वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 27 एप्रिल 2020

वाचक लिहितात...
निवेदन :
‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

वाचनीय अंक
‘सकाळ साप्ताहिक’ची दुसरी ई-आवृत्तीही (२५ एप्रिल २०२०) वाचनीय आहे. डॉ. अविनाश भोंडवे खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त लिहीत असतात. प्रकाश पवार यांच्या राजकीय विश्लेषणाला चिंतनाची जोड मिळून ते अधिक प्रगल्भ होत आहे. नंदिनी  आत्मसिद्ध  यांचे लिखाण  तर  उत्तमच... आणि तुका ह्मणे सहज आहे। सहज पाहे सहजी।। 
- डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ लेखक, पुणे 

वाचनीय व विश्वासार्ह साप्ताहिक   
सर्वप्रथम ‘सकाळ साप्ताहिक’ची ई-आवृत्ती (२५ एप्रिल २०२०) उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद! अंकातील सर्वच लेख माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण आहेत. साप्ताहिकमधील माहिती नेहमीच वाचनीय आणि विश्वासार्ह असते. 'संकटातील सकारात्मकता' हे संपादकीय उत्तम आहे. 'मानवी अस्तित्वाची लढाई' या लेखात राजकीय परिस्थितीचे उत्तम विश्लेषण केले आहे. 'क्रीडाजगतासही कोरोनाने ग्रासले' या लेखातील ऑलिंपिक स्पर्धेसंदर्भातील माहिती छान असून ऑलिंपिक स्पर्धा रद्द न होता एक वर्ष पुढे ढकलण्यात आल्याने नक्कीच खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे. एकूणच अंक वाचनीय झाला आहे.
- मिलिंद देशपांडे, पुणे

'कोविड-१९'ची कथा सांगणारा अप्रतिम लेख   
‘सकाळ साप्ताहिक’मधील राज-रंग सदरांतर्गत  कोविडची कथा सांगणारा 'मानवी अस्तित्वाची लढाई' (२५ एप्रिल २०२०)  हा प्रकाश पवार यांचा लेख खूप चांगला आहे. कोविड-१९  या  प्रश्नाचा  स्थानिक ते जागतिक परिप्रेक्ष्य, राज्यसंस्थेची भूमिका, मानवीयतेचे प्रश्न, गुंते, ताणतणाव याविषयी फार सूत्ररूपाने  लिहिले आहे.  त्यातले सभय मानवी चिंता आणि भारतीय सकारात्मकता, तसेच गावगाड्यातील ऊर्जा कसा धीर देऊ  शकते याचे मार्मिक विश्लेषण केले आहे. मानवी व जग ध्रुवीकरण काळातील दिशाहीन काळात समकालीन भयग्रस्त जीवनावरील इतकी सखोल माहिती देणारा लेख वाचायला मिळणे दुर्लभ, पण  हे  प्रकाश पवार यांच्या लिखाणातून शक्य झाले असून त्यांनी हा विषय खूप मोठ्या कॅनव्हासवर लिहिला आहे.
- रणधीर शिंदे,  मराठी अधिविभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विषयाची समर्पक मांडणी 
‘सकाळ साप्ताहिक’मधील (२५ एप्रिल २०२०)  प्रकाश पवार यांच्या ‘मानवी अस्तित्वाची लढाई या  लेखात त्यांनी  विषयाची  अतिशय समर्पक मांडणी केली आहे. राजकीय परिस्थिती मांडताना अनेक नवीन पैलूंवर प्रकाश टाकला आहे. अगदी गावगाड्याचा संदर्भ देऊन सामाजिक, धार्मिक संस्थाचा हस्तक्षेप, अमेरिकी  आणि भारतीय संघराज्य व्यवस्थेची तुलनात्मक मांडणी केली आहे. दोन्ही देशांमधील नेतृत्व आणि तेथील राज्य सरकारांची  धडपड व अस्वस्थता  मांडली  आहे. एकूणच लेख तर छान झालाच आहे, शिवाय लेखातून  अनेक नवे राजकारण विषयक संदर्भ पुढे आणले आहेत.
- राज पांडे, बारामती

छापील अंकाच्या प्रतीक्षेत 
‘सकाळ साप्ताहिक’चा (२५ एप्रिल २०२०)  अंक वाचला. सध्या अंक ई-आवृत्ती म्हणून  प्रसिद्ध होत असल्याने  वाचायला थोडा त्रास होतो,  पण  अंक वाचनीय झाला आहे. मात्र मी छापील अंकाची वाट पाहत आहे. मला स्वतःला  या अंकात सहजच या  सदरातील ऋता  बावडेकर यांचा 'प्रेम म्हणजे काय?', भटकंतीत भेटलेला  अवलिया ही ट्रेककथा, लॉकडाऊनमधले दिवस, मनतरंग सदरातील जहाज सोडायचे नाही, तर  ट्रेंडिंग  या सदरातील 'कुंभकर्णाची लोकप्रियता' इत्यादी लेख आवडले, छान आहेत.    
- विवेक देशपांडे, पुणे

काही लेख विशेष आवडले!
‘सकाळ साप्ताहिक’ची ई-आवृत्ती (२५ एप्रिल २०२०) उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.  या अंकातील डॉ. अविनाश भोंडवे यांचा 'कोरोनाच्या ऐकीव संकल्पना', 'भटकंतीत भेटलेला  अवलिया' ही  ट्रेककथा, व्हॉट्स न्यू सदरातील फिटनेस ट्रॅकर  'चार्ज  4'ची एंट्री, नंदिनी आत्मसिद्ध  यांचा 'बनती नही है  बादा  ओ साग़र  कहे बगैर' लेख आणि ट्रेंडिंग सदरातील  इरावती बारसोडे यांचा 'कुंभकर्णाची लोकप्रियता' हे लेख चांगले उतरले आहेत. तसेच कट्टा हे  राजकीय सदरही  मला आवडते.    
- प्रकाश निवृत्ती बोंगाळे, पुणे

लेख आणि मांडणी उत्कृष्ट 
'कोविडोत्तर युगाची नांदी' (१८ एप्रिल २०२०) या लेखासाठी सर्वप्रथम मी प्रकाश पवार यांना धन्यवाद देतो, की त्यांनी यासारख्या विचारांची मांडणी केली. कारण ही मांडणी समाजापुढे येणे आवश्यक होते. या लेखात सरांनी काळाची विभागणी दोन विभागांत करून 'चंड' म्हणजे 'अमानवी' ही संकल्पना आमच्यासारख्या अभ्यासकांना माहिती करून दिली. तसेच जगाची संरचनात्मक व्यवस्था आज उभी राहत असून जुन्याचा अंत होत आहे, तर नव्याला सहमती मिळत आहे याबद्दलही मांडणी केली. वर्णद्वेष वाढत असून अमेरिकेसारखे काही देश हिंसक भूमिका घेत आहेत आणि यातूनच समाजाची बदलत चाललेली मानसिकता लक्षात येते. विज्ञान-तंत्रज्ञानाला माणूसच नियंत्रित करतो, यामध्ये चंड भूमिका कशी असावी याचा उल्लेख केला असून विविध धोरणांमुळे सामाजिक व राजकीय जीवन कसे बदलले हेही सविस्तर मांडले आहे. मात्र, आर्थिक क्षेत्रामध्ये कोरोनाची भूमिका कशी आहे यावरही थोडा भर द्यायला हवा होता. मात्र, राजकीय अंगाने पाहिले तर लेख आणि मांडणी उत्कृष्ट आहे!
- डॉ. संजय गायकवाड, पुणे  

वाचनीय ई-आवृत्ती
‘सकाळ साप्ताहिक’ची  दुसरी  ई-आवृत्ती (२५ एप्रिल २०२०) वाचली. पहिल्या ई-आवृत्तीपेक्षा  हा अंक वाचायला  सोपा गेला. 'कोविड - १९'च्या पार्श्वभूमीवरील संपादकीय उत्तम आहे. 'आरोग्य संपदा'मध्ये डॉ. अविनाश भोंडवे यांनी कोरोनाच्या ऐकीव  संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. 'व्हॉट्स न्यू' या सदरातून  दिली जाणारी  नव्या गॅजेट्सची माहिती  उपयुक्त आहे. 'फूडपॉइंट' मधील एका रेसिपीतील  कंगणी तृणधान्य म्हणजे काय हे  मात्र समजले नाही. महत्त्वाचे  म्हणजे  ग्रहमान हे सध्याच्या लॉकडाऊन मधील परिस्थितीशी पूर्णतः विसंगत असून  त्यामध्ये वर्तवलेले भविष्य  प्रत्यक्षात येणे अशक्य आहे. एकंदरीत वाचनीय ई-आवृत्ती झाली  आहे. 
- सुरेश भाले, पुणे.

संबंधित बातम्या