नाटक आणि प्रेक्षक : ना उरो अंतर

राज काझी
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

रंगभूमी

‘ओके हॉर्न प्लिज’च्या आसपास ट्रकांच्या मागे ‘कीप डिस्टन्स’सुद्धा लिहिलेलं असतं जे आपल्याला ‘बुरी नजरवाले तेरा मुह काला’ इतकंच मनावर घ्यावसं वाटत नव्हतं. कोरोनानं मात्र आपल्या आयुष्यात हे ‘डिस्टन्स’ सक्तीचेच करून ठेवले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेप्रमाणेच नाटक-सिनेमालाही प्रेक्षकांना मधे एकेक खुर्ची रिकामी ठेऊन बसावं लागतंय. नाटक आणि प्रेक्षकांमध्ये एक विचित्रच अंतराय निर्माण होऊन बसलाय. रंगमंचावर प्रयोग सुरू असताना नाटक-प्रेक्षकांमध्ये जी एक अदृश्य, अनाम देवाण घेवाण होत असते ती सांधण्यासाठी, रेंज क्षीण असलेल्या ठिकाणी मोबाईलची होते तशी आपली उलघाल होतेय! – मात्र संवाद तुटू नये, अंतर पडू नये यासाठी नाटक आणि प्रेक्षक दोघेही प्राप्त परिस्थितीत ‘शो मस्ट गो ऑन’ ही निष्ठा निकरानं निभावताहेत.

नाटक आणि प्रेक्षक यांचं नातं ‘जवळ’चं, एकमेकांना कधीच ‘अंतर’ न देणारं! विशेषतः मराठी माणसाचं नाट्यप्रेम सर्वश्रुत सर्वमान्यच, तर नाटकाचं अस्तित्वच प्रेक्षकाधीन. प्रेक्षकांविना अपूर्ण. म्हणून तर प्रेक्षकांना ‘मायबाप’ संबोधणाऱ्या बालगंधर्वांचा वारसा चालवणारी आजची रंगभूमीही ‘रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना अभिवादन करून’च पडदा दूर करते… मात्र या पडद्याची सीमारेषा या दोन निकटच्या जगात कायम असते. रंगमंच आणि प्रेक्षागृह यांच्या या विभाजकाला ‘फायरिंग लाईन’ म्हटलं जातं. ‘अग्निरेखा’, जी दोन्हीही बाजूनं ओलांडायची मुभा नाही! चार भिंतींत घडणाऱ्या नाटकामधली व प्रेक्षकांमधली अदृश्य चौथी भिंत. प्रेक्षकांना मुळातच वंदनीय मानल्यानं नाटकानं या भिंतीत राहणं म्हणजे आपल्या मर्यादेत राहणं. त्याच भूमिकेतून नियम होते. प्रेक्षकांना पाठ दाखवायची नाही, सतत त्यांच्या सन्मुख राहायचं. भरतानं नाटकात शयनदृश्यांइतकीच भोजनदृश्यंही निषिद्ध मानली. समोरच्या नाटकाशी एकरूप होताना बघणाऱ्यांच्याही मनात खाण्याची इच्छा निर्माण होऊ नये आणि मूळ नाटकापासून त्यांनी विचलित होऊ नये यासाठी खरं तर ही खबरदारी! असल्या भावना उद्दीपनापासून प्रेक्षकांना दूर ठेवण्याची घेता येईल तेवढी खबरदारी घेणारं नाटक त्यांच्या उदात्त भावनांना आवाहन करण्याचा प्रयत्न कायम करीत आलं. भावनेला स्पर्श करणं वेगळं आणि भावना चाळवणं वेगळं हे गणित चुकलेली नाटकं कमअस्सलच ठरली.

नाटक आणि प्रेक्षकांमधे ही चौथी भिंत असली तरी मधलं अंतर विरघळून टाकण्याची ताकद नाटकात आहे. रंगणाऱ्या प्रयोगात एकरूप होण्याची मानसिकता प्रेक्षकही बाळगून असतो. नुसतं बघणं नसतं, मनाची कवाडंही किलकिली असतात आणि उत्तम नाटकामध्ये ती उघडून थेट मनापर्यंत पोहोचण्याची क्षमता असते. मनाशी लीलया संवाद साधणारं नाटक अनेकदा बुद्धीलाही यात सामील करू पाहतं. मन आणि बुद्धी दोहोंनाही आनंद देतं ते नाटक श्रेष्ठ ठरतं. पडदा पडल्यावरही असं नाटक तिथं थांबत नाही ते प्रेक्षकांसोबतच येतं, त्यांच्या ‘अंतरा’त!... 

नाटक आणि प्रेक्षक यांच्यात अंतर उरत नाही तेव्हाच प्रयोग रंगतो, रंगमंचावर पात्रं आपापले संवाद बोलत असली तरी नाटक मात्र प्रेक्षकांशी संवाद जुळवण्याच्या प्रयत्नात असतं. कधी कधी त्यासाठी ते प्रसंगी पात्रांनाही प्रेक्षकांशी थेट बोलायला सांगत आलं आहे. संगीत नाटकात ‘नांदी’नंच याला सुरुवात होते आणि मग सूत्रधार नटीशी बोलता बोलता प्रेक्षकांशीही बोलतच नाटक सुरू करून देतो. नाटकाला जे प्रेक्षकांना सांगायचं आहे तेही तोच शेवटी भरतवाक्यात थेट सांगून टाकतो! अर्थात नाटकांच्याही आधी आख्यानं आणि कीर्तनं श्रोत्यांशी केवळ बोलायचीच नाही, तर त्यांना आपल्यात सामीलसुद्धा करून घ्यायची. लोकनाट्यं तर तशीही मोकळी ढाकळीच, शाहीर अन सोंगाडे तर प्रेक्षकांमधल्या नामांकितांना बरोब्बर हेरून त्यांच्या टोप्याही उडवायची. ‘विच्छा माझी पुरी करा’ म्हणताना दादा कोंडक्यांनी अगदी यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रेंसारख्या मातब्बरांनाही सोडलं नव्हतं… नाटक ही सलगी प्रेक्षकांच्या आणखी जवळ जाण्यासाठी करत असतं.

प्रेक्षकांना नाटक आपल्या जवळचंच नव्हे तर आपलंच वाटतं, जेंव्हा ते त्यांच्या जगण्याशी नातं सांगतं. त्यांच्या भवतालाचं, आयुष्याचं प्रतिबिंब नाटकाच्या आशयात दिसल्यानं असं ममत्व येऊ शकतं. एखाद्याच्या मनाला भिडताना नाटकानं आपला सर्वज्ञात खोटेपणाही पार केलेला असतो. अभिनेते, दिग्दर्शक, तंत्रज्ञांच्या कुशल कामगिरीनं साधलेल्या प्रभावी परिणामकारकतेचाही यात वाटा असतो. प्रभावशून्य प्रयोग संवेदनशील आशयालाही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यापासून दूरच ठेऊ शकतो. याही शिवाय, मुळात प्रेक्षकांच्या मनाबिनापर्यंत पोहोचण्यात स्वतःलाच रस नसणारी दुर्बोध आशयाची स्वयंघोषित थोर नाटकंही या जगात असतात!

प्रेक्षकांच्या मतीशी असं टोकाचं फटकून वागणाऱ्या नाटकांना प्रेक्षक आपल्या मनापासूनही लांबच ठेवतात. प्रेक्षकांपर्यंत काही पोहोचत नसलं तर ते तिथंच थिजून जातं, हा अनुभव जब्बार पटेलांनीही त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी आरंभीच्या काळी घेतला. राज्यनाट्यस्पर्धेत ‘पीडीए’ कडून त्यांनी ‘जादूगार’ हे असंच जडजंबाळ नाटक केलं होतं. पहिल्या प्रयोगाच्या पहिल्या काही मिनिटातच त्यांना आपली चूक उमगली. नाटक प्रेक्षकांच्या डोक्यावरूनच जाणार असेल तर त्यांच्या आतपर्यंत पोहोचण्याची आस धरणं व्यर्थच! नाटकांबरोबरच आपल्या चित्रपटांबाबतीतही हा धडा त्यांनी पुढं आयुष्यभर लक्षात ठेवला. आयनेस्कोच्या अशाच ‘द चेअर्स’ वरून विजया मेहतांनीही ‘खुर्च्या’ करून पाहिलं. या न-नाट्याला त्यांच्या खास सुजाण सुबुद्ध प्रेक्षकांनीही नन्नाच दिला! त्यावर पुलंनी त्यांच्या खुमासदार शैलीत ‘खुर्च्या (भाडयाने आणलेल्या!)’ लिहून त्याची खिल्ली उडवली होती.

प्रेक्षकांच्या मनासोबतच संवेदनांना स्पर्श करण्यासाठी नाटकानं अनेकदा आपला कमानीतला मंच ओलांडून थेट प्रेक्षकांमध्येही प्रवेश केला. अर्थात ‘प्रोसेनियम’मधून बाहेर पडत प्रेक्षकांना सामोरं जाणारं या ‘अल्टरनेटिव्ह थिएटर’ला रंजनापेक्षा जागरणाचा ध्यास असे. समूहानं समूहात उभं राहणारं बादल सरकारांचं ‘थर्ड थिएटर’ जनसामान्यांत चेतनेचा स्रोत बनलं होतं. वंगभूमीच्या या रंगचळवळीनं महाराष्ट्रासह देशात उत्तरेकडून दक्षिणेपर्यंतच्या सामाजिक बांधिलकीच्या रंगकर्मींना प्रेरणा दिली. आणीबाणीच्या काळात अमोल पालेकरांनी केलेलं ‘जुलूस’ हे केवळ एक नाटक नव्हतं… नुसती कमान पार करूनच नाटक थांबलं नाही, प्रेक्षागृहांबाहेर पडत ते प्रसंगी रस्त्यांवरही उतरलं. अशी पथनाट्यं, चौथरा नाटकं ही जनसामान्यांच्या अंतरीचा उद््गार बनली. यांच्यातल्या पुढे वाढत गेलेल्या दाहक शक्तीचा मुजोर व्यवस्थेलाही धसका घ्यावा लागला आणि स्वतःला वाचवण्यासाठीच्या बिथरल्या अगतिकतेतून सफदर हाश्मींसारखा बळीही तिनं घेतला. पण रंगभूमीचं अपार सामर्थ्य अमरच राहिलं, माणसांसाठी उभ्या नाटकासाठी माणसानंही रक्त वाहिलं!

नाटका-प्रेक्षकांमधली ‘अग्निरेखा’ ओलांडल्यानंच आविष्कारात ही दाहकता आली असेल का?.. अर्थात दरवेळी व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्यासाठीच फक्त हे घडलं असंही नाही. ‘वंचितांच्या रंगभूमी’ बरोबरच ‘वंचितांसाठीची रंगभूमी’ही बिनछपराचीच होती. झोपडपट्टीतल्या मुलांनाही नाटक पाहता यावं म्हणून रत्नाकर मतकरींनी आपलं ‘टी बॉक्स थिएटर’ त्यांच्या वस्त्यांमध्ये नेलं. याच मतकरींनी नाटकाचा अनुभव गडद करण्यासाठी ‘लोककथा ७८’ वेळी आपली पात्रं प्रेक्षागृहातच नव्हे तर प्रेक्षागृहाबाहेरही वावरत ठेवली होती. तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगातही नानाच्या लग्नाच्या अक्षता प्रेक्षकांमध्ये सुद्धा वाटल्या जायच्या. पुण्याच्या ‘भरत’मधल्या एका प्रयोगाला शरद पवारांसोबत आलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या हातावरसुद्धा नंदू पोळनं अक्षता ठेवल्या होत्या!... प्रेक्षकांमधून ‘एन्ट्री’ आणि ‘एक्झिट्स’ची त्या काळी हौशी व स्पर्धांच्या नाटकांमधून गर्दीच होऊ लागली होती. खरं तर या सगळ्यांच्या खूप आधी साठच्या दशकामधेच ‘झोपी गेलेला जागा झाला’चे बबन प्रभू प्रेक्षकांमधून अवतरत. अगदी आजही ‘शेखर खोसला’चा मारेकरी प्रेक्षकांत बसलेला आढळतो तर ‘लग्नाची पुढची गोष्ट’ सांगायला कविता मेढेकर प्रेक्षकांमधून येते. आपल्या अनुभवात सामील करून घेण्यासाठी नाटक हे असं प्रेक्षकांत उतरत असलं तरी काही वेळा या उलट आपल्याशी एकरूप होत आलेल्या प्रेक्षकाला त्यातून बाहेर काढण्यासाठीही नाटक हे तंत्र वापरतं. जर्मन नाटककार ब्रेख्तची ही रंगशैली त्यांच्या नाटकांबरोबरच आपल्याकडेही आली. खानोलकरांनी अनुवादित केलेल्या ‘अजब न्याय वर्तुळाचा’मध्ये विजया मेहता यांनी व तर पुलंच्या, जब्बार पटेल दिग्दर्शित ‘तीन पैशांचा तमाशा’ मध्ये हे तंत्र जाणकारीनं वापरलं गेलं. नाटकाच्या कथेत प्रेक्षकाला जास्त रमू न देता हे केवळ नाटक आहे याची अधूनमधून जाणीव करून देत त्याहीपेक्षा नाटकाला जे महत्त्वाचं सांगायचं आहे ते अधोरेखित करण्याचं ब्रेख्तसाहेबांचं हे ‘एलिएनेशन’ तंत्र!

प्रेक्षकांचा फार अनुनय न करण्याचा स्वभाव असणाऱ्या प्रयोगशील रंगभूमीलाही एका टप्प्यावर एका वेगळ्या प्रकारच्या रंगानुभवाच्या निर्मितीसाठी प्रेक्षकांना अधिक जवळ आणण्याची निकड जाणवली. कमानी रंगमंचावरच्या दर्शनी वास्तववादी नाटकापेक्षाही अधिक खऱ्या नाट्यानुभवाच्या चाचपणीसाठी प्रेक्षकांचा अधिक समीपचा सहभाग अपरिहार्य ठरला. नाटकाच्या ‘इंटेन्स’ अनुभवासाठी ही ‘इंटिमेट’ अर्थात ‘समीप रंगभूमी’ उभी राहिली. छोटेखानी सभागृहात तिन्ही-चारही बाजूने प्रेक्षकांच्या सान्निध्यात वेगळ्या शैली व संवेदनेची नाटकं रंगू लागली. सत्तर-ऐंशीच्या दशकात दादरच्या छबिलदास विद्यालयात मूळ धरलेल्या या चळवळीनं नाटक आणि प्रेक्षकांना चार पावलं पुढं नेलं. मुंबईत त्याही आधी अन्यत्र असे प्रयोग होत होतेच, पण छबिलदासनं त्यांना एककेंद्रित केलं. सत्तरच्या दशकाच्या आरंभीच पुण्यातही ‘महाराष्ट्रीय कलोपासक’नं कन्याशाळेच्या हॉलमध्ये एकाच एकांकिकेचे दर बुधवारी असे महिन्यात चार प्रयोग करायला सुरुवात केली होती. वास्तविक ‘प्रयोग’ नावाचा हा उपक्रम या आधी काही काळ टिळक रस्त्यावरच्या मधू लोखंडेंच्या छापखान्याच्या प्रशस्त प्रांगणात सुरू झाला होता, माधव वझेंनी बसवलेल्या सतीश आळेकरांच्या ‘सामना’ या एकांकिकेपासूनच...

मधल्या मोठ्या खंडानंतर पुढे विविध मुक्काम बदलत काही काळ पुण्यातल्या ‘स्नेहसदन’मध्ये पुन्हा उभी राहिलेली ही रंगभूमी आज ‘सुदर्शन’मध्ये सुस्थापित झालेली दिसते. ‘ज्योत्स्ना भोळे रंगमंच’ आणि आता ‘द बॉक्स’ या विस्तारित शाखा... प्रदीप वैद्यंच्या ‘काजव्यांचा गाव’नं नाटक-प्रेक्षकांमधलं उरलंसुरलं अंतरही आता संपवलंय. प्रेक्षकांनी वेढलेल्या, भिडलेल्या जागेत हा ‘काजव्यांचा गाव’ उभा राहतो. वैद्य याला ‘इमरसिव्ह थिएटर’ म्हणतात, जिथं नाटक-प्रेक्षक एकजीव होतात. शंभरपन्नास प्रेक्षकातलं हे ‘काजव्यांचा गाव’ असो की आठदहा हजारांच्या विराट समूहातलं ‘जाणता राजा’.. वारीच्या रिंगणात काय अन पंढरीच्या गाभाऱ्यात काय, शेवटी आस असते ती मनोमन गळा भेटीचीच!

नाटक व प्रेक्षकांमधे अंतर न उरो आणि अद्वैताचा हा अमृतानुभव अनुपम होवो.

संबंधित बातम्या