आंधळा मागतो एक डोळा... 

राधिका इंगळे काकतकर 
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

रुआ आणि आरू
रुआनच्या प्रश्‍नांना आरू कशी उत्तरं देते? आणि त्यांच्यातला 'इंटरेस्टिंग' संवाद.

रुआनची चिडचिडच चालू होती. तो म्हणाला, ‘OMG! आज अंघोळ करताना shower gel डोळ्यात गेलं माझ्या आरू.. आणि २ मिनिटं मला काही दिसतंच  नव्हतं. मी खूप घाबरलो. मला बाथरूमचं दारपण दिसत नव्हतं.. मला रडूच यायला लागलं. Thank God, मा तिकडंच होती आणि तिनं माझे डोळे धुतले. अजूनही मला नीट वाचता येतच नाहीये.. आणि मला एकदम जाणवलं... ज्या लोकांना कधीच दिसत नाही, जे ब्लाइंड आहेत, ते कसं  वाचत असतील? आरू खरंच, कसं वाचतात हे लोक?’ 

आरू - रुआ, गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात - Necessity is the mother of invention. अंध लोकांच्या वाचनासाठी Braille (ब्रेल) नावाची script (लिपी) असते. ज्यामुळं ते साहित्याचा, म्हणजे लिटरेचरचा आस्वाद घेऊ  शकतात. Let me tell you the story of the birth of Braille. 

लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत - लिपी विकसित केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. दोन बहिणी आणि एका भावाच्या पाठीवर जन्मलेला लुई सगळ्यांचा लाडका होता. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या वर्कशॉपमध्ये कार्यमग्न असत. 

लुई तीन वर्षांचा असताना एक दिवस त्याचे वडील कोणाशीतरी बोलत आपल्या कार्यशाळेबाहेर गेले, तेवढ्यात लुईनं वडिलांचं अनुकरण करण्याच्या नादात त्यांची एक आरी उचलली आणि अनवधानाने ती त्याच्या एका डोळ्यात घुसली. लुई जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञानं, Eye Doctor नं त्याच्यावर उपचार केले. काही वेळानं लुईला आराम पडला, पण त्याच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसऱ्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुईचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले, लुई दोन्ही डोळ्यांनी आंधळा झाला. 

लहानपणापासून लुई Independent होता. त्याला पालकांकडून नेहमी प्रोत्साहन मिळत असे. स्पर्श आणि वासाच्या सहाय्यानं छोटा लुई अनेक वस्तू सहज ओळखत असे आणि स्वतःची कामं स्वतःच करीत असे. १८१६ च्या सुमारास लुईच्या गावात एक पाद्री आले. त्यांच्या मदतीनं लुईचं शिक्षण सुरू झालं. सुरुवातीला त्यांनी लुईला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्यानं वस्तु-परिचय करून दिला, तसंच संगीत आणि बायबलचं शिक्षणही सुरू झालं. पुढं सुमारे एक वर्षानं लुईला त्याच्या गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आलं. अभ्यासात लुई हुशार होता, केवळ श्रवणाच्या - listening च्या जोरावर त्यानं केलेली प्रगती पाहून अनेकांना आश्चर्य वाटे. या शाळेत लुई दोन वर्षं शिकला आणि त्यामुळं लुईला अनेक विषयांत आवड निर्माण झाली. 

पुढं पाद्री पॅलुय यांनी अनेक प्रयत्न करून पॅरिस येथील अंध मुलांच्या शाळेत लुईला प्रवेश मिळवून दिला. अंध मुलांसाठीच्या या जगातील पहिल्या शाळेत प्रवेश घेणारा लुई सगळ्यात लहान वयाचा विद्यार्थी होता. सहा वर्षांत लुईनं शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो त्याच शाळेत स्वयंसेवक, शिक्षक म्हणून काम करू लागला. 

लुई ब्रेल हे स्वतः अंध असल्यानं अंधांमध्ये स्पर्शज्ञान अतिशय तीव्र असतं, याची त्यांना जाणीव होती. ते पॅरिस इथं असताना फ्रेंच लष्करातील अधिकारी Captain Charles Barber हे उठावदार टिंबे व रेघा यांच्या आधारे रणांगणावरील संदेशवहनासाठी त्यांनी तयार केलेल्या लेखनपद्धतीचं प्रशिक्षण सैनिकांना देण्यासाठी तेथे आले होते. त्यांच्या लेखनपद्धतीमध्ये शब्दांचा आवाज spelling शिवाय ओळखला जात असे. ब्रेल यांनी स्वतः या लेखनपद्धतीचा विशेष अभ्यास केला व तिचंच परिष्करण करून त्यांनी स्वतःची लिपी तयार केली. तीच पुढं ब्रेल लिपी (Braille Lipi) म्हणून विख्यात झाली. आधुनिक युगात ही लिपी अंधांना खूपच वरदान ठरली; कारण संगीत, गणित, संगणक कार्यक्रम इत्यादींमुळं वेगवेगळ्या चिन्हांच्या आधारे या लिपीचा वापर केला जातो. ब्रेल यांच्या या लिपी शोधामुळं अंधांना पुस्तकांचे Printed Universe खुलं झालं, तसंच त्यांचं आयुष्यही प्रकाशमय झालं.

रुआ - Wow Aaru, where there is a will, there is a way... मला आज हे पूर्ण पटलंय. मी पण आता Blind School मध्ये जाऊन Volunteering करणारे आणि माझ्याकडून शक्य आहे तेवढा आनंद या मित्रमैत्रिणींबरोबर वाटणार आहे!

संबंधित बातम्या