वाचक लिहितात...

-
सोमवार, 9 मे 2022

वाचक

भारताच्या इतिहासाबद्दल वाचायला आवडेल
‘विश्वाचे आर्त’ या सदरात डॉ. सदानंद मोरे राज्यपद्धती आणि राजकारणाची वाटचाल उलगडून दाखवत आहे. भारताच्या इतिहासाबद्दलही डॉ. मोरे यांनी सविस्तर माहिती दिल्यास वाचायला आवडेल. 
तसेच ता. २३ एप्रिलच्या अंकातील किशोर पेटकर यांचा ‘इटलीचे विश्वकरंडक अपयश’ लेख वाचला. पण पराभवाचे मूळ कारण त्यात आलेलेच नाही, असे वाटते. बारा वर्षांपूर्वी त्यांच्या युवेंट्स संघाने तेथील सीरीआए (फर्स्ट डिव्हिजन लीग) स्पर्धा जिंकली होती. त्‍यावेळी त्यांनी जिंकण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचे उघड झाले होते. राष्ट्रीय स्पर्धेत जर खेळातील क्लृप्ती आजमावल्या नाहीत, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांत उतरती कळा लागली, तर त्यात नवल ते काय? 
- अ. गो. कानेटकर, मुंबई

बंदीपेक्षा दीर्घकाळ वापर हवा
प्लॅस्टिक या अतिशय महत्त्वाच्या विषयावरचे ता. १९ मार्चच्या अंकातील ‘प्लॅस्टिक मुक्तीकडे’ हे संपादकीय वाचले. यानिमित्ताने मी स्वतः केलेला प्रयोग सांगावासा वाटतो. रोज ऑफिसला जाताना डबा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून नेला जातो. हे करताना, एकच पिशवी आपण किती दिवस वापरू शकतो? हे बघायचे ठरवले. आश्चर्य म्हणजे, एकच पिशवी दोन वर्षे वापरूनही फाटली नाही. यावरून असे वाटते, की ‘प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरणे’ यापेक्षा प्रती व्यक्ती कमीतकमी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरायच्या असे ठरवणे आणि त्या दीर्घकाळ वापरत राहणे हे जास्त परिणामकारक होईल. कारण पर्यायी गोष्टीही (उदा. कागद) पर्यावरणासाठी हानिकारकच आहेत. पारदर्शकता, पाण्यापासून संरक्षण, हे प्लॅस्टिकचे फायदे इतर पर्यायी वस्तूंपासून मिळू शकत नाहीत. त्यामुळे प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्यापेक्षा, ‘प्रती व्यक्ती प्रत्येक वर्षी पाच पिशव्या मिळू शकतील,’ अशा प्रकारचे काही पर्याय काढता आले, तर जास्त परिणामकारक ठरतील. अर्थात, त्यासाठी संयम आणि वापरलेली प्लॅस्टिक पिशवी धुऊन परत वापरण्यासाठी पडणारे किंचितसे कष्ट, याची तयारी हवी! आणि त्याला पर्याय नाहीच!! 
-  आरती पित्रे

आवडणारे लेख
मी गेली काही वर्षे ‘सकाळ साप्ताहिक’चा वाचक आहे. इतिहास, भूगोल, भूशास्त्र या विषयांना अंकांमध्ये स्थान मिळते याचा मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. ता. २ एप्रिलच्या अंकातील डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा प्राचीन अरवली पर्वतावरचा लेख तर आवडलाच, पण त्यांचे याआधीचे पर्वतांवरील लेख सामान्य वाचकाला नुसते आवडणारे नाही तर त्या पर्वतांवर ट्रेकिंग करावेसे वाटेल. भारतीय उपखंडाची भूमी माती, नद्या आणि पर्वत रांगा अशा विविधतेने नटलेली आहे. भारतीय संस्कृती विविधतेनून गेली पाच हजार वर्षे कशी बहरली ते अशा लेखांमुळे कळते. असे लेख ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये अवश्य यावेत. 
- डॉ. शरद न. राजगुरू

 

निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

संबंधित बातम्या