ब्रजभूमीतील राजकीय प्रारूपे

प्रकाश पवार
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

राज-रंग

‘ब्रजभूमी’ म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेश किंवा हरित प्रदेश होय. येथील राजकारणावर श्रीकृष्णाचा प्रभाव राहिलेला आहे. परंतु पन्नाशीच्या दशकाच्या तुलनेत आज-काल उत्तर प्रदेशाचे राजकारण आमूलाग्र बदललेले दिसते.  पश्चिम उत्तर प्रदेश (हरित प्रदेश) हा एक राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा उपप्रदेश आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि अवध उत्तर प्रदेश यापेक्षा हा उपप्रदेश आर्थिक दृष्ट्या प्रगत आहे.

पॉल ब्रास यांनी सुरुवातीला उत्तर प्रदेशाच्या राजकारणाचा अभ्यास केला होता. त्यांनी ‘अॅन इंडियन पोलिटिकल लाइफ: चरण सिंग अॅण्ड काँग्रेस पॉलिटिक्स 1937 टू 1961’ हे राजकीय चरित्र लिहिले. या चरित्रात ‘जाट’ ही जात वर्चस्वशाली असल्याचे चित्र त्यांनी रेखाटले होते. पश्चिम उत्तर प्रदेशातील चाळीस विधानसभा मतदारसंघात जाट या जातीचा प्रभाव आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील तीस पैकी पंधरा जिल्ह्यांमध्ये जाट समाजाचे दहा ते पंधरा टक्के संख्या बळ आहे. परंतु तरीही जाट समूह आज वर्चस्वशाली जात नाही. या भागातील राजकारणाचे, हिंदू लोकसंख्या बळ आणि मध्यमवर्ग हे दोन मुख्य आधार नव्याने उदयास आले आहेत. या दोन घटकांच्या भोवती उत्तर प्रदेशातील हरित प्रदेशात नवीन राजकारण उभे राहिलेले आहे. 

हिंदुत्व व विकासाचे प्रारूप

हरित प्रदेशात जाट समाज वर्चस्वशाली आहे (जातीचे संख्याबळ, उसाची शेती), हे एक पोलादी मिथक होते. हे मिथक वितळत गेले. या ऐवजी हिंदुत्व व विकास ही दोन नवीन तत्त्वे घडवली गेली. या गोष्टीमुळे जाट राजकारण धरसोडीचे घडू लागले. या फेरबदलाची चार वैशिष्ट्ये दिसतात. एक, जाट समूह जवळपास बाराशे समुदायांचा मिळून बनलेला आहे. ढोबळ मानाने या समुदायात हिंदू, मुस्लिम आणि शीख अशा तीन राजकीय अस्मिता आहेत. या तीन अस्मितांमुळे जाट समुदायाचे राजकीय वर्तन वेगवेगळे घडते. ही गोष्ट भाजपने समजून घेतलेली आहे. भाजपने जातीच्या जागी हिंदू लोकसंख्या बळाचे तत्त्व राजकारण घडवण्यासाठी वापरले. दोन, भाजपने पश्चिम उत्तर प्रदेशाचा राजकीय व सामाजिक भूगोल नव्याने समजून घेतलेला आहे.
पश्चिम उत्तर प्रदेशाचे दोन भाग आहेत. अ)  बागपत, मुझफ्फरनगर, शामली, मेरठ, बिजनोर, गाझियाबाद, हापूर, बुलंदशहर, मथुरा, अलिगड, हाथरस, आग्रा, मुरादाबाद या भागात जाट लोकसंख्या राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरते.  आ) रामपूर, अमरोहा, सहारणपूर, गौतम बुद्ध नगर या भागात जाट लोकसंख्या राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरत नाही. तसेच एकूण लोकसंख्येमध्ये हरित प्रदेशात जाटांची लोकसंख्या इतर सर्व जातींच्या तुलनेत राजकीय दृष्ट्या प्रभावी ठरणारी नाही. हे लक्षात घेऊन भाजपने ‘जाट’ या अस्मितेच्या ऐवजी ‘हिंदू’ ही अस्मिता या विभागात अधोरेखित केली. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी भाजपने सतरा जाट उमेदवार दिलेले आहेत. परंतु भाजपने त्यांची ओळख ‘हिंदू’ अशी निर्माण केलेली आहे. राष्ट्रीय लोकदलाने बारा जाट उमेदवार दिले आहेत, तर समाजवादी पक्षाच्या उमेदवारांपैकी सहा उमेदवार जाट आहेत. राष्ट्रीय लोकदल व समाजवादी पक्ष यांच्या उमेदवारांची ओळख जात केंद्रित आहे. तर भाजपच्या उमेदवाराची ओळख हिंदू केंद्रित आहे. म्हणजे जात विरुद्ध हिंदुत्व हा सामाजिक आखाडा उदयाला आला. तीन, पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये जाट हा समूह १९८९पासून सातत्याने वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसतो. अजित सिंग हे काही काळ व्ही.पी. सिंग यांच्या बरोबर राहिले. त्यांनी १९९५मध्ये काँग्रेस पक्षाबरोबर जाणे पसंत केले. त्यानंतर त्यांनी भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. नंतर त्यांनी राष्ट्रीय लोकदल पक्षाची स्थापना केली. मायावती यांच्या सरकारमध्ये अजित सिंग यांनी सहभाग घेतला. पुढे त्यांनी वाजपेयी मंत्रिमंडळाशी जुळवून घेतले. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भाजपबरोबर तर एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात काँग्रेसबरोबर मैत्री केली (२०११). धरसोड हे त्यांच्या राजकारणाचे खास वैशिष्ट्ये दिसते. चार, जाट समूहाचे राजकारण अस्थिर आहे. जाट समूहाचे राजकारण गेल्या तीस वर्षात एकसंघपणे घडलेले नाही. हा जाट समूहाच्या राजकारणाचा ताजा इतिहास आहे. असे का झाले? याचे कारण बदललेल्या नवीन वर्गरचनेत दिसते. 

नवीन वर्ग रचना

पश्चिम उत्तर प्रदेशात नवीन वर्ग रचना उदयास आली आहे. हा नवीन वर्ग उच्च श्रीमंत प्रकारचा आहे. तसेच या भागातील मध्यमवर्ग देखील श्रीमंत आहे. पश्चिम उत्तर प्रदेशाच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील इतर उपप्रदेश मागास आहेत. या संदर्भातील काही निवडक उदाहरणे महत्त्वाची आहेत. एक, पश्चिम उत्तर प्रदेशातील कृषी औद्योगिक समाजात अंतर्गत बदल झाले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश म्हणजे ‘ब्रजभूमी’ असे वर्णन केले जाते. यमुना नदीच्या खोऱ्यातील हा प्रदेश आहे. या प्रदेशात पाणी उपलब्ध आहे. या प्रदेशात उसाची शेती केली जाते. यामुळे या प्रदेशात साठ-सत्तरच्या दशकात कृषी-औद्योगिक समाजाची निर्मिती झाली. या प्रदेशात कृषी औद्योगिक समाजात १९९० नंतर बदल घडत आहेत. तीन कृषी कायद्यांना विरोध करणारे आंदोलन या भागात झाले. तीन कृषी कायद्यांना विरोध हा मुद्दा भाजपविरोधी दिसत असला, तरी बदललेल्या वर्गरचनेमुळे हा मुद्दा या भागात पूर्णपणे भाजपच्या विरोधात काम करेल असे दिसत नाही. दोन, १९९७मध्ये अजित सिंग यांनी भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी शेतकरी आणि कामगार यांच्या ऐक्याची संकल्पना मांडली. त्यानंतर त्यांनी लोकदल या पक्षाची स्थापना केली. किसान आणि कामगार या संकल्पनांच्या ऐवजी त्यांनी ‘लोक’ ही संकल्पना राजकारणात महत्त्वाची मानली. अजित सिंग यांची ‘लोक’ ही संकल्पना निसरडी होती, त्यामुळे अजित सिंग यांना काँग्रेस, भाजप, बहुजन समाज पक्ष यांच्या बरोबर समझोते करावे लागले. ही त्यांची वाटचाल, त्यांच्या पक्षाला अखिलेश यादव यांच्या पक्षाबरोबर युती करण्यापर्यंत घेऊन आली आहे. जयंत चौधरी अशा या निसरड्या संकल्पनेवर आधारित राजकारण करत आहेत. तीन, गेल्या सत्तर वर्षांमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशात भांडवली विकास झाला आहे. उत्तर प्रदेशचा हा भाग दिल्लीला जोडून आहे. तसेच ब्रजभूमीमुळे सेवा क्षेत्राचा विकास झाला आहे. या बदलामुळे मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढली. या भागातील मध्यमवर्ग १९९० नंतर जन्मलेला आहे.  या मध्यमवर्गाला कल्याणकारी राज्याबद्दल राग आहे. हा वर्ग जाटांचे नेतृत्वही मान्य करत नाही. तसेच भाजपची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी हिंदुत्व आणि विकास अशी दुहेरी आहे. यामुळे हिंदुत्वाची ओळख आणि विकासाची आकांक्षा अशा दुहेरी चौकटीत पश्चिम उत्तर प्रदेशाचे राजकारण घडवले जाते. दुसऱ्या शब्दात येथील मागास जातींच्या ऐक्याचे राजकारण घडवणे अवघड आहे. जयंत चौधरी आणि अखिलेश यादव यांचा जाट-यादव ऐक्याचा प्रयोग आणि हिंदुत्व-विकास प्रयोग यांनी संपूर्ण राजकारण व्यापलेले आहे.

संबंधित बातम्या