.. एक ‘अक्षरपर्व’ संपले! 

कुमार गोखले 
सोमवार, 13 जुलै 2020

स्मरण 

...अगदी ठणठणीत माणसालाही ‘आपण आजारी आहोत’ असं वाटायला लावणाऱ्या सध्याच्या विचित्र वातावरणात, गर्दी टाळायला आणि विरंगुळा म्हणून शनिवारी मी नेहमीपेक्षा बराच उशिरा टेकडीवर रेंगाळून घरी परत आलो. जेवण करून काहीतरी वाचत पडावं असा विचार सुरू असतानाच दुपारी एकच्या सुमारास, अक्षरचा, म्हणजे कमल शेडगे यांच्या मुलाचा त्याच्या मोबाइलवरून फोन आला. 
एरवी कमलजींच्या घरून फोन आला तर त्यांच्या लँडलाईनवरूनच यायचा. 

पण आज अक्षरचा फोन त्याच्या मोबाईलवरून आल्यानं का कुणास ठाऊक, मनात क्षणभर काहीतरी अशुभ, नको तो विचार चमकून गेला. 

अक्षरच्या ‘बाबा गेले!’ या बोलण्यावरून तो अशुभ विचार दुर्दैवाने खरा ठरला, आणि मी सुन्न होऊन बसून राहिलो. 

‘कमल शेडगे’ नावाचं अक्षरलेखनातलं एक पर्व संपलं होतं. 

कमलजींची तब्येत ठीक नाही, हे माहीत होतं, पण असं अघटित आणि ते ही इतक्या अवचित होईल असं मुळीच वाटलं नव्हतं. ते बरे होऊन पुन्हा नव्यानं काम सुरू करतील, असा आम्हा सगळ्यांनाच विश्वास होता. 

परवाच २२ जूनला त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला फोन केला होता, तेव्हा ते झोपले होते, म्हणून घरच्यांकडं शुभेच्छा पोचवल्या आणि इतर गप्पा मारल्या. दोन तीन दिवसांनी आठवणीनं कमलजींनी स्वत: मला फोन करून माझ्याच तब्येतीची विचारपूस केली, तेव्हा मला अक्षरश: भरून आलं. 

...तशी कमलजींची आणि माझी पहिली समक्ष भेट त्या मानानं खूप उशिरा, म्हणजे पुण्यात बालगंधर्वमधे त्यांचं दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा अक्षरप्रदर्शन झालं होतं तेव्हा झाली. त्या आधी कित्येक वर्षं मी त्यांना मराठी नाटकांच्या अक्षरप्रधान जाहिराती आणि वृत्तपत्रांत, आपल्या वैविध्यपूर्ण मांडणीनं आणि सौंदर्यपूर्ण अक्षरांनी अनेक पुरवण्यांना ‘विशेष’ दर्जा प्राप्त करून देणारे मोठे कलावंत म्हणून लांबून ओळखत होतोच. मी त्यांना अक्षरलेखनातले माझे मानसगुरु मानलं होतं आणि त्यांना आदर्श मानून माझं काम चालू ठेवलं होतं.
पण त्यांची ‘खरी’ ओळख मला या प्रत्यक्ष भेटीत, त्यांच्या शांत, निगर्वी आणि अत्यंत साध्या, काहीशा अबोल व्यक्तिमत्त्वामुळं झाली.. आणि मग आमच्या काही भेटी, अधूनमधून फोन चालू राहिले. 

मीही त्याच व्यवसायात असून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं मला घरच्यासारखं मानलं, हा त्यांचा मोठेपणा. 

गेल्या २२ फेब्रुवारीलाच, हे कोरोना प्रकरण, लॉकडाउन वगैरे भानगडी सुरू व्हायच्या काही दिवस आधी, मी आणि कमर्शियल आर्टिस्ट शरद आपटे कमलगुरुजींची तब्येत ठीक नाही म्हणून त्यांना भेटायला मुलुंडच्या त्यांच्या घरी गेलो होतो. आम्ही मुद्दाम भेटायला आलो म्हटल्यावर, तब्येत बरी नसतानाही अक्षरांचा विषय निघताच, एरवी स्वत:बद्दल विशेष न बोलणारे कमलजी एकूणच अक्षरलेखनाविषयी भरभरून बोलत राहिले. 
त्यांनी नुकतेच केलेले अक्षरलेखनाचे नवीन नमुने आम्हाला पाहायला मिळाले. 

कुठलीही विशेष साधनं, इक्विपमेंट न वापरता साधं ब्लॅक स्केचपेन, काही वेळा तर अक्षरश: बॉलपेन, काळी शाई आणि टच अप साठी वापरलेला व्हाइट पोस्टर कलर एवढ्यानंच साकारलेली लयदार, विलक्षण वळणांची, साध्या ड्रॉइंग पेपरवर केलेली ती अक्षरं पाहताना आमच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले आणि अडीच तीन तास कसे गेले ते आमच्या लक्षातही आलं नाही.
कमलजींच्या सौभाग्यवती शुभदा शेडगे या माउलीनं स्वत:ची तब्येत ठीक नसतानाही आमच्यासाठी गेल्या गेल्या उत्तम शिरा कॉफी देऊन स्वागत केलं आणि नंतर जेवणाची वेळ झाली, म्हणून स्वत: अगत्यानं गरम गरम मालवणी पद्धतीचा स्वयंपाक रांधून आम्हाला डायरेक्ट जेवायलाच बसवलं. 

कामाचा ‘विलक्षण झपाटा’ हे कमलजींचं वैशिष्ट्य होतं. काम चांगलं होण्यासाठी त्यांनी ‘मूडबीड’ची वाट कधीच पाहिली नाही. काम आल्याआल्याच झपाट्यानं त्यांचं विचारचक्र सुरू व्हायचं आणि त्या ओघातच कागदावर त्यांची लयदार अक्षरं उतरू लागत. त्यांना त्यासाठी अमूकच टेबल, अमूक इन्स्टुमेंट्स हवीत असं काही नसायचं. अगदी जमिनीवर बसूनही ते काम करू शकत. आजूबाजूला कितीही गडबड असो, त्यांच्या एकाग्रतेवर कधीच परिणाम होत नसे. त्यांना कुणी मदतनीस, असिस्टंटही कधी लागायचा नाही. काम आणणं, ते उत्तमरीत्या वेळेत पूर्ण करणं आणि ते पोचवणं ही कामं ते स्वत:च करायचे. हे सगळं स्वत: करूनही त्यांनी इतकं प्रचंड काम कसं काय केलं असेल हे आश्चर्यच आहे..! 

किती विविध प्रकारचं काम केलं त्यांनी! 

चित्रकलेतलं कुठलंही औपचारिक शिक्षण नसताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या संस्थेत काम करताना माधुरी, फेमिना, फिल्मफेअर इत्यादी मासिकांचे लेआऊट्स आणि शीर्षकं  
केली. बरं त्या काळी हल्लीसारखी कंप्युटरवर व्हेक्टर अक्षरं करून ताबडतोब हव्या त्या साईझला लहान मोठी करण्याची सोय नसे. ब्रोमाईड्स मारण्याइतकाही वेळ नसे. मग कॉलमविड्थ किंवा ग्रिडमधे बसणारी ‘सेमसाईझ’ अक्षरंच, ती ही झटपट करावी लागत. हे काम किती अवघड असे, हे त्या क्षेत्रात काम केलेला माणूसच समजू शकेल. महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मैफल’सारख्या रविवार पुरवण्या, बालगंधर्वांवरील अंकासारखे विशेषांक हे कमलजींच्या लेआउट्सनी आणि लयदार अक्षरांमुळंही नावाजले गेले. 

मॅजेस्टिक, राजहंस, मेनका, लोकवाङ्‍मय गृह सारख्या अनेक प्रकाशनांसाठीची वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठं त्यांच्या अक्षरांनी सजली. 
अक्षर, किर्लोस्कर, सामना, माहेर, चंदेरी, षट्कार, लोकसत्ता, मार्मिक, किशोर, अमृत, दीपावली, अशा अनेक मासिके/वृत्तपत्रांचे उत्तमोत्तम लोगोज त्यांनी केले. 

अक्षरश: हजारो नाटकांच्या जाहिराती कमलजींनी केल्या. प्रत्येक नाटकाच्या अक्षरलेखनातून त्या नाटकाचा आशय प्रतिबिंबित होत असे. त्यांच्या मते शब्दांची सुयोग्य मांडणी करताना कवी, लेखक यांना जशी कसरत करावी लागते, खरं तर तशीच मेहनत अक्षरलेखन करताना अक्षरकारानंही घ्यायला हवी. 

‘मत्स्यगंधा’ नाटकाची अक्षरं साकारताना अनुस्वाराऐवजी काढलेली मासोळी, ‘पुरुष’ नाटकाचं लेटरिंग करताना वासनेनं वखवखलेल्या पुरुषाचं प्रतीक म्हणून काढलेलं गिधाडाचं चित्र, ‘नागमंडल’ नाटकासाठी केलेली सर्पाकार अक्षरं, ‘धुक्यात हरवली वाट’साठी केलेली आउट ऑफ फोकस अक्षरं, ‘छिन्न’साठी केलेली अक्षरं कापून पुन्हा चिकटवून भंगलेलं मन दाखवणं, ‘महासागर’ नाटकाच्या शीर्षकात नायिकेच्या केसांना दिलेला सागराच्या लाटांचा आकार... अशी शेकडो उदाहरणं रसिकांच्या अजूनही लक्षात असतील. नाटकांबरोबरच शेकडो मराठी आणि हिंदी सिनेमांचीही वैविध्यपूर्ण शीर्षकं कमलजींनी केली आहेत. 

कमलजींची अक्षरं, डिझाईन आणि प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन वाघ यांचे फोटो यांनी सजलेली शेकडो ध्वनिमुद्रिकांची वेष्टणेही (रॅपर्स) अनेकांच्या लक्षात असतील.
त्यांनी ‘लेट्रासेट’मधल्या अनेक रोमन फाँट्सचे अगदी तस्सेच देवनागरी वळणाचे अक्षरनमुनेही तयार केले होते. 

भारतातच नव्हे, तर जगात प्रसिद्ध असलेल्या सर्वाधिक खपाच्या ‘कालनिर्णय’ या प्रसिद्ध दिनदर्शिकेचे कमलजींनी तारखांच्या आकड्यांसहित केलेले डिझाईन तर इतके लोकप्रिय झाले, की त्यावरून अनेकांनी तशाच कॉप्या काढल्या. 
अनेक व्यक्ती, संस्था यांच्यासाठी त्यांनी निमंत्रणपत्रिका, स्मरणिका यांचीही डिझाईन्स केली. 

कमलजींचं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी पदरमोड करून मुंबईत, मुंबईबाहेर अनेक शैक्षणिक संस्था, नाटकांची थिएटर्स इत्यादी ठिकाणी त्यांच्या अक्षरलेखनाच्या विविध शैलींची प्रदर्शनं भरवली. यात फोटो कलरनं रंगवलेल्या मोठ्या ब्रोमाईड्स बोर्डवर चिकटवलेल्या असत. त्या प्रदर्शनाला अनेक मान्यवर, लेखक, नटनट्या, कलावंत, कला शाखेचे विद्यार्थी आणि सामान्य रसिक भेट देऊन प्रदर्शनाचा आनंद घेत. जोडीला स्लाईड शो ही असे. ‘अक्षरंही बोलकी असू शकतात’ हे या प्रदर्शनांच्या निमित्तानं लोकांपर्यंत पोचलं. लोकांना उत्तम अक्षरांची आवड लावण्याचं मोठं काम या प्रदर्शनांमुळे झालं. कमलजींना गावोगावचे अनेक ज्ञात-अज्ञात अक्षरप्रेमी आपले आदर्श आणि मानसगुरू मानू लागले. 

एवढं प्रचंड काम केलेले कमलगुरुजी स्वत:बद्दल फार न बोलता अक्षरसौंदर्याबद्दल मात्र भरभरून बोलत. कमलजींचा ऋजु, निगर्वी, शांत स्वभाव कायम माझ्या लक्षात राहील. आपल्या कलेची आर्थिक किंमत ‘वसूल’ करायला त्यांना त्यांच्या संकोची स्वभावामुळं फारसं जमलं नाही, ते कायम आपल्या कामाच्या आनंदातच तल्लीन राहिले. 
त्यांनी करून ठेवलेल्या प्रचंड कामाच्या मानानं त्यांना मिळायला हवी होती तेवढी प्रसिद्धी, मानसन्मान मात्र दुर्दैवानं मिळू शकले नाहीत असं मला वाटतं. 

याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे कमलजी आपल्या विविध कामांचे नमुने आणि त्याविषयी माहिती देणारी ‘माझी अक्षरगाथा’, ‘चित्राक्षरं’, ‘कमलाक्षरं’ आणि ‘ऐसी अक्षरे’ ही चार पुस्तकं आपल्यामागं ठेवून गेले आहेत. अनेक अक्षरप्रेमींनी ती आपल्या संग्रही ठेवली आहेत. अक्षरांच्या अभ्यासकांना ती एखाद्या दीपस्तंभाप्रमाणं मार्गदर्शन करत आहेत. 
पाचवं, ‘माझी अक्षरगाथा २’ हे पुस्तकही लवकरच तयार होतं आहे. गुरुजींचा कलाकार, डिझायनर मुलगा अक्षर ते काम लवकरच पूर्ण करणार आहे. 

मी कमलजींविषयी, त्यांच्या ‘ऐसी अक्षरे’ पुस्तकाविषयी फेसबुकवर लिहिलं, तेव्हा ते पुस्तक मिळण्यासाठी संपर्क म्हणून माझा फोन नंबर दिला होता, त्यावेळी गावोगावच्या अनेक अक्षरप्रेमींनी पुस्तकासाठी मला फोन केले होते. 
विशेष म्हणजे, त्यांपैकी अनेकांनी गुरुजी गेल्याची बातमी ऐकल्यावर सांत्वनासाठी मला फोन करून दु:ख व्यक्त केलं, मेसेज केले. फेसबुकवर तर श्रद्धांजलीच्या असंख्य पोस्ट्स येत राहिल्या होत्या.

गुरुजींविषयी गावागावांत किती आदर आहे, हेच यातून स्पष्ट होतं. 

वयोमानानुसार आजारपणात दृष्टी साथ देत नसूनही कमलजींचा हात मात्र शेवटपर्यंत स्थिर होता. अगदी जायच्या आदल्या दिवशी त्यांनी अक्षरसाठी नव्या नाटकाचं लेटरिंग करून ठेवलं होतं. असं भाग्य किती कलावंतांच्या वाट्याला येत असेल? 

गेली कित्येक वर्षं गुरुपौर्णिमेला गुरुजींना मी आवर्जून फोन करून नमस्कार करत असे, पण या गुरुपौर्णिमेला मात्र मला हा श्रद्धांजली लेख लिहावा लागला, हे दुर्दैव म्हणायचं नाही तर काय?

संबंधित बातम्या