निसर्ग आहे साक्षीला

अनुज खरे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

सहजच...

सध्याच्या काळात आपल्याला एकच शब्द चहूबाजूला ऐकायला मिळत आहे तो म्हणजे ‘कोरोना’. या रोगाने अनेकांच्या शरीरावरच नव्हे तर मनावरही काही प्रमाणात आघात केलेला आहे. जागतिक आरोग्याबरोबर जागतिक मानसिकतेलाही एक प्रकारचे नैराश्य आले आहे. या निराशेच्या स्थितीतून बाहेर पडायचं असेल आणि पुन्हा नवी सुरुवात करायची असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे निसर्गाच्या जवळ जाण्याचा. निसर्गापासून माणूस लांब गेला, निसर्गाने आखलेल्या चाकोरीबाहेर वागायला लागला की बऱ्याचदा कोरोनासारखी अनेक संकटं मानवजातीवर आलेली आहेत. गेल्या काही वर्षात पसरलेले रोग, नैसर्गिक आपत्ती यांचा नीट अभ्यास केला की आपल्याला हेच जाणवेल. मग यावर उपाय काय? तर निसर्गाला पूर्णपणे शरण जाणे.

आता आपणही कोरोनाच्या संकटातून सावरत पुनःश्च हरीओम म्हटले आहे. आपले दैनंदिन जीवन पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा वेळी जंगलात जाणे आणि निसर्गापासून नवी ऊर्जा घेणे फायद्याचे ठरेल यात कोणतीही शंका नाही. जंगलात गेल्यावर जंगलातल्या अगदी बारीक सारीक बाबींचं नीट निरीक्षण केलं की आपल्याला जो आनंद मिळेल त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. मुख्य म्हणजे निसर्ग आपल्याला वाचता यायला हवा. निसर्गात प्राणी, पक्षी ज्या ज्या कृती करतात त्याला अर्थ असतो.

माणूस सोडून निसर्गातील इतर सर्व घटक निसर्गाने घालून दिलेल्या नियमांना धरूनच वागतात. अगदी आपल्या परिसंस्थेतील सर्वोच्च घटकाचे म्हणजेच वाघाचे जरी उदाहरण घेतले तरी प्राणी निसर्गाच्या नियमांचं किती काटेकोरपणे पालन करतात हे आपल्या लक्षात येईल. भूक लागेल तेव्हाच शिकार करणे हा मांसाहारी प्राण्यांचा स्थायीभाव आहे. किंबहुना निसर्गाने आपला समतोल राखून ठेवण्यासाठी घातलेला तो नियम आहे. मी अनेकदा चितळांच्या कळपाशेजारून शांतपणे जाणारा वाघ पहिला आहे. अशा वेळी भूक लागलेली नसल्याने तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही.

आपली पुढची पिढी सक्षम व्हावी ही अंतःप्रेरणा प्रत्येक प्राण्या-पक्ष्यात असते. त्यामुळे अगदी सहज प्रवृत्तीने सर्वोकृष्ट जोडीदार निवडला जातो. त्यासाठी वेगवेगळे निकष लावले जातात. नरही माद्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी, आपण किती ताकदवान आणि सक्षम आहोत हे दाखवून देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. मोर आपला डौलदार पिसारा फुलवतो, चितळांमध्ये द्वंद्व होते. पुढची पिढी चांगली जन्माला यावी यासाठी आपणच कसे योग्य आहोत हे निसर्गात अशा विविध प्रकारांनी दाखवले जाते.

प्राण्यांना त्यांच्या भावना कधीच लपवून ठेवता येत नाहीत. आईचं आपल्या पिल्लाबद्दल असलेलं प्रेम वादातीत आहे.  

धनेश पक्ष्याचं उदाहरण घ्या. धनेश पक्ष्यातली मादी, पिल्लांना जन्म देण्याआधी ढोलीत स्वतःला बंद करून घेते. अंडी उबवणे, पिल्लं बाहेर आल्यावर त्याचं संगोपन करणे, घरट्याची नियमित साफसफाई करणे ही कामं ती ढोलीत राहून करते. तितकंच कौतुक नर धनेश पक्ष्याचं आहे. जितके दिवस मादी ढोलीत राहते तितके दिवस ती तिच्या अन्नासाठी पूर्णपणे नरावर अवलंबून असते. मादी ढोलीच्या बाहेर येईपर्यंत, नर धनेश पिल्लांबरोबरच मादीलाही अन्न पुरवतो आणि पिल्लं आणि मादी यांची काळजी घेतो. टिटवीही पिल्लांच्या बाबत अशीच संवेदनशील असते. हा पक्षी माळरानावरच अंडी देतो. आपल्या अंड्यांजवळ कोणाची चाहूल लागली तर लगेच त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी किंवा अंड्यांपासून दूर नेण्यासाठी त्या ठिकाणापासून दूर जाऊन आरडाओरडा करून अक्षरशः आकाश-पाताळ एक करतो; जेणेकरून शत्रूचं लक्ष विचलीत व्हावं आणि अंडी वाचावीत.

गवा किंवा हत्ती यांसारखे मोठे प्राणी धोक्याची चाहूल लागताच पिल्लांना कळपाच्या आतल्या बाजूला घेऊन त्यांच्याभोवती सुरक्षित कडं करतात. मार्जारकुळामध्ये तर आईने शिकविल्याशिवाय पिल्लांना त्यांच्या पुढील आयुष्यात शिकार करता येत नाही. आईजवळ असेपर्यंत पिल्लं संपूर्णपणे आईवर अवलंबून असतात. या काळात त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम पाहण्यासारखं असतं. वाघांच्या अशा आई आणि पिल्लांचं निरीक्षण करण्यात मी अनेक वेळा तासन तास घालवले आहेत. पिल्लांचं एकमेकांबरोबर खेळणं, आईच्या अंगावर उड्या मारणं, आईचं अनुकरण करणं, आईने त्यांची काळजी घेणं हे पाहण्यात जो आनंद मिळतो त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. वाघांमध्ये आईने आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी तिच्यापेक्षा जास्त ताकदीच्या नराशी दोन हात केल्याचं उदाहरणही आहे.

प्राण्यांमध्ये एक वृत्ती अगदी सहजतेने आढळून येते ती म्हणजे सावधता. चितळं अगदी मोकळ्या मैदानात चरत असली तरी कमालीची सावध, चौकस असतात. कोणताही धोका दिसला, जाणवला तरी आपल्या इतर बांधवांना सावध करण्याचं काम ती चोख करतात. अशी सावधता बाळगली तरच आपण टिकून राहू शकू, जगू शकू हे त्यांना पक्कं माहीत असतं. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्याची कला प्राण्यांनी उत्तम राखली आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीशी जमवून घेण्याच्या क्रियेत माहीर असणारा बिबट्या त्याचं उत्तम उदाहरण आहे. बदल केले नाहीत तर आपली जात टिकून राहणार नाही, ती नामशेष होईल हे प्राण्यांना उमजलं आहे.

कळपाने किंवा समूहाने राहणाऱ्या प्राणी पक्ष्यांमध्ये समन्वय आणि संभाषण हे उत्तम असते. रानकुत्रे हे समूहाने शिकार यासाठी प्रसिद्ध. शीळ घालून विशिष्ट पद्धतीने संभाषण यांच्यात साधलं जातं. शिकार करताना एकमेकांमध्ये असलेला समन्वय वाखाणण्याजोगा असतो. लहानपणी एकीचे बळ मिळते फळ या आपण शिकलेल्या म्हणीचे रानकुत्रे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यांच्यात असलेल्या एकीमुळे प्रसंगी वाघालाही ते भारी पडू शकतात. समन्वयाचे आणखी एक उदाहरण आपल्याला दिसेल ते म्हणजे भोरडी पक्षी. बलुचिस्तानातून आपल्याकडे स्थलांतर करून येणारा हा पक्षी संध्याकाळच्या वेळी वेगवेगळ्या उडण्याच्या रचना करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या रचना करताना त्यांची संख्या हजारोंच्या घरात असते पण त्यांच्यात असणारा समन्वय हा बघण्यासारखा असतो. इतकी मोठी संख्या असूनही या रचना करताना एकमेकांमध्ये टक्कर झाली आहे असे अगदी क्वचितच घडत असेल.

थोडक्यात काय तर निसर्गाकडे बारकाईने पाहिलं की आपल्या लक्षात येईल की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे. निसर्गाकडे बघताना एक वेगळी दृष्टी घेऊनच आपण कायम निसर्गात फिरलं पाहिजे. ते खरं निसर्ग पर्यटन आहे. आजकाल निसर्ग पर्यटन म्हणजे केवळ आकर्षण बनलं आहे. निसर्गात फिरताना तिथे पूर्वापार राहत असलेल्या आदिवासींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. निसर्गाच्या समतोलाला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही याची काळजी त्यांच्याकडून पुरेपूर घेतली जात असे. हेच लोक आज आपले खरे मार्गदर्शक आहेत. आज जंगलाबाहेर स्थायिक झालेल्या या लोकांना सोबत घेऊन; त्यांनाही फायदा होईल आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊन केलेलं पर्यटन हीच जबाबदारपणे केलेली भ्रमंती म्हणायला हवी. आणि तेच शाश्वत पर्यटन आहे. मुख्य म्हणजे निसर्ग शिक्षण हा निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे मग निसर्गाच्या पटलावर उधळलेल्या नानाविध रंगांचं सौंदर्य आपल्याला त्या नजरेतून दिसेल.

डाव्या बाजूने येणाऱ्या सांबराने दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याच्या आवाजाने माझी या सगळ्या विचारांत लागलेली तंद्री भंगली. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या गाईड्सना प्रशिक्षण देण्यासाठी मी आणि माझा एक मित्र दोन महिन्यांपूर्वी पेंचला गेलो होतो. कर्माझरी विश्रामगृहाजवळ असणाऱ्या माझ्या आवडत्या रुनीझुनी पाणवठ्यावर बसून आजूबाजूचा निसर्ग पाहताना माझ्या मनात नानाविध विचार येऊन गेले होते. निसर्गाचं मोठेपण माझ्यासमोर त्यानेच उलगडून दाखवलं होतं. त्याच्या थोरपणाची प्रचिती तसा तो कायमच देत असतो. त्यामुळे सरतेशेवटी निसर्गाला साक्षीला घेऊन आजवर केलेला हा निसर्ग वाचनाचा प्रवास असाच सुरु ठेवायचा हे मी मनाशी पक्कं केलं आणि मी विश्रामगृहाकडे निघालो

संबंधित बातम्या