कृतार्थ, परिपूर्ण 

अंजोर पंचवाडकर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

स्मरण
 

एकोणीस ऑगस्टला वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी संगीतकार खय्याम गेले. ‘मदनमोहन फेसबुक पेज’ने त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे, ‘आता तिथे तुम्हाला आधी गेलेले तुमचे मित्र आणि सहकारी भेटतील!’ मनात विचार आला, की त्यांना भेटतील त्यांचे मित्र, सहकारी; आपलं काय? ‘रारंगढांग’मधलं वाक्य आठवलं, ‘आदमी जब मर जाता है तो उसका पिछे क्या रहता है साब?’ तर मला वाटतं, मागं त्या व्यक्तीचं काम उरतं, आठवणी उरतात... 

खय्याम काही माझ्या रोजच्या बैठकीतले होते का? मी त्यांना कधी भेटले तरी होते का? तर, नाही. पण ते मात्र मला भेटत गेलेत आणि जातील.. त्यांच्या गाण्यातून! ते पुरेसं आहे. मग वाईट का वाटतं? वाईट एवढ्यासाठी वाटतं, की हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग निर्माण करणारी गुणी माणसं आणि त्यांची सर्वसमावेशक वृत्ती लोप पावत आहे त्याचं! आज त्यांचे केवळ राजकीय विचार आवडत नाहीत म्हणून जावेद अख्तर आणि अनुपम खेरच्या कलेला एका फटक्यात मोडीत काढलं जातं, तेव्हा वाईट वाटतं. लार्जर दॅन लाइफ इमेज असलेल्या रफीच्या मनाविरुद्ध ठणकावून पुन्हा पुन्हा रिटेक करून ‘कहीं एक मासूम नाजुकसी लड़की’ सारखी रचना जन्माला घालण्याची मनस्वी वृत्ती लोप पावत चालल्याचं वाईट वाटतं. 

खय्यामबद्दल लिहिताना काय लिहावं असा प्रश्नच पडत नाही, असं निरलस परिपूर्ण व्यक्तित्व होतं ते. घरात गाण्याला पूर्णपणे मज्जाव असताना गाणं करायचं म्हणून घर सोडलेल्या खय्यामना मशिदीतल्या अज़ानमध्ये, देवळातल्या घंटेमध्ये, चर्चमधल्या कॉयरमध्ये, गुरुद्वारातल्या शबदमध्ये फक्त संगीत दिसायचं. ‘शामे गमकी कसम’ ते ‘मौसम मौसम लव्हली मौसम’ असा भला मोठा सांगीतिक कॅनव्हास होता त्यांचा. जवळपास सहा दशकांची चित्रपटसृष्टीतील कारकीर्द आणि त्यात जेमतेम पंचावन्न सिनेमे आणि फक्त  अडीचशेच्या आसपास गाणी खय्यामसाहेबांनी केलीत. या हिशोबानं वर्षाला सरासरी फक्त एक चित्रपट होतो. आपल्या टर्म्सवर काम करायचं आणि करायचं ते परफेक्टच करायचं हा हट्ट. विविध प्रथितयश कवींच्या (साहिर, मजरूह, जाँ निसार अख्तर, कैफी आझमी, मीर तकीमीर, शहरयार, नक्श लायलपुरी, निदा फाजली, गुलजार, कितीतरी...) अर्थपूर्ण गाण्यांना, शायरीला खय्याम यांनी चाली लावल्या. ते काव्य त्यांना जसं भावलं, जाणवलं तसंच ते स्वरबद्ध होऊन त्याच वजनानं श्रोत्यांपर्यंत पोचलं पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता. त्यामुळंच त्यांची छाप त्यांच्या संगीतावर उमटत गेली. मी जेव्हा ‘न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया’ हे गाणं पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा ‘हे १०० टक्के खय्यामचं गाणं आहे’ हे जाणवलं. शब्दांतूनच निघाल्यासारखा वाद्यमेळ आणि विराम (पॉझेस) हे एक ‘खय्यामिक’ वैशिष्ट्य होय. मनस्वी कलाकाराचा ठसा हा आपोआप उमटतो, त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. 

शब्दांतील भाव तंतोतंत चालीत ओढणं सोपं नाही. मी शाळेत असताना प्रथम ‘शामे गम की कसम’ ऐकलं होतं. तेव्हा ‘ग़मगीन’ असा काही शब्द आहे, हेही माहीत नव्हतं (मी गमही है हम म्हणत असे) पण त्यातल्या ‘अब तो आजा के अब रात भी सो गई’मधली आर्तता तेव्हाही स्पर्शून गेली होती. ‘अपने आप रातोंमें’ हे गाणं ऐकताना खरंच रात्री झोपेत कुणी गात आहे असा आभास होतो. ‘तूही सागर है तूही किनारा’ मधली भक्ती, ‘ठेहेरिये होश में आ लूं, तो चले जाइयेगा’ मधला खट्याळपणा, ‘आंखोंमें हमने आपकी सपने बिछाए है’ मधली प्रेमातली हुरहुर, ‘दिल चीज क्या है’ मधलं आर्जव, ‘वो सुबह कभी तो आएगी’ मधला आशावाद आणि ‘आवाज दो हम एक है’ मधला जोश... सगळं सगळं खय्याम यांच्या संगीतामधून अनुभूत होतं. 

‘है कली कली के लबपर’, ‘आसमां पे है खुदा’, ‘रझिया सुलतान यामधे मुक्त अरेबिक संगीताचा वापर दिसतो. पहाड़ी राग त्यांच्या आवडीचा. खय्यामना एकदा मुलाखतीत ‘शामे गम की कसम’ने लोकांवर इतकी जादू कशी केली, असं विचारल्यावर ते म्हणाले होते, की ते त्या काळातलं ते ‘नवं संगीत’ होतं. भारतीय धाटणीची चाल आणि पाश्चात्त्य सिम्फनीसारख्या कॉर्ड्स असलेलं संगीत हा प्रयोग लोकांना आवडला. जाणकारांच्या मते रागाची कॉम्बिनेशन्स, गाण्याच्या दोन ओळींना सांधणारा चपखल स्वर हेही प्रयोग खय्याम यांच्या संगीतात बघायला मिळतात. ‘आंखोंमें हमने आपके’, ‘सिमटी हुई ये घड़ियां’, ‘कभी कभी मेरे दिलमे’, ‘देखिये आपने फिर प्यारसे’, ‘चांदनी रात में एक बार’, ‘परबतोंके पेडोपर’, ‘ठेहेरिये होश में आ लूं’, ‘फिर छिड़ी रात बात’... अशा हळुवार द्वंद्वगीतांबरोबरच ‘गापुची गापुची गम गम’ आणि ‘मौसम मौसम लव्हली मौसम’ अशी मजेशीर चालू पिढीची (contemporary) गाणीही खय्यामसाहेबांनी दिलीत. त्या प्रयोगांची फार गंमतही वाटते. 

कभीकभी, बाजार, रझिया सुलतान आणि उमरावजान हे खय्याम यांचे महत्वाचे चित्रपट. त्यातले रझिया सुलतान आणि उमरावजान हे ऐतिहासिक किंवा पिरियड फिल्म्स. त्याचे संगीत करताना त्यांनी इतिहास वाचला, त्यातल्या स्थळांना भेटी दिल्या. त्या व्यक्तिरेखा स्वतःमध्ये झिरपू दिल्या. उमरावजानच्या गाण्यांवर वर्षभर काम सुरू होतं म्हणे. तिची गाणी खय्याम किंवा आशाची न वाटता उमरावजानचीच वाटावी म्हणून त्यांनी आशाला खालच्या पट्टीत गायला लावलं आहे. रझिया सुलतानमध्ये, हबशी गुलामाच्या तोंडी ‘खुदा खैर करे’ सारखं गाणं बांधल्यावर ते गाण्यासाठी प्रस्थापित किंवा मुलायम आवाज त्यांना नको होता. निर्माता कमाल अमरोही आणि संगीतकार खय्याम यांचा रांगड्या अप्रस्थापित आवाजाचा शोध त्यावेळच्या विविध भारतीचे निवेदक कब्बन मिर्झा यांच्यापाशी जाऊन थांबला! इतकं दणकट आणि अनवट झालंय ते गाणं कब्बन मिर्झा यांच्या आवाजामुळं! तसंच ‘बाजार’मधल्या ‘फिर छिड़ी रात बात फूलोंकी’साठी तलत अझीझ आणि ‘आहिस्ता आहिस्ता’मध्ये ‘कभी किसीको मुकम्मल जहां’साठी भूपेंद्र यांच्या मुलायम आवाजाचा वापरसुद्धा किती बहारदार. याला म्हणतात डिटेलिंग, याला म्हणतात परफेक्शन! 

साधारण १९८३ मध्ये आलेल्या ‘रझिया सुलतान’ या चित्रपटाची वेगळीच गंमत आहे. कमाल अमरोही यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट. जवळ जवळ दहा वर्षं त्याच्या निर्मितीचं काम सुरू होतं. त्यातल्या ‘ऐ दिले नादान’चं रेकॉर्डिंग किती आधी झालं असलं पाहिजे, कारण हे गाणं ऐकूनच यश चोप्रा (आणि साहिर) यांनी ‘कभी कभी’, खय्याम यांच्या आश्वस्त हाती सोपवला. ‘कभी कभी’ आला १९७६ मध्ये (त्यानंतर लागोपाठ त्यांचे ‘त्रिशूल’ आणि ‘नूरी’सुद्धा आले) आणि ‘रझिया सुलतान पूर्ण व्हायला मात्र ८३ हे वर्ष उजाडलं! चित्रपटसुद्धा नशीब घेऊन येतात ते असं. गाणी अर्थात दोन्ही सिनेमांतली गाजली. 

दूरदर्शनवर खय्याम यांची मुलाखत बघत होते. किती लोभस व्यक्तित्व होतं हे! सैगलसारखं गायक-नट होण्यासाठी कर्मठ घरातून पळून गेलेला हा मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी नावाचा युवक आता गतआयुष्याकडं कृतार्थतेनं आणि मिश्किलपणे बघत होता. खऱ्याखुऱ्या आयुष्यातसुद्धा ‘तुम अपना रंज ओ गम, अपनी परेशानी मुझे देदो’ म्हणणाऱ्या गायिका पत्नी, जगजीत कौरला भरभरून श्रेय देताना बघून इतकं भरून येत होतं ना! एकुलत्या एक मुलाच्या अकाली मृत्यूचं दुःख पचवून तिघांच्या आद्याक्षरानं स्वकमाईतून उभा केलेला केपीजे ट्रस्ट, त्यातून इंडस्ट्री मधल्या नवोदितांना मदत दिली जाते हे सांगताना ते म्हणत होते, ‘सब, सब लोग अपनेही तो है।’ देशाचं नाव खराब होईल, असं काम कधी आपल्या हातून झालं नाही हे सांगताना अभिमान दाटला होता चेहऱ्यावर! कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? त्यांनी लहानपणीची एक आठवण सांगितली. पंजाबात ट्रेननं प्रवास करताना लाहोरजवळ ‘खटकर कलों’ म्हणून एक स्टेशन लागे. ते आलं, की यांचे वडील सगळ्या मुलांना प्रणाम करायला लावत, का? तर ते भगतसिंग यांचं जन्मगाव म्हणून. हे आयुष्यातलं शिक्षण ‘आवाज दो हम एक है’सारखं देशभक्तिभारित गाणं करताना बाहेर येत असतं. स्ट्रगल करत असतानासुद्धा कलाकार जेव्हा डोळसपणे आयुष्याकडं बघत असतो, तेव्हा मानवतेची ती कळकळ ‘फिर सुबह होगी’च्या संगीतात दिसते. 

‘ऐ दिले नादान’ लिहिणाऱ्या जाँ निसार अख्तर यांनी त्याचे शंभरएक शेर लिहिले होते. त्यातून सिनेमातल्या गाण्यात त्यातले फक्त पाच निवडले गेले. काय ती मेहनत, लगन आणि विचक्षणता! या लोकांच्या जाण्यानं आपलं नुकसान होतं, ते हे गुण लोप पावतात म्हणून. यांची गाणी तर रेकॉर्डेड आहेत, एक कळ दाबली की ऐकायला मिळतात. पण ती करायला असले मनस्वी कलाकार कुठून आणायचे? 

‘मैं पल दो पालक शायर हूँ’ मधे साहिर म्हणतोय, 
मुझसे पेहेले कितने शायर 
आये और आकर चले गए 
कुछ आहे भरकर लौट गए 
कुछ नगमे गा कर चले गए 
वो भी एक पल का किस्सा थे 
मैं भी एक पल का किस्सा हूँ 
कल तुमसे जुदा हो जाऊंगा 
वो आज तुम्हारा हिस्सा हूँ। 
खय्यामसाब यांनी आपल्या सर्वांच्या सुरेल आयुष्याचा व्यापलेला हिस्सा हा असा कृतार्थ, परिपूर्ण आणि हवाहवासा आहे!    

संबंधित बातम्या