वाचक लिहितात...

-
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

सायकलिंगचा लाभ
‘सकाळ साप्ताहिक’च्या २ ऑक्टोबर २०२१च्या ‘सायकलिंग - आनंदासाठी, आरोग्यासाठी’ हा अंक वाचताना आरोग्यासाठी सायकलिंग कसे जरुरीचे आहे, त्याबद्दल चांगली माहिती मिळाली. अंक वाचताना मन भूतकाळात गेले. १९६८ साली मी ग्रंथालय शास्त्राची पदवी घेतली. पहिल्या नोकरीच्या ठिकाणी सायकलने जाण्यास सुरुवात केली. नंतर नोकऱ्या बदलत गेलो. १९७४ साली पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ग्रंथपाल (वरिष्ठ) म्हणून माझी निवड झाली. बस सोयीची नसल्याने सायकलशिवाय दुसरा पर्याय नव्हता. घरापासून अंतर होते तेरा किलोमीटर. म्हणजे रोज २६ किलोमीटर सायकलिंग होत होते. ग्रंथालयातील कामही बैठे नव्हते, सतत फिरावे लागत होते. ती चाल रोज सात-आठ किलोमीटर होत होती. १९७४ ते १९८४पर्यंत सायकल प्रवास होता. त्याचा दृश्य परिणाम मला आता जाणवतोय; वयाच्या ८०व्या वर्षातही मी पूर्ण तंदुरुस्त आहे. सायकलिंग हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे.
- विजय देवधर

सायकलीला प्राधान्य द्यायला हवे
ता. २ ऑक्टोबरच्या ‘सकाळ साप्ताहिक’मधील श्रीनिवास निमकर यांनी लिहिलेल्या ‘सायकलीचे ते दिवस’ या लेखासह सायकलवरील इतर लेख वाचले. सध्याचे वायू प्रदूषण पाहता, आता पुणे महापालिकानेही शहरातील वायू प्रदूषण, आवाज प्रदूषण रोखायला सायकलला प्राधान्य दिले आहे ते चांगले. यामुळे हवेचे, आवाजाचे प्रदूषण थांबेल आणि आरोग्यही चांगले राहील. सुधारणा होईल, पण त्यासाठी गरज आहे लोकसहभागाची आणि लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या प्रभावी कार्यक्रमाची व त्याच्या अंमलबजावणीची.
- डॉ. किरण भिंगार्डे, कोल्हापूर

आठवणी जाग्या झाल्या
श्रीनिवास निमकर यांचा ‘सायकलीचे ते दिवस’ लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझेही वडील ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये होते. सुरुवातीला तेही सायकल चालवत जायचे. पण नंतर फॅक्टरीची बस सर्व्हिस सुरू झाल्यावर ते बसने जाऊ लागले. तेव्हा आम्ही शनिवार पेठेत राहायचो अणि बस दक्षिणमुखी मारुतीपाशी यायची. कधीकधी वडिलांना उशीर झाला की मला त्यांच्याबरोबर सायकलवरून बस स्टॉपपर्यंत सोडायला जावे लागायचे. जाताना ते सायकल चालवायचे आणि त्यांना तेथे सोडून मी सायकलवरून परत घरी यायचो. आठवड्यातून एक दोनदा तरी जावे लागायचे... मजा यायची!
- संजय कुलकर्णी

डॉ.  थोरात  यांचे  लेख  तरुण  पिढीने  वाचावेत
डॉ. यशवंत थोरात यांनी ‘मनापासून’ या सदरामधून लिहिलेले त्यांचे वडील ले.ज. एस.पी.पी. थोरात यांचे असामान्य कार्य मांडणारे दोन्ही लेख तरुण पिढीने वाचावे असे आहेत, जेणेकरून तरुणांनाही या घटना माहिती होतील. १९५० आणि १९६०मध्ये घडलेल्या घटना आणि त्यामध्ये डॉ. थोरात यांच्या वडिलांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याची मला पूर्ण माहिती आणि जाणीव आहे, आणि त्यांच्याविषयी आदर आहे. 
माझे सासरे मे. व्ही. जी. बापट (एज्युकेशन कॉर्प्स) यांचे १९५४-१९५६ दरम्यान जालंधरमध्ये पोस्टिंग होते. थोरात यांच्या वडिलांचेही त्याचवेळी तिथे पोस्टिंग होते. त्या दोघांचा त्यावेळी कदाचित काही संबंधही आला असावा. एनडीए आणि इतर सुरक्षा संबंधित सेवांच्या प्रवेशपरीक्षांसाठी तरुणांना प्रशिक्षण देऊन तयार केल्याबद्दल मे. बापट यांचा १९७०च्या दरम्यान जनरल थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
- सुभाष काळे

संबंधित बातम्या