झुंड: सांस्कृतिक राजकारणाचा प्रयोग

प्रकाश पवार
सोमवार, 14 मार्च 2022

राज-रंग

चित्रपट क्षेत्र सांस्कृतिक राजकारणाचा एक महत्त्वाचा आखाडा असतो. सांस्कृतिक राजकारण चित्रपटातील खुसखुशीत भाषा व अतिनाट्यमय पद्धतीने लोकांच्या मनामध्ये प्रवेश करते, तर कधी कधी सांस्कृतिक राजकारण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचंड गंभीरपणे भाष्य करत पुढे सरकत जाते. असाच एक चित्रपट सध्या भारतीय सांस्कृतिक राजकारणाला व्यापणारा प्रदर्शित झाला आहे.

राजकारण विविध क्षेत्रांतून घडते. उदा. निवडणुकांचे राजकारण, आर्थिक राजकारण, संसदीय राजकारण, सांस्कृतिक राजकारण इत्यादी. दैनंदिन राजकारणाचा भाग म्हणून सांस्कृतिक राजकारणाची चर्चा घडते. सांस्कृतिक राजकारण राजकीय संघटना घडवितात, या गोष्टीची जाण जवळपास सर्वांनाच असते. कल्याणी मेनन यांनी ‘एव्हरीडे नॅशनॅलिझम’ या ग्रंथात हा मुद्दा मांडला आहे. याआधी मार्सिया लँडी यांनी ‘फिल्म, पॉलिटिक्स अॅण्ड ग्राम्सी’ हे पुस्तक नव्वदीच्या दशकात लिहिले होते. हे पुस्तक जागतिक पातळीवरती लोकप्रिय झाले होते. चित्रपट क्षेत्र सांस्कृतिक राजकारणाचा एक महत्त्वाचा आखाडा असतो. सांस्कृतिक राजकारण चित्रपटातील खुसखुशीत भाषा व अतिनाट्यमय पद्धतीने लोकांच्या मनामध्ये प्रवेश करते, तर कधी कधी सांस्कृतिक राजकारण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचंड गंभीरपणे भाष्य करत पुढे सरकत जाते. भारतीय सांस्कृतिक राजकारणाला व्यापणारा असाच एक चित्रपट सध्या प्रदर्शित झाला आहे. ‘झुंड’ हा तो चित्रपट आहे. या  हिंदी भाषेतील चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मराठी भाषिक नागराज मंजुळे यांचा पुढाकार आहे. त्यांनी चित्रपटात प्रचंड मोठा गुंता उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमीर खानपासून सर्वांनी या चित्रपटाचे कौतुक केले. सांस्कृतिक दृष्टिकोनातून ‘आयडिया ऑफ बहिष्कृत इंडिया’ आणि  पर्यायी राजकारणाची चौकट  यांच्यावर या चित्रपटात भाष्य केले आहे. चित्रपट सृष्टीतील मुख्य सांस्कृतिक वर्चस्वाची चौकट बाजूला ठेवून हा चित्रपट साकारलेला आहे. या चित्रपटात मानवमुक्तीच्या (शोषणमुक्ती) पर्यायी चौकटीला अधोरेखित केले आहे, त्यामुळे हा चित्रपट इतर चारचौघ्या चित्रपटांसारखा नाही. हा चित्रपट सांस्कृतिक राजकारणाची आखीव-रेखीवपणे जाणीव विकसित करतो. विशेषतः डॉ. आंबेडकरांनी कल्पिलेली  बहिष्कृत भारताची संकल्पना यातून डोळ्यासमोर येते.  हा चित्रपट अर्थातच महासांस्कृतिक राजकारणाचा विषय ठरतो. कारण चित्रपटात महानायक (अमिताभ बच्चन) प्रतीकात्मक स्वरूपात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मान देतो. तर महामानवाच्या विचारांतून शहरी गरिबांमध्ये उन्नत व चांगल्या जीवनाची एक नवी कल्पना विकसित होते. त्या संकल्पनेचा भाग म्हणून  शहरी  गरिबीच्या वस्तीवरून विमान टेक ऑफ झालेले दिसते. ही कथा केवळ चित्रपटाच्या मूल्यमापनाची नव्हे तर एका  पर्यायी  सांस्कृतिक राजकारणाचे सूतोवाच करणारी आहे. 

भारताची संकल्पना
‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेची भारतात भौतिक व सांस्कृतिक अंगाने चर्चा सतत होत राहिली आहे. विशेषतः संसदेत ही चर्चा गेल्या महिन्यात झाली आहे. तर या आठवड्यात ही चर्चा चित्रपटाच्या माध्यमातून सुरू झाली आहे. याची काही उदाहरणे पुढील आहेत. एक,  ‘झुंड’ या चित्रपटात जिज्ञासा म्हणून भारताबद्दल प्रश्न विचारले गेले आहेत. दोन,  चित्रपटामध्ये त्या प्रश्नाची उत्तरे बहिष्कृत भारत या संकल्पनेच्या अंगाने देण्यात आलेली आहेच. चित्रपटात सलगपणे बहिष्कृत भारत असा शब्द येत नाही. परंतु भारत आणि बहिष्कृत हे शब्दप्रयोग वेगवेगळ्या संवादामध्ये येतात. तीन, चित्रपटातील आशय हा ‘बहिष्कृत भारत’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेशी मिळताजुळता आहे. यामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ म्हणजेच बहिष्कृत भारत अशी एक संकल्पना या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. चार, चित्रपटामध्ये सामाजिक चित्र उभे करण्यात आले आहे. त्या सामाजिक चित्रांमध्ये वेगवेगळे समूह आणि त्या समूहांमधील सद्रभावना या गोष्टीही चित्रित केल्या गेल्या आहेत. विशेषतः हा चित्रपट गंभीरपणे एका अर्थाने काँग्रेस प्रणीत आयडिया ऑफ इंडिया आणि रूढीवाद्यांची (Conservatism) आयडिया ऑफ इंडियाची संकल्पना नाकारतो. त्याऐवजी हा चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बहिष्कृत भारत ही ‘आयडिया ऑफ इंडिया’ची संकल्पना विकसित करतो. मथितार्थ म्हणजे ‘झुंड’ हा चित्रपट  डॉ. आंबेडकर प्रणीत राजकारणाचा एक कंगोरा अतिशय सूक्ष्मपणे मानतो.

बहिष्कृत भारतची पंचसूत्री 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेली बहिष्कृत भारत ही संकल्पना शब्दशः संकल्पना चित्रपटात घेतलेली नाही. परंतु चित्रपटात आशय म्हणून ही संकल्पना पूर्ण ताकदीनिशी उतरविण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेषतः समकालीन काळाच्या संदर्भात सहजासहजी लक्षात येतील अशी काही सूत्रे आखीव-रेखीवपणे मांडली आहेत. ती पाच सूत्रे चित्रपटांत ठसठशीतपणे दिसतात. यामुळे ही पाच सूत्रे लोक समूहामध्ये चित्रपटाच्या खुसखुशीत भाषेच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. ती पाच सूत्रे पुढील प्रमाणे आहेत. एक, झुंड चित्रपटात वर्ग ही संकल्पना वर्गसंघर्ष या जाणिवेच्या संदर्भात मांडली आहे. त्यामुळे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ (गरीब आणि श्रीमंत) या दोन वर्गातील संघर्ष वर्ग जाणिवा विकसित करतो. संपूर्ण चित्रपटात अशी वर्ग जाणीव आणि वर्ग संघर्षाची जाणीव विकसित करण्यावर भर दिला गेला आहे. उदा. प्रतिकात्मक नावे, झोपडपट्टीचे वर्णन, झोपडपट्टीतील उदरनिर्वाहासाठीचा संघर्ष, मनोरंजनासाठीची साधने, संगीत आणि गीत इत्यादी. दोन, या चित्रपटात ब्राह्मण्यवाद ही विचारसरणी अधोरेखित केलेली आहे. विशेषतः शहरी भागामध्ये ब्राह्मण्यवाद ही विचारसरणी शिक्षणसंस्था आणि झोपडपट्टी यांच्या संबंधातून दाखवण्यात आली आहे. तसेच झोपडपट्टीत व्यवसाय करणारा वर्ग आणि प्रत्यक्ष झोपडपट्टीत राहणारा वर्ग यांच्यातील संबंधातदेखील ब्राह्मण्यवाद ही विचारसरणी अधोरेखित केलेली आहे. यामध्ये जातियविषमतेचे चित्रण केलेले आहे. बनियावादाचे शोषण प्रधान स्वरूप अधोरेखित केलेले आहे. तीन, चित्रपटामध्ये महात्मा फुले प्रणीत स्त्रीशूद्रातिशूद्र या संकल्पनेपासूनचा आशय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण खेळांमध्ये स्त्रियांचा सहभाग आहे. तसेच स्त्रीशूद्रातिशूद्र यांच्या हिताचे धोरण आखणाऱ्या प्रतीकांचा समावेश डॉ. आंबेडकर जयंतीत केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ही संकल्पना मांडून जातात. चार, चित्रपटाची पूर्ण कथा भौगोलिक दृष्ट्या नागपूरभोवती  फिरत राहते. या गोष्टीचा संदर्भ म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या शहराची निवड धर्मांतर करण्यासाठी केली होती, या गोष्टीची सहजासहजी जाणीव करून देते. प्रतीकात्मक स्वरूपात खेळाच्या मैदानाच्या जवळील दैवतावाद नाकारला जातो. त्याऐवजी भौतिक व सांस्कृतिक उन्नतीचा एक मार्ग खेळ म्हणून पाहण्याची दृष्टी चित्रपट विकसित करतो. देव आणि मैदान यापैकी मैदानाला अग्रक्रम दिला जातो. शहरी आणि निमशहरातील गरीब वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे शहरी मध्यमवर्गाची संस्कृती आणि शहरी व निमशहरी भागातील गरीब वर्गाची संस्कृती यांच्यातील संघर्ष या चित्रपटात चित्रित केला गेला आहे. पाच, संपूर्ण चित्रपटात समाजव्यवस्था व राजकीय व्यवस्था यावर भाष्य केलेले आहे. समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था भारतीय राज्यघटनेची मोडतोड करते, यावरदेखील भाष्य केलेले आहे. आदिवासींची ओळख पोलिस पाटील म्हणजेच राज्यसंस्थेला नाही. हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे. समाजदेखील आदिवासींना ओळखत नाही. परंतु मुस्लिम आदिवासींना ओळखतात. आंबेडकरवादी समूह मुस्लिमांशी सद्रभावनेने वागतो. या गोष्टी सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक वर्चस्व यांच्यातील व्यापक संघर्षाचा भाग म्हणून चित्रपटात सर्जनशील पद्धतीने आलेल्या आहेत.

संबंधित बातम्या