वाचक लिहितात

वाचक लिहितात
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

नियम मोडण्यात धन्यता कशी वाटते?
आपल्या भारतामध्ये लोकांची सामाजिक जाण अतिशय कमी आहे ही बाब मोठी दुर्दैवी आहे. ‘सकाळ साप्ताहिक’च्या संपादकीयामध्ये (नियम पाळाच - ता. १८ जुलै) आपण कोरोनाविषयी अतिशय स्पष्टपणे लिहिले आहे. सरकार आणि मीडिया वारंवार लोकांना याबाबत सांगताहेत पण मनावर कोण घेतो? अतिशय गरजेचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही, ही सोपी गोष्ट कुणी अंगवळणी पाडून घेत नाही याचे नवल वाटते. नियम मोडण्यात सगळ्यांना धन्यता वाटते ही दुर्दैवी बाब आहे. घरात आहे त्यातच भागवायची मोठी संधी जनतेला मिळाली आहे, त्यामुळे जवळजवळ सगळ्यांचीच उधळपट्टी थांबली आहे ही अतिशय चांगली आणि मोलाची गोष्ट आहे. 
- डॉ. शिवाजी गायकवाड, राजगुरुनगर

पियानोवरील गीतांचा उत्तम धांडोळा
पियानोच्या साथीने किंबहुना काही वेळा पियानोमुळेच अजरामर झालेल्या हिंदी चित्रपटगीतांचा धांडोळा उत्तमरीत्या सादर केला गेला आहे ‘बेकरार दिल...’ या आनंदयात्रेत (ता. ८ ऑगस्ट). परंतु, एका गाण्याची उणीव त्यात जाणवली - ‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत कौन हो तुम बतलाओ...’ असे तीन सुंदरींना एकाच वेळी विचारणारा पियानोवरचा देव आनंद! 
असो. लेखाच्या शेवटी लेखिकेने उपस्थित केलेल्या ‘पियानो जुन्या चित्रपटांतच जास्त का दिसतो?’ या प्रश्नावर मला वाटते ते असे, पियानो, विशेषतः ग्रॅँड पियानो या वाद्याला जागा भरपूर लागते. शिवाय तो सहजपणे हलवता येत नाही. म्हणजेच, नव्या आणि बदलत्या जमान्याच्या भाषेत सांगायचे तर, त्याला बराच ‘सेटअप’ लागतो (जागेचा, पैशाचा, वेळेचाही). पियानोगीतांच्या दिवसांनंतर एकंदरीतच आयुष्याची गती वाढली, वापरण्याच्या वस्तू आटोपशीर आकाराच्या व सहज बाळगता याव्या (पोर्टेबल) अशी गरज निर्माण झाली. वापरातील अवडंबर कमी व्हावे आणि वेळ व श्रम वाचावे असे वाटू लागले. उदा. फाउंटन पेनऐवजी बॉलपेन, होल्डॉल किंवा ट्रंकेऐवजी बॅकपॅक इ. याचेच प्रतिबिंब वाद्यांमध्येही उमटले असावे आणि बदलत्या विचारांनुसार गिटार, माउथ ऑर्गन, बोंगो किंवा छोटा ड्रमसेट यांची लोकप्रियता वाढत गेली असावी. परिणामी नायक आणि विशिष्ट वाद्य, अशा जोड्याही तयार झाल्या असाव्या (उदा. ऋषी कपूर आणि गिटार).
- श्रीनिवास निमकर

जुन्या आठवणींना उजाळा
‘आनंदयात्रा’ सदरातील अंजोर पंचवाडकर यांचा १४ मार्चच्या अंकातील ‘एक दिन हमको याद करोगे’ हा गीता दत्त यांच्याविषयी लिहिलेला लेख अभ्यासपूर्ण वाटला. गीता दत्त यांनी गायलेली गाणी व त्यांचे जीवन यांचे नाते लेखिकेने सुरेखपणे दाखविले आहे. पोस्टखात्याने गीताच्या स्मरणार्थ तिकीट छापले होते ही माहिती माझ्यासाठी नवीन होती. त्यांची काही मराठी गाणी अधूनमधून रेडिओवर ऐकायला मिळतात. गीता दत्त यांनी ‘शाहीर परशुराम’ या मराठी चित्रपटात वसंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सुरेख गाणी गायली होती. तो चित्रपट मी विद्यार्थी असताना कोल्हापूरमध्ये पाहिला होता. त्यातील ‘बोले कावळा लवतो डोळा’ हे गाणे ‘साहिब, बीबी और गुलाम’मधील ‘कोई इरसे’ची आठवण करून देते. 
- दिलीप पंगू

नव्या खाद्यसंस्कृतीची ओळख
संजय दाबके यांच्या प्रवासातील बुरे-भले’ या सदरामधून विविध देशांमधील खाद्यसंस्कृतीची ओळख होत आहे. लेखक स्वतः भरपूर फिरलेले असल्यामुळे टिपिकल टुरिस्ट स्पॉटला मिळणाऱ्या पदार्थांऐवजी त्या देशातील खासियत असलेले पदार्थ त्यांनी स्वतः चाखलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी लिहिलेले लेख वाचायला मजा येते. अमेरिका, युरोपातील पोलंड, जर्मनीनंतर आता पूर्वेकडील देशांमधील खाद्यसंस्कृतीविषयी वाचायला उत्सुक आहे. 
- राजू नवाथे

संबंधित बातम्या