तत्त्वनिष्ठ, शिस्तबद्ध, झुंजार उद्योगपती!

भरत फाटक
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022

स्मरण  

काळाच्या पुढची दूरदृष्टी आणि कामाचा झपाटा या दोन्ही बाबतीत राहुलकुमार बजाज यांच्याकडून स्फूर्ती घेण्यासारखे पुष्कळ आहे. थोड्याच क्षेत्रांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून ‘सरळ बॅट’ने खेळून त्यांनी दाखवून दिले आहे, ‘यू जस्ट कॅनॉट बीट अ बजाज’! 

‘भारत हा जगातील एकमेव देश असावा, जेथे अधिक उत्पादन केल्याबद्दल व्यवस्थापनाला दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागते!’ लायसन्स, कोटा, परमीट राजबद्दल उबग येऊन उद्‍गारलेले हे शब्द आहेत, गेल्या शनिवारी (ता. १२ फेब्रुवारी) अस्ताला गेलेल्या तेजस्वी सूर्याचे, उद्योगपती राहुलकुमार बजाज यांचे! ‘स्वातंत्र्यासाठी माझ्या आई-वडिलांनी कारावास भोगला. औद्योगिक स्वातंत्र्यासाठी माझीही गजाआड जाण्याची तयारी आहे!’ हा काळ होता, १९७०च्या दशकामधील. केंद्रीय पातळीवर विविध उद्योगांना किती क्षमता स्थापन करता येईल, याचे नियोजन केले जाई. त्याप्रमाणे उत्पादनाचा परवाना मिळण्यासाठी अर्ज करावा लागे, आणि त्यावरील निर्णय वर्षानुवर्षे प्रलंबित असे. पुरवठा कमी असल्यामुळे उत्पादनांचा काळाबाजार चालत असे. स्कूटरसारखी वस्तू अधिकृत किमतीपेक्षाही अधिक ‘ऑन मनी’ घेऊन विकली जात असे, किंवा उत्पादक किमती वाढवून याचा गैरफायदा घेऊ शकत. लहानपणापासून गांधीजींच्या विचारांचा वारसा मिळालेल्या राहुलजींना हे बिलकूल अमान्य होते. ग्राहकाला रास्त किमतीला उत्तम गुणवत्तेचे उत्पादन मिळाले पाहिजे, आणि कामगारांना कष्टाचा सन्मान करणारे वेतन मिळाले पाहिजे, या तत्त्वाबद्दल ते नेहमी आग्रही होते.

त्यांचे आजोबा जमनालालजी बजाज हे महात्मा गांधीजींचे निकटवर्ती होते. ते काही काळ काँग्रेस पक्षाचे खजिनदारही होते. कुटुंबातील सर्वांचाच देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्याकडे ओढा होता. राहुलकुमारांचे वडील कमलनयनजी यांनीही स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले होते व नंतर ते खासदारही झाले. राहुलजींना स्वतःला राजकारणात रस नव्हता, पण त्या विषयातील आपली सडेतोड मते निर्भीडपणे मांडण्याबद्दल ते प्रसिद्ध होते. राजकारणातील आणि सरकारमधील अनेकांशी व्यक्तिगत पातळीवर ओळख असली, तरी व्यवसायाच्या लाभासाठी त्याचा उपयोग करण्याचा विचारही त्यांना त्याज्य होता. नियमानुसार आणि गुणवत्तेवरच त्यांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणारा उद्योग उभारण्याचे आणि वाढविण्याचे स्वप्न साकार केले.

इटलीमधील जगप्रसिद्ध पियाजिओ कंपनीबरोबर तंत्रज्ञानाचे सहकार्य करून उत्पादन केलेली ‘व्हेस्पा’ स्कूटर मुंबईमधील गोरेगावमधील एका गॅरेजमधून प्रथम बाजारात आली. त्यानंतर मुंबईमध्येच कुर्ला इथे बजाज ऑटोचा कारखाना होता. १९६०च्या दशकात पुण्याजवळ आकुर्डी येथे मोठी जागा घेऊन नवा कारखाना उभारण्यात आला. मुंबईच्या उच्चभ्रू कारमायकेल रोडवर निवासस्थान असणारे, आणि कॅथेड्रल स्कूल, दिल्लीचे स्टीफन्स कॉलेज, मुंबईचे सरकारी लॉ कॉलेज, इतकेच नव्हे तर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनाचे उच्च शिक्षण घेतलेले राहुलजी हे सर्व सोडून आकुर्डीमध्ये कारखान्यात येऊन राहिले. सुरुवातीचे काही दिवस गेस्ट हाऊसमध्ये राहिल्यावर त्यांनी स्वतःचे घर बांधले, तेही फॅक्टरीच्याच आवारात, आणि संपूर्ण कारकीर्द त्यांचा निवास तेथेच राहिला. २४ x ७ हा आज रूढ असणारा वाक्प्रचार त्यांनी ६० वर्षे प्रत्यक्ष आचरणात आणला. मोठे उद्योगपती होऊन अपरंपार वैभव निर्माण केल्यावरही साधी राहणी आणि मध्यमवर्गीय मूल्ये त्यांनी कधीही सोडली नाहीत.

स्वयंचलित दुचाकी- स्कूटर व मोटरसायकल हे भारतातील मध्यमवर्गाचे वाहन म्हणून अभिमानाने घरी आणले जाते. १९७०मध्ये बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक आणि १९७२पासून अध्यक्ष झालेल्या राहुलजींनी या वाहनांना ‘हमारा बजाज’ ही ओळख मिळवून दिली. उत्पादनावर निर्बंध आणि प्रचंड वाढती मागणी यामुळे या उद्योगाला आकाशही ठेंगणे होते. एकेकाळी लग्नामध्ये जावयाला बजाज स्कूटर देणे प्रतिष्ठेचे समजले जाई, इतकी ती स्कूटर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली होती. मात्र या उद्योगात पूर्ण सचोटीने व्यवहार करून, संपूर्ण करभरणा नेहमीच नियमाप्रमाणे करून, कोणताही आडमार्ग न वापरता आणि दुसऱ्या उद्योजकांशी वैर न करता, कर्ज न घेता यशस्वी उद्योग कसा उभारता येतो, याचा आदर्श त्यांनी प्रत्यक्ष वर्तणुकीतून दिला आहे.

मात्र हा सर्व प्रवास तीव्र संघर्षातूनच आणि खडतर पद्धतीने झाला, याचा विसर पडून चालणार नाही. पहिली मोठी परीक्षा १९७१मध्ये पियाजिओ कंपनीचा तांत्रिक करार संपुष्टात आला, तेव्हा झाली. पुढे या लढ्याचे अनेक अध्याय उलगडले. आमच्या डिझाइनची नक्कल केली, अशा अर्थाचा खटला पियाजिओने अमेरिकेतील न्यायालयात दाखल केला. करार संपल्यावर १० वर्षांनी असा वाद उकरून काढण्यात आला, तो बजाज ऑटो भारतीय बाजाराची सीमा ओलांडून निर्यातीची क्षितिजे पादाक्रांत करू लागल्यावर. जगातील नामांकित कायदेतज्ज्ञांची मदत घेऊन बजाज ही लढाई लढले आणि तडजोड करण्यास नकार दिला. त्यापाठोपाठ पश्चिम जर्मनीमध्येही खटले दाखल केले गेले. तेथील सुप्रिम कोर्टापर्यंत लढा देऊन बजाजांनी यश मिळविले.

१९८१पासून स्कूटर निर्मितीच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण व्हायला सुरुवात झाली. मात्र स्कूटर निर्मितीला भारतीय बाजारपेठेत मोठे आव्हान आले ते ऑटोमॅटिक स्कूटर निर्मितीच्या रूपाने! त्याला प्रत्युत्तर म्हणून बजाजने मोटरसायकल व निर्यात बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले. मोटरसायकल गुणवत्तेला जगाच्या बाजारात स्थान मिळवून दिले. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बजाज यांना अन्य काही कठीण प्रसंगांतून जावे लागले. मात्र सचोटीचा व्यवहार असणारा बजाज समूह कोणताही डाग न लागता या प्रसंगांतून बाहेर आला.

स्पष्टवक्ता, तत्त्वनिष्ठ, शिस्तबद्ध, झुंजार उद्योगपती म्हणून नावलौकिक असणारे राहुलकुमार सार्वजनिक जीवनातही असेच ताठ मानेने, पण सामाजिक बांधिलकी असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जगले. इंडियन एअरलाईन्सचे अध्यक्ष म्हणून मानद पद स्वीकारल्यावर मोठी जीवितहानी झालेल्या अपघाताचाही त्यांनी सामना केला. आपल्या २१ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वक्तशीरपणा, कार्यक्षमता आणि प्रशिक्षण यावर भर देऊन गुणवत्ता सुधारण्याला प्राधान्य दिले. राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांनी औद्योगिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. ‘स्वदेशी’चा आग्रह धरताना दर्जा उंचावणे, तंत्रज्ञान सुधारणे, कार्यक्षमता वाढविणे यांचा त्यांनी सतत पाठपुरावा केला.

काळाच्या पुढची दूरदृष्टी आणि कामाचा झपाटा या दोन्ही बाबतीत राहुलकुमारांकडून स्फूर्ती घेण्यासारखे पुष्कळ आहे. १९८०मध्येच संगणक, १९८६मध्ये रोबॉटिक्स बजाजमध्ये आले होते. ‘स्टार्ट अप’ या कल्पनेचा आज बोलबाला आहे. ते भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे अध्यक्ष होते. या माध्यमातून तरुणांना सीड कॅपिटल आणि कर्जासाठी जमीन देण्यापर्यंतचे साहाय्य गेली ३० वर्षे ते करीत होते. कामाचा झपाटा केवढा होता याचे, एकच उदाहरण पुरेसे आहे. औरंगाबादजवळ वाळूज येथे ७५० एकरावरील प्रकल्प ताबा मिळाल्यापासून १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा जणू विक्रमच त्यांनी केला होता!

आज बजाज ऑटो जागतिक दुचाकी बाजारात एक लाख कोटींचे बाजारमूल्य असणारी पहिली आणि एकमेव कंपनी आहे. २५ लाख दुचाकी निर्यात करण्याची विक्रमी कामगिरी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अग्रेसर झालेल्या बजाज फिनसर्व्ह व बजाज फायनान्स या कंपन्यांचे बाजारमूल्य अनुक्रमे ₹    ४ लाख कोटी व ₹    २.५० लाख कोटी इतके प्रचंड आहे. थोड्याच क्षेत्रांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून ‘सरळ बॅट’ने खेळून त्यांनी दाखवून दिले आहे, ‘यू जस्ट कॅनॉट बीट अ बजाज’! त्यांच्या स्मृतीला नम्र अभिवादन!

(लेखक सी.ए. व आर्थिक घडामोडींचे विश्लेषक आहेत.)

संबंधित बातम्या