काश्मिरीयतचा खडतर प्रवास

प्रकाश पवार
सोमवार, 28 मार्च 2022

राज-रंग

काश्मिरीयत हा वस्तुस्थितीतील भारतीय आदर्श होता, परंतु आजच्या घडीला राजकीय घडामोडींमुळे काश्मिरीयत जवळपास दृष्टीटप्प्यांच्या बाहेर गेली आहे. ही प्रक्रिया राजकीय सत्तासंघर्षाचा एक भाग म्हणून घडत गेली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात काश्मिरीयतचे राजकारण करावे की काश्मिरीयत व जम्हूरीयत विरोधी राजकारण करावे? यापैकी कोणाची निवड करावी, हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

‘काश्मिरीयत’ ही एक सामाजिक व धार्मिक सलोख्याने जीवन जगण्याची पद्धत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरीयत पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकात प्रभावी होती. तीस वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरचे सामाजिक जीवन काश्मिरीयतच्या संवेदनशील नात्यांनी बांधलेले होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातून भारताला काश्मीरीयत हा दृष्टिकोन मिळाला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मात्र या संकल्पनेचा प्रवास फारच खडतर झालेला दिसतो.  ऐंशीच्या दशकापासून पुढे जाणीवपूर्वक काश्मिरीयत विरोधी भूमिका घेतल्या गेल्या. जवळपास बेचाळीस वर्षे  काश्मिरीयत आणि काश्मिरीयत  विरोधी शक्ती यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. काश्मिरीयत हा वस्तुस्थितीतील भारतीय आदर्श होता, परंतु आजच्या घडीला राजकीय घडामोडींमुळे काश्मिरीयत जवळपास दृष्टीटप्प्यांच्या बाहेर गेली आहे. ही प्रक्रिया राजकीय सत्तासंघर्षाचा एक भाग म्हणून घडत गेली आहे. अहिंसेवर हिंसेने आक्रमण केले, हा एक भाग सत्तरीच्या नंतरचा दिसतो. सत्तरीच्या आधी जवळपास वीस वर्ष काश्मिरीयतचे राजकारण घडत होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मिरीयतचे राजकारण घडवण्याचा प्रयत्न केला. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि अटलबिहारी वाजपेयी अशा तीन पंतप्रधानांनी काश्मिरीयतची संकल्पना राजकारणात प्रवाहित ठेवली. आजच्या घडीला ही परिकथेतील राजकारणाची कल्पना ठरली आहे. यामुळे काश्मिरीयतच्या राजकारणाचा ऱ्हास कसा घडत गेला? हे पाहणे मोठे जिज्ञासेचे ठरते.

 सत्तरीच्या दशकातील आव्हान 
सत्तरीच्या दशकात आक्रमक राजकारणाची सुरुवात झाली. या घडामोडींमुळे काश्मिरीयतला सुरुवातीला  सत्तरीच्या दशकात आव्हान मिळत गेले. यांची महत्त्वाची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. एक, इंदिरा गांधींनी बांगलादेशाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांची ‘इंदिरा इज इंडिया’ व ‘इंदिरा म्हणजे दुर्गा देवी’ अशी प्रतिमा कल्पिली गेली होती. विशेषतः बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया’ अशी घोषणा दिली. तर अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘दुर्गा’ ही  प्रतिमा वापरली होती. या घडामोडींमुळे आक्रमक राजकारणाची सुरुवात झाली. या घडामोडींमध्ये काश्मिरीयतच्या समोर आक्रमक राजकारणाचे मोठे आव्हान उभे राहिले. दोन, झिया-उल-हक यांनी भारताच्या या आक्रमक राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. झिया-उल-हक यांनी हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा प्रकार वापरला. मुस्लिमांना जास्तीत जास्त आक्रमक क्षेत्रात त्यांनी ओढून घेतले आणि ढकलले देखील. यामुळे काश्मिरीयत प्रचंड अडचणीत आली. तीन, १९७५ मध्ये शेख अब्दुल्ला व इंदिरा गांधी यांच्यामध्ये समझोता झाला. परंतु सामाजिक सलोखा राखण्यासाठी या गोष्टीचा फार उपयोग झाला नाही. हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोखा अडचणीत आला. दुसऱ्या शब्दात, राजकारणात काश्मिरीयत, जम्हूरियत, सामाजिक सलोखा, धार्मिक सलोखा यांचा बळी दिला गेला. 

ऐंशीच्या दशकातील आव्हाने
ऐंशीच्या दशकात काश्मिरीयत, जम्हूरियत, सामाजिक सलोखा, धार्मिक सलोखा यापुढे राजकीय क्षेत्रात प्रचंड मोठी आव्हाने उभी राहिली. काश्मिरीयतच्या समोर सत्तरीच्या दशकापेक्षा जास्त मोठी आव्हाने ऐंशीच्या दशकात उभी राहिली. यासंदर्भातील पुढील उदाहरणे चित्तवेधक आहेत. एक, सुफी विचार दुर्बल केला गेला. पीर किंवा फकीर यांच्यावरील श्रद्धा कमी झाली. यामुळे सहिष्णुता कमी कमी होत गेली. दोन, १९८४ मध्ये फारूक अब्दुल्ला यांचे जवळचे नातेवाईक गुल शाह यांच्याकडे सत्ता गेली. त्यांचे व्यक्तिमत्त्व आक्रमक होते. त्यांनी काश्मिरीयतला पाठिंबा दिला नाही. १९८६मध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलींमुळे काश्मिरीयत अडचणीत आली. तीन, १९८७ साली निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांमध्ये राजकीय प्रामाणिकपणा नव्हता. यामुळे या गोष्टीचा फायदा घेऊन  ‘आयएसआय’सारखी संघटना विस्तारत गेली. या गोष्टीचा परिणाम म्हणजे शांततेचा ऱ्हास होत गेला. तसेच काश्मिरीयतचादेखील ऱ्हास होत गेला. यामुळे सामाजिक सलोखा आणि धार्मिक सलोखादेखील बराच कमी झाला. 

कॉँग्रेस ऱ्हासाचा कालखंड (१९८९-२०२२)
काँग्रेसच्या ऱ्हासाचा कालखंड जवळपास ३२ वर्षांचा आहे. या काळात नेतृत्वाचादेखील ऱ्हास घडून आला होता. राजीव गांधींच्या काळात नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली. कारण भारतीय समाज त्यांना नीटनेटका माहीत नव्हता. यामुळे काश्मिरीयत व जम्हूरियत या संकल्पनांचा ऱ्हास सुरू झाला. याची जी काही महत्त्वाची उदाहरणे पुढील आहेत. एक,  राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाच्या पोकळीच्यावेळी काश्मीरमध्येदेखील एक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. जम्मू काश्मीर म्हणजे काय आहे? याचे नीटनेटके आकलन संपुष्टात आले होते. यामुळे काश्मीरमधील सामाजिक सलोखा आणि धार्मिक सलोखा नेतृत्वाला समजला नाही. दोन, या पार्श्वभूमीवर आधारित भारतात विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार स्थापन झाले. या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. परंतु विश्वनाथ प्रताप  सिंग यांची भूमिका मंडलवादी होती. तर लालकृष्ण अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका हिंदुत्ववादी होती. मंडल आणि हिंदुत्व या दोन भूमिकांमध्ये राजकीय वाद उभा राहिला. तेव्हा काश्मीरमध्ये काश्मिरीयत अडचणीत येत गेली. तीन, मुफ्ती मोहम्मद सईद  गृहमंत्री असताना (१९८९) त्यांच्या मुलीचे अपहरण झाले, तेव्हा सरकार दुबळे झाले. यामुळे काश्मिरीयतच्या विरोधात आक्रमक शक्ती प्रबल झाल्या. चार,  १९८४ -१९८९ या काळात राज्यपाल असणाऱ्या जगमोहन यांना हिंसेचा प्रश्न सोडविण्यासाठी १९९०मध्ये पुन्हा पाठवले गेले.  जगमोहन आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होता. यामुळे काश्मीरमधील हिंसेचा प्रश्न सोडवला गेला नाही. उलट हिंसा वाढत गेली. या प्रक्रियेमधूनदेखील काश्मीर मधील काश्मिरीयत अडचणीत आली. पाच, काश्मीरमधील पंडितांचे विस्थापन झाले. साडेतीन ते पाच लाख काश्मिरी पंडितांचे स्थलांतर घडले. काश्मिरी पंडितांचे स्थलांतर होण्यामुळे काश्मिरीयत ही जीवन जगण्याची पद्धत जवळपास संपुष्टात आली. सहा, १९९९मध्ये इंदिरा गांधींच्या नंतर प्रथमच जाणकार नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सत्तेवर आले. अटलबिहारी वाजपेयी यांना जम्मू-काश्मीरमधील सामाजिक पार्श्वभूमी  नीटनेटकी माहीत होती. १९९९ ते २००४ या दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांनी काश्मीरमध्ये काश्मिरीयत राबविण्याचा प्रयत्न केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकशाही, सहिष्णुता, धार्मिक सलोखा या तत्त्वांना अग्रक्रम दिला होता, असा त्यांचा दावा होता. परंतु तरीही काश्मिरी पंडितांचा प्रश्न पूर्णपणे सोडवला गेला नाही. सात, अटलबिहारी वाजपेयी यांच्या नंतर पंजाबियतची माहिती असणारे  मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. त्या काळात हिंसेचा प्रश्न फार चिघळला नाही. परंतु काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुटला नाही. आठ, मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपबरोबर आघाडी करून सरकार स्थापन केले (२०१६-२०१८). या कालखंडातदेखील काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवला गेला नाही. नऊ, ऐंशीच्या दशकापासून एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकापर्यंत काश्मिरीयत अडचणीत येत गेली. 

थोडक्यात काश्मिरीयत म्हणजे लोकशाही, धार्मिक सलोखा, सहिष्णुता या चौकटीतील राजकारण होते. त्याजागी राजकीय संघर्षाचे राजकारण उभे राहिले आहे. म्हणजे आज-काल काश्मिरीयत व जम्हूरीयतचे राजकारण हद्दपार झालेले दिसते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात काश्मिरीयतचे राजकारण करावे की काश्मिरीयत व जम्हूरीयत विरोधी राजकारण करावे? यापैकी कोणाची निवड करावी, हा एक यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या