महाराष्ट्राची राजकीय संस्कृती

प्रकाश पवार
सोमवार, 18 एप्रिल 2022


राज-रंग

समकालीन काळामध्ये म्हणजेच एकविसाव्या शतकाच्या दोन दशकातील राजकीय संस्कृती विसाव्या शतकातील साठीच्या दशकापेक्षा वेगळी आहे. समकालीन राजकीय संस्कृती चाणक्य केंद्रित राजकीय संस्कृती आहे.

महाराष्ट्रात आजकाल राजकीय संस्कृतीबद्दल सतत भाष्य केले जाते. विशेषतः शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन गडकरी,  सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे अशा बिनीच्या नेत्यांनी गेल्या दोन अडीच वर्षात वेळोवेळी, ‘...ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही,’ अशी भूमिका मांडली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीबद्दल राजकीय चर्चाविश्वात तीन प्रश्न उपस्थित होतात. पहिला एक साधा प्रश्न म्हणजे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कोणती आहे? दुसरा प्रश्न, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बदलत आहे का? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे बदलते स्वरूप कोणते आहे? आणि तीन, महाराष्ट्राची बदलती संस्कृती कोणत्या घडामोडींमुळे बदलत आहे? हे प्रश्न चित्तवेधक स्वरूपाचे आहेत. 

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची उदाहरणे तीन-चार घटनांमुळे पुन्हापुन्हा दिली जात आहेत. यापैकी पहिली घटना म्हणजे ईडीचा हस्तक्षेप. दुसरे उदाहरण म्हणजे, साथीच्या काळात मुंबई येथे रेल्वे स्थानकावर अचानकपणे झालेली गर्दी आणि पत्रकारांनी केलेले प्रक्षेपण. तिसरे उदाहरण अर्थातच शरद पवार यांना पुन्हापुन्हा राजकीय स्पर्धेत लक्ष्य करण्याचे दिसते. याबद्दलची उदाहरणे म्हणजे बारामती येथे आरक्षणासाठी धरणे आंदोलन, गोविंद बाग येथे शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन, एस.टी. संपासंदर्भात अचानकपणे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक घरावर मोर्चा हेदेखील दिले जाते. चौथे उदाहरण, इलेक्ट्रॉनिक मीडिया इंडस्ट्रीचा राजकीय क्षेत्रातील हस्तक्षेप हेदेखील वेळोवेळी नोंदविले गेले आहे. या उदाहरणांच्या पार्श्वभूमीवर राजकीय संस्कृतीची पन्नास आणि साठीच्या काळातील उदाहरणे दिली जातात. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, चिंतामणराव देशमुख, प्र. के. अत्रे यांनी घडवलेली आहे, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष पुन्हापुन्हा सांगतात. न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख हे अत्यंत सुसंस्कृत नेतृत्व होते. त्यांनी राजकीय संस्कृतीचे चार मानदंड अधोरेखित केले होते. एक, राजकीय पुढाऱ्यांमधील संबंधासाठी त्यांनी ‘राजकीय संस्कृती’ हा शब्दप्रयोग वापरला होता. विशेषतः राजकीय प्रचार करताना व्यक्तीची व्यक्तिगत मानहानी होणार नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा. यशवंतराव चव्हाण यांनी याची दखल सातत्याने घेतली. निवडणूक प्रचारामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर भर दिला. त्यांनी प्रचारात व्यक्तिगत उणीदुणी काढली नाहीत. व्यक्तिगत जीवनातील घटनांना त्यांनी राजकीय विषय म्हणून राजकारणात प्रवेश करू दिला नाही. थोडक्यात राजकारण सार्वजनिक असते. राजकारण व्यक्तिगत नसते, या गोष्टीची जाण असणारी संस्कृती अशी राजकीय संस्कृतीची संकल्पना आहे. दोन, रानडे, आंबेडकर, चव्हाण, देशमुख यांनी राजकीय पक्षांचे परस्परांशी संबंधदेखील सार्वजनिक स्वरूपाचे कल्पिलेले होते. राजकीय पक्षांमध्ये खुली स्पर्धा असेल, तरीही राजकीय पक्ष काही नीतिमूल्यांचे पालन करतील. राजकीय पक्षांची संस्कृती सारासार विवेकावर आधारित असेल. अशी यांची राजकीय संस्कृतीची संकल्पना होती. तीन, प्रतिस्पर्ध्याला आव्हान देताना नीतिमूल्यांची संस्कृती पाळली जात होती, उदा. चीनच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण यांची भूमिका राजकीय संस्कृती म्हणून महत्त्वाची होती. ‘चीन हा चीन आहे. परंतु भारत हा प्राचीन आहे,’ या यशवंतराव चव्हाणांच्या भाषाशैलीमध्ये प्राचीन संस्कृती आणि प्राचीन संस्कृतीच्या पायावरील संघर्ष हा मुद्दा कळीचा होता. चार, संस्कृतीची निवड करत असताना विविधतेतील एकात्मतेला महत्त्व दिले जात होते. न्यायमूर्ती रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, चिंतामणराव देशमुख यांनी राजकीय संस्कृतीची निवड या चौकटीत केली होती. डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय नैतिकता ही संस्कृती प्रमाण मानली होती. या गोष्टी गेल्या दोन-अडीच वर्षात पुन्हापुन्हा नोंदविल्या गेल्या आहेत. 

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील फेरबदल
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रत्येक दशकात बदलत गेली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीने प्रत्येक दशकात वेगवेगळी वळणे घेतली. याची काही नमुनेदार उदाहरणे दिसतात. एक, पन्नाशीच्या दशकात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आक्रमक झाली होती. पन्नाशीच्या दशकात संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या मुद्द्यावर आधारित राष्ट्रीय संस्कृती आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती असा उभा संघर्ष उभा राहिला होता. स.का. पाटील, मोरारजी देसाई यांची राजकीय संस्कृती आणि मराठी भाषिक लोकांची राजकीय संस्कृती असे द्वैत उभे राहिले होते. दोन, परंतु साठीच्या दशकांमध्ये हा संघर्ष निवळला. साठीच्या दशकामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी राजकीय संस्कृतीला राष्ट्रीय-प्रादेशिक सलोखा (National Regional Harmony), सामाजिक सलोखा (Social Harmony), धार्मिक सलोखा (Religious Harmony), भाषिक सलोखा (Linguistic Harmony), उपप्रादेशिक सलोखा (Sub-Regional Harmony), कृषी औद्योगिक सलोखा (Agriculture Industrial Harmony) असे सुसंवादी स्वरूप प्राप्त करून दिले. चव्हाण यांनी बहुस्तरीय सलोख्याची संकल्पना अधोरेखित केली होती. तीन, सत्तरीच्या दशकात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत नव्याने फेरबदल सुरू झाले. चव्हाण यांनी निश्चित केलेल्या बहुस्तरीय सलोख्याच्या संकल्पनेला आव्हान दिले गेले. यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला. यानंतर महाराष्ट्रात काँग्रेस विरुद्ध काँग्रेस अशी एक नवीन राजकीय संस्कृती निर्माण झाली. या राजकीय संस्कृतीमुळे उपप्रादेशिक सलोख्याच्या संस्कृतीला मोठे आव्हान मिळाले. चार, ऐंशीच्या दशकामध्ये नवहिंदुत्व ही नवीन संस्कृती निर्माण झाली. या संस्कृतीमध्ये आक्रमकता होती. आध्यात्मिक आणि धार्मिक सलोख्यापेक्षा ही संस्कृती वेगळी होती. पाच, नव्वदीच्या दशकामध्ये उत्तर भारतातील राजकीय संस्कृती महाराष्ट्रात स्वीकारण्यास सुरुवात झाली. उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये चाणक्य विचार मध्यवर्ती होता. यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्वाचे वर्णन ‘चाणक्य’ म्हणून केले जाऊ लागले. शरद पवार यांना मान्य असो अगर नसो प्रसारमाध्यमांनी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी शरद पवार यांचे वर्णन अनेकदा ‘चाणक्य’ असे केले होते. विशेषतः आघाडीचे राजकारण म्हणून चाणक्य पद्धतीची संस्कृती शिवसेना-भाजप यांनीही या दशकात घडवली होती. 

समकालीन काळातील राजकीय संस्कृती
समकालीन काळामध्ये म्हणजेच एकविसाव्या शतकाच्या दोन दशकातील राजकीय संस्कृती विसाव्या शतकातील साठीच्या दशकापेक्षा वेगळी आहे. समकालीन राजकीय संस्कृती चाणक्य केंद्रित राजकीय संस्कृती आहे. ही राजकीय संस्कृती कधी ‘ठाकरी’ भाषा वापरते. तर कधी साम, दाम, दंड, मतभेद अशा साधन अनेकतेचा वापर करते. एक, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील संस्कृती किंवा चाणक्य संस्कृती शहरी भागात प्रचंड प्रभावशाली दिसू लागली. मुंबई शहरामध्ये या संस्कृतीच्या भोवती राजकारण घडत गेले. मुंबईच्या बाहेर ठाणे, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे ‘चाणक्य संस्कृती’ची नवीन बेटे तयार झाली. चाणक्य विचार आधुनिक लोकशाहीमध्ये सुसंगत नाही असा एक निष्कर्ष विद्यापीठांच्या अभ्यासामध्ये काढला गेला होता. परंतु , हा निष्कर्ष चुकीचा होता हे एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात  सहज लक्षात येऊ लागले. दोन, एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात उत्तर प्रदेशातील संस्कृती किंवा चाणक्य संस्कृती ही घडामोड अतिगतीशीलपणे घडत गेली. साठीच्या दशकातील राजकीय संस्कृती आणि एकविसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकातील राजकीय संस्कृती यांचा कुठेही धागादोरा जुळत नव्हता. यामुळे महाराष्ट्रीय संस्कृती म्हणून नव्याने चर्चा सुरू झाली. ही चर्चा नव्या संदर्भात शरद पवार यांनी सुरू केली आहे. ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक नेता करताना दिसतो. तसेच नितीन गडकरी अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रीय राजकीय संस्कृतीची बाजू घेताना दिसतात. त्यांनी वेळोवेळी त्यांचे राजकारण महाराष्ट्रीय संस्कृती केंद्रित ठेवलेले दिसते. २००९ पासून पुढे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला महाराष्ट्र राजकीय संस्कृती केंद्रित राजकीय वर्तन करण्यास भाग पाडलेले दिसते. म्हणजेच थोडक्यात महाराष्ट्रीय राजकीय संस्कृती आणि समकालीन काळातील चाणक्य संस्कृती या दोन संस्कृतींपैकी कोणत्या संस्कृतीची निवड करावी? हा एक प्रश्न महाराष्ट्रीय जनतेच्या पुढे आहे.

संबंधित बातम्या