जनांचे राजकारण

प्रकाश पवार
सोमवार, 10 जानेवारी 2022

राज-रंग

राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि कार्य काळाच्या संदर्भात वेगळे घडले असले तरी समाज परिवर्तनाच्या संदर्भात त्यांच्या विचारांमध्ये महत्त्वाची साम्यस्थळे दिसतात. 

राजकारण हा अलीकडे उत्सव झालेला आहे. कधी कधी राजकारणाचा उत्सव हा  महोत्सवात रूपांतरित होतो. परंतु त्यामध्ये राजकारणाचा आशय नसतो. मात्र यास जानेवारीतील पहिला पंधरवडा अपवाद ठरतो. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच  मानव मुक्तीच्या सांस्कृतिक राजकारणाची सुरूवात होते. पहिल्याच पंधरावड्यापासून सांस्कृतिक राजकारणाला नव्याने आकार दिला जातो. तीन जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. बारा जानेवारीला राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते. सहाजिकच या पंधरवड्यात या राष्ट्रीय  प्रतिमांच्या व विचारांच्या संदर्भात अभिजनांऐवजी जनांच्या राजकारणाचा उत्सव साजरा केला जातो. राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद  यांनी समाजकारणाला अग्रक्रम दिला होता. त्यांनी राजकारण आणि समाजकारण यांचा एकत्रित विचार केला. म्हणजेच समाज परिवर्तनाच्या राजकारणावर त्यांचा जास्तीत जास्त भर होता. जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि कार्य काळाच्या संदर्भात वेगळे घडले असले तरी समाज परिवर्तनाच्या संदर्भात त्यांच्या विचारांमध्ये महत्त्वाची साम्यस्थळे दिसतात. शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि सामाजिक चळवळी जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता हा विचार राबविण्याचा आग्रह धरतात. प्रत्येक वृत्तपत्रातील कार्यक्रमांचे बातमीपत्र या तीन कार्यक्रमांच्या नोंदींविना पूर्ण होत नाही, म्हणून  एका अर्थाने हे जनांचे (लोक) राजकारण असते. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच लोक राजकारणाची सुरुवात ठरते. या अर्थाने ही जनांच्या  राजकारणाची एक कथा आहे.

समाज पुनर्रचनेचा विचार
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांनी समाजाची पुनर्रचना करण्यासाठी कार्य केले तसेच विचार मांडले. याची काही चित्तवेधक उदाहरणे आशयाच्या संदर्भात समान दिसतात. एक, जिजाऊंनी नवीन गावे वसवली होती. उदा. देहू गावाच्या जवळ सांगुडे हे गाव वसवले होते. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा प्रयोग केला होता. तर स्वामी विवेकानंदांनी बहिष्कृतांच्या शिक्षणासाठी आग्रह धरलेला होता. या तीनही गोष्टी एका अर्थाने समाजामध्ये परिवर्तन घडविणाऱ्या होत्या.  

दोन, जिजाऊंनी हिंदू-मुस्लिम असा फरक केला नाही. त्यांनी हिंदूंच्या बरोबर मुस्लिम सैनिकांवरती  विश्वास ठेवला. सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर फातिमा शेख या शिक्षिका  होत्या. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकन सोशल सायन्सच्या वार्षिक अधिवेशनात हिंदुस्थानच्या इतिहासातील ‘इस्लामचे योगदान’ या विषयावर व्याख्यान दिले होते. मानवेंद्रनाथ रॉय यांनी याच या व्याख्यानातील आशयाशी सुसंगत शीर्षकाचे इंग्रजी पुस्तक लिहिले. अशी नोंद दत्तप्रसाद दाभोळकर यांनी  केली आहे. मुख्य मुद्दा म्हणजे जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांनी धार्मिक सलोख्याच्या (Religious harmony) विचारांना अग्रक्रम दिला होता. तीन,  जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद  यांनी स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला होता. सार्वजनिक जीवनात महिलांनी सहभाग घेऊ नये, असे सामाजिक व धार्मिक बंधन होते. जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेत सहभाग घेऊन सामाजिक व धार्मिक बंधन  प्रत्यक्ष कृतीने दूर केले. त्यांनीच महिलांच्या स्वातंत्र्याची सुरुवात आधुनिक पूर्वकाळात सुरू केली. आधुनिक काळात सावित्रीबाई फुले यांनी सार्वजनिक कार्यात जोतिराव फुले यांच्याबरोबर सार्वजनिक कार्य सुरू केले. त्यांनी एका अर्थाने जिजाऊंच्या कार्याचा दुसरा टप्पा सुरू केला. स्वामी विवेकानंद यांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. स्वामी विवेकानंद यांनी महिलांच्या सामाजिक सुधारणांबाबत उदारमतवादी भूमिका मांडली होती. याबद्दलचे विवेचन दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले आहे. म्हणजेच थोडक्यात जात, धर्म, स्त्री-पुरुष या क्षेत्रातील विषमता दूर करण्याचा मोठा प्रकल्प राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या कृती कार्यक्रमात होता. हा विचार खेड्यांची पुनर्रचना समतेच्या आधारावर करण्याचा होता. 

समतेचा आग्रह
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांनी सामाजिक व आर्थिक समतेचा आग्रह त्यांच्या कृती कार्यक्रमात धरलेला होता. जिजाऊ यांनी प्रत्यक्ष राजकीय घडामोडींमध्ये भाग घेतला. त्यांनी स्वराज्याचा विचार मांडला. त्यामुळे त्यांनी एका अर्थाने स्त्री-पुरुष विषमता नाकारली. त्यांनी त्यांच्या जीवनावरती लावलेली धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय बंधने दूर केली. स्वराज्याच्या स्थापनेच्या आधी जिजाऊंनी सामाजिक क्रांती घडवलेली होती. जिजाऊंनी घडवलेल्या  सामाजिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हिंदुस्थानातील तीन राजे रयतेचे राजे होते असा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यापैकी एक होते, असे विवेकानंदांचे मत आहे. म्हणजेच महिलांना आणि रयतेला समता देणारा विचार व कृती कार्यक्रम जिजाऊंनी आखलेला होता. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री पुरुष समतेचा विचार विकसित केला. त्यांनी स्त्री शिक्षण या गोष्टीचा पुरस्कार पुरुषांच्या बरोबर महिलांसाठीही केला. त्यांनी  महिलांना माणूस बनविण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे मानले. म्हणजेच स्त्रियांसाठी मानवी हक्कांचा त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग केला होता. स्वामी विवेकानंद यांनी सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार केला. यामुळे खुद्द स्वामी विवेकानंद स्वतःला मी समाजवादी आहे असे म्हणत असत, असा उल्लेख १ नोव्हेंबर १८९६च्या पत्रात केलेला आहे. तसेच स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंद्रनाथ यांनी माझा भाऊ समाजवादी आहे, असे लिहिलेदेखील आहे. आर्थिक गरिबीबद्दल त्यांनी भाष्य केले होते. म्हणजेच जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये समतेचा विचार खूप खोलवर मुरलेला होता. 

जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा विचार दिसतो. नवीन वर्षामध्ये नवीन राजकारणाला सुरुवात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन विचारांच्या आग्रहापासून होते. राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांना राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद  यांनी एकत्रित जोडले होते. त्यामुळे यांच्या विचारांचा उत्सव वेगवेगळा साजरा करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा महोत्सव एकत्रितपणे साजरा करणे हे औचित्यपूर्ण ठरते.

संबंधित बातम्या