राज्यगीत व राजकारण...

प्रकाश पवार
शनिवार, 8 जानेवारी 2022

राज-रंग

घटक राज्ये राष्ट्रक, राष्ट्र आणि राष्ट्रवाद अशा तीन प्रक्रिया भाषा आणि राज्यगीतांच्या मदतीने घडवितात.

राज्यातील सरकार आणि सरकार चालविणारा पक्ष विविध बाजूंनी राजकारण घडवत असतो. या प्रकारचे राजकारण घडवणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी पहिला घटक भारत आणि भारतातील घटक राज्य यांच्यातील सहसंबंध हा आहे. तर दुसरा घटक विविध राज्यातील सहसंबंध हा आहे. पन्नाशीच्या दशकात भाषावार राज्य पुनर्रचना हा घटक  राजकारण घडवत होता. तर  समकालीन दशकात यामध्ये बदल झाला आहे. ह्या गोष्टीची नव्याने सुरुवात गेल्या दशकापासून झाली (२०११). हा बदल साहित्य-संस्कृती, आणि राजकारण यांच्या एकत्रित संबंधातून होत गेला. याबद्दलच्या कथा गुजरात, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड अशा काही राज्यांमध्ये घडल्या आहेत. तर काही राज्यांमध्ये घडत आहेत. आकाराने मोठी घटक राज्ये व  छोटी घटक राज्येदेखील राष्ट्रक (ऐक्य) व राष्ट्रवाद  यांची कथा निर्माण करतात. त्या आधारे राजकारण घडवितात. गेल्या दशकात या गोष्टीची सुरुवात ‘जय जय गर्वी गुजरात...’ या गीतापासून झाली होती (२०११). तर यावर्षी ‘सोने की भूमी मणिपूर... या गीतापर्यंत ही प्रक्रिया चालत आलेली आहे. आसाममध्येदेखील देशवाचक राज्यगीत आहे. 

मोठी घटक राज्य आणि राज्यगीत

मोठी घटक राज्ये राष्ट्रक, राष्ट्र आणि राष्ट्रवाद अशा तीन प्रक्रिया भाषा आणि राज्यगीतांच्या मदतीने घडवितात. याबद्दलची चार  महत्त्वाची उदाहरणे दिसतात. एक, महाराष्ट्र राज्याच्या नावातच ‘राष्ट्र’ आहे व इतर घटक राज्यांच्या नावात राष्ट्र नाही, असा विचार राजकीय प्रक्रियेत मांडला जातो. दोन,  मध्यप्रदेशात राष्ट्रवादाच्या आधारे राजकारण घडवण्याची नवीन परंपरा २०११पासून सुरू झाली. जून २०११मध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान  यांनी राष्ट्रगीताबरोबर राज्यगीत गाण्याची परंपरा सुरू केली. ‘सुख का दाता, सबका साथी, शुभ का संदेश है, मां की गोद, पिता का आश्रम, मेरा मध्यप्रदेश है...’ या गीतामध्ये राष्ट्रकाची (एकोपा) धारणा घडवलेली आहे. म्हणजे मध्यप्रदेशामध्ये ऐक्य आणि एकोपा आहे. ही राष्ट्रकाची धारणा राष्ट्रवादाशी जोडून घेतलेली आहे. एकूण समान हितसंबंध आणि आकांक्षांचे गुणगान करत राष्ट्रवादाची आखणी केलेली दिसते. तीन, बिहार राज्याच्या स्थापनेला २१ मार्च २०१२रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यगीत जाहीर केले. सत्य नारायण यांनी लिहिलेल्या गीतास मुख्यमंत्र्यांनी राज्यगीत म्हणून लोकार्पित केले. ‘मेरे भारत के कंठहार, तुझको शत शत वंदन बिहार, तू वाल्मीकि रामायण, तू वैशाली का लोकतंत्र...’  हे बिहार राज्याचे गीत आहे. या गीताच्या माध्यमातून बिहारमध्ये राष्ट्रक (ऐक्य) या स्वरूपात राजकारण नितीश कुमार यांनी घडवले. तसेच त्यांनी राष्ट्रक आणि राष्ट्रवाद यांचा सहसंबंध जोडला. यामुळे नितीश कुमार यांचे राजकारण सांस्कृतिक ‌राष्ट्रवादाच्या पायावर उभे राहिले. तसेच राष्ट्रवादाच्या चौकटीत घडू लागले.  चार, या प्रक्रियेपासून दक्षिण भारतदेखील दूर राहिला नाही. पूर्व भारत, उत्तर भारत याप्रमाणेच दक्षिण भारतातदेखील ही प्रक्रिया घडली.  कर्नाटकने २००४मध्ये ‘विजयी भारत माता की बेटी...’ हे राज्यगीत स्वीकारले. कर्नाटक राज्यामध्ये झेंडा समितीची स्थापना करण्यात आली होती. या झेंडा समितीने पिवळा, पांढरा व लाल रंगाचा झेंडा तयार केला. तेव्हा सिद्धरामय्या राज्याचे मुख्यमंत्री होते. आज-काल कर्नाटकातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमध्ये पिवळा, पांढरा, लाल झेंडा दिसतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमा प्रश्नांवरील वादविवादात या झेंड्याचे दर्शन होत राहते. तसेच बंगळूर शहरात या झेंड्याच्या मदतीने कर्नाटक अस्मिता घडवली जात आहे. पाच, आसाम राज्यामध्ये २०१३मध्ये ‘ओ मुर अपूनार देश...’ हे गीत राज्यगीत म्हणून स्वीकारले. तरूण गोगोई मुख्यमंत्री असताना त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. काँग्रेस, भाजप आणि घटक राज्य पक्षांनी राज्यगीतांच्या मदतीने प्रादेशिक अस्मितांचे राजकारण उभे केले. कारण कर्नाटक आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये एका अर्थाने काँग्रेस पक्षाचा पुढाकार होता. मध्यप्रदेशात भाजपचा पुढाकार होता. तर बिहारमध्ये नितेश कुमार यांच्या पक्षाचा पुढाकार होता. 

छोटी घटक राज्य व राज्यगीत

मोठ्या घटक राज्यांच्या प्रमाणे छोटी घटक राज्येदेखील ऐक्य घडविण्यासाठी अशाच प्रकारच्या गीतांचा उपयोग करतात. याबद्दलची दोन उदाहरणे महत्त्वाची आहेत. एक, छत्तीसगड हे छोटे राज्य आहे. या राज्याने नरेंद्र देव वर्मा यांचे गीत राज्यगीत म्हणून स्वीकारले. ‘अरपा पैरी के धार महानदी के अपार इंद्रावती हर पाखाराम तोरे...’ या गीतात छत्तीसगडचे सांस्कृतीक वर्णन केलेले आहे. यामधूनदेखील राष्ट्रक ही धारणा जन्मास येते. या गोष्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादाच्या भोवती राजकारण घडवले जाते. दोन, उत्तराखंडामध्ये राष्ट्रवादाचा संबंध राज्यगीताशी जोडण्यात आलेला आहे. ‘उत्तराखंड देवभूमी, मातृभूमी, शत शत वंदन अभिनंदन...’ हे राज्यगीत देवभूमी आणि मातृभूमी यांची सांधेजोड करते. थोडक्यात मोठ्या घटक राज्यांमध्ये आणि छोट्या घटक राज्यांमध्येदेखील चार प्रकारचे राजकारण घडत आहे. एक, या प्रकारच्या राज्यगीतांच्या कथांमधून राष्ट्रक (ऐक्य) ही धारणा उदयाला येत आहे. दोन, या गीतांच्या मधून राष्ट्रक ही धारणा राष्ट्रवादाची पूर्वअट आहे असे दिसते. आधी राष्ट्रक जन्माला येते. नंतर राष्ट्रवाद उदयास येतो. या गोष्टींसाठी राज्यगीत आणि राज्याच्या झेंड्याचा आग्रह धरलेला दिसून येतो. तीन, ही एक आजच्या काळातील राजकारणाची मुख्य कहाणी झाली आहे. या चौकटीतील घटना विविध राज्यांत घडत आहेत. आपल्या राज्याचा गौरव आणि इतर राज्यांबद्दल स्पर्धा असे त्यास रूप आले आहे. चार, समान भाषा, संस्कृती, धर्म, वंश या घटकांमुळे ज्या समाजात एकीची भावना निर्माण झाली आहे, असा समाज म्हणजे राष्ट्रक होय. या समाजात स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करण्याची आकांक्षा अद्याप निर्माण झालेली नसते.  त्यामुळे राष्ट्रक ही संकल्पना भारतीय (राष्ट्रीय) या संकल्पनेपेक्षा वेगळी आहे.  परंतु यामध्ये एक धोका असतो. तो म्हणजे  राष्ट्रकामध्ये स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करण्याची आकांक्षा निर्माण होते, तेव्हा तो समाज राष्ट्र बनतो. म्हणजेच राज्यांनी राज्य गीतांमधून राष्ट्रकापर्यंतच राजकारण करावे. भारतीय राष्ट्र संकल्पनेला आव्हान निर्माण होईल असे राजकारण करू नये, ही एक सूक्ष्म अशी लक्ष्मणरेषा आहे. ही प्रक्रिया आसाममध्ये १९२७मध्ये सुरू झाली. आंध्र प्रदेशात १९५६मध्ये या प्रक्रियेचा आग्रह धरला. तर तामिळनाडूने १९७०मध्ये ही प्रक्रिया सुरू केली. २०२१मध्ये ही प्रक्रिया मणिपूरसारख्या राज्यामध्येदेखील पसरलेली दिसते. ओडिशाने ‘वंदे उत्कल जननी...’ हे गीत २०२०मध्ये स्वीकारले. म्हणजेच गेल्या दशकापासून ही प्रक्रिया जास्त गतीने घडू लागली असे दिसते.

 

संबंधित बातम्या