हसता हसविता शंभर वर्षे

शकुंतला फडणीस
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

स्मरण

आपल्या रेषा आणि मार्मिक टिप्पण्यांमुळे मराठी भाषेतील नामवंत साप्ताहिके-मासिकांच्या वाचकांच्या कित्येक पिढ्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवणारे व्यंग्यचित्रकार हरिश्चंद्र लचके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने... 

काळ :  एकोणीसशे बत्तीस-चौतीस 
स्थळ:  भूम-कुर्डुवाडी परिसर  
पात्रे : दहा-बारा वर्षांचा एक मुलगा आणि भोवताली असंख्य चित्रे. विशेषतः व्यंग्यचित्रे.
  
तो मुलगा तासन् तास त्या चित्रांमध्ये हरवून जायचा. त्याकाळी आपल्या देशात खूपशा वस्तू परदेशातूनच यायच्या. अगदी किराणा दुकानदारांना लागणारी रद्दीसुध्दा! सुंदर रंगी-बेरंगी चित्रे अशा रद्दीतून सहजच मिळायची. पण फुलपाखरांची किंवा नटनट्यांची चित्रे जमविण्याच्या त्या वयात त्याला व्यंग्यचित्रांनी मोहिनी घातली. तो तासन् तास ती चित्रे बघत राहायचा. तशी चित्रे काढायचा प्रयत्न करायचा. आपलीही चित्रे कधी छापून येतील का, असे मनाशी म्हणायचा. एके दिवशी स्वतःच्या कल्पनेने त्याने एक चित्र काढले आणि चक्क ते ‘किर्लोस्कर’ मासिकाला पाठवून दिले. आश्चर्य म्हणजे अवघ्या तेरा वर्षाच्या त्या मुलाचे चित्र ‘किर्लोस्कर’ सारख्या मासिकात छापूनसुद्धा आले! त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

त्या मुलाचे नाव हरिश्चंद्र लचके. केवळ चित्र छापून ‘किर्लोस्कर’चे संपादक ‘शंवाकि’ (शं. वा. किर्लोस्कर) थांबले नाहीत. त्यांनी त्या मुलाला सतत प्रोत्साहन दिले. या नंतर ‘हंस -मोहिनी’शी लचके यांचा संबंध जुळून आला. त्या मासिकांचे संपादक अनंत अंतरकर व्यंग्यचित्रकरांच्या स्पर्धा घेत असत. अशा स्पर्धेत लचके यांनी सहज भाग घेतला आणि एकदम पहिले बक्षीस पटकावले. तो महायुद्धोत्तर टंचाईचा काळ होता. कापड टंचाईची तीव्रता दाखवणारे त्‍यांचे चित्र त्यावेळी चांगलेच गाजले होते.

हरिश्चंद्र लचके यांची व्यंग्यचित्रे कौटुंबिक विषयांवरती असत. ती तत्कालीन मासिकांमधून प्रकाशित व्हायची. साहजिकच ती खूप वाचकांपर्यंत पोचायची.  मराठी माणसांना व्यंग्यचित्रांची आवड लागली याचे बरेचसे श्रेय लचके यांना द्यायला पाहिजे. केवळ लोकप्रियतेवर न थांबता ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये पुरम मास्तरांकडे त्यांनी चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घ्यायला सुरुवात केली, आणि १९४३मध्ये सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी जी.डी. आर्ट (पेंटिंग) परीक्षेत उत्तम यश मिळवले. चांगला व्यंग्यचित्रकार प्रथम चांगला चित्रकार असावा लागतो, हे लचके यांना मनोमन पटले होते. त्यामुळे त्यांनी चित्रकलेच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले.

कुर्डुवाडी जवळच्या भूम गावी १८ फेब्रुवारी १९२१ रोजी हरिश्चंद्र लचके यांचा जन्म झाला. खेडेगावातल्या साध्यासुध्या वातावरणातच त्यांचे बालपण गेले. वडील लहानपणीच वारले. आईने मोठ्या कष्टाने मुलांना वाढवले. लचक्यांच्या घराजवळ एक किराणामालाचे दुकान होते. तिथे छोटा हरि जाऊन बसायचा आणि तिथल्या रद्दीतून चांगली आकर्षक चित्रे मिळवायचा. घरात चित्रकलेचे वातावरण वगैरे काही नव्हते. पण स्वतःच्या हिंमतीवर आणि जिद्दीने त्यांनी चित्रकला चालू ठेवली. 

लचके यांनी राजकीय व्यंगचित्रेही काढली. त्या चित्रांवर ब्रिटिश व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांच्या चित्रांचा प्रभाव दिसून येतो. त्यांचे एक राजकीय व्यंग्यचित्र टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर छापून आले होते. An Atomic Egg Has Hatched असा त्याचा मथळा होता. अणुबॉम्बच्या स्फोटानंतर जपान शरण आला या १९४५ सालच्या घटनेवर हे चित्र आधारलेले होते. त्या काळात, टाइम्समध्ये एका हिंदी युवकाने काढलेल्या एका व्यंगचित्राला एवढे महत्त्वाचे स्थान मिळाले ही नक्कीच एक विशेष घटना होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र त्यांनी केवळ सामाजिक विषयांवरच कुंचला चालवला. त्यांनी आजवर काढलेल्या हास्यचित्रांची संख्या दहा हजारांहून अधिक भरेल!

हरिश्चंद्र लचके यांची चित्रे बऱ्याचदा संवादावर आधारित असतात. परंतु ते संवाद अतिशय मार्मिक आणि चपखल असतात. अर्थात केवळ चित्रावर आधारित अशीही व्यंगचित्रे त्यांनी काढली आहेत. उदाहरणार्थ, पुलाचे उद््घाटन हे चित्र. उद््घाटनाची फीत कापल्यानंतर दोन टोकाचे दोन मान्यवर एकदम खाली पाण्यात पडतात. त्यांच्या ‘आत्महत्या’ या चित्रात जीवन-मरणाची विलक्षण विसंगती आहे. रॉकेल टंचाईवरचे त्यांचे चित्र अक्षरश: भेदक आणि विदारक आहे. मृतदेहाच्या दहनाकरिता प्रत्यक्ष मृतदेह घेऊनच माणसांनी रॉकेलच्या दुकानापुढे रांग लावली आहे!

व्यंग्यचित्र म्हणजे क्षणभर सुखावणारी माफकशी करमणूक अशा गैरसमजाला या चित्राने छेद दिला आहे.  

भूम-कुर्डुवाडीसारख्या भागात, चित्रकलेची कसलीही पार्श्वभूमी नसलेल्या गरीब कुटुंबात लचके यांचे बालपण गेले. पण त्यांनी हास्यचित्रकलेत आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान मिळवले ते केवळ स्वतः:च्या जिद्दीवर. त्यासाठी अफाट परिश्रम घेतले. एकेकदा दिवसाकाठी शंभर-दीडशे स्केचेस केलेली आहेत. आपल्याला अधिक शिकता यावे म्हणून कुर्डुवाडीहून ते पुण्याला आले. पुण्याहून मुंबईला गेले. वेगवेगळ्या नोकऱ्या आणि व्यवसाय करून त्यांनी या क्षेत्रात विविध अनुभव मिळवले. आपल्या व्यंग्यचित्रांचे संग्रहदेखील काढले. त्यांची ‘हसा आणि लठ्ठ व्हा’, ‘हसा आणि हसवा’, ‘गुदगुल्या’ आदी पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यांचा छपाईसाठी लागणाऱ्या ब्लॉकमेकिंगचा व्यवसाय होता. ते उत्तम फोटोग्राफी करायचे. सकाळी बागकामात गढलेले असायचे आणि दुपारी घरातील बंद पडलेल्या, मोडलेल्या वस्तूंची दुरुस्ती करायचे. ते आपल्या जीवनात तृप्त आणि समाधानी होते. त्यांना पत्नीची सुंदर साथ होती. पण या आनंदी आणि समाधानी जिवाला जणू कुणाची दृष्ट लागली. पत्नी, कन्या आणि डॉक्टरपुत्र असे तिघांचे पाठोपाठ निधन झाले. आपल्या व्यंगचित्रांनी आयुष्यभर इतरांना हसवणाऱ्या हरिश्चंद्र लचके यांची शोकांतिका रसिकांना चटका लावून गेली. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हे एक स्मृतिपुष्प.

संबंधित बातम्या