पूर्वांचलचे वर्गीय राजकारण...

प्रकाश पवार 
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

राज-रंग

पूर्वांचलमधील वर्ग रचनेमुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली आहे. यामुळे पूर्वांचलमधील जनता प्रत्येक निवडणुकीत वेगळा निर्णय घेते. पूर्वांचल प्रदेशात राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यामध्ये एक प्रकारचे अस्थैर्य दिसते. पक्ष व मतदारांचे संबंध सातत्यपूर्ण दिसत नाहीत.

उत्तर प्रदेशाच्या राजकारणात विकास प्रारूप ही भाजपची मुख्य विषय पत्रिका आहे. विकास प्रारूपाच्या आधारेच भाजपने पूर्वांचलचे राजकारण घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत. एक, लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही पातळ्यांवर पूर्वांचलचे राजकीय महत्त्व दिसून येते. लोकसभेच्या उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी २६ जागा पूर्वांचलमधील आहेत. तसेच उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण जागांपैकी १३० जागा पूर्वांचलमधील आहेत. दोन, पूर्वांचलची लोकसंख्या सहा कोटी तीस लाखाच्या आसपास आहे. या लोकसंख्येमुळे राजकीय पक्षांना पूर्वांचलची दखल घ्यावी लागते. पूर्वांचलमधून आजपर्यंत पाच पंतप्रधान झाले. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, विश्वनाथ प्रताप सिंग आणि चंद्रशेखर यांचा पूर्वांचलशी थेट संबंध होता. तर सध्याचे पंतप्रधान पूर्वांचलमधील वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीदेखील पूर्वांचलमधील गोरखपूरचे आहेत. एकूण पूर्वांचलचा हा राजकीय प्रवास गौरवशाली आहे. परंतु पूर्वांचलची आर्थिक -सामाजिक स्थिती यापेक्षा वेगळी आहे.
विकासाच्या आकांक्षाचे राजकारण
पूर्वांचलमध्ये विकासाची दोन प्रारूपे मांडली जात आहेत. समाजवादी पक्षाचे विकास प्रारूप कृषीशी संबंधित आहे. तर भाजपचे विकास प्रारूप सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्याशी संबंधित आहे. ‘मागास’ या अर्थाने पूर्वांचलचे राजकारण वेगळे घडते. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल आणि इतर प्रदेश यांच्यामध्ये वर्गीय रचना  स्पष्टपणे दिसते. पूर्वांचल आर्थिक, सामाजिक, राजकीय या तीनही क्षेत्रांमध्ये मागासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो.  यासंदर्भातील चार सिद्धांत सुस्पष्टपणे दिसतात. एक, पूर्वांचलमध्ये शेतकऱ्यांकडे शेतीचे क्षेत्र कमी आहे. पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये उसाची आणि बटाट्याची व्यापारी तत्त्वावर शेती केली जाते. त्या तुलनेत पूर्वांचलमध्ये केवळ उदरनिर्वाहासाठी शेती केली जाते. यामुळे कृषी क्षेत्राचा राजकारणावरती प्रभाव पडत नाही. उलट पश्चिम उत्तर प्रदेशातील कृषी क्षेत्राचा प्रभाव पूर्वांचलमधील राजकारणावर पडतो. दोन, पूर्वांचलमध्ये ओबीसींपेक्षा अतिमागास समूह मोठ्या संख्येने आहे. त्या समूहाची ओळख अतिमागास ओबीसी या प्रकारची आहे (मौर्य, चौहान, निषाद, कुर्मी, प्रजापती इत्यादी).  यामुळे  पूर्वांचलमध्ये भाजपने अतिमागास समूहातील नेतृत्व गेल्या दशकात विकसित केले होते. सुहेलदेव भारतीय समाज पक्ष व जनवादी पक्ष यांनी समाजवादी पक्षाबरोबर युती केली. यामुळे कृषी क्षेत्रातील विकसित समूह आणि कृषी क्षेत्रातील मागास समूह असा एक नवीन समझोता समाजवादी पक्ष, सुहेलदेव भारतीय समाज पक्ष व जनवादी पक्ष यांनी घडविला आहे. ह्या प्रारूपाद्वारे सध्या भाजपच्या विरोधी राजकीय प्रक्रिया घडत आहे. तीन, पूर्वांचलमध्ये ओबीसींच्या अंतर्गत अतिमागास व मागास असा एक राजकीय वाद आहे. यामुळे समाजवादी पक्षापासून अतिमागास समूह भाजपकडे वळला होता. तरीही इतर प्रदेशांच्या तुलनेत पूर्वांचलमध्ये समाजवादी पक्षाला गेल्या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या होत्या. या प्रदेशात भाजपने पूर्वांचल विकासाचे प्रारूप विकसित केलेले आहे. पूर्वांचल विकासाच्या प्रारुपाचे लक्ष पूर्वांचल एक्सप्रेसवे हे आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवे लखनऊ, बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, आंबेडकर नगर, आझमगड, गाजीपुर अशा दहा जिल्ह्यांतून जातो. यामुळे सेवा क्षेत्राचा विकास हा भाजपचा मुख्य प्रचारातील मुद्दा आहे. तसेच भाजपने प्रयागराज व कुशीनगर विमानतळांचे काम सुरू केलेले आहे. याबरोबरच आझमगड, अयोध्या, चित्रकूट, काशी, सोनभद्र येथेदेखील विमानतळांचे काम सुरू आहे. औद्योगिक विकास प्राधिकरण गोरखपूर आणि काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्प यांचेदेखील काम सुरू केलेले आहे. यामुळे समाजवादी पक्षाच्या विकास प्रारूपाची रचना आणि भाजपच्या विकास प्रारूपाची रचना यांमध्ये फरक आहे. थोडक्यात भाजप सेवा आणि उद्योग क्षेत्रांतील लोकांना पक्षाकडे ओढून घेत आहे. तर समाजवादी पक्ष कृषी क्षेत्र आणि कृषी औद्योगिक या क्षेत्रातील लोकांना पक्षाकडे ओढून घेत आहे. चार, भाजपने ठाकूर समाजाकडे राज्याची सत्ता दिली. दुसऱ्या शब्दात अतिमागास समूहाला सत्तेपासून दूर राहावे लागले. यामुळे भाजपच्या अंतर्गत उच्च जाती आणि अतिमागास जाती असा एक  राजकीय सत्तेतील भागीदारी वरून संघर्ष निर्माण झाला आहे. यामध्ये वर्ग रचना सुस्पष्टपणे दिसून येत आहे. 
राजकीय अस्थिरता
पूर्वांचलमधील वर्ग रचनेमुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली आहे. यामुळे पूर्वांचलमधील जनता प्रत्येक निवडणुकीत वेगळा निर्णय घेते. पूर्वांचल प्रदेशात राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यामध्ये एक प्रकारचे अस्थैर्य दिसते. पक्ष व मतदारांचे  संबंध सातत्यपूर्ण दिसत नाहीत. याची काही निवडक उदाहरणे पुढीलप्रमाणे दिसतात. एक, २०१२च्या निवडणुकीत पूर्वांचलमधील १३० जागांपैकी ७१ जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. तेव्हा बसपला २४ आणि भाजपला १४ जागा जिंकता आल्या होत्या. दोन, २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १३० पैकी ८७ जागा जिंकल्या होत्या. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि अपना दल यांच्या जागा एकत्रित केल्या, तर भाजपने जवळपास एकशे तीसपैकी शंभर जागा जिंकल्या होत्या. 
दोन निवडणुकांतील हा प्रचंड मोठा बदल आहे. एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे वळण्याचा हा कल दिसतो.  या विभागात अॅन्टी इनकम्बन्सी प्रभावी दिसते. या विभागात फ्लोटिंग व्होटर्स नाहीत. मागास समूह एकमुखी निर्णय घेतात. त्यामुळे येथे अतिमागासांचे राजकारण घडते.  तीन, २०२२च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्वांचलमधील ही राजकीय अस्थिरता भाजपच्या विरोधात जाईल, असे राजकीय वातावरण आहे. परंतु याच भागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्य प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच राजकीय नेतृत्व आणि पूर्वांचल मधील जनता यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद-विवाद असल्याचे दिसते. पूर्वांचल मधील जनतेचे आणि आर्थिक हितसंबंधांचे प्रतिनिधित्व सुस्पष्टपणे केले जात नाही. हा एक इतिहास जवळपास साठ सत्तर वर्षांचा आहे. पूर्वांचलचे तीन वेगवेगळे विभाग आहेत. पूर्वांचलमधील एक महत्त्वाचा विभाग पूर्व अवध क्षेत्र म्हणून ओळखला जातो. दुसरा विभाग पूर्वेकडील पश्चिमी भोजपुरी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर तिसरा विभाग उत्तरेकडील नेपाळ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या तीन विभागांमध्ये मतदारांचे रूपांतर लाभार्थींमध्ये करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. हेच भाजपचे या विभागातील नवीन राजकारणदेखील आहे. पूर्वांचलचा विकास आणि मतदारांचे लाभार्थींमध्ये रूपांतर ही भाजपच्या राजकारणाची दोन वैशिष्ट्ये आहेत.

संबंधित बातम्या