लेखकांचा संपादक 

हेरंब कुलकर्णी
सोमवार, 8 मार्च 2021

स्मरण  

सदा डुंबरे गेले. माध्यमांची वाटचाल बऱ्याच अंशी वैचारिकतेकडून मनोरंजनाकडे होत असण्याच्या काळात त्यांनी समाजाची वैचारिकता व कलाभान उंचावण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची आठवण आवर्जून येते. एखाद्या संपादकाचे मोठेपण त्याने केलेला व्यासंग, लेखन व सतत नावीन्याचा शोध यात असतेच, परंतु किती नवीन लेखक घडवले, लेखकांना प्रोत्साहन देऊन लिहिते केले, यावरूनही संपादकांचे स्वतंत्र असे मूल्यमापन होत असते, या पार्श्वभूमीवर सदा डुंबरे यांनी माझ्यासारख्या अनेक नवीन लेखकांना नेहमीच प्रोत्साहन दिले ह्याची नोंद घ्यायला हवी. 

डुंबरे यांच्यामुळे ‘साप्ताहिक सकाळ’ मध्ये (आता ‘सकाळ साप्ताहिक’) मला अनेक रिपोर्ताज लिहिता आले. अनेक सामाजिक मुद्दे पुढे नेता आले. माझ्यातील लेखकाला  घडवणारे हे त्यांचे योगदान विसरता येत नाही. २००६ मध्ये आदिवासी भागातील दोनशे शाळांना भेटी देऊन मी त्या शाळांतील गुणवत्तेची भीषण स्थिती  आणि शिक्षणाची दैना यावर ‘ शाळा आहे शिक्षण नाही’ हे पुस्तक लिहले. त्यावेळी त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मात्र डुंबरे यांनी वास्तव पुढे येणे आवश्यक आहे अशा भूमिकेतून मला ‘तू बघितलेलं सगळं वास्तव लिहून काढ,’ असे सांगितले. त्याबरोबरच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे, ‘केवळ प्रश्न न मांडता तज्ज्ञांशी बोलून उपाययोजनाही मांड’. अनेकजणांशी बोलून मी ती कव्हरस्टोरी केली होती.

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या त्यावेळच्या सीईओ प्राजक्ता लवंगारे यांनी एकशे वीस हंगामी वसतिगृहे सुरू केली होती. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी ट्रकमध्ये बसलेली मुले उतरवून घेतली व  सांभाळली.. अतिशय ऐतिहासिक असा तो प्रयोग होता. शालेय वयातल्या हजारो मुलांना आई-वडिलांसोबत न पाठवता गावकरी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेत होते. मी हा विषय सदा डुंबरे व संध्या टाकसाळे यांना सांगितला. अनेक ठिकाणी भेटी देऊन लिहिलेला वृत्तांत त्यांनी छायाचित्रांसह फोटोसह प्रसिद्ध केला. राज्याच्या ग्रामीण भागातील घडणारी घटना त्यांनी राज्यस्तरावर नेली. त्यानंतर अनेक सामाजिक विषय त्यांना सांगायचे व त्यांनी ते प्रसिद्ध करायचे. यातून लेखक म्हणून माझा आत्मविश्वास वाढला.

जिनन  नावाच्या केरळमधल्या एका कलावंताला मी केरळमध्ये भेटलो होतो. त्याच्यासोबत दहा तास घालवले व त्याच्या अफलातून जगण्याविषयी दीर्घ लेख लिहून सदा डुंबरे यांना पाठवला. लेख स्वीकारणे किंवा नाकारणे इतकीच संपादकीय भूमिका अनेक ठिकाणी असते; परंतु सदा डुंबरे यांनी मला फोन करून तू जो विषय निवडला आहेस, तो वेगळा व महत्त्वाचा आहे, परंतु ते व्यक्तिचित्र नीट उमटत नाहीये, असे सांगितले. एवढे सांगून ते थांबले नाही तर त्यांनी शोभा भागवत यांनी लिहिलेल्या अरविंद गुप्ता यांच्या व्यक्तिचित्राची एक प्रत मला वाचायला पाठवली. आणि हे वाचून लिही, असे सांगितले.. मी पुन्हा प्रयत्न केला तरीही ते त्यांच्या पसंतीला उतरले नाही.. तो लेख छापला गेला नाही पण एखादा लेखक घडवण्यासाठी स्वतः त्या लेखकाला एखादा लेख वाचायला पाठवून प्रोत्साहन देणे, तेही माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या  एका अप्रसिद्ध लेखकाला,  यातून लेखक घडवण्याची तळमळ दिसते हे मला विसरता येत नाही.. आपण लेखक म्हणून वाचकांसमोर येतो परंतु त्यामागे अनेक संपादकांची प्रेरणा आणि प्रेम असते, हे आज सदा डुंबरे यांना आठवताना जाणवते.

‘साप्ताहिक सकाळ’ने दिवाळी अंकातून अनेक लेखक पुढे आणले व सर्वात महत्त्वाचे दिवाळी अंकांची परंपरा अधिक गंभीर केली. त्याच प्रमाणे अनेक महत्त्वाचे प्रश्न सविस्तरपणे मांडण्याची, वाचण्याची सवय लेखकांना आणि वाचकांनाही त्यांनी लावली. शब्दसंख्येची भीती काढून तो विषय सविस्तरपणे पोहोचवण्यासाठी रिपोर्ताज शैलीला महत्त्व मिळवून देणे, हे सदा डुंबरे यांचे मराठी साहित्य व सामाजिक प्रश्नांना महत्त्वाचे योगदान आहे. चळवळीचे आणि कार्यकर्त्यांचे पाठीराखे आणि माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या, नव्या लेखकांना प्रोत्साहन देणारे  संपादक म्हणून ते लक्षात राहतील. वाचकांच्या पातळीवर जाऊन मनोरंजनाचा आधार घेत खप वाढवायचा की खपाचा विचार न करता समाजाची जडणघडण करणे महत्त्वाचे मानायचे हा पेच प्रत्येक संपादकासमोर असतो. डुंबरे दुसऱ्या प्रकारचे संपादक होते. समाजाची वैचारिक पातळी उंचावण्यासाठी त्यांनी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले हे विसरता येत नाही. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान सदैव लक्षात राहील.

संबंधित बातम्या