वारसा ‘मिरासदारी’चा

प्रसाद मिरासदार
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

स्मरण  

कोणताही उपदेश न करता विद्यार्थ्यांच्या अंतःप्रेरणांना प्रोत्साहन देऊन कसे घडवायचे, याचा द.मा. मिरासदार हे शिक्षक म्हणून आदर्श वस्तुपाठ होते. 

प्रख्यात साहित्यिक आणि कथाकथनकार प्रा. द. मा.मिरासदार म्हणजे माझे मोठे काका. घरात आदराने सारे त्यांना दादा म्हणत. महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात ‘पु.ल.’, ‘गो.नी’, ‘गदिमा’ तसे दादाकाका ‘द.मा.’ या लघुनावाने प्रसिद्ध होते. पण त्यांना कुणाचा फोन आला की ते फोन घेतानाच “मिरासदार” असे आडनाव उच्चारत ते स्वतःला संबोधत असत. त्यांनी आपल्या कथासंग्रहाचे नावही ‘मिरासदारी’ ठेवले होते. ग्रामीण भागातील माणसांच्या इरसाल वागण्याच्या कुणालाही न दुखावणाऱ्या, नर्म विनोदी कथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या आणि स्वतःची अशी एक वेगळी वाट मराठी साहित्य दालनात तयार केली. एका अर्थाने ग्रामीण विनोदी मराठी साहित्यात स्वतःची मिरासदारी प्रस्थापित करून त्यांची या क्षेत्रातील वाटचाल चालू झाली.

दर दिवाळीत आम्ही सारे मिरासदार कुटुंबीय जेव्हा पंढरपूरला एकत्र जमायचे तेव्हा दादा दिवाळी अंकात छापून आलेली कथा आम्हाला वाचून दाखवायचे, त्यामुळे लहानपणापासून माझ्या मनात त्यांची लेखक म्हणून असणारी प्रतिमा रुजली आहे. अकलूज सारख्या छोट्या गावातून पुण्यात रहायला आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा एका मोठ्या ग्रंथालयात त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे वाचकांना आकर्षित करण्यासाठी सूचना फलकावर लावलेली पाहिली तेव्हा त्यावरचे ‘द.मा.मिरासदार’ हे नाव वाचून झालेला आनंद आणि ते आपले काका आहेत याचा पहिल्यांदा अभिमान वाटला. पुढे आम्ही सारे मिरासदार कुटुंबीय ‘गुरूकिल्ली’ चित्रपट पाहायला गेलो असताना पडद्यावर द.मा.मिरासदार हे नाव वाचल्यावर वाटलेला अभिमानही आठवतो. या छोट्या प्रसंगातून ‘द.मां.’चे लेखक म्हणून असणारे मोठेपण आणि त्यांचे आपल्याशी असणारे नाते मनात रुजत गेले. 

सातवीत असताना मला वाचनाची गोडी लागली. त्यावेळी मे महिन्याच्या सुट्टीत मी त्यांची सगळी पुस्तके अधाशासारखी वाचून काढली होती आणि त्यावेळी आलेले हसू आणि झालेला आनंद आजही आठवतो. पुढे त्यांच्या कथांनी हा आनंद वारंवार दिला. त्यांच्या कथा वाचत असताना अकलूज, पंढरपूरचा परिसर डोळ्यासमोर उभा राहायचा पण त्यांच्या कथाकथनाचा अनुभव घेताना हा परिसर आणि त्यातील पात्रे मनात जिवंत उभी राहायची. द.मा.मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांनी कथाकथन हा कलाप्रकार महाराष्ट्रात रुजवला आणि गावोगावी जाऊन हजारो कार्यक्रम करून तो लोकप्रियही केला. माडगूळकर आणि पाटील यांच्या निधनानंतरही त्यांनी एकट्याने शेकडो कार्यक्रम केले. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि परदेशातही त्यांचे कार्यक्रम झाले. 

त्यांना गोष्टी सांगायला मनापासून आवडायचे. घरात कुटुंबातील मुलांना जसे ते गोष्ट सांगण्यात रमून जायचे तितक्याच तन्मयतेने ते हजारो श्रोत्यांच्या समोरही गोष्ट सांगताना रंगून जायचे. गोष्ट सांगण्याची ही त्यांची अंतःप्रेरणा शेवटपर्यंत टिकून होती. अगदी वयाच्या नव्वदीतही ते तितक्याच उत्साहाने गोष्टी सांगायचे. 

दहावी झाल्यानंतर मी गरवारे वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथे मराठीचे प्राध्यापक म्हणून ‘द.मा.’च शिकवायला होते त्यामुळे विद्यार्थी म्हणूनही त्यांचा खूप सहवास लाभला. मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक इतका मोठा होता की आमच्या वर्गात बाहेरच्या कॉलेजचे विद्यार्थीही केवळ त्यांचे शिकवणे ऐकण्यासाठी येऊन बसायचे. अनेक विद्यार्थी कला किंवा शास्त्र शाखेतील असायचे पण केवळ ‘द.मां’ना शिकवताना ऐकण्याचा आनंद घेण्यासाठी वर्गात गर्दी करायचे. त्यांचा वर्ग म्हणजे आनंदाची पर्वणी असायची मराठीतला कोणताही धडा ते त्या लेखकाचे अनेक किस्से आणि संदर्भ सांगत इतका रंगवून शिकवायचे की सतत हास्याचे फवारे उडणारा हा वर्ग कधी संपूच नये असे वाटायचे. या त्यांच्या विनोदी शैलीमुळे त्यांचे शिकवणेही जसेच्या तसे लक्षात रहायचे. शिक्षक म्हणून मनोरंजनाचीही ही ताकद त्यांना पूर्ण माहिती होती. त्यांच्या कथा साहित्यातूनही त्यांनी मनोरंजनातून कलेची मूल्ये जोपासत अनेक अभिजात साहित्यकृती घडविल्या आहेत.  

गरवारे महाविद्यालयात त्यांच्या सहवासात शिकत असताना आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संस्कृती मंडळ चालवत असू. त्यांच्यामुळे अनेक मोठे साहित्यिक आम्हा विद्यार्थ्यांशी बोलायला येत. ‘द.मां’च्या प्रभावामुळे मी आणि माझा मित्र माधव गोखले गरवारे महाविद्यालयातर्फे अनेक कथाकथन स्पर्धांतून भाग घेऊन पारितोषिके मिळवत असू. अनेकदा त्यांच्याच कथा आम्ही सांगत असू. बऱ्याचदा गणेशोत्सवात सोसायट्यांच्या गणेश मंडळात जाऊन कथाकथनाचे कार्यक्रम करणे हा आमचा आवडता छंद होता. या सर्वावर त्यांच्या कथाकथनाच्या शैलीचा प्रभाव नक्कीच असला पाहिजे. 

महाविद्यालयात आम्ही ‘परिचय’ नावाची सांस्कृतिक संस्था स्थापन केली होती आणि त्यामार्फत ‘युवोन्मेष’ नावाचा युवा कलामहोत्सव आम्ही मित्रमंडळी आयोजित करायचो. या सर्व उपक्रमांत द.मा.मिरासदार हे नाव प्रेरणास्थान म्हणून असायचेच. प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून हजर रहायचे. आम्हाला लागेल तिथे मदत करायचे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाविद्यालयीन जीवनात अनेक सांस्कृतिक उपक्रम आम्ही करू शकलो. कोणताही उपदेश न करता विद्यार्थ्यांच्या अंतःप्रेरणांना प्रोत्साहन देऊन कसे घडवायचे याचा शिक्षक म्हणून तो आदर्श वस्तुपाठ होता. हे ते केवळ माझ्याशी असणाऱ्या नात्यामुळे करत नव्हते तर त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्याबाबत त्यांनी अशा प्रकारे मार्गदर्शक म्हणून काम केले होते. नंतरच्या काळात अनेक नामवंत कार्यकर्त्यांनी त्यांचे किस्से सांगितल्यावर हे मला उमगले. आजही अनेकजण आदर्श शिक्षक म्हणून त्यांचे नाव घेतात ते याच कारणामुळे. 

कथाकथनाप्रमाणेच त्यांची ‘विनोदाचे आख्यान’ ही व्याख्यानमाला लोकप्रिय होती. मराठी विनोदी साहित्यिकांची ओळख करून देणारी ही व्याख्यानमाला ऐकणे म्हणजे आनंदाची एक पर्वणी असे. ते ऐंशी वर्षांचे झाले तेव्हा गरवारे महाविद्यालयातच त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन आम्ही केले. या व्याख्यानमालेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याच निमित्ताने त्यांच्यावरचा ‘मिरासदारी’ हा लघुपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली. या निमित्ताने आम्ही सगळे त्यांच्या जन्मगावी म्हणजे अकलूजला गेलो. तिथल्या मिरासदार वाड्यात त्यांनी आपले जन्मस्थळ दाखवले आणि दत्ताराम हे नाव त्यांना कसे दिले याचा किस्साही सांगितला. त्यानंतर पंढरपूरला गेलेले त्यांचे बालपण, तिथले किस्से प्रत्यक्ष त्या स्थळी जाऊन त्यांनी सांगितले. या लघुपटातील एक दृश्य खूप स्मरणीय झाले आहे. लहानपणी वाचनाच्या छंदामुळे पंढरपूर नगर वाचनालयात आपण कसे अडकले होतो याचा किस्सा ते स्वतः सांगत आहेत आणि त्याचवेळी प्रत्यक्ष दृश्य स्वरूपातही त्याच ठिकाणी ते दृश्य अभिनित पण होते आहे.

त्यांच्या जीवनातील हा प्रसंग त्यांच्या आयुष्याला वळण देणारा आहे. कारण या वाचनाच्या छंदातूनच ते लेखक म्हणून घडले. फार थोडी माणसे लहानपणी जे स्वप्न पाहतात ते मोठेपणी प्रत्यक्ष साकारतात. पण द.मां.ना लहानपणापासून लेखकच व्हायचे होते आणि ते तसे झाले एवढेच नव्हे तर साहित्यिक म्हणून मोठा नावलौकिकही मिळवला. त्यामुळेच वयाची नव्वदी पार करताना जीवनाच्या शेवटी ते अतिशय समाधानी आणि आनंदी होते. 

शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची विनोदबुद्धी तल्लख होती. कॉफी हे त्यांना अतिशय आवडते पेय. अंथरुणावर खिळल्यानंतर त्यांना फक्त कॉफी हवी असायची. कॉफीचा कप हातात दिला की ते हसून श्लोक म्हणायचे, ‘सदासर्वदा योग तुझा घडावा... आणखी काय मागणार.... ?’

जीवनाकडून स्वतःसाठी फारशा मागण्या न करता सतत आनंदी, उत्साही आणि चैतन्यशील राहून इतरांच्या जीवनात आपल्या कथांनी, व्याख्यानांनी, कथा कथनाच्या कार्यक्रमांनी आणि चित्रपटांनी आनंदाची पखरण करणाऱ्या दादांकडून त्यांच्या ‘मिरासदारी’चा वारसा सर्वांनाच लाभो हे मागणेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

संबंधित बातम्या