महासमन्वयी महोदधि

संतोष शेणई
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

स्मरण  

श्रीगुरुजींना कोणताही प्रश्न वर्ज्य नसे. श्रीगुरुजींशी कोणत्याही विषयावर बोलायला कधी दडपण यायचे नाही. त्यांची विद्वत्ता, त्यांचे वय यांचे दडपण नसे. ते आपल्याशी आपुले होऊन संवाद साधत. कित्येकदा सतत बारा-तेरा तास त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या अर्ध्या वयाचे आम्ही दमत असू. मात्र त्यांना कधी थकलेले पाहिले नाही. श्रीगुरुजी चैतन्याचा अखंड वाहता झरा होते.

‘‘आधी तना-मनाचे मर्म जाणा, मग धर्म समजणे सोपे होईल. पिंडी ते ब्रह्मांडी. सारे ब्रह्मांड तुमच्या ठायीच वसलेले आहे, ते शोधायचे सोडून दुसरीकडे कुठे हिंडत आहात?’’ असे श्रीगुरू बालाजी तांबे विचारायचे आणि अध्यात्माचा रस्ता आयुर्वेदातून जातो हे समजवायचे. ते आयुर्वेदिक डॉक्टर की आध्यात्मिक गुरू, असा प्रश्न कित्येकजण विचारायचे. त्यांना मी सांगत असे, तुम्ही द्वैतवादी आहात की अद्वैतवादी यावर ते अवलंबून आहे. कारण श्रीगुरुजी केवळ अद्वैतवादी नव्हते, तर ते महासमन्वयवादी होते. त्यांनी केवळ अध्यात्म व आयुर्वेद यांचीच सांगड घातली असे नाही, जगण्यातला प्रत्येक विषय ते एकमेकांशी जोडून घेत असत. जगणे असे तुकड्यातुकड्याने नसतेच, सगळे विषय मिळून आयुष्य असते. काही विषय तनाचे असतात, काही मनाचे. म्हणून प्रत्येक गोष्टीत संतुलन महत्त्वाचे असे त्यांचे सांगणे असे. 

आयुष्यात सगळेच विषय महत्त्वाचे असतात, हे त्यांनी जाणले होते. त्यामुळेच कोणत्याही विषयावर आपण बोलू लागलो, तर त्या विषयात जगात सध्या नवीन काय चालले आहे, हे ते सांगू लागत. त्यांना स्वतःला कोणत्याही विषयाचे वावडे नव्हते. एखाद्या वेळी त्यांना गप्पा मारताना काही नवीन वाटले तर ते प्रश्न विचारून त्याबाबतची जास्तीत जास्त माहिती समोरच्याकडून मिळवायचे. त्यानंतर जेव्हा त्यांना थोडा वेळ मिळेल तेव्हा ते गुगलवरून त्याविषयी अधिक माहिती घेऊन स्वतःची जिज्ञासा पूर्ण करायचे. श्रीगुरुजी अखंड विद्यार्थी असलेले अधिकारी पुरुष होते. 

श्रीगुरुजी खूप बोलत असत. वेगवेगळ्या विषयांची माहिती देत राहात. त्यावरचे चिंतन ऐकवत. बरे, एखाद्या विषयावर आज गप्पा झाल्या. नंतर पुन्हा कधी गप्पा त्याच विषयावर सुरू झाल्या तर त्यांचे मागच्याहून कितीतरी पुढचे चिंतन ऐकायला मिळत असे. ‘फॅमिली डॉक्टर’ पुरवणी २००३च्या नोव्हेंबरपासून सुरू झाली. गेल्या सतरा वर्षांत अनेकदा विषयांची पुनरावृत्ती झाली, पण विचारांची पुनरावृत्ती झाली नाही. मागे सांगितले, त्याहून वेगळे प्रत्येक वेळी श्रीगुरुजींनी ऐकवले.  

श्रीगुरुजी विद्यापीठीय शिक्षणानुसार अभियंते होते. पारंपरिक वारशानुसार आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. त्यांना संगीत प्राणप्रिय होते. त्यांनी संगीत रचनाही केल्या होत्या. त्यांनी रांगोळीची प्रदर्शने भरवली होती. पाककलेत त्यांना रस होता. भारतीय संस्कृतीविषयीचे त्यांचे प्रेम आणि त्यांची पर्यटनप्रियता यामुळे कार्ल्याच्या आत्मसंतुलन ग्राममधील रहिवाशांसोबत त्यांची तीर्थस्थळांना भेट असायची. जगभर फिरताना कोणतीही कलात्मक वस्तू दिसली की ते कौतुकाने घेऊन येत. कोणतेही आधुनिक उपकरण त्यांना हाताळायचे असे. जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना रस असे. 

त्यांची चिकित्सक, संशोधक वृत्ती सतत दिसायची. विषयाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करायची व ते मानवाच्या कल्याणासाठी कसे वापरता येईल ते पाहायचे यासाठी त्यांची धडपड असायची. श्रीगुरुजी प्रत्येक गोष्टीत समरस व्हायचे, पण गुंतून पडायचे नाहीत. संसारी संन्यासी कसा असावा, ‘गुंतुनी गुंत्यात नाही’ हे ‘कमलपर्णापरी’ सहजतेने कसे जगावे, हे श्रीगुरुजींकडून शिकण्याजोगे होते.

त्यांना कोणताही प्रश्न वर्ज्य नसे. एकदा त्यांच्याकडे एक परदेशी तरुण आला होता. त्याला प्रश्न पडला होता, ‘पैसे मिळवावेत कसे?’ खरेतर त्यावेळी श्रीगुरुजी एका वेगळ्या विषयावर बोलत होते. परंतु त्या अस्वस्थ तरुणाने त्यांना हा प्रश्न अचानक विचारला आणि श्रीगुरुजी त्याला पुढे तासभर तो चांगल्या पद्धतीने पैसे कसे मिळवू शकेल हे समजावून देत होते. नंतर मी विचारले, ‘अर्थ अनर्थासी कारण म्हणतात, मग....’ मला मधेच थांबवत म्हणाले, ‘‘संसारी माणसाला पैसा हवाच. त्याचे पैशावाचून पदोपदी अडेल. त्यामुळे त्याने चांगल्या पद्धतीने पैसा मिळवायला हवा. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारे’ हे सूत्र लक्षात ठेवायला हवे. त्याचबरोबर ‘उदास विचारे वेच करी’ हेही लक्षात ठेवले पाहिजे.’’ एवढेच सांगायचेय, की श्रीगुरुजींशी कोणत्याही विषयावर बोलायला कधी दडपण यायचे नाही. त्यांची विद्वत्ता, त्यांचे वय यांचे दडपण नसे. ते आपल्याशी आपुले होऊन संवाद साधत. 

कित्येकदा सतत बारा-तेरा तास त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या अर्ध्या वयाचे आम्ही दमत असू. मात्र त्यांना कधी जांभई देतानाही पाहिले नाही. चैतन्याचा अखंड वाहता झरा होता तो. ‘साम टीव्ही’साठी ‘श्रीगीतायोगा’चे चित्रण करीत होतो कार्ल्यात. श्रीगुरुजींनी नुकतीच वयाची ७६ वर्षे पूर्ण केली होती. तो दिवस होता १४ ऑगस्टचा. दुपारीच शूटिंग सुरू झाले होते. रात्री साडेअकरा वाजता श्रीगुरुजींनी पॅक अप करायला सांगितले. ठरवलेल्यापैकी काही काम अपुरे राहिले होते. ते दुसऱ्या दिवशी करायचे तर आम्हा सगळ्यांचीच पंधरा ऑगस्टची सुटी जाणार होती. प्रत्येकाने कुटुंबाबरोबर कार्यक्रम आखला होता. एकीकडे कॅमेरा ट्रायपॉडवरून उतरवला जात असताना श्रीगुरुजींना अडचण सांगितली. त्यांच्या बरोबरची एक सहकारी जरा रागावलीच, ‘‘वाजले किती पाहा. कधीपासून शूटिंग सुरू आहे. आता काही नाही, पॅक अप म्हणजे पॅक अप.’’ श्रीगुरुजींची काळजी तिच्या बोलण्यातून जाणवत होती, पण श्रीगुरुजींना आमची काळजी होती. त्यांनी आमच्या त्या मैत्रिणीला घरी जाऊन चॉकलेट आणायला सांगितले. ती तिथून हलल्यावर पुन्हा कॅमेरे ट्रायपॉडवर चढले. पुन्हा तयारी होईस्तोवर बारा वाजले होते. पंधरा ऑगस्ट सुरू झाला होता. श्रीगुरुजींमधील एनसीसीचा अंडर ऑफिसर जागा झाला. त्यांनी आम्हा सगळ्यांना उभे करून राष्ट्रगीत म्हणायला लावले. देशाला वंदन करायला लावले. चॉकलेट वाटली. शूटिंग संपले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. बारा तासांची पूर्ण शिफ्ट झाली होती, ७६व्या वर्षी. सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला प्रेम देणारे, स्वतःपेक्षाही समोरच्याची काळजी घेणारे, त्याला शक्ती देणारे ते श्रीगुरुजी आता नाहीत.

संबंधित बातम्या