एक संवेदनशील आदर्शवादी

आशा अग्निहोत्री
सोमवार, 18 जुलै 2022

‘सुंदर तेची वेचावे, सुंदर करोनी मांडावे, स्वतः व इतरांसाठी,’ हे चित्रकार रवी परांजपे सरांचे ब्रीदवाक्य. मी व माझ्या नवऱ्याने -मिलिंदने -अनेकदा सरांशी केलेल्या बौद्धिक, भावनिक व वैचारिक चर्चेत ह्या वाक्याचा सरांनी उलगडलेला अर्थही मला अनेक वर्षे उपयोगी पडत आहे. सुंदर काय, हे समजण्यासाठी आधी कुरूप काय, हे समजून ते आधी बाजूला काढून टाकायचे आणि मग जे सुंदर आहे ते अजून खुलवून, सजवून, सुबकतेने, सकारात्मक दृष्टिकोनातून परत त्याच जागी ठेवून द्यायचे. ज्याला आवडेल, समजेल- सरांच्याच भाषेत सांगायचे तर -ज्याची ‘प्रगल्भता’ असेल तोच ते वेचेल.

चित्रकर्मी रवी परांजपे ह्यांच्याकडून मला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काय शिकता आले, ते सांगण्याचा हा प्रयत्न. सरांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर एका दिग्गज, बहुआयामी, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकाराचे आयुष्य हे अनेक आव्हानांनी भरलेले असते, हेच दिसून येते. सातत्य, परिश्रम, प्रामाणिकपणा व निरपेक्षपणे कलेची सेवा हे गुणच उत्तम कलाकार घडवू शकतात, हे परांजपे ह्यांच्या जीवन प्रवासातील घटनांमधून शिकायला मिळते.

चित्रकार म्हणजे खांद्याला झोळी, बेताचे आर्थिक गणित असलेला कलाकार अशी काहीशी समजूत आजही असते. पण प्रामाणिक मार्गाने अविरत कष्ट करून व बुद्धिचातुर्य वापरून समाजाचे पाठबळ व क्वचित रोषही पत्करून चित्रकार ऐटबाज, सधन, रुचिसंपन्न आयुष्य जगू शकतो हा संस्कार रवी परांजपे यांनी कलाक्षेत्रातील मंडळींना कळत नकळत दिला. सरांनी स्वतःचे कलादालन, त्यांची अमूल्य व दुर्मीळ चित्रे व साहित्याचे भांडार हा खजिना पुढल्या पिढीसाठी फाउन्डेशनच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. त्यांनी रंगांच्या दुनियेतील प्रवासात अनेक नवनवीन प्रयोग केले, स्वतःची छबी निर्माण केली. नवीन तंत्रज्ञान व माध्यमे वापरून चित्रकला क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले. ‘सातत्य व परिश्रम’ हे त्यांनी जगायचे सूत्र बनविले होते. अर्ध्या रात्रीत कीर्ती मिळवण्याची त्यांना कधीही घाई नव्हती. सरांनी स्टुडिओ बाहेरील वातावरणाचा स्वतःच्या कामावर परिणाम होऊ द्यायचा नाही, हे सूत्रही अंगीकारले होते.

‘परस्पेक्टिव्ह अॅण्ड स्किओग्राफी’ (Perspective and Sciography) असा विषय आम्हाला आर्किटेक्चरच्या शिक्षणक्रमात होता. त्यामध्ये अनेक देशी व विदेशी चित्रकार, आर्किटेक्ट यांची चित्रे प्रोजेक्टरच्या साहाय्याने दाखवली जायची. परांजपे सरांची चित्रेही दाखवली जायची. ती चित्रे चक्क आपल्याला गोष्ट सांगत आहेत, अशी भावना निर्माण करायची. चित्रांमधला ऊन, सावलीचा खेळ, निसर्ग, मानवी आकृत्या, निर्जीव वस्तू त्यांची परिमाणे, रंगसंगती हे इतके विलोभनीय असायचे की ह्या चित्रांच्या आत कधी प्रवेश केला हे कळायचेही नाही.

आर्किटेक्ट हा खरे तर प्रोजेक्टच्या कथानकाचा सूत्रधार असतो. तो कथा लिहितो, स्वप्ने व कल्पना रंगवतो, कागदावर साकारतो आणि प्रत्यक्षातही आणतो. त्याकाळी त्रिमितीतील चित्रे रंग व कागदांच्या माध्यमातून काढली जायची. ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे बहुतांश चित्रकार ही चित्रे ‘इम्प्रेशनिझम स्टाइल’मध्ये साकारायचे. अशा काळात रवी परांजपे ह्यांनी विकसित केलेले त्रिमितीतील चित्रांचे तंत्रज्ञान हे भारतातल्या तमाम आर्किटेक्टना वरदान होते. शुद्ध चित्रकारिता व आर्किटेक्चर याचा सुंदर मिलाफ घडवून निर्माण केलेले त्रिमितीतील चित्र अचूक, सूक्ष्म गोष्टींची सत्यतेत जाणीव करून देणारे, बोलके, सुबक, सुंदर, नीटनेटके व अतिशय देखणे असायचे.  चित्र, संगीत व शब्दांसोबतच नृत्याविष्कारही ह्या चित्रकाराच्या कॅनव्हासवर नकळत सादर व्हायचा आणि त्या कलाविष्कारातून ‘औचित्य व सौंदर्य’ ह्यांचे त्रिमिती रूपदर्शन सामोरे यायचे. आमच्या आर्किटेक्चरच्या  शिक्षणक्रमात ‘फॉर्म, स्पेस अॅण्ड ऑर्डर’ हे फ्रान्सिस डी.के. चिंग ह्यांचे पुस्तक वाचणे हे क्रमप्राप्त आहे. पण जेव्हा परांजपे सरांच्या ‘डिझाईन, ऑर्डर, सिस्टिम’ ह्या त्रिसूत्रीचे अध्ययन केले तेव्हा ही त्रिसूत्री जीवनातील वैयक्तिक मार्गक्रमणेतही अतिशय उपयुक्त आहे हे पटले.

‘सुंदर तेची वेचावे, सुंदर करोनी मांडावे, स्वतः व इतरांसाठी,’ हे सरांचे ब्रीदवाक्य. मी व माझ्या नवऱ्याने -मिलिंदने -अनेकदा सरांशी केलेल्या बौद्धिक, भावनिक व वैचारिक चर्चेत ह्या वाक्याचा सरांनी उलगडलेला अर्थही मला अनेक वर्षे उपयोगी पडत आहे. सुंदर काय, हे समजण्यासाठी आधी कुरूप काय, हे समजून ते आधी बाजूला काढून टाकायचे आणि मग जे सुंदर आहे ते अजून खुलवून, सजवून, सुबकतेने, सकारात्मक दृष्टिकोनातून परत त्याच जागी ठेवून द्यायचे. ज्याला आवडेल, समजेल- सरांच्याच भाषेत सांगायचे तर -ज्याची ‘प्रगल्भता’ असेल तोच ते वेचेल. तोच तुमच्याकडे आकृष्ट होईल. मुंबईहून पुण्याला कायमस्वरूपी आधी सर व पाठोपाठ मी वास्तव्यास आलो. आमची दोघांची शेते एकाच संस्थेत मागच्या पुढच्या गल्लीत होती. मी संस्थेच्या कारभारात विशेष लक्ष देऊन तळमळीने काम करत होते आणि ते काम करत असताना त्यांनी मला दिलेल्या काही सल्ल्यांचा व्यक्तिगत व सामाजिक कामात फार उपयोग झाला, हे स्मरते. 

परांजपे सरांचे अजून एक वचन म्हणजे ‘सुबोध-सुंदर-भावस्पर्शी’ कला. प्रामाणिकपणे, सातत्याने व नावीन्यपूर्णतेने आपली कला सादर करण्याचा संकल्प सोडला तर कुठल्याही कलाकाराला त्याच्याच कलाविष्कारातून ‘अभिजाततेची’ अनुभूती घेता व देता येऊ शकते. ‘अभिजातता- एक परिचय’ हा एक कार्यक्रम काही वर्षांपूर्वी सरांच्या संकल्पनेतून साकारला गेला. त्याचे सूत्रसंचालन व या विषयावर चर्चा घडवून आणायची जबाबदारी मिलिंदवर सोपवली होती. कार्यक्रमाचे उद्दिष्ट अभिजातता या विषयाच्या बीजरोपणाचे होते.

ह्या कार्यक्रमाचा आमच्या व्यक्तिगत आयुष्यात विचार आणि कृती ह्या दोन्हींवर बराच प्रभाव पडला. आम्ही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करतच होतो, पण त्या कामाकडे बघायचे  व ते कृतीत उतरवायचे सूत्र बदलून काही वेगळे प्रयोग करून पाहिले. सरांच्या शब्दात मांडायचे तर ‘जी कलाकृती निर्माण केल्यावर सर्वात प्रथम जेव्हा स्वतःला त्याचा आनंद, अभिमान वाटतो व त्यामधला गर्भित भाव स्वतःला स्पर्श करतो तीच अभिजाततेची अनुभूती’. ती कलाकृती ज्यांच्यापर्यंत पोचायची ती पोचतेच.

सरांना अनेक पुरस्कार, बक्षीसे, सन्मान मिळाले. मिळालेल्या सर्व कौतुकाच्या वर्षावाचा आदर करून, त्या सन्मानांना कुरवाळत न बसता पुढील पिढीसाठी ‘गुणीजन पुरस्कार’, स्पर्धेमार्फत बक्षीसे, शिष्यवृत्त्या, गरजूंना कामाच्या संधी उपलब्ध करून त्यांना पायावर उभे करणे, अनेक नवोदित व नावाजलेल्याही गायक, वादक, चित्रकारांना स्वतःच्या स्टुडिओत कार्यक्रम आयोजित करण्याची संधी देऊन, त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करणे हे त्यांनी अगदी सहज केले आहे. त्याची कुठेही जाहिरात नाही हे महत्त्वाचे.

सरांकडून अजून एक शिकवण नकळत मिळत गेली ती म्हणजे ‘भूमिका बदल’ व नेमका ‘संवाद’ साधणे. त्यांना मी रवी परांजपे सर, आर्टिस्ट रवी परांजपे, रवी काका, रवीजी, वक्ता/विशेष अतिथी, दर्दी संगीतप्रेमी, मार्मिक लेखक ह्या सर्व भूमिकांतून अनुभवले. प्रत्येक भूमिका ते खुबीने पार पाडायचे आणि कार्यभाग संपला की त्या भूमिकेतून सहज विलग व्हायचे. त्यामध्ये भपका अजिबात नसायचा. एक भूमिका मात्र कायम तीच असायची ‘परखडपणा व स्पष्टवक्तेपणा’! हा आत्मविश्वास त्यांच्या सर्वच वागणुकीत दिसायचा व देहबोलीतून व्यक्त व्हायचा. अगदी रुग्णालयात दाखल होईपर्यंत परांजपे सर असेच होते. रुग्णालयात जेव्हा त्यांना काहीही शारीरिक हालचाल करता येत नव्हती तेव्हाही त्यांच्या घाऱ्या, भावस्पर्शी डोळ्यांमार्फत संवाद सुरू होता. 

ह्या ‘संवेदनशील आदर्शवादी’ व्यक्तिमत्त्वाचे दोन विचार मांडून थांबते.

समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘वारसाहक्क व वारसावृद्धी’ हे दोन विचार आपली जीवनमूल्ये म्हणून जोपासली तर सशक्त व निरोगी समाज निर्माण होईल. यासाठी ही रत्ने आपल्या खजिन्यात आहेत ही जाणीव हवी व त्यांना तावून सुलाखून चमकवता कसे येईल ह्यासाठी व्यक्तिगत प्रयत्न व्हायला हवेत. ह्याच अनुषंगाने सरांचे ‘सिद्धी प्राप्तते‘वरील भाष्य प्रत्येक व्यक्तीने नीट समजून घेणे आवश्यक वाटते. प्रथम सिद्धी प्राप्त झाली आहे ह्याची जाणीव होणे आणि त्या जाणिवेतून लगेच बाहेर पडून परत सामान्य होणे आणि पुनःश्च सिद्धी प्राप्तीची ओढ ठेवणे, ह्या प्रक्रियेतून सातत्याने उत्तम काम निर्माण होऊ शकते हे व्यक्तिशः मला मिळालेले संचित!

 

संबंधित बातम्या