चित्तवेधक राजकीय प्रारूपे
राज-रंग
भारतातील प्रत्येक जिल्हा राजकारणाचा नवीन पट घडवतो, राजकारणाचा नवीन आखाडा घडवला जातो. अशीच एक चित्तवेधक कथा कोल्हापूर जिल्ह्यात घडून आली.
गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात विधानसभेच्या ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्यापैकी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासह दोन मतदारसंघांत काँग्रेस पक्षाने विजय मिळविला. तर पंढरपूरची पोटनिवडणूक भाजपने जिंकली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचा विजय हा नवीन प्रारूप घडवणारा आहे. या घडामोडींमधून दोन मुख्य प्रारूपांचा उदय झाला, असे निवडणूक निकालावरून दिसते. उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या दोन्ही प्रारूपांची सरळसरळ स्पर्धा घडून आली. त्यापैकी एक प्रारूप सतेज पाटील यांनी घडवले. तर दुसरे प्रारूप देवेंद्र फडणवीस घडवत आहेत. निवडणुकीतील जय पराजयापेक्षा सतेज पाटील प्रारूप आणि देवेंद्र फडणवीस प्रारूप या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. ही दोन प्रारूपे परस्पर विरोधी राजकारण घडविणारी आहेत.
सतेज पाटील प्रारूप
काँग्रेस पक्षाचे प्रारूप राष्ट्रीय राजकारणात पुन्हा पुन्हा पराभूत होत आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील पुन्हा पुन्हा यशस्वी होत आहेत. सतेज पाटील यांच्या राजकीय धोरणांमध्ये काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनाची शक्यता आहे. त्यामुळे सतेज पाटील प्रारूप हा राजकीय क्षेत्रातील एक नवीन जिज्ञासा निर्माण करणारा विषय ठरतो. या गोष्टीचे भान गल्लीपासून दिल्लीपर्यंत जवळपास सर्वांनाच आलेले दिसते. परंतु गल्लीच्या तुलनेत दिल्लीमध्ये या सतेज पाटील प्रारूपाचा आशय अस्पष्ट समजलेला दिसतो. विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाला सतेज पाटील प्रारूपाचा अर्थ कळलेला दिसतो. सतेज पाटील प्रारूपाची चर्चा राज्य पातळीवर गंभीरपणे होत राहील. या प्रारूपाची स्थूलमानाने पाच वैशिष्ट्ये आहेत. एक, सतेज पाटील प्रारूपाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदू आणि स्वाभिमान या दोन गोष्टींचा सुमेळ घातलेला दिसतो. त्यांनी या दोन गोष्टींना एकत्र जोडल्यामुळे एका अर्थाने सकारात्मक राजकारणाची पायाभरणी सुरू झाली आहे. दोन, सतेज पाटील प्रारूपामध्ये सामाजिक सलोखा ही संकल्पना एका अर्थाने तत्त्वज्ञान या प्रकारची आहे. परंतु त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतिकार्यक्रमांमध्ये उतरवलेले दिसते. तसेच त्यांनी या तत्त्वज्ञानाला विविध प्रकारचे कंगोरे नव्याने निर्माण करून दिले आहेत. उदाहरणार्थ, हिंदू-मुस्लिम ऐक्य, विविध जातींमधील सामाजिक सलोखा, स्थानिक व विस्थापितांमधील सलोखा, हिंदू-जैन सलोखा, हिंदू -लिंगायत सलोखा, कृषी आणि औद्योगिक सलोखा, कृषी आणि व्यापारी सलोखा अशी त्यांची व्यापक वैशिष्ट्ये कृती कार्यक्रमात दिसतात. विशेषतः हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यातील सलोखा हा या काळातील यशस्वी राजकारणाचा एक महत्त्वाचा प्रयोग ठरत आहे. तीन, विविध प्रकारचा सामाजिक सलोखा प्रत्यक्ष मतदान वर्तनामध्ये बदल घडवून आणतो, असा मुद्दा या प्रारूपामध्ये विकसित केला गेला आहे. यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाची मते काँग्रेस पक्षाकडे वळविण्यात त्यांना यश आले. हिंदुत्ववादी मतदारांना भाजप हा एक पर्याय उपलब्ध होता. परंतु पाटील यांनी शिवसेनेचे हिंदू मतदार आणि काँग्रेस पक्षाचे हिंदू मतदार यांच्यामध्ये एक नवीन समझोता घडवून आणला. ही घडामोड प्रचंड अवघड होती. परंतु उत्तर कोल्हापूर मतदार संघात ती यशस्वी झाली. चार, सतेज पाटील प्रारूपाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सोशल मीडिया या नवीन राजकीय सामाजिकरणाच्या साधनावर नियंत्रण मिळवलेले दिसते. तसेच त्यांनी युथ आणि बूथ यांच्यामध्ये एक प्रकारची साखळी निर्माण केली आहे. विविध खेळ आणि शिक्षणातील आवडीनिवडीच्या मदतीने त्यांनी तरुणांशी जुळवून घेतले. पाच, सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या अवतीभवती राजकारण घडविण्याचा प्रयत्न केला. यामुळे राज्य पातळीवरील नेतृत्व आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व या प्रारूपात फार हस्तक्षेप करू शकले नाही. तसेच त्यांच्या विरोधातील भाजपचे राज्य पातळीवरील नेतृत्व व राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वदेखील फार प्रभावी ठरू शकले नाही. थोडक्यात राजकारणाचा आखाडा केवळ जिल्ह्यांमध्ये उभा केला पाहिजे, हा एक यशस्वी प्रयोग त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस प्रारूप
कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात निवडणुकीचा निकाल म्हणून देवेंद्र फडणवीस प्रारूप आणि सतेज पाटील प्रारूप यामध्ये तीव्र स्पर्धा दिसते. सतेज पाटील प्रारूप निवडणुकीच्या संदर्भात स्थानिक संस्था, सहकारी संस्था, विधान परिषद, विधानसभा अशा पातळ्यांवरती वरचढ ठरले. परंतु तरीही या जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यासंदर्भातील चार वैशिष्ट्ये लक्ष्यवेधक आहेत. एक, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाप्रणीत हिंदुत्व कृतिशील आहे. देवेंद्र फडणवीस प्रारूपाने या जिल्ह्यात शिवसेनेकडील हिंदुत्ववादी मतदार भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला. यामुळे उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे मतदान वाढले. म्हणजेच काही मतदार काँग्रेसकडे वळले. तर काही मतदार भाजपकडे वळले. अर्थात शिवसेनेच्या पुढे भाजपने एक नवे आव्हान उभे केले आहे. यामुळे भाजप व शिवसेना सातत्याने हिंदुत्वाच्या भोवती राजकीय चर्चा घडवतात. दोन, परंपरागत व्यवसाय स्वीकारणारा एक वर्ग आहे. त्या वर्गामध्ये व्यवसाय आणि आधुनिकता अशी जुळवाजुळव सुरू आहे. त्याचबरोबर धार्मिक श्रद्धांची सीमारेषा ओलांडून लोक हिंदुत्वाच्या प्रांतात जाऊ शकतात. याबद्दलचे छोटे छोटे प्रयोग महत्त्वाचे ठरतात. यामुळे भाजपचे मतदान काही प्रमाणात वाढते. या गोष्टीचे भान देवेंद्र फडणवीस यांना आहे. तीन, बहुजन समाज भाजप विरोधात होता, मात्र बहुजन समाजातील एक गट भाजपशी जुळवून घेऊ इच्छितो. त्या गटाला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपशी जोडून घेतले. उदाहरणार्थ, महाडीक गट भाजपशी समरस झाला आहे. यामुळे बहुजन समाजाचा भाजपाविरोध हळूहळू निवळत चालला आहे. ही प्रक्रिया शैक्षणिक संस्था आणि नागरी संघटनांच्या मार्फतदेखील घडत आहे. चार, राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा हा मुद्दा उठविला आहे. चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेत आहेत. यामुळे हनुमान चालिसा एक हिंदुत्वाचा नवीन प्रकार घडविला जात आहे.
देवेंद्र फडणवीस प्रारूपामध्ये हिंदुत्व मध्यवर्ती आहे, तर सतेज पाटील प्रारूपामध्ये विकास आणि सामाजिक सलोखा मध्यवर्ती आहे. देवेंद्र फडणवीस प्रारूप राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाच्या भोवती राजकारण घडवते. तर सतेज पाटील प्रारूप जिल्ह्यातील नेतृत्वाला सत्ता व अधिकार देण्याची भूमिका घेते. जिल्ह्याच्या राजकारणाची स्वायत्तता सतेज पाटील प्रारूप जपण्याचा प्रयत्न करते. याउलट जिल्ह्याच्या राजकारणावर राज्याच्या व राष्ट्रीय राजकारणाचे अंतिम नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस प्रारूप करते. हा महत्त्वाचा फरक देवेंद्र फडणवीस प्रारूप आणि सतेज पाटील प्रारूपामध्ये आहे.