वाचक लिहितात...

-
सोमवार, 5 जुलै 2021

निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

‘बनगरवाडी’चा नेमका नायक कोण?
‘सकाळ साप्ताहिक’च्या १९ जूनच्या अंकातील सुनील देशपांडे यांचा ‘चटका लावून गेलेली बनगरवाडी’ हा लेख मला माझ्या कॉलेजच्या दिवसात घेऊन गेला. १९६५ साली ‘बनगरवाडी’ पुस्तक आम्हाला बारावीमध्ये अभ्यासासाठी होते. आजही हे माझे आवडते पुस्तक आहे. कॉलेजमध्ये असतानाच मी हे पुस्तक किमान वीस वेळा वाचले असेल. वार्षिक परीक्षेमध्ये ‘बनगरवाडी’च्या ‘नायका’वर निबंध लिहायचा होता आणि मी ‘मास्तर’ या पात्राविषयी लिहीत सुटलो होतो. नंतर मला कळाले की अनेकांनी बनगरवाडीचा नायक म्हणून ‘कारभारी’वर लिहिले होते. मला या परीक्षेत सर्वसामान्य गुण मिळाले होते. काही वर्षांपूर्वी एका लेखामध्ये या पुस्तकाचा कोणी नायकच नाही, कारण ‘बनगरवाडी’ हे गावच मुख्य पात्र आहे असे वाचले होते. पण अजूनही परीक्षेत कोणाचे उत्तर बरोबर होते याबाबत मनात संभ्रम कायम आहे. 

- डॉ. सुभाष दिवेकर

सजावटकारांचं अभिनंदन
‘सकाळ साप्ताहिक’च्या १९ व २६ जूनच्या अंकातील ‘...ऐका पुढल्या हाका’ आणि ‘न्यू नॉर्मलची नवलाई’ ही संपादकीय समयोचित आणि चिकित्सक अशी आहेत. तसेच तुमच्या सजावटकारांचंही अभिनंदन करायला  हवं. २६ जूनच्या अंकाचं ‘गाणे मनातले’ हे मुखपृष्ठ आणि  त्या लेखाची आतील सजावट या दोन्हीही सजावटींना दाद द्यायला हवी.

- डॉ. बाळ फोंडके

 

मार्गदर्शक ठरणारा लेख
मोना शहा यांचा ‘कथा मिलेनियल्सची’ (ता. २६ जून) हा ‘सकाळ साप्ताहिक’मधील लेख खूप आवडला. नव्या पिढीला समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणारा लेख आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाविषयी उत्सुकता वाढली आहे. निश्चितच ते पुस्तक वाचेन. इतर लेखही छानच आहेत. 

- पंढरीनाथ म्हस्के

वाचकांसाठी उपयुक्त सदर
‘सकाळ साप्ताहिक’मधील ‘चित्रभान’ हे सदर सामान्य वाचकांसाठी खूप उपयुक्त आहे, कारण या सदरामधून शरद तरडे कला आणि चित्रकलेविषयीचे अनेक पैलू उलगडून सांगितले जातात.

- सुनील जगताप

उत्सुकता वाढवणारे सदर
‘साप्ताहिक सकाळ’मधील ‘भूवारसा पर्यटन’ हे सदर अनेक गोष्टींसाठी अत्यंत माहितीपूर्ण आहे. भारतासारख्या विविधता असणाऱ्या देशामध्ये अनेक वैविध्यपूर्ण ठिकाणे आहेत. या ठिकाणांच्या निर्मितीच्या ऐतिहासिक, भौगोलिक तसेच सांस्कृतिक, पुरातत्त्वीय ओळख या सदरामधून होते. सामान्य वाचक, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हे सदर उपयुक्त आहे. सामान्य वाचकांसाठीही भौगोलिक आणि भूगर्भशास्त्रीय घटनांविषयी आणि त्यातून तयार झालेल्या अशा वैविध्यपूर्ण ठिकाणांच्या माहितीची उत्सुकता वाढवणारे हे सदर आहे. या लेखांमधील माहिती अत्यंत सहज, सोपी सुटसुटीत असून त्याविषयीचे नकाशे आणि छायाचित्रे यामुळे ती समजण्यास सोपी आणि चित्तवेधक वाटतात. अशी भूशास्त्रीय वारसा म्हणून जपण्याची, संवर्धन करण्याची अनेक ठिकाणे असून त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. या सदरामुळे याविषयीची जागृती होण्यास नक्कीच मदत होईल आणि संवर्धन, जतन करण्यासाठी अनेक हात पुढे येतील.

- डॉ. सविता कुलकर्णी

संबंधित बातम्या