निमशहरी राजकारणाचे नवीन प्रारूप

प्रकाश पवार
सोमवार, 31 जानेवारी 2022

राज-रंग

महानगरांच्या तुलनेत नगरपंचायतींचे राजकारण निमशहरी पद्धतीने घडत जाते. निमशहरी भागांमध्ये नव्याने सेवाक्षेत्राचे हितसंबंध निर्माण झाले आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील वर्ग आणि ग्रामीण मध्यमवर्ग यांच्यामध्ये सत्तास्पर्धा असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे. 

महाराष्ट्रात नुकत्याच १०६ नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यातल्या पाली, देहू, महाळुंग-श्रीपूर, वैराग, नातेपुते आणि तीर्थपुरी या सहा नगरपंचायती नव्याने निर्माण करण्यात आल्या होत्या. नगरपंचायतीचे राजकारण महानगरांप्रमाणे घडत नाही. महानगरांच्या तुलनेत नगरपंचायतींचे राजकारण निमशहरी पद्धतीने घडत जाते. निमशहरी भागांमध्ये नव्याने सेवाक्षेत्राचे हितसंबंध निर्माण झाले आहेत. परंतु त्याबरोबरच ग्रामीण भागातील मध्यमवर्ग देखील अशा निमशहरी भागात प्रभावी भूमिका पार पाडतो. या दोन वर्गांनी मिळून निमशहरी भागाचे राजकारण ढवळून काढले आहे. राजकीय पक्षांच्या संदर्भात एकशेसहा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे फेरबदल झाले. सेवाक्षेत्रातील वर्ग आणि ग्रामीण मध्यमवर्ग यांच्यामुळे देखील हा राजकीय बदल झाला आहे. यामुळे निमशहरी भागात नवीन राजकारणाचे प्रारूप उदयास आले आहे. या प्रारूपाची स्थूल मानाने पक्षीय स्पर्धा आणि वर्गावर्गातील सत्ता स्पर्धा अशी दोन वैशिष्ट्ये दिसतात.

पक्षीय सत्तास्पर्धा  

नगरपंचायती निवडणुकीमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी चार पक्षांची सत्तास्पर्धा होती. या सत्तास्पर्धेत भाजपने नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रगती केलेली दिसून येते. त्यांच्या यशाची तीन वैशिष्ट्ये दिसतात. एक,  त्यांना या निवडणुकीत ७४ जास्त जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे भाजपने स्विंग केलेला दिसतो. दोन, भाजपला २०१४- २०१६ या निवडणुकीत २०.२७ टक्के जागा मिळाल्या होत्या (३४५ जागा). या निवडणुकीच्या तुलनेत २०२१ मधील नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला २३.३९ टक्के जागा मिळालेल्या आहेत (४१९ जागा). तीन, भाजपपासून शिवसेना दूर जाऊन देखील भाजपची पडझड झालेली नाही. हे या निवडणुकीतून भाजप बद्दलचे एक नवीन सूत्र पुढे आलेले आहे. चार, भाजप या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष महाराष्ट्रात नव्हता. त्यामुळे सत्ताधारी पक्ष नसतानादेखील भाजपला मुख्य चार पक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत.  यामुळे भाजपची ही एक नगरपंचायत निवडणुकीतील सातत्यपूर्ण कामगिरी ठरते. 

काँग्रेस पक्षाची निमशहरी भागात मोठी पडझड झाली आहे. कारण काँग्रेस पक्षांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. एक, २०१४-२०१६ यादरम्यान २६.४ टक्के जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या. तर २०२१-२२च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला १९.२० टक्के जागा मिळालेल्या आहेत. दोन, काँग्रेस पक्षाच्या जवळपास शंभर जागा कमी झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षांच्या जागांची घट २०१४ ते २०१६च्या तुलनेत दिसते. परंतु गेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील जागांच्या पार्श्वभूमीवर त्यांना मिळालेले हे यश चांगले आहे असे दिसते. तसेच काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील नगरपंचायतीमध्ये त्यांचे गड राखलेले दिसतात. परंतु फार चांगली प्रगती केलेली दिसत नाही. 

नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती चांगली झालेली दिसते. याची तीन कारणे आहेत. एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरपंचायतीतील ४५ जागा वाढलेल्या आहेत. दोन, २०१४-२०१६च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १९.७४ टक्के जागा मिळाल्या होत्या (३३६ जागा). २०२१च्या नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २१.२७  टक्के जागा मिळाल्या आहेत (३८१ जागा). तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व एकसंघपणे राजकारण घडविताना दिसते. विशेषतः जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, राजेश टोपे यांच्याबरोबर या पक्षातील रोहित पवार, रोहित पाटील असे युवा नेतेही राजकीय संघटन करत आहेत. युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या निवडणुकीतून वाढीस लागले. त्यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा केला होता. तसेच त्यांनी जनता दरबार भरविले होते. यामुळे कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि जनतेशी संपर्क अशा दोन गोष्टी त्यांनी घडविल्या होत्या. महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष शिवसेना आहे. शिवसेना पक्षाच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये जवळपास ९२ जागा वाढलेल्या दिसतात. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेनेचे दोन वैशिष्ट्ये दिसून आली. शिवसेना पक्षाला २०१४ -१०१६च्या नगरपंचायती निवडणुकीमध्ये जवळपास १२ टक्के जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. २०२१ च्या नगरपंचायती निवडणुकीत शिवसेनेच्या जागा १६. ५२ टक्के निवडून आलेल्या आहेत (२९६ जागा). 

वर्गावर्गातील सत्तास्पर्धा

नगरपंचायत निवडणुकांत सेवाक्षेत्रातील वर्ग आणि ग्रामीण मध्यम वर्ग सत्तास्पर्धा करत होता, हा चारही पक्षांच्या राजकारणाचा सामाजिक व आर्थिक पाया होता. तसेच महाविकास आघाडीच्या राजकारणाचाही आधार होता. महाविकास आघाडीने एकत्रितपणे नगरपंचायतीच्या निवडणुका लढविल्या नाहीत. काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील जवळपास सर्वच ठिकाणी निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या. तरीही महाविकास आघाडीची  नगरपंचायत निवडणुकीतील कामगिरी उठावदार दिसते. याची तीन कारणे आहेत. एक, त्यांना एकत्रितपणे ५७ टक्के जागा निवडून आणता आल्या (१०२१ जागा). दोन, महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपच्या जागा केवळ २०.२७ टक्के निवडून आलेल्या आहेत. म्हणजेच महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या जागांमध्ये ३७ टक्के जागांचा फरक आहे. हा फरक प्रचंड मोठा आहे असे दिसते. तीन, भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीने सर्वात जास्त नवीन कार्यकर्त्यांची जमवाजमव केली. नवीन कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने संधी दिली. हा फेरबदल महाविकास आघाडी सत्ताधारी असल्यामुळे घडून आला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा तळागाळात झालेला मोठा बदल आहे. तसेच हा बदल नगरपंचायती म्हणजे निमशहरी भागात झालेला आहे. निमशहरी भागातील राजकारणात महाविकास आघाडीचा पुढाकार वाढलेला आहे, असे दिसते. म्हणजेच थोडक्यात सेवाक्षेत्रातील व्यावसायिक वर्ग आणि ग्रामीण भागात नव्याने उदयास आलेला मध्यमवर्ग यांचे राजकारण महाविकास आघाडीकडे झुकलेले दिसते. निमशहरी भागात सेवाक्षेत्रातील व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील मध्यमवर्ग यांच्यामध्ये एक प्रकारचा समझोता घडण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. परंतु व्यावसायिक क्षेत्रातील वर्ग आणि ग्रामीण मध्यमवर्ग यांच्यामध्ये सत्तास्पर्धा असल्याचेही चित्र सध्या दिसत आहे. सेवाक्षेत्रातील वर्ग आणि ग्रामीण मध्यमवर्ग हे राजकीय पक्षांचे दोन नवीन आधारस्तंभ उदयाला आले आहेत.

 

संबंधित बातम्या