शुद्ध स्वरांचा अधिपती 

पं. संजीव अभ्यंकर 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

ज्येष्ठ शास्त्रीय गायक, पद्मविभूषण, पंडित जसराज यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्याकडं दहा वर्षं राहून गुरुकुल पद्धतीनं शिक्षण घेतलेल्या पंडित संजीव अभ्यंकर यांनी गुरुजींबद्दलच्या आठवणींना दिलेला उजळा... 

पं. जसराज यांच्याकडं शिकायला जायचं ठरल्यावर तिथपासून ते आजपर्यंतचा सारा काळ माझ्या लख्ख स्मरणात आहे. गुरुजींनी मला शिकवायला सुरुवात केली, तो दिवस म्हणजे ५ जानेवारी १९८४. खरंतर तारखा आणि कुठल्या मैफिलीत आपण काय गायलो, हे माझ्या लक्षात राहात नाही; पण गुरुजींकडं गायन कधी सुरू केलं, हे मला लक्षात ठेवावं लागत नाही. मला आजही आठवतं, मी त्यांच्याकडं बुधवारी गेलो होतो. कलाकाराचा एक मूड असतो. त्या दिवशी गुरुजी मला म्हणाले, ‘संजीव, आपण गुरुवारपासून तुझ्या शिक्षणाला सुरुवात करू,’ आणि आमचं शिक्षण तसं गुरुवारपासून चालू झालं. 

गुरुजींनी स्पून फीडिंग पद्धतीनं कुणाला शिकवलं नाही. गुरुजी एखादी गोष्ट दाखवून द्यायचे, तशी करायला सांगायचे. एखादी गोष्ट चुकली, म्हणजे तान घेताना किंवा एखादी जागा घेताना त्यांच्या पद्धतीनं ती आली नसेल, तर ती चूक दाखवून द्यायचे, ती जागा कशी घ्यायची हे सांगायचे. एक-दोनदा ते सांगत असत, समोरच्या शिष्याला जर ते कळलं नाही, तर ते पुढं जात असत. गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये अत्यंत सहजता होती; मात्र त्यांना आपल्याकडं येणाऱ्या प्रत्येक शिष्याच्या क्षमतेचा अत्यंत नेमका अंदाज होता. कोण किती शिकू शकतं, कोणाकडून किती अपेक्षा ठेवायची, याबद्दल त्यांचं गणित अगदी पक्कं होतं. 

गुरुजींकडं शिकायला जाण्याआधीच स्वतंत्रपणे माझ्या मैफिली सुरू झाल्या होत्या. आत्मस्तुती म्हणून नव्हे; पण दिवंगत विनोदी लेखक आणि संगीताचे जाणकार पु. ल. देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पं. वसंतराव देशपांडे माझ्या एका मैफिलीला आले होते, त्यांनी माझ्या गायकीला पसंती दिली होती. त्यानंतर संगीतात करिअर करायचं हा निर्णय घ्यायची वेळ आली, तेव्हा माझ्या आई-वडिलांचा असा आग्रह होता, की पं. जसराज यांनी शिकवायची तयारी दर्शवली, तर त्यांच्याकडंच शिकायला पाठवायचं. माझी आई पं. जसराज यांची शिष्या. माझं गाण्याचं पुढचं शिक्षण त्यांच्याकडंच व्हावं, असं आईला वाटत होतं. त्यामागचं कारण म्हणजे, पं. जसराज यांचा सांगीतिक स्वभाव आणि माझा स्वभाव मिळताजुळता आहे असं आईचं सांगणं होतं. हा आईचा अभ्यास होता. व्यक्तिगत स्वभाव आणि सांगीतिक स्वभाव हे वेगवेगळे असतात, हे आईचं मत होतं. पं. जसराज यांनी जेव्हा आईला विचारलं, की तुम्ही संजीवला माझ्याचकडं शिकण्याचा आग्रह का धरत आहात? त्यांनी अन्य दोन दिग्गजांची नावं घेऊन त्यांच्याकडं का पाठवत नाही, असं विचारलं. आईनं त्या वेळी त्यांनाही हेच उत्तर दिलं होतं. पंडितजींकडं शिकायला येणारे शिष्य किमान काही पात्रता असणारेच असायचे. अगदी प्राथमिक पातळीपासून त्यांच्याकडं विद्यार्थी येत नसत. मी आणि श्वेता असे दोघेजण त्यांच्याकडं शिकत होतो. त्यांच्याकडचा शिकतानाचा काळ मला आठवतो. तो म्हणजे किती शिकू आणि किती नको, असा माझा त्या वेळचा पवित्रा होता. गुरुजींकडनं आपल्याला जास्तीत जास्त कसं शिकता येईल आणि त्यासाठी वेळही कमी कसा लागेल, याकडं माझा कटाक्ष होता. नववीत असताना मी गुरुजींकडं शिकायला गेलो. गुरुजी तेव्हा ५३ वर्षांचे होते. त्यांच्या कारकिर्दीचा तो सुवर्णाध्याय सुरू होता. दुसरा कुठलाही विचार न करता मी केवळ त्यांच्याकडं अत्यंत लक्ष देऊन संगीत शिकत होतो. 

मला आठवतंय, एकदा गुरुजींनी श्वेताला शिकवलेला एक राग मी त्यांना नंतर गाऊन दाखवला, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं होतं. ते मला म्हणाले, ‘मी तर तुला हे शिकवलं नव्हतं?’ मी त्यांना सांगितलं, ‘तुम्ही श्वेताला शिकवत असताना मी ते ऐकून शिकलो.’ अर्थात, त्यांच्याकडं वावरत असताना टीपकागदासारखं जितकं म्हणून शिकता येईल, ते मी त्यांच्याकडून शिकत होतो. अनेक जण मी गुरुजींचा सर्वांत लाडका शिष्य असं म्हणत. खरंतर असं म्हणणं हा गुरुजींवर अन्याय ठरेल. ते त्यांच्या कुठल्याच शिष्यांमध्ये भेदभाव करत नसत. प्रत्येकाला ते सगळं सारखंच शिक्षण देत असत. त्यांच्या माझ्याकडून असणाऱ्या अपेक्षा जास्त होत्या, असं मी म्हणेन. तू हे करू शकतोस, असं ते अनेक वेळा मला म्हणत. 

आज मागं वळून बघताना मला असं सांगावंसं वाटतं, की आमच्यामधला तो शुद्ध संवाद होता. गुरुजी शुद्ध स्वरांचे अधिपती होते आणि सकारात्मक बाबींचे ते पुरस्कर्ते होते असं नाही, तर त्यांच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मकताच होती. एखाद्या मैफिलीला किंवा अन्य कोणाच्या गायनानंतर, आम्ही शिष्य त्या व्यक्तीच्या गायनातील त्रुटींबद्दल चर्चा करत असू. कधी गुरुजींच्या जवळ त्यांचं यावर काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना आमचं मत सांगून काही विचारलं, तर गुरुजी तो मुद्दा टाळून आम्हाला सांगत, ‘ते सोडा. त्यानं ही जागा किती छान घेतली, त्याची ही गोष्ट किती छान आहे.’ गुरुजींनी त्यांच्या कारकिर्दीत कधीही दुसऱ्याच्या गाण्याची समीक्षा केली नाही. 

मी त्यांच्याकडं शिकत असताना त्यांनी मला अनौपचारिक पद्धतीनं शिकवलं. त्यांच्याकडं शिकायला लागल्यावर एक वर्षानं पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी मला त्यांच्या साथीनं गाण्याची संधी दिली. त्यांना स्वरसाथ करताना अनेक वेळा त्यांच्या पसंतीची पावती मला मिळाली. एकदा देस रागात गायलेला स्वर त्यांना इतका आवडला, की  
त्यांनी माझी खूप स्तुती केली, मनापासून दाद दिली. किती छान, शुद्ध स्वर लागला आहे, असं ते मला म्हणाले. माझ्यासाठी ही खूप मोठी पावती होती. गुरुजी पुढं अनेक वेळा म्हणायचे, ‘संजीव जेव्हा बरोबर असतो, तेव्हा खूप सावध राहावं लागतं. माझ्या शिष्यांमध्ये मी शिकवलेल्यांपैकी काही जण साठ टक्के ग्रहण करतात, काही जण ८० टक्के ग्रहण करतात; मात्र संजीव असा मुलगा आहे, जो माझ्याकडून शिकतोच; पण त्यात ४० टक्के ॲड करतो.’ माझ्यासाठी ही पावती होती. 

गुरुजींचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या स्वभावातली सकारात्मकता आणि स्वतःवर, म्हणजे जिभेवर असलेला त्यांचा कंट्रोल. त्यांच्याइतकं फिरणं, मैफिलीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं क्वचितच कुणाचं असेल; पण या प्रत्येक ठिकाणी घरचं जेवण कसं घेता येईल, याकडं त्यांचा कटाक्ष होता. त्यांचे अनेक चाहते त्यांच्यासाठी घरून डबा घेऊन येत असत. कुठलंही व्यसन नाही, आपल्या कामावर प्रचंड निष्ठा, यामुळं गुरुजी सर्वाधिक काळ मैफील करू शकले. आपल्या वयोमानानुसार आपण कुठले राग कसे सादर केले पाहिजेत, याबद्दलचं त्यांचं व्यवस्थापन अत्यंत चोख होतं. साध्या श्रोत्याला हे कळणार नाही, पण सातत्यानं त्यांच्या मैफिली ऐकणाऱ्या जाणकार रसिकालासुद्धा ते क्वचित जाणवलं असेल; पण १० वर्षं मी त्यांच्याबरोबर राहिल्यानं, तसंच ४०० मैफिली त्यांच्याबरोबर केल्यानं आपल्या गायनशैलीत गुरुजींनी कसे मोहक बदल केले, याचा मी साक्षीदार आहे. गुरुजींची स्वरांवरची हुकमत आणि राग सादर करायची खास पद्धत ही विलक्षण होती. कुठल्याही रागात त्यांचे स्वर अत्यंत श्रवणीय लागले. शुद्ध, कोमल स्वरांपेक्षा तीव्र स्वरपण ते अत्यंत श्रवणीय पद्धतीनं सादर करत. ज्या पद्धतीनं ते सादर करत, त्यानं श्रोते मंत्रमुग्धच होत असत. त्यांच्या गायनात रोमँटिसिझम आणि भक्ती यांचा संगम होता. अत्यंत नक्षीदार, म्हणजे खूप मेहनत घेऊन त्यांनी सादर केलेला राग रसिकांना त्या वेळी जरी तो साधा वाटला, तरी तो साधा नसे, त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत असे. भौतिक आणि पारलौकिक अशा दोन्ही गोष्टींचा समावेश त्यांच्या गायनात होता. मूल्यप्रधान असं त्यांचं गायन होतं. उच्च दर्जाची मधुराभक्ती त्यांच्या गाण्यात होती.

संबंधित बातम्या