आम आदमी राजकारण...

प्रकाश पवार
सोमवार, 24 जानेवारी 2022

राज-रंग

या शतकातील दुसऱ्या दशकात ‘आम आदमी’ या संकल्पनेच्या राजकारणाचा दुसरा टप्पा सुरू झाला. काँग्रेस पक्षाला विरोध करून ‘आम आदमी’ हा नवीन पक्ष स्थापन झाला. आता या शतकातील तिसरे दशक सुरू झाले आहे. या दशकात ‘आम आदमी’ या संकल्पनेच्या राजकारणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात पंजाबमध्ये ‘आम आदमी विरुद्ध आम आदमी’ असा राजकीय आखाडा उभा राहिला आहे. म्हणजेच पंजाबचे राजकारण  ‘आम आदमी विरुद्ध आम आदमी’ या  चौकटीमध्ये घडविण्याचा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.

राजकारणात विसाव्या शतकात ‘लोक’ आणि एकविसाव्या शतकात ‘आम आदमी’ या संकल्पना लोकप्रिय झाल्या. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी राजकारणात ‘लोक’ ही संकल्पना पुढे आणली. विशेषतः ‘आम्ही भारतीय लोक’ (We the people of India) या संकल्पनेवर घटनाकारांनी भर दिला. परंतु एकविसाव्या शतकात  राजकारण करण्यासाठी ‘आम आदमी’ ही संकल्पना वापरण्याचा कल वाढलेला दिसतो (‘गरीब आदमी’, ‘तिसरा आदमी’). या शतकाच्या पहिल्या दशकात, ‘काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ’ ही घोषणा वापरण्यात आली. ‘आम आदमी’ संकल्पनेच्या राजकारणाचा हा आरंभीचा टप्पा होता (२००१-२०१०). समकालीन शतकातील दुसऱ्या दशकात ‘आम आदमी’ या संकल्पनेच्या राजकारणाचा दुसरा टप्पा सुरू झाला (२०११-२०२०). काँग्रेस पक्षाला विरोध करून ‘आम आदमी’ हा नवीन पक्ष स्थापन झाला. त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव केला. सध्या (२०२१ पासून) समकालीन शतकातील तिसरे दशक सुरू झाले आहे. या दशकात ‘आम आदमी’ या संकल्पनेच्या राजकारणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्यात पंजाबमध्ये ‘आम आदमी विरुद्ध आम आदमी’ असा राजकीय आखाडा उभा राहिला आहे. म्हणजेच पंजाबचे राजकारण  ‘आम आदमी विरुद्ध आम आदमी’ या  चौकटीमध्ये घडविण्याचा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांचा प्रयत्न असल्याचे दिसते. या कथेत नेतृत्व आणि विविध प्रश्न यांना मध्यवर्ती ठेवलेले दिसते. यामुळे ‘आम आदमी’ या संकल्पनेच्या राजकारणाचा तिसरा कंगोरा तीक्ष्ण होताना दिसतोय.

आम आदमी विरोधी अभिजन अंतराय 
पंजाबच्या राजकारणात ‘आम आदमी’ आणि ‘अभिजन’ अशा दोन छावण्यांमध्ये राजकारण घडत आहे. त्यास अंतरायाचे राजकारण म्हटले जाते. या प्रकारचे राजकारण काँग्रेस अंतर्गत देखील सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत या राजकारणाची सुरुवात जवळपास दोन अडीच वर्षांपासून सुरू झाली होती. या संकल्पनेच्या आधारे काँग्रेस पक्षात तीन पद्धतीने राजकीय प्रक्रिया घडत आहे.  एक, चरणजितसिंग चन्नी  यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना वेळोवेळी विरोध केला आहे. चरणजितसिंग चन्नी आम आदमी आणि अमरिंदर सिंग राजा (अभिजन) असे राजकीय अंतरायाचे (political cleavages) सूत्र त्यांनी विकसित केले आहे. लोक आपल्या बरोबर आहेत, असा चरणजितसिंग चन्नी यांचा दावा आहे. दोन, चरणजितसिंग चन्नी  आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामध्ये एक अबोल राजकीय अंतराय सुरू झालेला आहे. सिद्धू यांनी अनेक वेळा चन्नी सरकारला अडचणीत आणले आहे. त्यामुळे चरणजितसिंग चन्नी हे ‘आम आदमी’ आणि नवज्योतसिंग सिद्धू हे ‘अभिजन’ अशी प्रतिमा पंजाबच्या राजकारणात उभी राहिली आहे. विशेषतः चन्नी हे काही काळापुरते मुख्यमंत्री आहेत, निवडणुकीनंतर सिद्धू मुख्यमंत्री होतील, अशाप्रकारचे आकलन पंजाबमध्ये आहे. परंतु चन्नी यांच्या मते हा निर्णय पंजाबची जनता घेणार आहे. तसेच हा निर्णय हायकमांड घेणार आहे. म्हणजेच थोडक्यात काँग्रेस पक्षांतर्गत आम आदमी विरोधी अभिजन असा संघर्ष सुरू आहे. तीन, चन्नी यांनी स्वतःची प्रतिमा ‘पंजाबी आम आदमी’ अशी मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे राजकारण खुद्द काँग्रेस मधील अभिजनांच्या विरोधातील आहे. या तीन राजकीय प्रक्रियांमुळे पंजाबच्या राजकारणात काँग्रेस अंतर्गत चरणजितसिंग चन्नी या नेतृत्वाचा उदय झालेला आहे. काँग्रेस पक्षात त्यांचे नेतृत्व ‘आम आदमी’ या संकल्पनेच्या भोवती  उभे राहत आहे. 

पंजाबी आम आदमी विरोधी बाहेरील आम आदमी
चन्नी  यांनी केवळ ‘आम आदमी’ नव्हे तर ‘पंजाबी आम आदमी’ अशी प्रतिमा रचण्यास सुरुवात केली आहे. ‘पंजाबी आम आदमी’ या संकल्पनेत दोन अस्मितांचे एकत्रीकरण झालेले आहे. एक म्हणजे त्यांनी ‘पंजाबी’ ही अस्मिता अधोरेखित केलेली आहे. तसेच ते राजकारणात गुरु गोविंदसिंग यांची भाषा वापरतात. दुसरे म्हणजे त्यांनी ‘आम आदमी’ ही अस्मिता देखील अधोरेखित केलेली आहे. पंजाबी आणि आम आदमी या दोन संकल्पनांचे रसायन त्यांनी विकसित केले आहे. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्या विरोधात लढण्यासाठी ताकद त्यांनी या संकल्पनेतून शोषून घेतली आहे. विशेषतः ‘पंजाबी आम आदमी’ ही संकल्पना भाजपच्या आणि आम आदमी पक्षाच्या मुद्द्यांच्या विरोधात मांडली जात आहे. याची महत्त्वाची दोन उदाहरणे दिसतात. एक, चन्नी यांचे राजकारण आम आदमी पक्षाच्या विरोधातील आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांचे राजकारण चन्नी यांच्या विरोधातील आहे. केजरीवाल यांनी, ‘चन्नी आम आदमी पक्षाचे मुद्दे घेत आहेत’, असा आरोप केला आहे. तर चन्नी यांनी केजरीवाल यांना पंजाबच्या बाहेरील ठरवले आहे. केजरीवाल खरे पंजाबी आम आदमी नाहीत अशी भूमिका त्यांनी  मांडली. यामुळे ‘पंजाबी आम आदमी’ विरुद्ध ‘बाहेरील (उपरे) आम आदमी’ असा एक अंतराय राजकीय प्रक्रिया घडवत आहे. दिल्लीच्या राजकारणाने वीज व पाणी हे प्रश्न सोडविले. यापेक्षा जास्त संवेदनशीलपणे पंजाबने हे प्रश्न  सोडविले असा दावा चन्नी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगेंद्र यादव, कुमार विश्वास यांच्यानंतर चन्नी यांनी केजरीवाल यांची राजकीय चिकित्सा सुरू केली.  आर्थिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. यामुळे चन्नी यांचे संघर्षशील स्वरूपाचे नेतृत्व पुढे आले. दोन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व भारतात  लोकप्रिय आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित झालेल्या सुरक्षेच्या प्रश्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा  झाली. पंतप्रधान विरुद्ध चन्नी अशी चर्चा पंजाबमध्ये झाली, तशीच ती चर्चा पंजाबच्या बाहेरही झाली.  

मथितार्थ म्हणजे ‘आम आदमी’ ही संकल्पना एकविसाव्या शतकातील तीनही दशकांमध्ये राजकारण घडवताना दिसते. ‘आम आदमी’ संकल्पना ही आत्ता एकाच अर्थाचे राहिलेली नाही. त्या संकल्पनेचा अर्थ या तीन दशकात तीन वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होत गेला. आरंभीचा अर्थ साटेलोटे भांडवलशाहीला विरोध म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी वापरला. त्यानंतर काँग्रेसच्या राजकारणाला विरोध म्हणून आम आदमी पक्षाने ‘आम आदमी’ ही संकल्पना वापरली. तर समकालीन दशकात  चरणजितसिंग चन्नी यांनी अभिजन वर्गाला विरोध आणि राज्याबाहेरील नेतृत्वाला विरोध या अर्थाने ‘आम आदमी’ ही संकल्पना राजकारणात गतिमान केलेली दिसते. विशेष म्हणजे ते अनुसूचित जाती या वर्गातील असल्याने त्यांचा तळागाळाशी संबंध आहे. तसेच ते गुरु गोविंदसिंग यांच्या वचनांचे दाखले देऊन बोलत आहेत. यामुळे त्यांचा ‘आम आदमी’चा दावा हा तिसरा टप्पा ठरतो.

 

संबंधित बातम्या