सत्तेचा दुभंगलेला चिरेबंदी किल्ला

प्रकाश पवार
सोमवार, 6 डिसेंबर 2021

राज-रंग

ही कथा राजकीय अभिजन विरुद्ध राजकीय अभिजन अशा राजकीय संघर्षाची दिसते. यामुळे या कथेतील राजकीय अभिजन वर्ग दुहेरी भूमिका वठवित आहे. या वर्गाने ही द्विधा मनःस्थिती जाणीवपूर्वक घडवलेली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. याआधी देवेंद्र फडणवीस सरकारने पाच वर्ष पूर्ण केली होती. या दोन्ही सरकारांच्या कारभाराच्या शैलीमध्ये फरक दिसतो. तसेच २०१४च्या आधी पृथ्वीराज चव्हाण सरकारने राज्यकारभार केला होता. त्यांची राज्यकारभाराची शैली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन सरकारांपेक्षा वेगळी होती. परंतु पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या तीनही सरकारांच्या काळात राजकीय अभिजन वर्गातील अंतर्गत संघर्ष, ही एक गोष्ट समान दिसून आली. विशेषतः राजकीय अभिजनांच्या राजकीय हितसंबंधांचा संघर्ष प्रथम स्थानावरती आलेला दिसतो. ही कथा राजकीय अभिजन विरुद्ध राजकीय अभिजन अशा राजकीय संघर्षाची दिसते. यामुळे या कथेतील राजकीय अभिजन वर्ग दुहेरी भूमिका वठवित आहे. या वर्गाने त्याची द्विधा मनःस्थिती जाणीवपूर्वक घडवलेली आहे. हीच सत्तेच्या चिरेबंदी किल्ल्याची दुर्दशा आहे.

ठाकरे सरकार आणि राजकीय अभिजन वर्ग
राजकीय अभिजन वर्ग म्हणजे राजकारण करणारा वर्ग. या वर्गामध्ये सर्व नेत्यांचा समावेश करता येईल. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील दोन वर्षांमध्ये सर्व अभिजन वर्ग एकसंध नव्हता. राजकीय नेतृत्वाला त्यांचे हितसंबंध नीटनेटके समजतात. त्यामुळे राजकीय नेतृत्वामध्ये ऐक्य आणि एकोपा असतो. परंतु उद्धव ठाकरे यांच्या या दोन वर्षांच्या काळामध्ये एकूण सर्वच आमदारांमध्ये एकमत नव्हते. त्यांच्यामधील ऐक्य जवळपास राजकीय संघर्षात रूपांतरित झाले होते. पक्षांच्या सीमारेषा नेतृत्वाच्या हितसंबंधांना बाधक ठरत नाहीत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातील दोन वर्षांमध्ये राजकीय नेतृत्वाचे चार गट पडले. शिवसेनेचे राजकीय नेतृत्व, भाजपचे राजकीय नेतृत्व, काँग्रेसचे राजकीय नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय नेतृत्व. या चार पक्षांमध्ये राजकीय संघर्ष होता. परंतु हा संघर्ष केवळ पक्ष पातळीवरील नव्हता. पक्षाच्या व्यतिरिक्त केवळ व्यक्तिगत पातळीवरील हितसंबंधांचा हा संघर्ष होता. यामुळे राजकारणाच्या स्वरूपात मुख्य तीन बदल दिसले. एक, राजकीय अभिजन हा वर्ग एकसंध राजकारण करत नाही. त्यांच्या राजकारणात फूट पडली आहे. दोन, राजकीय अभिजन हा वर्ग पक्षीय राजकारणदेखील फार कमी करतो. पक्षांपेक्षा इतर गोष्टींना महत्त्व देतो. तीन, राजकीय अभिजन वर्ग हा व्यक्तिगत पातळीवरील राजकारण जास्त करतो. यामुळे राजकीय पक्ष आणि राजकीय अभिजन या दोन्ही पातळ्यांवरील राजकारण या काळात सैरभैर झालेले दिसत होते. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये राजकीय अभिजन वर्गाच्या अंतर्गत एक प्रकारचा सावळागोंधळ दिसत होता. तरीही जनतेला त्याचे फार सुखदुःख नाही, तसेच सरकारमधील मंत्र्यांनाही दिसत नाही. यामुळे प्रसारमाध्यमांना सरकारबद्दल शंका येत राहते. याचे मुख्य कारण अभिजनांमधील फूट हेच आहे.

देवेंद्र फडणवीस सरकार (२०१४-२०१९)
राजकीय अभिजन वर्गातील सावळा गोंधळ उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सरकारमध्येही दिसून आला होता. त्या काळातील महत्त्वाचे उदाहरण म्हणजे एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. हे केवळ एकच उदाहरण नव्हे तर फडणवीस यांच्या कार्यकाळात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातील नेतृत्वामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. हा तणाव केवळ दोन पक्षांमधील नव्हता. या  संघर्षाची मुळे या दोन्ही पक्षांच्या ध्येयधोरणाच्या बाहेर गेली होती. त्यामुळे त्या काळात तीन वेगवेगळे वैशिष्ट्ये दिसून आली. एक, शिवसेना हा पक्ष सत्ताधारी असूनदेखील फडणवीस सरकारवर टीका करत होता. दोन, आपल्या पक्षातील नेतृत्वाचा गट फार पक्ष बांधीलकी मानत नाही, हे शिवसेनेच्या तेव्हाच लक्षात आले होते. तीन, विचारप्रणाली आणि अभिजन यांचा फारसा संबंध नसतो. त्यामुळे विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध पक्ष वगळूनदेखील मैत्रीच्या धाग्यांनी विणले गेलेले होते. म्हणजेच थोडक्यात अभिजन वर्ग व्यक्तिगत पातळीवरती राजकीय व्यवहार करतो, याचीही उदाहरणे दिसतात. 

पृथ्वीराज चव्हाण सरकार
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस या दोन सरकारांच्या आधी पृथ्वीराज चव्हाण सरकारमध्ये अभिजन वर्गातील फूट दिसून आली होती. चव्हाण सरकारच्या काळात नेतृत्वातील सुंदोपसुंदी धारदार झालेली दिसत होती. याची निवडक दोन उदाहरणे महत्त्वाची आहेत. एक, पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार हे दोन्ही नेते तेव्हा राजकीय अभिजन म्हणून एकसंध नव्हते. अजित पवार काही काळ मंत्रिमंडळातून बाहेर गेले होते. त्यांची चौकशीही झाली होती. दोन, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती यांची मोडतोड झाली. तेव्हा काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला एका अर्थाने घडलेल्या घडामोडींबद्दल फार गांभीर्य नव्हते. उलट स्वतंत्र ताकद आजमावण्याची संधी म्हणून ते या घटनेकडे पाहत होते. यामुळे अभिजन वर्गाला त्यांचे हितसंबंध नीटनेटके समजतात ही गोष्ट धूसर झालेली दिसत होती. लोकशाही पद्धतीच्या राजकारणात नेत्यांचा एक छोटा गट असतो. ते सर्व नेते त्यांच्या हितसंबंधांसाठी एकत्रित येतात. त्यांच्या विरोधातील राजकारणांचा पराभव  करतात. परंतु तशी वस्तुस्थिती आज सुस्थितीत दिसत नाही. 

राजकीय अभिजन वर्ग व्यापक अर्थानेदेखील परस्परांच्या विरोधात राजकीय कृती करताना आढळतो. ही घडामोड व्यापक राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. परंतु लोकचळवळी या घडामोडींकडे या दृष्टिकोनातून पाहत नाहीत. लोकचळवळीचा विस्तार करण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण होणे ही एक संधी असते. ही संधी ओळखणे आणि त्या संधीचा सदुपयोग करून घेणे या दोन्ही गोष्टी कमीत कमी महाराष्ट्रात तरी गेल्या दहा पंधरा वर्षात घडलेल्या नाहीत. या उलट राजकीय अभिजनांची सत्ता म्हणजे चिरेबंदी किल्ला आहे. तो चिरेबंदी किल्ला कायमस्वरूपी एकसारखाच असतो, अशी धारणा ठेवून चळवळींचे राजकारण घडते. थोडक्यात चळवळींनीदेखील अभिजनांच्या चिरेबंदी किल्ल्याला भेगा पडलेल्या समजून घेतल्या नाहीत. ही कथा पृथ्वीराज चव्हाण सरकार पासून ते उद्धव ठाकरे सरकारपर्यंत एक सारखी सलगपणे आपणास दिसत.

संबंधित बातम्या