राजकारणाचा घटनात्मक स्रोत

प्रकाश पवार
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

राज-रंग

भारतात राजकारणाची निर्मिती कशी होते? या प्रश्नाचे उत्तर प्रचंड गुंतागुंतीचे आहे. परंतु भारतीय राज्यघटना हा राजकारणाच्या निर्मितीचा प्रमुख स्रोत आहे. 

भारतीय राज्यघटनेला वगळून राजकारण घडवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा खरेतर राजकारणाच्या निर्मितीच्या मुख्य स्रोताकडे दुर्लक्ष केले जाते. सोप्या शब्दांत राजकारण राज्यघटनेच्या रूळांवरून पुढे पुढे सरकत जात नाही, राजकारण बिगर घटनात्मक चौकटीमध्ये  घडत जाते. असा फेरबदल भारतीय राजकारणात घडलेला दिसतो. यामुळे भारतात राजकारण घडवणाऱ्या मूळ घटनात्मक स्रोताची शोकात्म कथा निर्माण झाली आहे. या कथेवर उपाय म्हणून ‘घटनात्मक नैतिकता’ हा पर्याय पुढे आलेला दिसतो. सर्वसामान्य लोक या गोष्टीची चर्चा करत असतात. एका अर्थाने ते घटनात्मक राजकारण आणि घटनात्मक नैतिकतेचा आदर्श पुन्हा घडावा अशी त्यांची भूमिका असते. याचा अर्थ राजकारण घटनात्मक असते. तसेच राजकारण घटनात्मक नैतिकतेच्या संदर्भातील असते. तरीही या राजकारणाच्या पुढे मोठे पेचप्रसंग आहेत. 

राजकारणाच्या स्रोतांमधील पेचप्रसंग

लोक बोलीभाषेत राजकारण ‘घसरले आहे’ असे म्हणतात. तर काही लोक, ‘लोकांच्या हिताचे राजकारण घडत नाही’ असे म्हणतात. विशेषतः काहींना राजकारण हे व्यक्तिगत आहे, असे वाटते. हे लोकांना आलेले राजकारणाचे आत्मभान चुकीचे नाही. परंतु लोकांना असे आत्मभान का आले? याची महत्त्वाची दोन कारणे आहेत. एक, राजकारण घटनात्मक स्रोताच्या आधारे घडावे, ही भारतीय राज्यघटनेची कल्पना आहे. भारतीय राजकारणाच्या संदर्भात राज्यघटनेचा मुख्य गाभा, राज्यघटनेची उद्देशपत्रिका, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वे, राज्यघटनेतील मूलभूत हक्क इत्यादींच्या संदर्भात राजकारणाची उभारणी केली जावी, अशी घटनेची धारणा आहे. कारण 

राज्यघटनेने राजकारण कसे उघडावे याबद्दलचा आराखडा दिलेला आहे. दोन, प्रत्यक्ष व्यवहारात राजकीय पक्ष आणि राजकीय नेते राजकारणाची निर्मिती जात, धर्म, भाषा, वंश, प्रदेश, उपप्रादेशिक आशा सामाजिक घटकांच्या आधारे करतात. मथितार्थ म्हणजे राजकारणाचा घटनात्मक स्रोत आणि राजकारणाचा प्रत्यक्ष व्यवहारातील सामाजिक स्रोत, यापैकी कोणाची निवड करावी हा खरा भारतीय राजकारणातील मुख्य राजकीय पेचप्रसंग आहे. भारतातील राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी राजकारणाचा घटनात्मक स्रोत निवडावा, याबद्दलचा आग्रह फार धरला जात नाही. या गोष्टीचा राजकीय परिणाम म्हणजे राजकारणात घटनात्मक नैतिकता पाळली जात नाही, असे सातत्याने दिसून आले. घटनात्मक नैतिकतेचा आग्रह धरला जात नाही. त्यामुळे भारतीय राजकारणाचा पोत अव्वल स्थानावरून दुय्यम स्थानाकडे सातत्याने घसरत गेला. याचे भान सर्वसामान्य लोकांना आलेले दिसते. परंतु लोक म्हणजेच नागरिक हेदेखील घटनात्मक स्रोताप्रमाणे राजकीय व्यवहार करत नाहीत. त्यामुळे कायद्याचे राज्य, निवडणूक प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रात घटनात्मक नैतिकतेच्या पुढे गंभीर पेचप्रसंग उभे राहिले आहेत. 

घटनात्मक नैतिकता

राजकारणाचे शुद्धीकरण कसे करावे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकारणाचे शुद्धीकरण म्हणजे राजकारणात घटनात्मक नैतिकतेचा आग्रह धरणे होय. या प्रकारच्या राजकीय प्रक्रियेचा आग्रह पुढील पद्धतीने धरला गेला. एक, या गोष्टीची सुरुवात विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकात झाली होती. कारण घटनात्मक नैतिकता ही संकल्पना प्रथम भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणाचा सार्वजनिक व्यवहार कसा घडावा या संदर्भात वापरली होती. सार्वजनिक राजकारण घडवताना त्या राजकारणाला घटनात्मक नैतिकतेचे नीतिनियम पाळता आले पाहिजेत. राजकारणाने घटनात्मक कायद्यांचे नियम पाळून त्या चौकटीमध्ये राजकारण करावे. यामुळे राजकारण हा मनमानी पद्धतीचा व्यवहार शिल्लक राहत नाही. दोन, समकालीन काळात सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक नैतिकता या गोष्टीवर २०१४पासून जास्त भर दिलेला दिसतो. घटनात्मक नैतिकता हा राजकारणाचा आखाडा आहे. घटनात्मक नैतिकतेच्या आखाड्यात राजकारणाचे डाव-प्रतिडाव, रणनीती, ध्येय धोरणे निश्चित करावीत. हा एक राजकारणाचा मूल्यात्मक आदर्श आहे. तसेच राजकारणाचे धडे घटनात्मक चौकटीत गिरविण्याची पद्धत आहे. हा आदर्श बाजूला ठेवून घटनात्मक पद्धतीने निवडून आलेले नेते बिगर घटनात्मक मार्गाने राजकारण करतात, तेव्हा खरेतर घटनात्मक नैतिकतेच्यापुढे मोठे आव्हान उभे राहते. अशा वेळी घटनात्मक नैतिकता म्हणून काही नेते पदाचा राजीनामा देतात आणि अलिप्त होतात. पदाचा राजीनामा देणे आणि अलिप्त होणे म्हणजे घटनात्मक नैतिकता पाळणे नव्हे. कारण घटनात्मक नैतिकतेचे राजकारण म्हणजे शासन व्यवहार करताना जबाबदारीचे पालन करणे होय. राजीनामा देणे म्हणजे राजकारणात जबाबदारी पाळली गेली नाही याची राज्यकर्त्याने दिलेली कबुलीच असते. 

राजकारणाची भाषाशैलीदेखील घटनात्मक असली पाहिजे. परंतु राजकारणाची भाषाशैली बिगर घटनात्मक असते. राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष नेहमी आक्रमक भाषा आणि हिंसक भाषा वापरतात. राजकारण म्हणजे ‘राडा’ किंवा राजकारण रस्त्यावर उतरून घडते अशी धारणा घटनात्मक नैतिकतेच्या चौकटीतील राजकारणाचा अंत घडविते. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, राजकारणाचे जातीयकरण, राजकारणाचे हिंसाकरण, व्यक्तिगत पातळीवरील हल्ले प्रतिहल्ले हा सर्व प्रकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणात दिसतो. यामुळे राजकारणात घटनात्मक नैतिकतेचा आग्रह धरणे ही एक क्रांतिकारी घटना आहे. राजकारणात घटनात्मक नैतिकतेचा आग्रह ही घटना राजकारणाच्या शुद्धीकरणाची नव्याने सुरुवात आहे. घटनात्मक नैतिकतेचा आग्रह केवळ सर्वोच्च न्यायालयाने धरणे पुरेसे नाही. घटनात्मक नैतिकता हा नागरिकांच्या परस्पर व्यवहारांमध्ये, राजकीय पक्षांच्या राजकीय व्यवहारात, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय व्यवहारात आणि सामाजिक राजकीय चळवळींच्या प्रत्यक्ष व्यवहारात कसा आणता येईल, हाच आजच्या राजकारणापुढील एक प्रचंड आव्हानात्मक प्रश्न आहे.  ‘ही जमीन माझी आहे. पण मी या भूमीचा नाही’, (२०२१) हे पुस्तक या प्रश्नाची उकल करणारे आहे. आजकालचे सत्ता संघर्षाचे राजकारण घटनात्मक नैतिकतेच्या चौकटीत घडवण्याची

चळवळ फार दुर्बळ आहे. या चळवळीची नव्याने आखणी करणे म्हणजेच राजकारणाला घटनात्मक रूळांवरती आणणे होय. थोडक्यात राजकारणाच्या घटनात्मक स्रोताकडे पुन्हा नव्याने वळले पाहिजे. राजकारणाचा घटनात्मक स्रोत विकसित केला पाहिजे, त्याची डागडुजी केली पाहिजे.

संबंधित बातम्या