वाचक लिहितात...

-
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com
 

नवपर्यटकांना मार्गदर्शक
ता. १ जानेवारीच्या ‘सकाळ साप्ताहिक’मधील भूषण तळवलकर यांचा ‘माझा ‘स्व’पर्यटनवाद’ हा लेख म्हणजे नवपर्यटकांना मार्गदर्शनच आहे. पर्यटनाला जाताना अनेक प्रश्न असतात. आपली फसवणूक तर होणार नाही ना? राहण्याचे ठिकाण सुरक्षित असेल का? प्रवासात अडचणी आल्या तर काय होईल? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतात, आणि मग आपण ट्रॅव्हल कंपनीच्या जाहिरातबाजीला भुलून अधिक पैसे खर्च तर करतोच; पण कधीकधी विकतचा मनस्तापदेखील पदरी पडून घेतो. या लेखात लेखकांनी स्व-पर्यटन करताना आलेले अनुभव सुंदर मांडले आहेत. सर्वसामान्यपणे फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कमी असतात. आपण जागरूक राहून पर्यटनाचा आनंद घेऊ शकतो, हे लेखकांनी विविध प्रसंगातून स्पष्ट केले आहे. नवीन वर्षात पर्यटनाला जाणाऱ्या नवपर्यटकांना या लेखातून प्रेरणा मिळेल.
तसेच २५ डिसेंबरच्या ‘सकाळ साप्ताहिक’मधील संपादकीय ‘नवं कॅलेंडर’ मनाला खूप भावले. कॅलेंडरवरदेखील इतके सुरेख लिहिता येते हे या संपादकीयमधून दिसून आले. कॅलेंडरचे  रूपही काळाप्रमाणे बदलत गेले आहे. पूर्वी नोव्हेंबरपासूनच कॅलेंडरच्या जाहिराती टीव्ही आणि रेडिओवर येत असत. प्रत्येकाच्या मनात कॅलेंडर असतेच. पुढे काय करायचे आहे, हे आपण कॅलेंडर बघतच ठरवत असतो. कधी आपल्या योजना सफल होतात तर कधी फसतात. नव्या वर्षाचे स्वागत कॅलेंडरच्या साक्षीनेच होते. २०२२चे कॅलेंडर कोरोना संकटकाळ संपून नव्या आशांनी भरलेले असावे, हीच सदिच्छा!
- सुदाम कृष्णाजी विश्वे

प्रत्यक्ष जीवनात अनुकरण आवश्यक
डॉ. गुरुदास नूलकर यांचा पर्यावरण नियंत्रण आणि संवर्धन यावरील ‘हवामान बदलाच्या लढ्यात आपली भूमिका’ हा उद्‌बोदक आणि विशेषतः मार्गदर्शक लेख आवडला. मुख्य म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारींची जाणीव आणि डॉ. नूलकर यांनी सुचविलेले साधे, सोपे उपाय खूप महत्त्वाचे आणि प्रत्येकाला नक्की जमतील असेच आहेत. आपल्यासारख्या प्रत्येकाने ते केलेच पाहिजेत आणि इतरांना प्रोत्साहित करणेही आपल्याला जमण्यासारखे आहे. इच्छाशक्ती निर्माण करणारा लेख वाटला.
डू (Do)/ डोन्ट (Don't) याची यादी मार्गदर्शक आहे व त्यातील बहुतेक गोष्टींचे पालन माझे घरी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. हा लेख मला खूप आवडला आणि वैयक्तिक, सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील सर्वांसाठीच मार्गदर्शक वाटला. आपण सर्वांनीच हा विषय विशेष गांभीर्याने समजून उमजून घेऊन, त्याचे आपल्या जीवनात, प्रत्यक्षात अनुकरण करणे अपेक्षित आहे, असे नमूद करावेसे वाटते. 
- अरविंद खडके

 

संबंधित बातम्या