राज्यांचे राजकारण: गैरभाजपवाद...

प्रकाश पवार
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022

राज-रंग

केंद्र विरोधी राजकारण हा राजकीय आघाडी करण्याच्या पातळीवरील एक व्यवहारदेखील आहे. मात्र प्रादेशिक पक्षांच्या मार्फत घडणारे राज्यांचे राजकारण केवळ केंद्र विरोधी नाही; तसेच प्रादेशिक पक्षांच्या मार्फत घडणारे राज्यांचे राजकारण केवळ भाजप विरोधातील नाही, असाही एक मुद्दा पुढे येतो.

केंद्र आणि राज्य हे दोन घटक राजकारणाचे नवनवीन आखाडे घडवत आहेत. राज्ये केंद्रापेक्षा वेगळे राजकारण घडवण्याचा प्रयत्न करतात. हा कालखंड भारतीय राजकारणात सर्वसाधारणपणे नव्वदीच्या दशकानंतरचा होता. गेल्या दशकामध्ये मात्र राज्याचे  राजकारण फार प्रभावी घडले नाही (२०११-२०२०). परंतु समकालीन दशकांमध्ये राज्याने केंद्राच्या विरोधात जाऊन राजकीय आखणी सुरू केलेली दिसते. या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथे झाली. सध्या या राजकारणात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव  (केसीआर) यांनी नव्याने सहभाग घेतला आहे. राज्य हा घटक राजकारणात पुन्हा कृतिशील करण्याचा हा प्रयत्न आहे.  तसेच गैरकाँग्रेसवाद व गैरभाजपवाद या तत्त्वज्ञानाची चर्चा सुरू आहे. या दोन मुद्द्यांच्या भोवती राजकीय घडामोडी घडत आहेत.

केंद्र विरोध
केंद्र विरोध हा राज्याच्या राजकारणाचा एक मध्यवर्ती भाग दिसतो. परंतु केंद्र म्हणजे कोण? हा प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाची उत्तरे भारतीय राजकारणात तीन पद्धतीने व्यक्त झाली आहेत. एक,  केंद्र विरोध या बद्दल राजकीय चर्चा होते तेव्हा त्यात केंद्रांमध्ये सत्ताधारी असणारे सरकार हा एक घटक महत्त्वाचा मानला जातो. उदाहरणार्थ, सध्या केंद्रात भाजप  सत्तेत आहे. त्यास विरोध म्हणजे केंद्र विरोधी राजकारण होय. ममता बॅनर्जी यांचा केंद्राला विरोध या प्रकारचा आहे.  दोन, केंद्रीय पातळीवरील पक्षांना राज्य पातळीवरील पक्षांचा विरोध असतो. यामुळे केंद्र विरोधामध्ये स्थूलमानाने राष्ट्रीय पक्षांचा समावेश केला जातो. या सरधोपट सिद्धांताप्रमाणे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना प्रादेशिक पक्ष विरोध करतात. यामुळे केंद्र विरोध या सिद्धांतात भाजपबरोबर काँग्रेसचाही समावेश होतो. या सिद्धांताप्रमाणे ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव यांचा विरोध भाजपबरोबर काँग्रेस पक्षालादेखील आहे. यामुळे गैरभाजपवाद व गैरकाँग्रेसवाद अशी चर्चा होत राहते. तीन, राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्ष व राज्यातील प्रादेशिक पक्ष यांचा केंद्रांमधील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात समझोता होतो. यामुळे केंद्रातील विरोधी पक्ष आणि राज्यातील प्रादेशिक पक्ष हे दोन्ही मिळून सत्ताधारी पक्षाच्या विरोधात राजकारण घडवितात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष काँग्रेसबरोबर आघाडी करून राज्यातील राजकारण घडवत आहेत. असे एकूण तीन प्रकारे राज्याचे राजकारण केंद्राच्या संदर्भात उदयाला येत आहे. या तिन्ही प्रकारचे राजकारण समकालीन दशकात घडताना दिसते. तरीही समकालीन दशकात या तीन प्रकारांमध्ये एकमत नाही असेही दिसते. परंतु केंद्र विरोधी राजकारणाच्या घडामोडी घडत आहेत. 

प्रादेशिक पक्षांचा पुढाकार
केंद्र विरोधी राजकारण घडविण्यात प्रादेशिक पक्षांनी पुढाकार घेतलेला दिसतो. केंद्र विरोधी राजकारण हा एक युटोपिया आहे; तसेच तो राजकीय आघाडी करण्याच्या पातळीवरील एक व्यवहारदेखील आहे. यासंदर्भातील पुढील चार महत्त्वाच्या घडामोडी दिसतात. एक, ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचारात भाग घेतला. ममता बॅनर्जी यांनी अखिलेश यादव यांच्याबरोबर केंद्र विरोधी भूमिका घेतली. तसेच त्यांनी केंद्राला पराभूत करण्यासाठी उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करा, असाही प्रचार केला. ही त्यांची भूमिका म्हणजे प्रादेशिक पक्षाने केंद्र विरोधी राजकारण घडविण्यासाठी केलेला युटोपियाच्या पातळीवरील एक प्रयत्न आहे. दोन, चंद्रशेखर राव यांनी शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबरोबर चर्चा केली. राव यांनी महाराष्ट्राला भेट दिली. उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर राव यांनी केंद्र विरोधी भूमिका मांडली. शरद पवार यांनी आर्थिक समस्येच्या विरोधात केंद्र सरकार विरोधी राजकारणाचा मुद्दा मांडला. परंतु यामध्ये काँग्रेसला बरोबर घेऊन आघाडी करण्याबद्दल चर्चा झाली नाही. तसेच काँग्रेसला वगळून राज्यांची तिसरी आघाडी करणार का किंवा नाही, याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. ही एक पोकळी राज्यांच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली दिसते. तीन, ममता बॅनर्जी यांनी  महाराष्ट्राला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाला विरोध केला होता. यामुळे प्रादेशिक पक्षांचा एक विरोध काँग्रेस पक्षाला आहे, तर दुसरा विरोध भाजपला आहे. यामुळे प्रादेशिक पक्षांचे धोरण निश्चित ठरलेले दिसत नाही. चार, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांमधील एक पक्ष किंवा एक गट केंद्रातील सत्ताधारी भाजपबरोबरदेखील युती करतो. यामुळेच हरियानामध्ये भाजपला सरकार स्थापन करता आले. तसेच पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांनी स्थापन केलेल्या प्रादेशिक पक्षाबरोबर भाजपने युती केली. उत्तर प्रदेशामध्ये अपना दल या पक्षाच्या अनुप्रिया पटेल यांची भाजपबरोबर आघाडी आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये नव्याने संवाद सुरू असल्याची चर्चा आहे. म्हणजेच थोडक्यात प्रादेशिक पक्षांच्या मार्फत घडणारे राज्यांचे राजकारण केवळ केंद्र विरोधी नाही; तसेच प्रादेशिक पक्षांच्या मार्फत घडणारे राज्यांचे राजकारण केवळ भाजप विरोधातील नाही असाही एक मुद्दा पुढे येतो.  

काँग्रेसचा पुढाकार
काँग्रेस पक्षाचे भारतीय राजकारणातील स्थान कोणते आहे? हा प्रश्न राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून उपस्थित होत आहे. याची दोन कारणे आहेत. एक, काँग्रेस पक्षाचा जवळपास राष्ट्रीय पक्ष म्हणून ऱ्हास (decline)  झाला आहे. काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन गेल्या तीस-बत्तीस वर्षांत झालेले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून राजकारण करता येत नाही, अशी ममता बॅनर्जी यांची भूमिका आहे. दोन, काँग्रेस पक्ष हा काही राज्यांमधील पक्ष आहे. उदाहरणार्थ, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, पंजाब इत्यादी. त्यामुळे काँग्रेसचे वेगवेगळ्या राज्यातील स्थान हे महत्त्वाचे आहे. त्याआधारे राज्यांचे राजकारण उभे राहू शकते, ही काँग्रेस आणि काही निवडक प्रादेशिक पक्षांची व्यूहरचना आहे. यामुळे  राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य यांच्या संबंधांची चर्चा केलेली होती. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी राज्यांच्या राजकारणाला मध्यवर्ती ठेवून भाष्य केले होते. राहुल गांधी यांनी तमिळनाडूचे उदाहरण देऊन ‘आयडिया ऑफ इंडिया’ किंवा ‘हिंदुस्तानीयत’ या संकल्पनेचे विवेचन केले होते. त्यांना तमिळनाडूमधून प्रतिसादही मिळाला होता. या राजकीय प्रक्रियेवरून भारतीय राजकारणातील दोन प्रवाह स्पष्टपणे दिसतात. एक, प्रादेशिक पक्षांच्या पुढाकाराखाली आणि काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराखाली राज्यांचे राजकारण घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही प्रक्रिया गतिमान झालेली दिसते. दोन, समकालीन दशकात राज्यांचे राजकारण स्वतंत्रपणे उभे राहू नये, असा प्रयत्न भाजपचा आहे. काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष राज्यांचे राजकारण घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये एकसूत्रता नाही, ही भाजपची एक ताकद  आहे. म्हणजेच थोडक्यात गैरभाजपवाद हे राजकीय तत्त्वज्ञान प्रत्यक्ष राजकारणात फार प्रभावी दिसत नाही.

संबंधित बातम्या