योजक: तत्र दुर्लभ:...

डॉ. प्रमोद चौधरी
गुरुवार, 25 मार्च 2021

स्मरण 

व्यवस्थापनशास्त्राचे गुरू म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असे डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि डॉ. शरू रांगणेकर यांचे अलीकडेच निधन झाले. हे दोघे आणि डॉ. दिलीप सरवटे ही मराठी त्रयी म्हणजे भारतातील व्यवस्थापन शिक्षणाचे अग्रदूत. अस्सल भारतीय व्यवस्थापनतंत्र विकसित करून शिक्षण आणि नोकरी-व्यवसाय यांतील दरी कमी करण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या मान्यवरांना ही आदरांजली...

अ मन्त्रं अक्षरं नास्ति, नास्ति मूलम् अनौषधम्। 
अयोग्य: पुरुषो नास्ति, योजक: तत्र दुर्लभ:।।

‘मंत्र म्हणून उपयोग नाही असे अक्षर नाही. औषधी गुण नाहीत असे मूळ (वनस्पती) नाही. कोणतीही व्यक्ती अयोग्य नसते. फक्त गरज असते ती योग्य अशा योजकाची.’ उद्योगविश्वामध्ये तर योजकाची भूमिका कळीची ठरते. कालानुरूप आता या योजकांना व्यवस्थापक हे बिरुदही चिकटले आहे. या व्यवस्थापकांना त्याचे शास्त्र शिकवणाऱ्या ज्या विद्याशाखा आता प्रस्थापित झाल्या आहेत, त्या नवजात रूपात असतानाच्या काळात त्यांना आकार देऊ पाहणाऱ्या तिघा मराठी व्यवस्थापनगुरूंना अभिवादन करण्यासाठी मी या लेखाचे प्रयोजन केले आहे.

आयआयटी-मुंबईमधून अभियांत्रिकी पदवी मिळविल्यानंतर एक तप मी नोकरी केली. पुढे स्वतःचा उद्योग स्थापन केला. सदतीस वर्षांच्या उद्योजकीय वाटचालीत आणि त्याची तयारी म्हणून नोकरीच्या काळात व्यवस्थापनाचे धडे घेत असताना मी औपचारिक-अनौपचारिकरीत्या विविध व्यवस्थापनगुरूंच्या संपर्कात आलो. हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये जगविख्यात गुरूंकडूनही धडे घेण्याची संधी मला मिळाली. परंतु या क्षेत्रात सुरुवातीची पावले टाकताना मला डॉ. प्र. चिं. शेजवलकर, डॉ. दिलीप सरवटे आणि डॉ. शरू रांगणेकर या तिघा मराठी व्यवस्थापनगुरूंचा सहवास मिळाला.

या वर्षाच्या सुरुवातीलाच डॉ. शेजवलकर आणि डॉ. रांगणेकर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्याप्रमाणेच भारतीय व्यवस्थापनक्षेत्रात आदराने नाव घेतले जाणारे डॉ. सरवटे २०१६मध्ये हे जग सोडून गेले. या तिघांनी भारतीय व्यवस्थापनक्षेत्राचा परीघ दीर्घकाळ व्यापला, आपापल्या रीतीने त्यावर कायमची मोहोर उमटवली. डॉ. शेजवलकर यांची या क्षेत्राच्या अभ्यासाची सैद्धांतिक बैठक आणि ती विद्याशाखा व उद्योगक्षेत्र यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका, डॉ. सरवटे यांचा उद्योगविश्वामध्ये सल्लागार म्हणून केलेल्या कामाचा अनुभव व त्यातून व्यवस्थापनाच्या विद्याशाखेत त्यांनी केलेले काम आणि डॉ. रांगणेकर यांचा थेट बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवरील जबाबदाऱ्यांचा आवाका व त्यातून समृद्ध झालेले त्यांचे अनुभवविश्व या तिन्हीला आपण अल्पावधीमध्ये मुकलो आहोत. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या कार्याशी माझी झालेली प्रत्यक्ष ओळख, त्यामधून वेगवेगळी सूत्र आपणापुढे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे.

शेजवलकर सरांचा उल्लेख मी आधी करेन, कारण नोकरीच्या काळात अल्पकाळ का असेना, व्यवस्थापनाचे धडे सर्वप्रथम मी त्यांच्याकडून घेतले. तेव्हा मी बजाज टेंपोमध्ये होतो आणि अहमदाबादच्या आयआयएममधून शिक्षण घेतलेल्या माझ्या दोन सहकाऱ्यांसमवेत केईएम रुग्णालयासाठी दर गुरुवारच्या सुटीच्या दिवशी काही व्यवस्थापकीय सल्लासेवा देत होतो. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना मला स्वतंत्रपणे व्यवस्थापकीय शिक्षण घेता येत नव्हते. अशा परिस्थितीत शेजवलकर सरांच्या सायंकालीन वर्गांना हजेरी लावून त्यातून माझी ज्ञानशाखा शक्य त्या स्वरूपात रुंदावण्याचा प्रयत्न करत होतो. सरांनी तेव्हा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रीसर्च (आयएमडीआर) या संस्थेची मुहूर्तमेढ नुकतीच रोवली होती. 

शेजवलकर सरांशी झालेल्या त्या परिचयानंतर सार्वजनिक व्यासपीठांवर किंवा तशा ठिकाणी त्यांची ओझरती भेट होत राहिली. परंतु माझ्या व्यावसायिक वाटचालीच्या अगदी अलीकडच्या टप्प्यात, गेल्या वर्षी मी आवर्जून त्यांची भेट घेतली, तेव्हा माझ्या नोकरीच्या काळात आयएमडीआरमध्ये त्यांच्याकडून धडे घेतले, त्या दिवसांना उजाळा मिळाला. दीर्घकाळ थेट संपर्क नसूनही ते माझा आणि माझ्या कंपनीच्या प्रगतीचा आलेख पाहात असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. ''माणूस म्हणून आपण कंपनीतील सेवकांशी प्रेमाने वागता आणि एवढ्या व्यावसायिक यशानंतरही पाय जमिनीवर ठेवून आहात, याचा मला विशेष आनंद वाटतो,'' अशा शब्दांत त्यांनी माझे कौतुक केले होते. 

डॉ. शेजवलकर यांच्याप्रमाणेच पुणे हे कार्यकर्तृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवलेले दुसरे व्यवस्थापनगुरू म्हणजे डॉ. दिलीप सरवटे. डॉ. शेजवलकर यांनी ‘आयएमडीआर’मधून निवृत्त झाल्यानंतर ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन’ची स्थापना करून ज्ञानदानाच्या क्षेत्रालाच वाहून घेतले, त्याप्रमाणे डॉ. सरवटे यांनीही आयुष्यभर शिक्षकाची भूमिका निभावली. त्यांनीही आधी तीस वर्षे ‘टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर’मध्ये आणि नंतर पुण्याच्या ‘इंदिरा इन्स्टिट्यूट’मध्ये व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी घडवले. डॉ. शेजवलकर यांनी विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे अभ्यासक्रम तयार केले आणि अशा होतकरू व्यवस्थापकांना नोकरीची संधी देण्यासाठी उद्योगांना आपल्या संस्थेपर्यंत आणण्यात यश मिळवले. डॉ. सरवटे यांनी उद्योगांसाठी केस स्टडी अभ्यासण्याचे काम केले. माझ्या प्राज इंडस्ट्रीजसाठी त्यांनी केलेली इंटरनॅशनल मार्केटिंगची एक काल्पनिक केस स्टडी तर पूर्णतः आमच्या गरजांनुरूप राबवलेली होती! त्यातही लोकांना विचारप्रवण करणाऱ्या प्रश्नोत्तरांतून माहिती जमा करण्याचे कसब वाखाणण्याजोगेच होते.

उद्योग व्यवस्थापनाच्या ‘रेड ओशन आणि ब्लू ओशन’ ह्या व्यवस्थापनतज्ज्ञांनी प्रचलित केलेल्या संकल्पनेचे डॉ. सरवटे भारतातील प्रसारक होते. सन २००७-०८ मध्ये प्राज इंडस्ट्रीज मंदीतून सावरून मोठी झेप घेण्याच्या दृष्टीने सज्ज होत असताना मी स्वतः ‘ब्लू स्काय चॅलेंज’ ही याच स्वरूपातील धोरणआखणी केली होती आणि यशस्वीरीत्या राबवलीही होती.

या दोन्ही दिग्गजांच्या तुलनेत शरू रांगणेकर यांच्याशी माझा प्रत्यक्ष संपर्क मर्यादित स्वरूपाचा राहिला. परंतु त्याचा ठसा मात्र कायमस्वरूपी म्हणता येईल, असा राहिला.

दुर्दैवी योगायोग असा, की शेजवलकर सरांची मी अलीकडेच मुद्दाम भेट घेतली होती आणि रांगणेकरांची आठवण मी जानेवारीअखेरीस झालेल्या विश्व मराठी संमेलनातील माझ्या पूर्वमुद्रित भाषणाच्या निमित्ताने काढली होती. या संमेलनाला ऑनलाइन उपस्थित राहणाऱ्या मराठी तरुणांपर्यंत मला ‘इंट्राप्रेन्युअर’ ही संकल्पना पोचवायची होती आणि स्वतः इंट्राप्रेन्युअर असलेल्या शरूंची त्यानिमित्ताने मला हटकून आठवण झाली होती. प्रस्थापित बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून जबाबदारीच्या पदांवर कामाचा अनुभव हे शरूंचे वेगळेपण होते. त्या अर्थाने त्यांचा पिंड डॉ. शेजवलकर आणि डॉ. सरवटे या दोघांपेक्षाही वेगळा म्हणता येईल. तो अनुभव आणि भारतीय उद्योग-व्यवसायांची गरज यांचा मेळ साधत त्यांनी स्वतःच्या व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळांची आखणी करून एक वेगळा ठसा उमटवला होता. नर्मविनोदी संभाषणकौशल्य ही त्यांची खासियत. ‘इन द वंडरलँड्स ऑफ इंडियन मॅनेजर्स’ या त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकावरूनही त्यांच्या या वक्रदृष्टीचा अंदाज यावा. 

‘आंत्रप्रेन्युअरशिप’ आणि ‘इंट्राप्रेन्युअरशिप’ या दोहोंच्या प्रसारासाठी व्यवस्थापनकौशल्याची गरज विशेषत्वाने जाणवते. व्यवस्थापनगुरू म्हणून खरेच वंदनीय असे हे तिघेही महनीय मराठी तरुणांमधील उद्यमशीलता या विषयावरही सातत्याने चिंतन करणारे होते. त्या तळमळीतून त्यांनी केलेल्या ज्ञानप्रसाराचा मला काही अंशी लाभ घेता आला, हे माझे भाग्य म्हणता येईल. आज उद्योगक्षेत्राचा बऱ्यापैकी अनुभव घेतल्यानंतर मीही याविषयीच्या अनुभवांची शिदोरी नवउद्यमींपुढे उलगडतो, तेव्हा हे तिघे आणि जगभरातील अशा इतरही जाणकारांमुळे घडलेली उद्योजकीय व्यवस्थापनाची बैठकच उपयोगी पडते. व्यवस्थापनाचा हा ज्ञानप्रवाह असा दीर्घकाळ पाझरत ठेवल्याबद्दल या तिघाही मान्यवरांना माझे शतशः प्रणाम! 

(लेखक ज्येष्ठ उद्योजक व प्राज इंडस्ट्रीज लि.चे संस्थापक-कार्याध्यक्ष आहेत.)

संबंधित बातम्या