आजी - भाऊ

अनुभव काळे
सोमवार, 15 मार्च 2021

स्मरण  

चौदा मार्च हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी, लेखक, समिक्षक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर यांचा अकरावा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘विंदां’चे नातू अनुभव काळे यांनी आजोबा आणि आजींच्या आठवणींना दिलेला उजाळा...

‘विंदां’विषयी अनेक प्रसिद्ध लेखक, कवी, त्यांचे विद्यार्थी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालेले असंख्य चाहते अशा सर्वांनी विविधांगी लेखन केलं आहे. भाऊ मला आजोबा म्हणून जसे आठवतात ते थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे. शीर्षकामध्ये माझ्या आजीला पहिलं स्थान आहे कारण तिच्या पाठबळाशिवाय भाऊंना इतका मुक्त साहित्यसंचार करता आला नसता. म्हणून तिला भाऊंइतकंच मानाचं स्थान!

अगदी सुरुवातीची आठवण सांगायची झाली, तर मला पटकन दिसतात मुंबईच्या त्यांच्या गॅलरीमधले नाना प्रकारचे लाकडी ठोकळे. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला जात असू तेव्हा मी आणि माझी मामेबहीण अपूर्वाचं मोठं आकर्षण म्हणजे हे ठोकळे. भाऊंच्या सुतारकामाशी संबंधित प्रोजेक्टचा हा ‘बाय -प्रॉडक्ट’. त्या ठोकळ्यांमध्ये आम्ही अनेक तास गुंग होऊन खेळायचो. अनेक वेळा भाऊंना ‘असा ठोकळा कापून द्या’ वगैरे फर्माईशीदेखील व्हायच्या आणि लगेच भाऊ त्यांची करवत वापरून त्या पूर्ण करायचे. हे ठोकळे आठवण म्हणून ठेवून द्यायला पाहिजे होते, असं आता वाटतं. खास भाऊंकडूनच मिळणारी अजून एक आवडीची भेट म्हणजे ते जिथे जिथे व्यासपीठावर असत तेव्हा त्यांना मिळणारे सुंदर पुष्पगुच्छ आणि शर्टच्या  खिशावर लावायचे रिबन बॅज. 

ह्याच सुट्टीमधील नकोशी वाटणारी आठवण म्हणजे सकाळची अंघोळ! घरातल्या सर्व तांत्रिक बाबींविषयी भाऊंची ठाम मतं होती आणि ह्या सर्व गोष्टींचा वापर त्यांच्या काटेकोर नियमांप्रमाणेच करावा लागे. ह्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे बाथरूममधला गीझर. त्या वेळचे गीझर चालू ठेवताना त्याचा पाण्याचा नळही चालू ठेवायला लागत असे. त्यामुळे ‘अंघोळीचं पाणी काढणे’ ही जबाबदारी भाऊंनी फक्त आपल्याकडे ठेवली होती. त्यांचं सगळं गणित ठरलेलं असे -कोण कुठल्या क्रमाने अंघोळ करणार, गीझर किती वेळ चालू ठेवायचा, एक माणूस अंघोळीला गेला की पुढल्या माणसाने कधी तयार राहायचं, बादलीमध्ये गरम-गार पाण्याचं विशिष्ट प्रमाण असे हजारो प्रकार. विशेषतः एकजण अंघोळ करताना पुढचा वेळेवर तयार होतोय का ह्यावर त्यांची बारीक नजर असे. जर कोणी टिवल्याबावल्या केल्या किंवा आपला नंबर जवळ आलेला असताना काहीतरी दुसरंच करायला घेतलं की ते अत्यंत त्रासिक होत. ह्या रोजच्या कार्यक्रमामुळे मला अजूनही गीझरमधून पाणी काढणे ही एक भीतीदायक बाब वाटते. नशीब - पुण्याला आमच्या घरी बॉयलर होता नाहीतर भाऊ पुण्याला आल्यावरसुद्धा आमची सुटका नव्हती! 

पुणेरी पाट्यांचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. मुंबईच्या घरी ह्याच प्रकारच्या ‘सूचना’ सर्वत्र लिहिलेल्या असत. शिवाय त्या भाऊंच्या हस्ताक्षरात छोट्या आकारात असत. उदाहरणार्थ: ‘रेडिओचे चाप हळू दाबावेत’, पंखा दोनपेक्षा जोरात लावू नये’, ‘फोन सावकाश खाली ठेवावा’, 

‘टी.व्ही.चे कव्हर बाजूला काढून ठेवावे. टी.व्ही. गरम होईपर्यंत बघू नये’, ‘औषधे एक्स्पायरी आजमावून घ्यावीत’ वगैरे वगैरे. आम्ही ह्या सूचनांवरून भाऊंची यथेच्छ चेष्टा करायचो पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नसे. घरात जी अपूर्वाची खोली होती तिथे या पाट्यांना प्रवेश नव्हता. त्या खोलीला भाऊंनी ‘अमेरिका’ असं नाव ठेवलं होतं, त्या खोलीत एसी होता म्हणून! त्यांची खोली म्हणजे भारत, शेजारची बेडरूम म्हणजे इंग्लंड. आम्ही पुण्याहून प्रवास करून घरी पोचलो म्हणजे आमच्या बॅगांना चॉईस असे की पुढचे चार दिवस इंग्लंडमध्ये राहायचं की अमेरिकेत.

टीव्ही नवीनच घेतलेला असताना आम्ही सगळे, आजीसुद्धा टीव्हीसमोर बसून फुटकळ कार्यक्रम पाहण्यात दंग झालो की ते वैतागत. मधून मधून नातवंडे योग्य अंतर ठेवून बघताय ना यावर देखरेख असे. माझे बाबा हे भाऊंच्या मते ‘मिस्टर रिलायबल’. बाबांना काहीही काम सांगितलं म्हणजे ते परफेक्ट होणार ह्यावर भाऊंचा विश्वास होता. सगळ्या कुटुंबामध्ये जावई हा एकमेव अवलंबून राहण्याजोगा माणूस आहे असं त्यांना वाटत असावं. परंतु हेच ‘सर्वगुणसंपन्न’ आमच्याबरोबर ‘टॉम अँड जेरी’ बघत जोरजोरात हसू लागले की भाऊंना अगदी असह्य होई. ‘अरे तू वेडा की खुळा! हा कसला पोरखेळ बघतोस?’ असं वारंवार म्हणून आणि शेवटी कंटाळून आत निघून जात. भाऊंच्या कित्येक कवितांमध्ये विविध-ढंगी विनोद असला तरी कार्टून्स त्यांना थिल्लर वाटायचे. पुढे पुढे मात्र त्यांना क्रिकेटविषयी प्रेम निर्माण झालं आणि ते आवडीने टीव्हीवर बघायला लागले. अर्थात त्यातही त्यांची अशी काही मते होतीच : सचिन तेंडुलकर हा त्यांच्यासाठी अगदीच शेजारी राहणारा, दोन बिल्डिंगच्या मधे क्रिकेट खेळणारा, अधून मधून काचा फोडणारा आणि आता इंटरनॅशनल सेलिब्रिटी झालेला पण ‘बिनभरवशाचा’ माणूस! तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींप्रमाणे सचिन आउट झाला की ते ‘बंद करा आता! आपण हरलो’ असं म्हणून आत जाऊन शास्त्रीय संगीत ऐकण्यात मग्न होत.

 ‘काय हो - जेवण छान झालं ना. आता फ्रूट घेणार का?’ असं आपल्याला कोणी विचारलं तर आपल्याला वाटतं आता काहीतरी सुंदर दिसणारी फ्रूट प्लेट आपल्या समोर येणार. अगदीच प्लेट नाही तरी अंजीर, सफरचंद, द्राक्ष असं काहीतरी मिळेल म्हणून. दुर्दैवाने भाऊंच्या शब्दकोशात ‘फ्रूट’चा अर्थ ‘केळं’ असा होता. बाजारातून केळी आणायची, मग ती दारावर विवक्षित ठिकाणी टांगून ठेवायची, पिकायला लागली की घरातल्या सगळ्यांना ही ऑफर यायची! ह्या ‘प्रेमळ आग्रहाला’ फक्त माझी आई बळी पडत असे. 

डेक्कन एक्स्प्रेस ही आजी-भाऊंची पुण्याला यायची ठरलेली गाडी. मला ती बिलकूल पसंत नव्हती, कारण त्यात पूर्ण बोगी आरक्षित नसे. त्यामुळे कोणीही कधीही घुसून गर्दी व्हायची. एकदा मी आजी-भाऊंबरोबर पुण्याला येत असताना अशीच खूप गर्दी झाली. तेव्हा भाऊंनी मला त्यांच्याजवळ खेटून बसायला सांगितलं आणि माझ्या जागेवर कडेवर छोटं बाळ असलेल्या असणाऱ्या बाईला ‘इथे बसू शकता’ अशी खूण केली. मला त्यावेळी  राग आला. ‘आपलं आरक्षण असताना का म्हणून आपली जागा त्यांना द्यायची?’ मी अगदी हिरमुसलो तेव्हा मला आजीने नीट समजावून सांगितलं आणि माझा राग शांत झाला. ‘कर्तव्य आणि हक्क एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत’ हे पुस्तकी वाक्य व्यवहारात कसं लागू पडलं, हे मला तेव्हा उमगलं. अशा वरकरणी लहान वाटणाऱ्या घटनांचा आपल्या मनावर खोल परिणाम होतो हे नक्की!

भाऊंचा परफेक्शनिस्ट स्वभाव आणि जे आपल्याला समजत नाही ते त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून विद्यार्थी वृत्तीने समजावून घेणं हे मी अनेकदा पाहिलं आहे. एकदा कडू घोटही पचवला आहे. मी इयत्ता आठवीमध्ये असताना संस्कृत हा नवीन विषय शिकायला सुरुवात झाली. भाऊ नेहमी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘जीवेत शरद: शतम’ असं म्हणायचे. म्हणून त्यांच्या वाढदिवसाला मी त्यांना असंच लिहून पाठवलं. त्यांनी लगोलग त्यांचे मित्र लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांना विचारून ‘जीवेत’ आणि ‘शतम’ लिहिताना मी ‘त’चा पाय मोडला आणि ‘म’चा नाही, आणि हे चूक असल्याचे पटवून दिलं. ह्यामुळे माझ्यावर मात्र उलटाच परिणाम झाला - इतकं साधं वाक्य मला तर लिहिता येत नाहीच पण भाऊंनासुद्धा कोणाला तरी विचारून खात्री करावी लागते म्हणजे संस्कृत ही कठीण भाषा आहे आणि ती मार्क मिळवण्यापुरतीच उपयोगी आहे अशी माझी समजूत झाली!

कुठल्याही वशिलेबाजीपासून दहा हात दूर अशा भाऊंना ‘ज्ञानपीठ’सारखा मोठा पुरस्कार मिळू शकतो ह्याचं मला तेव्हा फार अप्रूप वाटलं. एक समाधानाची बाब म्हणजे डॉ. कलाम यांच्यासारख्या काही मूल्ये जपणाऱ्या व्यक्तीकडून भाऊंना तो स्वीकारायला मिळाला - नाहीतर तेवढं कारण काढूनसुद्धा भाऊ ‘मला पुरस्कार नको’ असं कदाचित म्हणाले असते. बहुधा राजशिष्टाचारांचा भाग असावा, म्हणून भाऊ समारंभाला शर्ट पॅंट घालून गेले, नाहीतर भाऊ त्यांच्या खादीच्या झब्ब्या-पायजम्यामधून बाहेर येणं अशक्य. 

भाऊंविषयी सगळ्यांनाच जिव्हाळा असला तरी आजी आमची खास लाडकी होती. भाऊ हे तिच्या जगण्याचाच एक भाग होऊन गेले होते. आजीची नेहमी थट्टा करण्याचा विषय म्हणजे ‘आजी- अशी एक गोष्ट सांग ज्याला तू भाऊंना नको म्हणालीस!’ नेहमी हे चेष्टेवारी नेणारी आजी एकदाच गंभीर होत म्हणाली ‘अरे संसारात कोणाला तरी एकाला हो म्हणावचं लागत, तरच संसार टिकतो!’ भाऊ आजीला कितीही ‘गृहीत धरत’ असले तरी तिच्यावाचून त्यांचं पानही हलत नसे. एरवी कठोर, रांगडे वाटणारे भाऊ आजीच्याबाबतीत किती हळवे होते ह्याचे अनेक नमुने घरातच सापडतील. त्यांनी भिंतीवर एक घड्याळ लावलं होतं - त्यातले सगळे काटे काढून तिथे एक हार्टचा आकार बनवून त्यात आजीचा सुंदर फोटो लावला होता. ते घड्याळ अजून डोळ्यासमोर आहे. स्वतः पूर्ण नास्तिक असूनही संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये ‘असतो मा..’ची वेळ आली की ते आजीबरोबर सामील होत असत. खास आजीसाठी बनवलेलं देवघर, तिच्या उंचीला सोपे पडतील असे फर्निचरमधले बदल, गॅलरीमध्ये दोघांना बसायला बनवलेली विशिष्ट अशी ‘फळी’ अशा कित्येक गोष्टी.

भाऊ अतिशय स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असले तरी स्वतःला न विसरता त्यांच्याबरोबर इतकी वर्षे सक्षमपणे संसार करणारी आजी स्वतः किती कणखर असली पाहिजे हे आता लक्षात येतं. नातवंडांना संध्याकाळी ‘शुभं करोति’ म्हणायला लावणे, दिवाळी मध्ये कितीही नको नको केलं तरी अभ्यंगस्नान करताना चेहऱ्याला तेल चोपडणे, कॉफी मागितली तर दुधाळ कॉफी देणे असे आजीचे ‘प्रेमळ’ लाड सहन करायला लागायचे. भाऊ प्रोफेसर म्हणून उत्तम असणार हे नक्की. मी शाळेत असताना मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला एक प्रश्न पडला. ‘जर महात्मा गांधी ब्रिटिश लोकांबरोबर लढत होते आणि हिटलर तेच करत होता तर गांधीजींनी हिटलरलाच का मदत केली नाही?’ तमाम टिनएजर्सप्रमाणे ‘आपल्याला काहीतरी जास्ती कळतं म्हणून ही एक फार उत्तम आयडिया गांधीजींनी अगदी वाया घालवली’ अशा मताला आम्ही पोचलो.  शाळेत विचारल्यावर काहीतरी उडवाउडवीची उत्तर मिळाली, एका बाईंनी ‘आगाऊपणा पुरे’ वगैरे सल्ले दिले. मग आम्हाला वाटलं आपण हे भाऊंना विचारावं: त्यांनी एक मिनीट विचार केला आणि म्हणाले ‘अरे हिटलर भारतासाठी अजून धोकादायक होता म्हणून असं केलं नाही’. एवढं नेमकं आणि अचूक उत्तर देऊन पुढच्याच क्षणी ते ‘मी भाजी आणायला निघतो’, म्हणून गेलेसुद्धा ! 

‘गेलेसुद्धा’ लिहिलं तेव्हा लक्षात आलं आजी, भाऊ जाऊन दशक होईल. सहजीवनातील आनंद समरसून उपभोगण्याच्या त्यांच्या आठवणी मात्र  चिरंतन आहेत.

संबंधित बातम्या