वाचक लिहितात...

वाचक
बुधवार, 6 मे 2020

वाचक लिहितात...
निवेदन :
‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

सर्वांनी वाचून विचार करावा...
‘सकाळ साप्ताहिक’मधील (२ मे २०२०) ‘सावरीच्या सहवासात’ हा प्रिया भिडे यांचा लेख माहितीपूर्ण आहे. डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी लिहिलेल्या ‘पृथ्वी : एक विलक्षण आविष्कार’ या लेखात विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती दिली असून पृथ्वी ही इतर ग्रहांपेक्षा कशी वेगळी आहे हे समजते. ‘कोरोना आणि बँकिंग व्यवहार’, ‘कोरोना : चर्चेतली औषधे व उपचार’ हे लेख सर्वांसाठीच उपयुक्त आहेत. इतर सर्व लेख आपल्याला वास्तविकतेचे भान करून देणारे आहेत. ‘प्रेम न लाभे’ हा लेख आणि 'स्वयंशिस्त आणि आपण’ हे संपादकीय मला खूपच भावले. अगदी सर्वांनी वाचून विचार करावा असे लिहिले  आहे.
- प्रज्ञा संतोष पाटील, पालघर

ई-आवृत्ती वाचतोय असे वाटत नाही.  
ता. २ मे २०२० च्या अंकातील प्रिया भिडे यांचा लेख खूप आवडला. सध्या कोरोना हा विषय सगळीकडेच असल्याने लेखांमध्येही आहे. लेख चांगले आहेत, पण त्यात खूप वेगळेपण वाटले नाही. फोनवर झूम करून वाचावे लागत आहे, त्यामुळे एरवीपेक्षा वाचायला थोडा जास्त वेळ लागतो. एवढे सोडले तर  ई-आवृती वाचतोय असे अजिबात वाटत नाही.
- ज्योती केमकर, पुणे 

विश्वासार्ह साप्ताहिक
सतत कोरोनाविषयी बातम्या ऐकून, बघून मन खिन्न झाले आहे. कोरोनावर उपाय म्हणून सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट येतात, पण विश्वासार्हता नसते. मात्र ‘सकाळ साप्ताहिक’मधील डॉ. अविनाश भोंडवे यांचा ‘कोरोना : चर्चेतली औषधे आणि उपचार’ (२ मे २०२०) हा लेख वाचून एक दिशा आणि विश्वास मिळाला. कोरोनाच्या भयाने मन उद्विग्न झाले  असताना मनाला उभारी देणारा प्रिया भिडे यांचा ‘सावरीच्या सहवासात’ हा लेख वाचायला मिळाला. या लेखातील 'मराठी मोग्गु’ हा शब्द खूप आवडला.
- आरती जठार, डोंबिवली

अंक आवडला!
ता. २ मे २०२० च्या अंकात कोरोनाच्या काळात चांगली माहिती वाचायला मिळाली. भविष्यपासून ते फूडपॉइंट सदरातील सँडविचच्या रेसिपीज असे सर्वच लेख छान आहेत. एकूण अंक आवडला. 
अविनाश मुजुमदार, डोंबिवली.

बांधिलकी जोपासणारे साप्ताहिक
‘सकाळ साप्ताहिक’ला डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणून अशा कठीण प्रसंगीसुद्धा ‘सकाळ'ने वाचकांची बांधिलकी जपली आहे.
अनिकेत मोहिते, नागपूर

वाचनीय अंक!  
ता. २५ एप्रिल २०२० च्या अंकातील सर्व लेख वाचनीय आहेत. ऋता बावडेकर यांचा ‘प्रेम म्हणजे काय?’, डॉ. अविनाश भोंडवे यांचा ‘कोरोनाच्या ऐकीव संकल्पना’, डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे यांचा ‘..जहाज सोडायचे नाही!’, प्रकाश पवार यांचा ‘मानवी अस्तित्वाची लढाई’ हे सर्व लेख माहितीपूर्ण तर आहेतच; शिवाय आत्मविश्वास वाढवणारे  आहेत. सध्याच्या परिस्थितीत काय काळजी घ्यावी याचीही लेखांतून  माहिती मिळते. सर्वच लेख सकारात्मक विचार मांडणारे आहेत.
- ज्येष्ठ लेखक कौस्तुभ केळकर, पुणे 

माहितीपूर्ण अंक!
ता. २ मे २०२० च्या अंकात छान माहिती दिली आहे. प्रिया भिडे यांचा ‘सावरीच्या सहवासात’ हा लेख वाचल्यावर निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा आनंद मिळाला; शिवाय भौगोलिक माहितीही मिळाली. फूडपॉइंट सदरातील सँडविचच्या रेसिपीजही छान आहेत. साप्ताहिकचा अंक नेहमीच माहितीपूर्ण असतो.
- योगिता पाटील, बदलापूर

साप्ताहिकचे नियमित वाचन 
ही ई-आवृत्ती (२ मे २०२०) छान  आहे. मी साप्ताहिकची नियमित वाचक आहे. मात्र, मागील काही अंक न आल्यामुळे वाचनात खंड पडला होता. परंतु, आता ‘सकाळ साप्ताहिक’ डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्याने ही उणीवही  दूर झाली आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे धन्यवाद.
उषा महादेव डेहनकर, नागपूर

वाट पाहावी असे साप्ताहिक
ही ई-आवृत्ती (२५ एप्रिल २०२०) छान आहे. शनिवार आला, की आम्ही वाचक ‘सकाळ साप्ताहिक’ची आतुरतेने वाट पाहात  असतो. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे, अशा परिस्थितीत सुद्धा ‘सकाळ साप्ताहिक’ सुरू आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे खूप खूप धन्यवाद!
सुजाता नेरूरकर, पुणे 

आखीव रेखीव मांडणी!
‘सकाळ साप्ताहिक’च्या (२५ एप्रिल २०२०) लेखांमधून सध्याच्या संचारबंदीच्या काळातील घडामोडींचा चांगल्याप्रकारे आढावा घेतला आहे. अंकाची मांडणी  अतिशय  रेखीव आहे. अशा माहितीपूर्ण लेखांमुळे लोकांना कठीण  काळात जागरूक राहायला नक्कीच मदत होते. 
- वैशाली खाडिलकर, मुंबई

संबंधित बातम्या