कार्यरत राहणारा कार्यकर्ता

संपत मोरे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

स्मरण
 

राजा ढाले कृतिशील बंडखोर होते. आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार होते. त्यांनी मराठी साहित्यक्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. लेखक म्हणून मोठे असणाऱ्या राजाभाऊंमध्ये एक कार्यकर्ता व दिशादर्शक नेता होता. त्यांनी ‘लिटल’ मॅगझीनच्या चळवळीतून मराठी साहित्याची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच दलित पॅंथरसारख्या संघटनेत भरीव योगदान दिले. पॅंथर फुटल्यानंतर मास मूव्हमेंटची उभारणी करत चळवळ गतिमान ठेवली. दलित साहित्याला ‘दलित साहित्य’ न म्हणता ‘आंबेडकरी साहित्य’ म्हटले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

राजा ढाले बंडखोर म्हणून ओळखले जात. त्यांची बंडखोरी त्यांच्या नावापासून सुरू झाली होती. त्यांचे मूळचे नाव राजाराम होते. पण त्यांनी आपल्या नावातील राम हा शब्द काढला आणि राजा हेच नाव ते सांगू लागले. राम हे नाव वैदिक संस्कृतीशी संबंधित असल्याने त्यांनी राम हा शब्द नावापुढे लावायचा बंद केला. त्यांच्या झुंजार स्वभावाबद्दल सांगताना ते म्हणायचे, ‘आमचे ढाले हे नाव लढाईचा वारसा सांगणारे आहे. ‘ढाले’चा अर्थ बिनीचा सैनिक. आमचे पूर्वज प्राचीन काळी किल्ल्यात राहात. किल्ले आणि गडाचे रक्षण करण्याचे काम करत. युद्धकाळात मोठा ध्वज घेऊन उभे राहत. ज्याच्या हातात ध्वज आहे तो लढाईत मारला गेला, तर त्याची जागा दुसरा लगेच घेई पण ध्वज खाली पडू देत नसत. ध्वज खाली पडणे म्हणजे युद्ध हरणे त्यामुळे ध्वज सतत हातात धरला जाई. यात पहिल्या रांगेत जे लोक असत ते हे ढाले.’

सांगलीजवळ असलेल्या नांद्रे या गावचे असलेले राजाराम पिराजी ढाले शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांच्या चुलत्यांनी त्यांना शिक्षणासाठी नेले होते. त्यांची चुलती ही त्यांची मावशीच होती. त्यांच्या आईची सख्खी बहीण. ढाले शाळेत शिकत असतानाच त्यांचे आई-वडील वारले. तेव्हा त्यांचा आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ त्यांच्या मावशी आणि चुलत्यांनी केला. वरळी येथील चाळीत हे कुटुंब राहात होते. शाळकरी वयातच ढाले आंबेडकरी चळवळीत आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हा ढाले नववीच्या वर्गात शिकत होते. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी वरळीतील विद्यार्थ्यांची एक संघटना स्थापन झाली. त्याचे संघटक आणि चिटणीस म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडली. यावेळी झालेली सभा मोठी होती. तिथेच त्यांच्यातला कार्यकर्ता जागा झाला, असे राजा ढाले यांनी मनोहर जाधव आणि मंगेश नारायणराव काळे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 

ढाले यांच्यात जसा कार्यकर्ता होता, तसाच त्यांच्यात एक चित्रकार, लेखक आणि समीक्षकसुद्धा होता. त्या त्या वेळी त्यांच्यातील कलावंत पुढे आला. १९६० ला महाविद्यालयात शिक्षणासाठी गेल्यावर त्यांच्यातील कवीला व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळाले. तिथे त्यांना लेखक कवी मित्र भेटले. वाङ्‌गमयीन नियतकालिके चालवणारे संपादक भेटले. अशोक शहाणे आणि भालचंद्र नेमाडे याच काळात भेटले. त्यावेळी अनियतकालिक ‘लिटल’ मॅगझीनची चळवळ जोरात होती. 

गतिमान आणि चर्चेत असलेल्या ‘लिटल’ मॅगझीनच्या चळवळीने प्रस्थापित साहित्यविश्वात जोरदार धक्के द्यायला सुरुवात केली होती. या चळवळीत अनेक प्रयोग झाले. सकस आणि समृद्धपणे चाललेल्या या चळवळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याकाळी साहित्यक्षेत्रांत असा प्रयोग करणे ही मोठी आणि धाडसाची गोष्ट होती. पण ‘लिटल’ मॅगझीनच्या प्रवर्तकांनी ते धाडस केले. राजा ढाले त्यात अग्रभागी होते. राजा ढाले यांनी या चळवळीत मोठे योगदान दिले आहे. आता, तापसी येरू यासारखे अंक त्यांनी काढले. येरूच्या अंकात त्यांनी ‘सत्यकथेची सत्यकथा’ हा समीक्षात्मक लेख लिहिला. हा लेख खूप गाजला. त्याची साहित्यवर्तुळात चर्चा झाली. सत्यकथा जिथून निघत होते, त्या खटाववाडीच्या कार्यालयाजवळ जाऊन सत्तकथेचा अंक त्यांनी व त्यांच्या मित्रांनी जाळला. नेमाडे आणि अशोक शहाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या लिटल मॅगझीनच्या चळवळीने प्रस्थापित मराठी साहित्यव्यवहार आणि प्रस्थापित मराठी लेखक यांच्या विरोधात मोठे बंड उभे केले होते. त्याच बंडात ढालेही सहभागी होते. त्यावेळी सत्यकथा या मासिकाचा खूप बोलबाला होता. राज्यभरातील मराठी लेखक सत्यकथेत आपले साहित्य छापून यावे म्हणून धडपडत, तर काहींना पाठवलेले साहित्य छापून आल्याची स्वप्ने पडायची असेही गमतीने म्हटले जात होते. सत्यकथा मासिक साहित्याच्या केंद्रस्थानी असताना त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन नवे उभे करण्याचे धाडस या मंडळींनी केले होते. सत्यकथा आणि सत्यकथेची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी वाड्‌गमयीन चळवळ उभा राहिली होती. राजा ढाले यांनी लिहिलेल्या ‘सत्यकथेची सत्यकथा’ या लेखातून सत्यकथेचा प्रस्थापितधार्जिणा साहित्यव्यवहार पुढे आला होता. पुढे याच चळवळीतून वेगवेगळे साहित्यप्रवाह निर्माण झाले आणि ते प्रस्थापित साहित्य क्षेत्राला भारी ठरले. 

दैनिक चक्रवर्तीमध्ये ‘येथे थोबाड रंगवून मिळेल’ हे चालवलेले त्यांचे सदर असो, की पोस्टमार्टेमच्या टेबलावर’ असो या दोन्ही लेखमाला तुफान होत्या. त्यात विद्रोह होता, त्यात बंड होते आणि प्रस्थापितांची मग्रुरी मोडून काढण्याची भाषा होती. याच बंडखोरीच्या प्रेरणेतून नव्या लेखकांना वाट सापडली. त्यामुळे आज लिटल मॅगझीनबद्दल आदराने बोलणारे लेखक आहेत. त्यांना साहित्यिक जडणघडणीत या चळवळीचा मोठा वाटा राहिला आहे.

राजा ढाले यांचा आयुष्यातील पहिला टप्पा लिटल मॅगझीनच्या चळवळीचा होता. ही चळवळ सुरू असतानाच ‘दलित पॅंथर’चा जन्म झाला. दलित पॅंथर स्थापन होणे ही महाराष्ट्रातील एक क्रांतिकारी घटना होती. दलितांवर होणाऱ्या अन्यायाकडे प्रस्थापित दलित नेतृत्वाचे लक्ष नव्हते. गावोगावी अत्याचार सुरू होते. पण त्या अत्याचाराच्या विरोधात कुठेही आवाज उठत नव्हता. माणसे निमूटपणे अत्याचार सहन करत होती. चळवळीत शिथिलता आली होती. जनता हैराण झालेली. त्यावेळी अमेरिकेत ‘ब्लॅंक पॅंथर’चा उदय झाला होता. त्याचीच प्रेरणा घेत महाराष्ट्रात दलित पॅंथर उभी राहिली. पॅंथरमुळे गावोगावी होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटली. लोक लढायला सज्ज झाले. खचलेले लोक धीराने उभे राहिले. राज्यभर पॅंथरचा एक झंझावात तयार झाला. दलित जनतेला पॅंथर अन्यायाच्या विरोधात लढणारी आणि शोषणातून मुक्ती देणारी आहे याची खात्री पटली. आपण एकटे नाही, आपण प्रथापितांच्या विरोधात लढू शकतो असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. पॅंथरच्या लढाऊ कारकिर्दीवर आलेले दस्तऐवज वाचले, तर तो काळ आणि त्यावेळी अत्याचाराच्या विरोधात उठलेले रान यांची कल्पना येते. राजा ढाले, नामदेव ढसाळ, भाई संगारे, अविनाश महातेकर आणि ज. वि. पवार हे पॅंथरचे झुंजार नेते. यांसारख्या लढाऊ नेत्यांनी पॅंथर उभी केली आणि इतिहास घडवला. 

पॅंथरचा काळ सुरू असतानाच १९७२ मध्ये राजा ढाले यांनी साधना साप्ताहिकात एक लेख लिहिला. या लेखामुळे राष्ट्रध्वजाबद्दल एक विधान आल्याने खळबळ उडाली. वेगवेगळ्या पक्षसंघटनानी साधना कार्यालयावर मोर्चा आणला. लोकांनी संपादकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. संपादक यदुनाथ थत्ते यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल अवचट यांनीही राजीनामा दिला. ढाले यांच्या या लेखावर अनेक दिवस गदारोळ सुरू होता. त्यांच्यावर खटला झाला. पुणे महानगरपालिकेत साधना साप्ताहिकाच्या विरोधात ठराव झाला. ढाले यांना कोणीतरी माफी मागण्याबाबत सुचवले, पण ‘फासावर गेलो तरी चालेल, पण माफी मागणार नाही,’ अशी बाणेदार भूमिका त्यांनी घेतली. ते करारी होते आणि त्यांचा हा करारीपणा शेवटपर्यंत कायम राहिला असे त्यांचे सहकारी ज. वि. पवार सांगतात. ते म्हणतात, ‘राजा ढालेंच्या या लेखानंतर पॅंथर राज्यभर गेली. पॅंथरला उभारी मिळाली.’

राजा ढाले यांच्या साहित्यिक योगदानाची नोंद घेताना पवार सांगतात, ‘दलित साहित्याच्या उगमापाशी ढाले नंग्या तलवारी घेऊन उभा राहिले नसते, तर दलित साहित्याची भ्रूणहत्याच झाली असती.’

राजा ढाले यांनी १९६४ ते १९७४ हा काळ अक्षरशः गाजवला. महाराष्ट्रभर जाऊन चळवळ बांधली. लिखाण करत राहिले. आपल्या भूमिका ठामपणे मांडत राहिले. त्यांच्या लिखाणाने खळबळ माजली, तरी ते खंबीर राहिले. स्वतःच्या भूमिकेपासून तसूभरही ढळले नाहीत. कारण त्यांना माहिती होते, की आपली बाजू सत्याची आहे, समतेची आहे. आपण जे लिहितोय, जे मांडतोय ते समतेच्या स्थापनेसाठी आहे. त्यांची ती भूमिका पक्की होती म्हणूनच ते विचलित झाले नाहीत.

आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले. कार्यकर्ते घडवत राहिले. लोकांना भेटत राहिले. मास मूव्हमेंटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत राहिले. ते कलावंत होते, चित्रकार होते, अगदी त्यांनी बालकवितासुद्धा लिहिल्या, कविता लिहिल्या, पुस्तकांच्या प्रस्तावना लिहिल्या. समीक्षेच्या क्षेत्रात काम केले. अनियतकालिके चालवली. चळवळ हा राजाभाऊंचा ध्यास होता. मग ती साहित्यातील चळवळ असो, की रस्त्यावरची चळवळ. लेखक आणि नेता या दोन्ही भूमिका त्यांनी सशक्तपणे निभावल्या. त्या भूमिकांना त्यांनी योग्य न्याय दिला. साहित्य आणि राजकीय सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राजभाऊंचे विचार कायम मार्गदर्शक ठरतील.

संबंधित बातम्या