ज्ञानाचे राजकारण

प्रकाश पवार
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

राज-रंग

भारतातील पर्यायी क्रांतिकारी राजकारणावरती गेल ऑम्वेट यांचा विलक्षण प्रभाव राहिला आहे. त्या जन्माने अमेरिकन होत्या. परंतु विचार आणि राजकारण या संदर्भात त्या भारतीय म्हणूनच जगभर ओळखल्या गेल्या. 

गेल ऑम्वेट साठीच्या दशकात (१९६३) भारतात आल्या. त्यांनी ऐंशीच्या दशकात (१९८३) भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कासेगाव (जि. सांगली) येथील डॉ. भारत पाटणकर यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी सातत्याने भारतातील पब्लिक इंटेलेक्चुअलच्या राजकारणाचे विविध कंगोरे राजकारणाच्या मध्यभागी आणण्याचा प्रयत्न केला.

पर्याय नागरी समाज
राजकारण  विविधांगी घडते. त्यामध्ये सत्ताकारण, समाजकारण, अर्थकारण अशी काही क्षेत्रे आहेत. यापैकी एक ज्ञानकारण क्षेत्र आहे. ज्ञान राजकारणाला आकार देते. ज्ञान पर्यायी राजकारण उभे करते. ज्ञान राजकारणाला अधिमान्यता देते. तसेच ज्ञान राजकारणाच्या अधिमान्यतेचा अंतही घडवते. अशाच ज्ञानाच्या क्षेत्रात ऑम्वेट गेल यांनी सत्तरीच्या दशकापासून भारतीय राजकारणाला  नवी दिशा दिली. त्यांनी पर्याय राजकारणाची संकल्पना विकसित केली. त्यांनी भारतातील नागरी समाजाला क्रांतिकारी चेहरा प्राप्त करून दिला. भारतीय राजकारणात नागरी समाजाची राजकीय धामधूम सतत राहिलेली आहे. सत्तरीच्या दशकामध्ये नागरी समाज व  राजकीय समाज असा आखाडा घडू लागला. सत्तेच्या राजकारणात गेल ऑम्वेट सक्रिय नव्हत्या. परंतु सत्तेच्या राजकारणाला लोकांच्या राजकारणात रूपांतरित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ऐंशीच्या दशकापासून पुढे भारतीय नागरी समाज दोन प्रकारांमध्ये विभागला गेला. एक, रूढीवादी नागरी समाज (conservative civil society) हा राजकारणाचा एक प्रकार उदयास आला. या प्रकारच्या नागरी समाजाचा त्यांनी त्यांच्या वैचारिक लिखाणात व चळवळीत प्रतिवाद केला. दोन, त्यांनी पर्यायी क्रांतिकारी नागरी समाजाची सातत्याने भूमिका मांडली. त्यांची पर्यायी क्रांतिकारी नागरी समाजाची संकल्पना बहुस्तरीय आहे. त्यांनी मार्क्स विचार, नव-मार्क्सवादी विचार, फुले विचार, आंबेडकर विचार, वारकरी विचार, बुद्धाचा विचार, पब्लिक बुद्धिजीवी यांचा एकत्रित विचार सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंत राजकारणाच्या संदर्भात मांडला. या अर्थाने त्यांनी बहुस्तरीय पर्यायी क्रांतिकारी नागरी समाजाची संकल्पना विकसित केली. गेल्या अर्धशतकात गेल ऑम्वेट यांनी भांडवलशाही, भ्रष्ट राजकारणाचा आणि रूढीवादी नागरी समाजाचा प्रतिकार केला. त्यांनी भारतीय राजकारणाला आणि नागरी समाजाला एक खरेखुरे परिवर्तनशील रूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. अशा या गेल ऑम्वेट यांनी काहीच दिवसांपूर्वी कासेगाव येथे अखेरचा निरोप घेतला. जागतिक राजकारणाला, भारतीय राजकारणाला, नागरी समाजाला त्यांनी समतावादी दिशा दिली, त्यांच्या प्रयत्नातून भारतीय राजकारणात समतावादी विचार पुढे गेला. 

क्रांतिकारी राजकारण
गेल ऑम्वेट यांनी सत्तरीच्या दशकात महात्मा फुले यांचे विचार आणि चळवळीवर संशोधन केले. तेव्हा महात्मा फुले यांचा क्रांतिकारी विचार राजकारणाचा मुख्य विषय झाला नव्हता. कारण साठीच्या दशकापासून पुढे  जाती अंताची चळवळ व विचार धूसर होत गेला. गेल ऑम्वेट यांच्या संशोधनामुळे महात्मा फुले यांचा जाती अंताचा विचार नव्या स्वरूपामध्ये पुढे आला. गेल ऑम्वेट यांनी १९७३ मध्ये संशोधन पूर्ण केले. त्यानंतर लाल निशाण पक्षाशी संबंधित सायंटिफिक सोशालिस्ट एज्युकेशन ट्रस्टने ‘कल्चरल रिव्होल्ट इन कलोनियल सोसायटी’ (१९७६) हे पुस्तक न्यायाच्या आणि ज्ञानाच्या राजकारणाचा भाग म्हणून पुढे आणले. पर्यायी राजकारणासाठी हे  पुस्तक लोकप्रिय ठरले. नव्वदीच्या दशकात त्यांचे संशोधन मराठीमध्ये ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ म्हणून प्रकाशित झाले (१९९५). त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारातील क्रांतिकारी नागरी समाजाचा विचार समकालीन राजकारणात मांडला. त्यांच्या या कामामुळे महात्मा फुले यांचे पर्यायी राजकारणाचे प्रारूप भारतीय आणि जागतिक पातळीवरती पोहोचले, तसेच महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी राजकारणाचा विचार तळागाळात नव्याने सुरू झाला. ऐंशीच्या दशकापासून पुढे कल्याणकारी राज्यसंस्थेचे स्वरूप बदलत गेले. ऐंशीच्या दशकापासून पुढे नव-उदारमतवादी राज्यसंस्था उदयास आली. या नव-उदारमतवादी राज्यसंस्थेच्या राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी त्यांची पुस्तके मैलाचा दगड ठरली. त्यांच्या ज्ञान क्षेत्रातील योगदानाने भारतातील क्रांतिकारी पर्यायी राजकारणाचा पाया व्यापक केला. 

पर्यायी बेगमपुरा राजकारण
गेल ऑम्वेट यांनी सातत्याने क्रांतिकारी पर्यायी राजकारणाची धारणा विकसित केली. त्यांनी जाती-अंत, वर्ग-अंत या गोष्टींचे पर्यायी राजकारण उभे केले. तसेच त्यांनी पितृसत्ताक कुटुंबसंस्थेच्या अंताचाही विचार मांडला. त्यांनी विकसित केलेल्या पर्यायी राजकारणाची निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. एक, त्यांनी ‘दलित अँड द डेमोक्रॅटिक रेव्होल्यूशन’ हे पुस्तक १९९४ साली लिहिले. या पुस्तकात त्यांनी लोकशाही प्रक्रियेत भारताचा विकास कसा झाला, या मुद्द्याचे सविस्तर विवेचन  केले. तसेच चळवळ आणि राजकारण यांच्यातील संबंधांचे विवेचनदेखील केले. ‘रीइन्व्हेस्टिंग रिव्होल्यूशन’ या पुस्तकामध्ये त्यांनी नवीन सामाजिक चळवळी या सामाजिक चळवळीपासून कशा वेगळ्या आहेत, याबद्दलची दृष्टी राजकारणाला व चळवळीला दिली. दोन, ‘वी विल स्मॅश धिस प्रिझन’, ’व्हॉयलन्स अगेन्स्ट वूमेन’, ‘जेंडर अॅण्ड टेक्नॉलॉजी’ या पुस्तकांमधून त्यांनी लैंगिक भेदभावाचे चिकित्सक विवेचन केले. तसेच त्यांनी स्त्री- पुरुष समानतेच्या राजकारणाची व चळवळीची चौकट स्पष्ट केली. तीन, ‘सिकिंग बेगमपुरा’ ही गेल ऑम्वेट यांची पर्यायी राजकारणाची क्रांतिकारी संकल्पना आहे. ‘सिकिंग बेगमपुरा: द सोशल व्हीजन ऑफ अँटी कास्ट इंटलेक्च्युअल्स’ (२००९) या पुस्तकात त्यांनी बेगमपुरा ही धारणा मांडली. त्यांनी बेगमपुरा राजकारणाची जातविहीन, वर्गविहीन, करमुक्त शहर आणि दुःखाशिवायचे जीवन ही चार वैशिष्ट्ये नोंदविली. या पुस्तकात त्यांनी रवीदासांच्या गाण्यातील ‘बेगमपुरा’ या संकल्पनेचा विस्तार केला. नेहरूंची आयडिया ऑफ इंडिया, महात्मा गांधीजींची रामराज्याची संकल्पना आणि संघ परिवारातील हिंदुत्वाची संकल्पना यांचा प्रतिवाद करून त्यांनी पब्लिक बुद्धिजीवींची ‘बेगमपुरा’ ही संकल्पना परिवर्तनाच्या राजकारणासाठी विकसित केली. त्यांनी ही संकल्पना तळागाळातील चोखामेळा, जनाबाई, कबीर, रविदास, तुकाराम, गोरा कुंभार, महात्मा फुले  इत्यादी सबाल्टन बुद्धिजीवींच्या विचारांचा विस्तार या स्वरूपात विकसित केली. त्यांच्या ज्ञान क्षेत्रातील कामगिरीमुळे डावे राजकारण कालसुसंगत झाले. तसेच भारतातील बुद्धाचा प्राचीन विचार, मध्ययुगातील पब्लिक बुद्धिजीवी, आधुनिक युगातील पब्लिक बुद्धिजीवी यांचा राजकारणात एकत्रित सांधा जोडला गेला. इथून पुढे त्यांची ही कामगिरी भारतात ज्ञानाच्या सत्तेची व ज्ञानाच्या राजकारणाची  वारसा म्हणून स्मरणात राहील.

संबंधित बातम्या