मेरी अलग पहचान लिख लेना... 

नंदिनी आत्मसिद्ध 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

स्मरण

आँख मे पानी रखो होटों पे चिंगारी रखो 
ज़िन्दा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो 
राह के पत्थर से बढ़ कर कुछ नहीं हैं मंज़िलें 
रास्ते आवाज़ देते हैं सफ़र जारी रखो 

आयुष्य जगताना अशी वृत्ती ठेवली, तर पायाखालची वाट सोपी होऊन जाते. जीवनाचा हा मंत्र देणारे आणि उर्दू भाषा आणि शायरीची परंपरा पुढं नेणारे शायर म्हणून नावलौकिक असलेले राहत इंदौरी अलीकडंच निवर्तले. आपल्या गावाचं नाव स्वतःच्या कविनामात गुंफून त्यांनी इंदूरशी असलेलं नातं अगदी पक्कं करून टाकलं होतं. आपली माती या कवीला नेहमीच जवळची वाटली. राहत यांची काव्यशैली संवादी होती. प्रवाही होती. परंपरेशी नातं सांगूनही नवी वाट चोखाळणारी होती. मुशायऱ्यांमधून शायरी गाऊन सादर करण्याची उर्दूची परंपरा; पण राहत आपली ग़ज़ल तशी सादर न करता आपल्या पद्धतीनं लोकांसमोर पेश करत. पण हे सादरीकरण इतकं प्रभावी असे, की गायलेल्या ग़ज़लप्रमाणं या ग़ज़लाही लोकांना मुखोद्‍गत होऊन जात... पेशानं शिक्षक असलेला हा कवी जनसमूहाशी सहजपणं संवाद साधू शकत असे. 

चालत राहणं, वाटचाल करत राहणं हा माणसाचा धर्म आहे, असा संदेश ते सहजपणे देऊन जात - 
रोज़ तारों को नुमाइश में ख़लल पड़ता है 
चाँद पागल है अँधेरे में निकल पड़ता है 
एक दीवाना मुसाफ़िर है मेरे आँखों में 
वक़्त-बे-वक़्त ठहर जाता है चल पड़ता है 

तसंच स्वतःच्या लोकप्रियतेत वाहून न जाता, वास्तवाचं भान मी नेहमी जपतो, हे सांगताना आणि अस्तित्वाचे धागे उलगडताना ते म्हणून गेले - 
मैं लाख कहूँ कि आकाश हूँ ज़मीन हूँ मैं 
मगर उसे तो ख़बर है कि कुछ नहीं हूँ मैं 
वो ज़र्रे ज़र्रे में मौजूद है मगर मैं भी 
कहीं कहीं हूँ कहीं नहीं हूँ मैं 
वो इक किताब जो मनसूब तेरे नाम से है 
उसी किताब के अंदर कहीँ कहीं हूँ मैं 

इंदूर इथं १९५० मध्ये जन्मलेले राहत क़ुरैशी शायर म्हणून राहत इंदौरी बनले. इंदूर आणि भोपाळमध्ये त्यांच शिक्षण पार पडलं आणि इंदूरच्या कॉलेजातच ते उर्दू भाषेचं अध्यापन करू लागले. उर्दू विषयातच त्यांनी पदवी व पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या प्रबंधाचा विषयच होता, उर्दू साहित्यावरच त्यांनी पीच.डी. केलं होतं - ‘उर्दू में मुशायरा.’ मुशायरा हा तर एरवीही त्यांचा हातखंडा विषय. कॉलेजच्या काळापासून शायरीचा शौक असलेले राहत तरुणपणातच मुशायऱ्यांमधून गाजू लागले होते. नंतर तर ते भारतात सर्वत्र आणि जगातील अनेक देशांमधून मैफली गाजवू लागले. उमेदीच्या काळात त्यांची प्रसिद्ध शायर जाँ निसार अख़्तर यांच्याशी भेट झाली. त्याच्या शुभेच्छा घेऊनच राहत यांनी शायर म्हणून मैफलीच्या मंचावर पाऊल टाकलं. जाँ निसारही मध्य प्रदेशातल्या भोपाळचे. ग़ज़ल सादर करणं ही एक कला आहे. तिला नजाकतीप्रमाणं अंदाज-इशारा यांचीही गरज असते. यात माहीर असलेल्या राहत यांनी मग या क्षेत्रात मागं वळून कधीच पाहिलं नाही... 

राहत यांच्या कवितांमधून मानवी संबंध, त्यात येणारी वळणं आणि पेच यांचा कायम उल्लेख येत राहतो. मग अशा अनुभवांना ते आपल्या मस्तीत भिडतात. सतावणारे प्रश्न समोर ठेवतात - 
दोस्ती जब किसी से की जाए 
दुश्मनों की राय ली जाए 
मौत का ज़हर है फ़ज़ाओं में 
अब कहाँ जाकर सांस ली जाए 

तर कधी, समंजस, पडती भूमिका घेऊन ते समोरच्याला म्हणाले - 
मेरी ख़्वाइश है कि आँगन में न दीवार उठे 
मेरे भाई, मेरे हिस्से की ज़मीन तू रख ले 

तशी तर उर्दू शायरी ही नेहमी नॉस्टाल्जिया किंवा स्मरणरंजनाशी जोडली जाते. कारण शतकांपासून इथं उर्दू शायर आणि त्यांची शायरी रुजलेली आहे. इतक्या वर्षांमध्ये या काव्याची स्मृती, शान आणि असर जराही कमी झालेला नाही. मीर, ग़ालिब, ज़ौक़, इक़बाल, फ़ैज़ किती म्हणून नावं घ्यावीत... नंतरच्याही पिढ्यांतले शेकडो शायर. याशिवाय हिंदी चित्रपटांमुळं हिंदी-उर्दू कविता जनमानसापर्यंत पोचलेली. यातील बऱ्याच कवींना आपली रचना पडद्यावर झळकावी असं वाटणं हेही स्वाभाविकच. अनेक मोठे शायर गीतकार म्हणून कमी-अधिक प्रमाणात यशस्वी ठरले आहेत. काहींनी वर्षानुवर्षं पडद्यासाठी सुंदर आणि समर्पक असं गीतलेखन केलं आहे. राहत यांनीही काही चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मिशन कश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, सर, ख़ुद्दार, बेगमजान, घातक अशा कितीतरी चित्रपटांसाठी राहत यांनी गीतलेखन केलं होतं. 

मात्र या क्षेत्रातली गणितं वेगळी असतात. तिथं पाय रोवून उभं राहणं आणि टिकून राहणं हे साऱ्यांनाच जमत नाही. काहींना ते चांगलं जमतं, तर काहींना गुणवत्ता असूनही टिकू दिलं जात नाही. राहत यांची गाणी वाखाणली गेली, पण ते पडद्यावरील गाण्यांपेक्षा तुडुंब भरलेल्या मैफलींमध्ये विशेष यशस्वी ठरले. यामागं त्यांच्या शब्दांमधली ताकद, हाक आणि आशयाची बुलंदी कारणीभूत होती. तशीच शायरी पेश करण्याची त्यांची अदाही! मैफलीतला शायर म्हणून राहत यांचं अपील थेट आणि जोरदार होतं. त्यांची पुस्तकंही खूप खपत आणि देशोदेशी त्यांना शायरी पेश करण्यासाठी मागणी असे. उर्दू काव्यसंग्रहांबरोबरच राहत यांच्या काव्याचे देवनागरीतील संग्रहही प्रचंड लोकप्रिय ठरले. ‘रुत’, ‘धूप बहुत है’, ‘चाँद पागल है’, ‘मौजूद’, ‘नाराज़’, ‘मेरे बाद’ असे राहत इंदौरी यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. 

ज्यांचं अस्तित्व ठळकपणे जाणवावं अशी काही व्यक्तिमत्त्वं असतात. राहत इंदौरी तसेच होते. शायर म्हणून त्यांची वाटचाल आश्वासक आणि प्रभावी होत राहिली. त्यांची पुस्तकं आणि मुशायरे दोन्ही जसे उजेडात आले, अधिकाधिक रसिकांपर्यंत गेले, तसा त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख उंचावत गेला. आपल्या काव्यशैलीसाठी ते ओळखले जाऊ लागले. त्यांना आपला आवाज सापडत गेला आणि या लोकप्रियतेच्या लाटेवर ते स्वार झाले. यूट्यूबवरही त्यांच्या काव्याचं सादरीकरण मोठ्या प्रमाणावर बघितलं जातं. त्यांची ‘बुलाती है, मगर जानेका नहीं’ ही कविता अशीच प्रचंड लोकप्रिय आहे. ही ग़ज़ल खरं तर फार काही सरस नाही. पण गर्दीला सोबत खेचण्याची राहत यांची सादरीकरणाची शैली जमावाला कसं वेडं करते, याचं ही कविता एक उदाहरण आहे. 

तशी तर लोकप्रियतेच्या काहीसा आहारी गेलेला कवी म्हणूनही काहींनी राहत यांची संभावना केली. तरुण प्रेक्षकांना खेचून घेताना त्यांची कविता कधी कधी शारीरतेकडं झुकते, असाही आरोप झाला. ‘तेरे बदन की लिखावट में हैं उतार चढाव/ मैं तुझको कैसे पढूँगा, मुझे किताब तो दे’ यासारखा शेर मग तरुणाईला चेकाळून टाकणारा कसा ठरला, हे राहत यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं. उर्दू काव्यमैफलींमधून एक माहौल तयार होत जातो आणि मग जोरदार सादरीकरण आणि भावनांना आवाहन करणारं काव्य बाजी मारून नेतं. मंचावर कविता सादर करताना राहत इंदौरी जरा जास्तच नाट्यमयता आणतात, असंही म्हटलं गेलं. राहत यांनी मात्र आपली वाट बदलली नाही. खरं तर ते या साऱ्या वातावरणात अगदी रमले होते... 

मात्र त्यांच्या शैलीतली तरलता आणि वास्तवाला भिडण्याची क्षमता ही त्यांच्या शायरीबरोबर राहिली. केवळ मुशायरे गाजवणारा शायर अशी राहत यांची संभावना करून काट मारण्याइतके ते हलक्या दर्जाचे नक्कीच नव्हते. लोकप्रियता कवीला बरेचदा आपल्या मागून यायला लावते, हे मात्र खरं आहे. राहत यांच्या अनेक कवितांमधून त्यांच्या कलंदर आणि अर्थगर्भ रचनेचा प्रत्यय येतो - 
नदी ने धूप से क्या कह दिया रवानी में 
उजाले पाँव पटकने लगे हैं पानी में 
ये कोई और ही किरदार है तुम्हारी तरह 
तुम्हारा ज़िक़्र नहीं है मेरी कहानी में 

तर कवी असण्यातली व्यवहारी जगातली मजबुरीही त्यांनी बोलून दाखवली आहे - 
मैं सोचता हूँ कोई और कारोबार करूँ 
किताब कौन ख़रीदेगा इस गिरानी में 

मनातली भावना, उठणारे तरंग त्यांच्या शायरीत शब्दबद्ध होतात, तेव्हा त्यांची नजाकत आणखीच वाढते. ही तरलता त्यांच्या कवितेनं मांडली, तिला एक मुलायम साज दिला - 
किसने दस्तक दी दिल पे, ये कौन है 
आप तो अन्दर हैं, बाहर कौन है 

देशातील राजकीय व सामाजिक वातावरण २०१४ नंतर बदलले आणि राहत यांची कविता अधिक टोकदार बनली. देशातल्या निरनिराळ्या आंदोलनांमध्ये त्यांच्या कवितेने एक उद्‍गार म्हणून प्रवेश केला. या कवितेतल्या विद्रोही सुरामध्ये अनेकांना आपल्या मनातील भावनांचं प्रतिबिंब दिसलं. यातून मग गेल्या काही वर्षांमध्ये राहत इंदौरींची कविता निरनिराळ्या आंदोलनांमधून गाजू लागली. राजकीय स्वरूपाच्या चळवळींना आणि प्रतिक्रियांना चालना देणारा शायर म्हणून राहत इंदौरी यांच्या कविता अलीकडं गाजत होत्या. दिवसच असे आहेत, की समूहाला आकर्षित करणारं काव्य चटकन उचललं जातं. त्यामुळं राहत इंदौरी यांच्या कवितांमधील अन्यायाविरुद्धचा आक्रोश, धर्मावरून संपूर्ण समाजाला बाद ठरवण्याची प्रवृत्ती आणि भेदभावाबाबतचे तीव्र तिखट उद्‍गार सामान्यजनांनी आणि काही राजकीय चळवळींनीही उचलून धरले. त्यांच्या आविष्कारात थेटपणा होता, आवेश होता आणि लोकांच्या बोलाचालीच्या भाषेचा ते सहज वापर शायरीत करत. त्यामुळं या कवितेचा परिणाम विशेष तीव्र होत असे. उगाच नाही त्यांच्या कविता अलीकडच्या काही आंदोलनांमधून वापरल्या गेल्या. त्यांच्या कवितांच्या ओळी सीएए आणि नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरुद्धच्या लढ्यात सातत्यानं उच्चारल्या गेल्या. या कविता त्यांनी काही चळवळीसाठी लिहिल्या नव्हत्या. तर त्यांना आलेले अनुभव त्यांना या ओळींपर्यंत घेऊन आले होते. एक दिवस कुणीतरी त्यांना उद्देशून ‘जिहादी’ हा शब्द वापरला. तो ऐकल्यावर राहत अस्वस्थ झाले. रात्रभर त्यांना झोप आली नाही. आपण जिहादी कसे काय, ही टोचणी त्यांना लागून राहिली. यातूनच त्यांना ओळी सुचल्या - 
मैं जब मर जाऊँ तो मेरी अलग पहचान लिख लेना। 
लहू से मेरी पेशानी पे हिंदुस्तान लिख देना।

हा त्यांचा शेर आणि ‘किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ेही है’ या त्यांच्या काव्यपंक्ती आंदोलनांचा आवाज बनून गेल्या... 

राहत इंदौरींचा शायरी पेश करण्याचा थाटही खास होता. उर्दूच्या क्षेत्रात मुशायरे गाजवणारे शायर विशेष लोकप्रिय होतात. बशीर बद्र हेही राहत यांच्यासारखे मैफली गाजवणारे शायर होते. अर्थात केवळ हाच गुण पुरेसा नसतो. तुमच्या शब्दांमध्येही एक ताकद लागते, भावनांना स्पर्श करण्याची वृत्ती लागते. राहत यांच्या काव्यातलं आत्मभान, उत्कटता आणि मनातला अंगार हा अस्सल होता. पण राहत यांची एकूण कविता काही एवढ्यापुरतीच सीमित नव्हती. तिच्यातली नजाकत, निसर्गाच्या आविष्कारांना शब्दांमध्ये गुंफून सादर करण्याची रीत तसंच जाणिवांच्या पातळीवर जपली जाणारी कोवळीक हे सारंच अप्रतिम होतं. शब्दांची ताकद आणि प्रभाव या कवितेला समर्थ अर्थ व आशय बहाल करत. राहत इंदौरी यांना यापुढंही नक्कीच लोक आठवत राहतील...

संबंधित बातम्या