दिलीपसाब, आम्हाला उशीरच झाला!

 जी. बी. देशमुख    
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

स्मरण

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आता आपल्यात नसले तरीही ते कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतील यात शंका नाही. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या एका चित्ररसिकानं ‘दिलीपसाहेबां’चं केलेेलं स्मरण...

सन १९७७ या वर्षीचं मॅट्रिक म्हणजे साधारण १९६२च्या आसपासचा जन्म असलेली आमची  पिढी जेव्हा १९६८ साली प्राथमिक शाळेत जाऊ लागली तेव्हा हिंदी सिनेमा भरात होता. देव आनंद-दिलीप कुमार-राज कपूर हे त्रिकुट पन्नाशीला टेकलं होतं आणि राजेश खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र आदींचा बोलबाला होता. पहिली-दुसरीत आम्ही होतो तेव्हा हिंदी चित्रपट काळ्या-पांढऱ्याकडून रंगीतकडे वळू लागला होता. मला आठवतं, मी  दिलीप कुमारला पहिल्या प्रथम  बलराज सहानी आणि संजीव कुमारबरोबर ‘संघर्ष’ चित्रपटात पाहिलं  होतं.  त्यापूर्वीची पंचवीस वर्षं ब्लॅक ॲण्ड व्हाईटचा जमाना ज्यानं ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून गाजवला होता, त्या नायकास बघण्याची सुरुवातच आम्ही रंगीत चित्रपटापासून केली होती.  ‘अंदाज’, ‘मधुमती’, ‘मुग़ल-ए-आज़म’, ‘गंगा-जमना’ अशा त्याच्या सुपरहिट सिनेमांच्या चर्चा ज्येष्ठांच्या तोंडून ऐकायला मिळत, पण हृदयातून त्यासाठी प्रतिसाद यावा, असं कारण आमच्याकडे नव्हतं.  नंतर त्याचा ‘ओमप्रकाश’ आणि सायरा बानूबरोबरचा ‘गोपी’ पाहिला.  बालमनावर त्याची ‘सुख के सब साथी, दुख मे ना कोई’ या मोहम्मद रफीच्या आवाजातील नितांत सुंदर राम-भजनात तल्लीन झालेला देवभोळा तरुण किंवा ‘मेरे पैरोमे घुंगरु बंधा दे’ म्हणत नाचणारा साधा-भोळा, हसरा गावकरी तरुण अशी प्रतिमा निर्माण झाली. 

दिलीप कुमार या नावाभोवतीचं वलय मात्र आम्हाला आमच्या आधीच्या पिढ्यांकडून कळू लागलं होतं. आमच्या शाळकरी वयातच बी. आर. चोप्रांच्या ‘दास्तान’नंतर आलेले ‘बैराग’ आणि ‘सगीना’ असे त्याचे सिनेमे पाहण्यात आले. अत्यंत चोखंदळपणे सिनेमा निवडणाऱ्या आणि आपल्या दीर्घ कारकिर्दीत केवळ ६३ सिनेमांत काम करणाऱ्या दिलीप कुमारचे आमच्या वाट्याला सुरुवातीलाच ‘दास्तान’, ‘बैराग’ आणि ‘सगीना’सारखे त्याच्या अस्सल दर्जाशी न जुळणारे सिनेमे यावे, हे आमचं दुर्दैव. 

सन १९७६च्या सुमारास तरुण हिरोच्या रूपातील त्याची थोडी लांबलेली कारकीर्द संपुष्टात आली.  त्याचे सिनेमे १९७६नंतर यायचे बंद झाले. अनेक हिरोंपैकी आपल्या आवडीचा एक अशी त्याच्याविषयी तोपर्यंतची भावना होती. अशात १९७३ साली तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्नाचं राज्य खालसा करणारा अमिताभ बच्चनचा ‘जंजीर’ आला आणि हिंदी चित्रपट आमूलाग्र बदलला. दिलीप कुमार या नावाचा मनावर प्रभाव निर्माण होण्यापूर्वीच आमच्या मनातील हिरो पक्का झाला होता. अमिताभ... निर्विवाद!!  मित्रांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावण्यापर्यंत अमिताभ विरुद्ध राजेश खन्ना अशी खुन्नस चालायची. दिलीप कुमारची थोरवी  आमच्याकरिता इतिहासात जाऊन अभ्यासण्याची गोष्ट होती.  पुढे अमिताभनं ‘नमक हराम’ सिनेमापासून राजेश खन्नाची पूर्णतः वाट लावली आणि पुढची सुमारे वीस वर्षं अमिताभचा हत्ती एकट्यानं डौलात चालत राहिला.  सारांश असा की दिलीप कुमार युग हे आमच्या पिढीसाठी घडून गेलेलं युग होतं. त्या युगाचे प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही नव्हतो. 

सन १९८१ उजाडलं आणि मनोज कुमारच्या ‘क्रांती’ सिनेमात नव्या अवतारातील दिलीप कुमार दिसला. प्रथमच अमिताभच्या भेदक डोळ्यातील अंगाराशी ओळख सांगणारी त्याची करारी नजर दिसून पडली होती,  तरी आम्ही भाव दिला नाही.  नंतरच्याच वर्षी आला रमेश सिप्पींचा ‘शक्ती’.  अमिताभ, दिलीप कुमार, राखी, स्मिता पाटील. ‘न भुतो न भविष्यती’  असा मुकाबला होणार होता.  खूप उत्कंठा निर्माण झाली होती.  आम्ही म्हणायचो, ‘अब दिलीप कुमारकी खैर नही,’ आणि आमच्या आधीच्या पिढीतील ज्येष्ठ दिलीप कुमार-भक्त  अशीच चिंता अमिताभच्या भवितव्याविषयी व्यक्त करायचे.  सलीम-जावेद या लेखकद्वयांनी ‘शक्ती’ची गोळीबंद पटकथा दिलीप कुमारला केंद्रस्थानी ठेवून लिहिली होती. साक्षात दिलीप कुमार पुढ्यात होता, प्रमुख पात्र त्याचं होतं. त्यामुळे अमिताभचे चाहते सिनेमा पाहून झाल्यावर अमिताभच्या नावाचा डंका पिटू शकले नव्हते, तसंच दिलीप कुमारचे दिवानेसुद्धा त्यांच्या हिरोची टिमकी वाजवू शकले नव्हते.  पण दोन्ही बाजूंना कळून चुकलं होतं की हा मुकाबला निर्णायक होऊच शकत नाही.  तेव्हापासून दिलीप कुमारचे चाहते अमिताभला आणि आम्ही दिलीप कुमारला उघडपणे नाही, तरी मनातल्या मानू लागलो होतो.  एक मात्र खरं की अमिताभची लोकप्रियता एव्हरेस्ट शिखराच्या स्तराला पोहोचलेली असताना ‘शक्ती’ सिनेमात अमिताभला तुलनेनं दुय्यम भूमिकेत त्याचे चाहते बघू शकले नव्हते. तीन तास आणि अठरा रिळं केवळ अमिताभच नजरेसमोर असावा अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रेक्षकांना हा धक्का पचवता आला नव्हता आणि म्हणूनच ‘शक्ती’ हा दमदार चित्रपट तिकीट बारीवर मात्र यशस्वी ठरू शकला नव्हता.  

नंतर ‘मशाल’, ‘मजदूर’, ‘दुनिया’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशी दिलीप कुमारची दुसरी इनिंग लांबत गेली आणि त्याचे सिनेमे आम्ही पाहत गेलो.  त्याशिवाय शक्य झालं तसं ‘मुग़ल-ए-आज़म’, ‘गंगा-जमना’, ‘मधुमती’, ‘राम और शाम’... असे त्याचे अनेक जुने सिनेमे पाहण्यात आले, पण अमिताभच्या ‘जंजीर’बरोबर माध्यमिक शाळा सुरू केलेले, ‘दिवार’बरोबर उच्च-माध्यमिक, ‘अमर अकबर अँथनी’बरोबर कनिष्ठ महाविद्यालय आणि ‘मुकद्दर का सिकंदर’बरोबर महाविद्यालयात प्रवेश घेणारे आम्ही अमिताभच्या पलीकडे बघण्याची क्षमता गमावून बसलो होतो. कारण, त्याच्या ‘अँग्री यंग मॅन’नं लागोपाठचे सुवर्ण महोत्सवी सिनेमे देत आम्हाला दुसरा विचार करायची उसंत दिली नव्हती. ‘शोले’समोर आम्हाला ‘मुग़ल-ए-आज़म’ फिका वाटायचा, ‘गंगा-जमना’पेक्षा ‘दिवार’मधील अमिताभच्या ‘उफ्फ, तुम्हारे उसूल तुम्हारे आदर्श’ अशा ज्वालामुखीच्या स्फोटासारख्या संवादफेकीची धग उजवी वाटायची. एकट्या ‘अँथनी’च्या पुढ्यात ‘राम और शाम’ची जादू आमच्या समोर काम करत नव्हती.

थोडक्यात, अमिताभ प्रेमाच्या पूर्वाग्रहापायी आम्ही हातचं राखूनच दिलीप कुमारची तारीफ करत असू, पण अमिताभशिवाय मानण्यासारखा हाच एक आहे, याविषयी मनात शंका नव्हती. अमिताभ विषयीचं प्रेम त्याच्या सन २००० नंतरच्या दुसऱ्या इनिंगमधील ‘खाकी’, ‘बागबान’, ‘देव’, ‘ब्लॅक’, ‘पा’, ’पिंक’, ‘पिकू’, ‘बदला’ आणि २०२० या वर्षीच्या ‘गुलाबो-सिताबो’सारख्या उच्च दर्जाच्या अभिनयाचे मापदंड स्थापित करणाऱ्या भूमिकांमुळे वृद्धिंगत होत राहिलं. नव्वदच्या दशकात आमच्या प्रगल्भतेकडे झुकू लागलेल्या वयापासून दिलीप कुमारच्या संयत अभिनयाचं महत्त्व आमच्या पिढीला कळू लागलं होतं, पण ‘अग्निपथ’सारखा जाळ मधेच उठायचा आणि पुन्हा अमिताभचं गारूड आमच्या मन-मस्तीश्कावर स्वार होत असे. दर्जेदार भूमिका आणि दूरदर्शनवर ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या कार्यक्रमामुळे अमिताभची जनमानसावरील पकड अधिकाधिक घट्ट होत होती त्याचवेळी १९९० नंतर ‘इज्जतदार’, ‘कानून अपना अपना’सारख्या सुमार आणि कडेलोट म्हणजे ‘किला’ नावाच्या ‘ब’ दर्जाच्या चित्रपटातून झळकून दिलीप कुमारने १९९६ साली निवृत्ती घेतली.   

अमिताभनं अनेकवेळा त्याच्या अभिनयावर दिलीप कुमारचा असलेला प्रभाव बोलून दाखवला होता. एका कार्यक्रमात दिलीप कुमार विषयी बोलताना अमिताभनं म्हटले होतं, ‘चित्रपटात स्वतःचं किंवा इतर कुणाचं दृश्य पाहताना मला नेहमी वाटत असतं की हे अमुक एका पद्धतीनं केलं जाऊ शकलं असतं किंवा त्यावर अधिकही पर्याय सुचतात. पण जेव्हा दिलीप कुमारच्या दृश्यांकडे बघावं तेव्हा अशी भावना होतं की यापेक्षा वेगळं किंवा चांगलं होऊ शकलं नसतं.’

दिलीप कुमार वृद्धापकाळानं गेल्याची बातमी आली आणि मनाला अपराधीपणाची टोचणी लागली.  दिलीप कुमारची मनमोकळेपणानं तारीफ न करण्याचा गुन्हा आमच्या पिढीकडून घडला होता खरा.  अमिताभ गारुडापायी आम्ही राजेश खन्नाचासुद्धा थोडा जास्तच दुःस्वास केला होता. दिलीप कुमार या महान कलाकाराला श्रद्धांजली वाहताना एवढंच म्हणतो, की आम्हाला या जगात येण्यास अंमळ उशीरच झाला.  आमचा जन्म एक पिढी आधी झाला असता, तर दिलीपसाब आमचे अमिताभ तुम्हीच राहिला असता यात शंका नाही..!!

संबंधित बातम्या