मध्यममार्गी उद्धव ठाकरे

प्रकाश पवार
सोमवार, 27 एप्रिल 2020

राज-रंग
 

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिनाभरापासून मोठे बदल दिसू लागले आहेत. त्यांपैकी एक बदल म्हणजे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले जात आहे. दुसरा बदल म्हणजे भाजप आक्रमक होत आहे. हळूहळू  नवीन समस्या निर्माण होत आहेत. पालघर येथे दोन साधूंच्या हत्या झाल्या, त्यामुळे दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये  अंतर पडत आहे. तसेच जनतेच्या मनातही  अंतर वाढत चालले आहे. यांची कारणमीमांसा फार झाली नाही. हा बदल गंभीर स्वरूप धारण करत आहे. याचे रंगीबेरंगी स्वरूप  वेगळे आणि गंभीरपणा वेगळा आहे. हे  नीट  समजून घ्यावे लागेल. 

मध्यममार्गी उद्धव  ठाकरे 
मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे हे मध्यममार्गी भूमिका घेणारे आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे अशा दोन वेगवेगळ्या व्यक्ती बरोबर दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. उद्धव ठाकरे आतापर्यंत तीन अवस्थांमधून पुढे गेले  आहेत. एक, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ही एक अवस्था होती. तेव्हा त्यांना पक्षांतर्गत विरोधकांशी  संघर्ष करावा लागला. दुसरी अवस्था भाजपशी युती झाली. परंतु, संघर्ष करावा लागला. युतीबरोबर केवळ समझोता आला नाही, तर युतीच्या पोटात एक बेबनाव होता. तिसरी अवस्था कोविड - १९ पासून सुरू झाली. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाल्यापासून उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व राजकीय  पक्ष आणि हिंदुत्व अशा द्विधा मनःस्थितीत होते. यामध्ये सत्तेवर आल्या नंतर फार मोठा बदल झाला नाही. उलट त्यांनी राममंदिराचा मुद्दा उचलला होता. भाजप आणि शिवसेना यांच्यात या  मुद्द्यांवर  स्पर्धा होती. पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्व विचारांशी जुळवून घेतले. यामुळे शिवसेनेच्या पुढे हिंदुत्वा संदर्भात  मोठे आव्हान उभे राहिले. शिवसेना पक्षाने हिंदुत्व विचारांची पुनर्मांडणी सुरू  केली. शिवसेना पक्षाने प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या विचारांचा मध्यवर्ती आशय मांडला. अशी एकूण नवीन मांडणी सुरू असताना कोविड - १९ ही एक मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना पक्षाची वैचारिक भूमिका मध्यममार्गी झाली. उद्धव ठाकरे यांनी कोविड - १९ च्या काळात अनेक वेळा जनतेशी संवाद साधताना मध्यममार्गी भूमिका घेतली. अंतराय हा शिवसेनेचा मुख्य राजकीय व वैचारिक  भाग होता. अंतराय म्हणजे दोन गटांमध्ये राजकारणाची विभागणी जाणीवपूर्वक  केली जाते. तसा आकार दिला जातो. अंतराय  भूमिपुत्र  आणि परप्रांतीय, हिंदू आणि मुस्लीम असा होता. असे त्यांचे अंतराय  कळीचे आणि राजकारण घडवणारे  होते. कोविड - १९ च्या काळात  शिवसेनेची ही संकल्पना जवळजवळ लोप पावली. उद्धव ठाकरे यांनी अंतरायांच्या जागी आम सहमतीची संकल्पना सातत्याने वापरली. त्यांनी भूमीपुत्र-परप्रांतीय, हिंदू-मुस्लीम, आक्रमक हिंदुत्व-मवाळ हिंदुत्व अशी भूमिका घेतली नाही. यामुळे शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री यांनी या काळात सहमतीने राजकारण केले. आक्रमकता हळूहळू मागे पडत आहे. मुख्यमंत्री लोकशाही मार्गाने जात आहेत. यामध्ये संवाद, चर्चा, चिकाटीने प्रयत्न केले जात आहेत. हा बदल शिवसेना पक्षाच्या संदर्भात खूप कठीण होता. असा बदल शिवसेना पक्षात घडेल अशी कल्पना आधी कोणी मांडली नाही. असा बदल शिवसेना पक्षात घडेल असा विचार जरी कोणी  मांडला असता, तरी प्रचंड टीका झाली असती. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा बदल पचवला आहे. याची दोन नमुनेदार उदाहरणे  म्हणजे एक, बंदीच्या काळात हिंदू-मुस्लीम असे परस्परविरोधी राजकारण त्यांनी केले नाही. दोन, हिंदू साधूंची हत्या झाली, तरीही मुख्यमंत्र्यांनी  समतोल भूमिका घेतली. यामुळे शिवसेना विविध आव्हाने  पचवीत आहे असे दिसून येते.

मुख्यमंत्री यांच्या पुढे दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होण्याचे प्रचंड मोठे आव्हान आहे. या मुद्यावर घटनात्मक हालचाल महाविकास आघाडीने केली आहे. यामुळे हा प्रश्न गंभीर नाही. परंतु, हा प्रश्न गंभीर केला गेला आहे. यामुळे मुख्यमंत्री विरुद्ध भाजप असा अंतराय घडला आहे. या मुद्द्यावर निकाल कोणत्याही बाजूने लागला, तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रचंड लोकप्रियता मिळेल. थोडक्यात कोविड - १९ च्या काळात लोकमत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जात आहे असे दिसते. हा  मुद्दा  चूकीच्या वेळी उपस्थित केला आहे. प्रश्नाला देखील वेळ आणि काळाची मर्यादा असते. ही मर्यादा भाजपने ओलांडली आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात ही वेळ आणि काळ बरोबर नाही, असे जनतेचे मत आहे. त्यामुळे हा मुद्दा शिवसेनेसाठी  ताकद झाला आहे.

महाराष्ट्रवाद
महाराष्ट्र आणि दिल्ली यांचे संबंध सरळसरळ विरोधात गेले आहेत. यांची कारणमीमांसा चतुसुत्री पद्धतीची राजकीय स्वरूपाची आहे. एक, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यात सुप्त  संघर्ष सुरू होता आणि आहे. हा संघर्ष राजकीय स्वरूपाचा आहे. म्हणजे सत्तास्पर्धेचा आहे. या मुद्द्यावर गडकरी समर्थक वर्गात नाराजी आहे. पण गडकरी समतोल बुद्धीचे राजकारणी आहेत. दोन, दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा पाच वर्षे  टिकली. परंतु, महाराष्ट्र मोठे राज्य आहे. येथे यशस्वी झालेले मुख्यमंत्री दिल्लीचा दावा करतात. असा दावा फडणवीस समर्थकांनी सुरू  केला होता. यामुळे मोदींपेक्षा जास्त चिंता शहांना वाटू लागली, तर विशेष काही नाही. यामुळे फडणवीस समर्थक आणि शहा यांच्यात सुप्त मन आणि मत भिन्नता आहे. ही घडामोड उघड झाली नाही. परंतु,  सत्तास्पर्धेचे  हे एक वैशिष्ट्य आहे. ते कटू सत्य आहे. तीन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये गेली दोन वर्षे तणाव वाढला आहे. निवडणूक प्रचाराच्या व रणधुमाळीच्या पुढे वाद गेला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध मोदी-शहा हा वाद कळीचा आहे. या मुद्द्याच्या आधी कॉंग्रेसमुक्त भारत आणि नेहरूविरोध या दोन मुद्द्यांवर  महाराष्ट्र भाजप विरुद्ध गेला आहे. चौथा मुद्दा म्हणजे शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा आहे. यांचे आणि भाजपचे संबंध सलोख्याचे होते. परंतु, भाजपने अविवेकी पद्धतीने  सत्तास्पर्धा सुरू केली. ही घडामोड फडणवीस विरोधात घडावी, असे दिल्लीच्या रणधुरंधर  नेतृत्त्वास कधीकधी वाटले असावे. कदाचित नसेलही, पण घडले मात्र नेमके तसेच. यानंतर कोविड - १९ च्या काळात दिल्लीविरोधी महाराष्ट्र असा वाद सुरू झाला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि दिल्ली यांच्या दरम्यानचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले आहे. भाजप विरुद्ध इतर सर्व पक्ष अशी एक पक्षीय घडामोड घडली आहे, तर दुसरीकडे जनसमूह  भाजप विरुद्ध जात आहे. यामुळे महाराष्ट्राचे लोकमत भाजप विरुद्ध जात आहे. 

दिल्लीविरोध हा एक नवीन गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. महाराष्ट्राची ही मोठी कोंडी आहे. यांचे आत्मभान दिल्लीला नाही. तसेच महाराष्ट्रात या गोष्टी उथळ पद्धतीने  घेतल्या जात आहेत. महाराष्ट्रात काही प्रश्नांवर व्यापक भूमिका घेतली गेली. परंतु, राजकीय क्षेत्रात कॉंग्रेसनंतर भाजप आणि महाराष्ट्र असा वाद उफाळून येत आहे. शरद पवार, नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे असे तीन नेते समतोल विचारांचे आहेत. या तीन नेत्यांच्या पुढे महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची मोठी जबाबदारी आहे. आरोग्य हा विषय राज्य सरकारांच्या क्षेत्रात आणि अर्थकारण केंद्र सरकारच्या क्षेत्रात असा वाद  हा मुद्दा केवळ महाराष्ट्राचा नाही. हा मुद्दा अखिल भारतीय आहे. त्यामुळे राजकारण आणि अर्थकारण यांची फार चढाओढ करू  नये.

संबंधित बातम्या