आजोबा मंडळ

राजेन्द्र बनहट्टी
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

ललित

सकाळी फिरायला जाण्याचा नाद फार पूर्वीपासून लागला. वयाने आता ऐंशीचा उंबरठा पार केलेला आहे. तरीसुध्दा सकाळच्या भ्रमंतीची भुलावण अजून ओसरलेली नाही.

सकाळी फिरायला जाण्याचा नाद फार पूर्वीपासून लागला. कसा लागला ते आठवत नाही. पण आठवते तेव्हापासून मी आपला सकाळी उठलो की बिनधास्त घराबाहेर पडत होतो. बालपणी तेव्हाचे सवंगडी बरोबर असायचे. आम्ही बालगोपाल घराजवळच्या पटांगणावर फिरत होतो, धावत होतो, पळापळी करत होतो. तेव्हा किलोमीटरचा उदय झाला नव्हता. तो मैल आणि कोस यांचा जमाना होता. पण किमान दोन तीन मैल तरी आमचा फेरफटका होत असणार. तासदीडतास लागायचा घरी परतायला.

बालपण भुर्रकन उडून गेले. तारुण्य झेपावले. मैदान सुटले. पण सकाळच्या भटकंतीची सवय कायम राहिली. आता तरण्याजवान दोस्तांच्या सोबत टेकडीवरचा मारुती रोज सकाळी गाठू लागलो. सगळी टेकडी आडवीतिडवी पालथी घालत होतो. दीडदोन तास केव्हा निघून जात ते कळत नव्हते. चारपाच किलोमीटर तरी अंतर सहज कापले जाई, जास्तच पण कमी नाही.

तारुण्य आले त्या वेगाने ओसरत गेले. मस्तकावर मध्यम वयाची शुभ्र पताका कळतनकळत फडकू लागली. साठीची चाहूल लागली. मात्र सकाळचे फिरणे तसेच चालू राहिले. फक्त आता समवयस्क मित्रांसह. तेसुध्दा टेकडीवर नाही, पण घरापासून दूर अशा मोकळ्या रस्त्यांवर. वेळेचा आणि अंतराचाही साहजिकच संकोच झाला. वेळ दोन तासांवरून एक तास आणि अंतर पाच किलोमीटरवरून तीन किलोमीटरपर्यंत आक्रसले.

सकाळच्या सहलींचा हा इतिहास आणि भूगोल वर्तमानात अजूनही चालू आहे. मात्र अलीकडे त्याची संक्षिप्त आवृत्ती तेवढी निघते आहे. कारण वयाने आता ऐंशीचा उंबरठा पार केलेला आहे. तरीसुध्दा सकाळच्या भ्रमंतीची भुलावण अजून ओसरलेली नाही. पण आता फिरतो ते घराजवळपासच्या रस्त्यांवर. शक्यतो रहदारी नसलेल्या गल्ल्याबोळांत. तेही फक्त तीस ते चाळीस मिनिटे. जेमतेम एकदीड, फार तर दोन किलोमीटर. तोसुध्दा एखाद्या रणांगणावर जाणाऱ्या सैनिकासारखा किंवा मैदानावर बॅटिंग करायला जाणाऱ्या क्रिकेट खेळाडूसारखा; संरक्षक आयुधे घालून. गुडघ्यांवर नीकॅप, कमरेला पट्टा, हातात काठी, डोक्यावर शिरस्त्राण, हिवाळ्याच्या थंडीत गरम कानटोपी, उन्हाळ्यात कापडी फेल्टकॅप. पावसाळ्यात काठीऐवजी छत्री. पाऊस पडू लागला की ती उघडून डोक्यावर धरायची. अर्थात हे रूपांतर फक्त झिमझिम पावसात. मुसळधार असेल तर फिरण्याला रामराम. बाहेर पावसाच्या धारा कोसळत असल्या तर घरातल्या पॅसेजमध्ये आमच्या येरझारा. पण खरी मौज सकाळी कोवळ्या उन्हात बाहेर रस्त्यावर फिरण्यात. अलीकडे सोबतीला कोणी नसते. पण एकटा जात असलो तरी बाहेर रस्त्यावर गेलो की एकटा राहत नाही. कारण ती काही बिनचेहेऱ्याची सकाळ नसते, उलट भिन्नभिन्न चेहेऱ्यांनी गजबजलेला तो प्रात:काल असतो. माझ्या बरोबर कोणी नसले तरी रस्ता त्या सकाळच्या रामप्रहरी फिरस्त्या माणसांनी फुललेला असतो. स्त्री -पुरुष, तरुण -वृध्द. सगळ्या प्रकारच्या, सगळ्या वयोगटातील लोकांची रस्त्यावर वर्दळ असते. मी पुण्यात कोथरूडला राहतो. एकदा सहज गंमत म्हणून माझ्या घरापासून अर्ध्यापाऊण किलोमीटरवर असलेल्या पौडरस्त्यापर्यंतची फिरणारी माणसे मोजली तर ती बावन्न भरली. पुढे एकदा त्यातील स्त्री -पुरुषांची जनगणना केली तर स्त्रिया अठ्ठावीस आणि पुरुष चोवीस निघाले. म्हणजे इथेही स्त्रिया पुरुषांपेक्षा आघाडीवर होत्या.

या चालणाऱ्या माणसांची वये वेगवेगळी तशा त्यांच्या चालण्याच्या तऱ्हाही निरनिराळ्या. काही मंडळी चारपाच जणांच्या गँगने मोठ्यांदा गप्पा मारत झपाझप फिरत तर काही एकटे दुकटे मुकाट्याने गुपचूप चालत. तरुण मंडळींपैकी काहींचे जॉगिंग तर काही उत्साही जवानांचे चक्क रनिंग. मध्यम वयातील प्रौढांच्याही चालण्याच्या विविध लकबी. काहीजण अगदी लेफ्टराईट करत पाय उडवत पलटणीत कवायत करावी तसे हात खालपासून वर फिरवीत ठेक्यात तालबद्ध चालत. छाती पुढे. मान ताठ. नजर नाकासमोर बाणासारखी सरळ रोखलेली. तर काही महाशय अगदी सहज रमत गमत इकडे तिकडे पाहत रेंगाळत चालत. जणू त्यांना चालण्याच्या व्यायामाशी काही देणे घेणे नाही. सहज गंमत म्हणून ते आपले फिरायला आले आहेत. याहीपेक्षा कमाल म्हणजे काही लोक ‘तू जपून टाक पाऊल जरा’ अशा स्टाइलमध्ये अगदी संथपणे पावले टाकत जात. मान सतत खाली. पायाखाली मुंगी तर चिरडत नाही ना हे बघण्यासाठी जणू दृष्टी रस्त्यावर खिळलेली.

हे झाले मध्यमवयीन फिरस्त्यांचे चालण्याचे प्रकार.पण आजोबा-पणजोबा या पदवीला पोचलेली वृद्ध मंडळी घराबाहेर निघत ती फारशी चालण्याच्या भरीला पडत नव्हती. माझ्यासारखे अपवाद हाताच्या बोटांवर मोजण्याइतके. बाकीचे वयोवृध्द सरड्याची धाव कुंपणापर्यंतच म्हणतात तसे घरापासून निघाले की सरळ चौकात फुटपाथवर ठेवलेल्या बाकांवर जाऊन ठिय्या ठोकत. औदुंबराच्या झाडाखालच्या दोन बाकांवर चारपाच आजोबा तरी आरामात बसलेले दिसत. त्या दोन बाकांवर इतर कोणी सहसा बसत नव्हते. ते बाक जणू त्या आजोबा कंपूसाठी आरक्षित झाले होते. कायमचे.

मी रोज चौकातून डावीकडे वळून त्या बाकांवरूनच पूर्वेला सूर्यदर्शनासाठी जात होतो. जाता येता त्या आजोबांच्या गटांशी प्रथम स्मितहास्य झाले. नंतर नमस्कार चमत्कार घडले. पुढे पुढे शब्दओळख होऊन थोडे फार बोलणे होऊ लागले. ती सगळी वृद्ध मंडळी आसपासच्या बंगल्यांमधून राहणारी सुखवस्तू पेन्शनरांची होती. मी त्या सगळ्या बुजुर्ग संचाला ‘आजोबा मंडळ’ म्हणत असे. खरे म्हणजे ते बरोबर नव्हते. कारण त्यातले बहुतेक सगळेजण हे चक्क पणजोबा झाले होते. चांगली चार चार, पाच पाच पंतवंडे प्रत्येकाला होती. फक्त त्यातले दादा तेवढे पंच्याऐंशीचे होते. बाकी सगळे पंच्याऐंशीच्या पुढचे. अप्पा सत्याऐंशी, तात्या अठ्ठ्याऐंशी, आबा नव्वद, बापू ब्याण्णव तर नाना थेट पंच्याण्णवाचे जख्ख म्हातारे होते. त्या मानाने मी ज्युनिअर. वयाने कमी. केवळ त्र्याऐंशीचा. त्यांच्यासारखा बैठा वृद्ध नाही, तर चालता फिरता. त्यामुळे ओळख झाल्यावरही त्या बाकांवर मी कधी बसलो नाही. त्या आजोबांच्या गप्पांमध्ये कधी फारसा सामील झालो नाही. त्यांच्यापेक्षा वयाने लहान म्हणून त्या आजोबामंडळातले सर्वांत पिकलेले ज्येष्ठ सभासद पंच्याण्णवचे नाना मी आलो की हात उंचावून माझे स्वागत करीत.

“वेलकम, यंग ओल्ड मॅन...”

मग सगळ्या कवळ्या हसून बाकावर हात थोपटत मला बसण्याचे आमंत्रण देत. पण मी कधी ते स्वीकारले नाही. उभ्या उभ्या हवापाण्याचे चार शब्द बोलून मी पुढे चालू लागायचो. मात्र तेवढ्या वेळातही त्यांचे

बोलणे माझ्या कानावर पडे ते आपले सतत तब्येतीबद्दलचे. त्यांच्या बोलण्याचा दैनंदिन अटळ विषय म्हणजे एकमेकांच्या तब्येतीची चौकशी आणि त्यातून निघणारा संवादाचा सूर एकच, प्रकृतीच्या तक्रारी.

नमुनाच सांगायचा झाला तर एकदा असाच त्यांच्या बाकासमोर नेहमीसारखा अल्पविराम केला. तर तेवढ्यात बापूंनी बेडपॅन घेतल्यासारखा कडवट चेहरा केला.

“दोन दिवस झाले शौच्यानंद नाही मिळाला.”

“शौच्यानंद?” मी बुचकळ्यात पडलो.

“अहो, दोन दिवस पोट साफ नाही झालं त्यांचं. सकाळी उठून पोट साफ झालं की तो शौच्यानंद.” तात्यांनी हसत हसत परस्पर खुलासा केला.

“तुम्ही आपले शौच्यानंदाचं कसलं कौतुक करताय बापू? मला तर सारखा आपला शौच्यानंदच. संग्रहणीनं पीडलो आहे ना मी? शंभर वेळा जाऊन आलो तरी आपली भावना कायम! इतके वेळा देवाचं दर्शन घेतले असतं तर देवदेखील प्रसन्न झाला असता. आहात कुठं?” आबांनी बापूंपेक्षा वरचा सूर लावला.

“अरे आबा तू शंभर हेलपाटे तरी घालू शकतोस. तेवढी ताकद आहे तुझ्या पायात अजून. पण मी या पार्कीन्सनने अगदी हैराण झालो आहे. चालताना पाय लटपटतात. तोल जातो. आधाराशिवाय एकदाही जाता येत नाही. तर शंभरदा जायची गोष्टच सोड. इथेही येतो तो मला सांभाळणाऱ्या बाईच्या सोबतीने. आता ती न्यायला येईल तेव्हा तिच्या आधारानं घरी जायचं. असा हा माणसाचा पुत्र या जगती पराधीन झाला आहे.” अप्पांनी आबांवर कुरघोडी केली.

“अरे लेको, तुम्ही शौच्यानंद, संग्रहणी आणि पार्कीन्सनचं तुणतुणं लावलय! पण मी काय भोगतोय ते माझं मला माहीत. गॅसेस, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी नुसता बेजार झालो आहे. भूक म्हणून लागत नाही. खाल्लेलं काही पचत नाही. जगणार कसा माणूस सांगा?” तात्यांनी मोठाला करपट ढेकर देत इतरांचं म्हणणं हातानंच उडवून लावलं.

“तुमची सगळी दुखणी असून तुम्ही सगळे रात्रभर सुखाने झोपताहात तरी. पण मी आपला रात्रभर भुतासारखा जागा. कितीही गोळ्या घ्या. डोळ्याला डोळा म्हणून लागत नाही. रात्रभर जागरण नि दिवसभर पेंग नि डुलक्या. आमची सूनबाई म्हणते सासरे कायम नाईट ड्यूटीवर असतात. रात्री सतत त्यांचा आपला घुबडासारखा पहारा. काऽऽय?” दादांनी डोळे मिटून प्रचंड जांभई देत ‘काय’ इतका लांबवला की त्यातला ‘य’ उमटलाच नाही.

इतका वेळ गप्प असलेले नाना हातातली काठी सावरून जरा ताठ बसले.

“तुमचं सगळ्यांचं एकदाचं रडून झालं का? अरे लेको, तुम्ही एकेका दुखण्यासाठी कुरकुरता आहात. तुम्हा सगळ्यांची सगळी दुखणी एकत्र करा. त्याची एक गोळी करा. किती जालीम होईल ती? अशी पॉवरफुल गोळी मी रोज गिळतो आहे नि दिवस काढतो आहे. आता बोला!” पंच्याण्णवच्या नानांनी सगळ्यांच्या तक्रारी एका झटक्यात गुंडाळल्या आणि ‘जितं मया’ अशा आवेशात टाळीसाठी काटकुळा हात पुढे केला.

मी बाकासमोर थोडावेळ थांबलो की त्या पिकल्या पानांच्या प्रकृतीच्या कुरबुरींची ‘तू -तू- मैं- मैं’ बहुधा रोजच ऐकत होतो. मुकाट्याने काही न बोलता त्यांच्याकडे बघत होतो. ती वठलेली शरीरे, पण अजूनचालती बोलती. वाळलेले चेहरे पण अजून हलते सरकते. त्यांच्या प्रकृतीच्या गाऱ्हाण्यांचे गीतापठण दिवसाआड तरी माझ्या कानांवर पडत होते. त्यांचे नियमित पारायण असह्य झाले तसे एक दिवस मला राहवले नाही. फारसा परिचय नसतानाही मी थोडी सलगी केली. म्हणालो,

“हे बघा, आपण एक ठराव करूया का?”

“ठराव? कसला ठराव? ” अचानक सगळ्या शुभ्र भुवया उंचावल्या.

फक्त नानांच्या डोळ्यात मिस्कील हसू तरळत होते. त्यांनी तेवढी खोचक टिपणी केली. “अहो, हे अनेक वर्षे साहित्य परिषदेत अध्यक्ष होते ना? ” जिथे जातील तिथे ठराव करायची सवय लागली आहे यांना.” सगळे एकजात हसले. पण मी नेटाने पुढे बोललो.

“ठराव असा की यापुढे इथे प्रकृतीबद्दल कोणी बोलायचे नाही. तब्येतीची तक्रार करायची नाही. चौकशी करायची नाही. चर्चा करायची नाही. ”

“का बरं? का नाही बोलायचं आम्ही आमच्या तब्येतीबद्दल?” अप्पांनी काठी आपटत विचारले.

“हो. का नाही बोलायचं? वा रे वा” बाकीच्यांनीही जरा जोषात अप्पांची री ओढली.

सगळ्यांचा पवित्रा थोडा आक्रमक होता. पण मी माघार घेतली नाही.

“कशाला बोलायचं? का म्हणून बोलायचं? अहो, तुम्ही सगळे आता शंभरीकडे वाटचाल करता आहात. ”

“शंभरीकडे?” सगळे थोडे कोड्यात. ‘काय म्हणायचं तरी काय आहे या गृहस्थाला’, असे प्रश्‍नांकित चेहेरे .

“मग? सांगतो काय? सेंच्युरी मारणार आहात तुम्ही सगळे. नानांना तर फक्त पाच धावा काढायच्या आहेत. त्या काढल्या की ते गावसकर. त्या पाठोपाठ बापू. आठ धावा काढल्या की ते तेंडुलकर. आहात कुठे? ” मी अगदी वेगळीच चाल खेळलो. त्यामुळे तो सगळा वृद्ध ताफा गप्प झाला.

त्यांना काय बोलावे ते कळेना. ते सगळे अर्धवट खुशीत नि अर्धवट दुग्ध्यात. ती संधी साधून मी घोडे पुढे दामटले. म्हणालो,

“अहो आता इतक्या मोठ्या वाटचालीत काही थोडे खाचखळगे येणारच. तब्येतीच्या कमी जास्त तक्रारी सुरू होणारच. तसा कुठलाही गंभीर आजार तुम्हाला कुणाला आहे का? कोणी काही अंथरुणाला खिळलेले नाही. या किरकोळ तक्रारी. ही दुखणी वयोमानानुसार नैसर्गिकपणे चालू राहणारच. त्यांची रोज उजळणी कशाला करत बसायचं?”

त्या वृद्ध वृंदाची अवस्था चक्रावल्यासारखी झाली. ओशाळल्या नजरेने ते एकमेकांकडे बघत राहिले. संभ्रमित आणि निरुत्तर. काही क्षण तसेच नि:शब्द गेले. मग अप्पांना एकदम उत्तर सुचावे तशी वाचा फुटली.

“अहो असं कसं म्हणता तुम्ही? आता या वयात तब्येतीबद्दल बोलणे अगदी साहजिकच नाही का? तब्येतीबद्दल बोललं की बरं वाटतं. दुखणं एकमेकांना सांगितलं की हलकं होतं. विसरायला होतं घटकाभर. मन मोकळं होतं. प्रकृतीबद्दल एकमेकांना नाही सांगायचं तर मग बोलायचं कशावर? आँ?  काय बोलायचं तरी काय? सांगा!” चष्म्याआडून डोळे वटारून बघत अप्पांनी काठी आपटून मला आव्हानच दिले. ‘मोठा आला शहाणा आम्हाला सांगणारा’ असा भाव त्यांच्या मुद्रेवर होता. मला निरुत्तर केल्याच्या आविर्भावात जणू विषय संपला अशी त्यांनी मान डावी उजवी फिरवली.

पण मी निरुत्तर होणार नव्हतो. मी ठामपणे म्हणालो, 

“अप्पा, स्वतःच्या दुखण्याशिवाय कशावरही बोला. हजार गोष्टी आहेत. आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या असतील. गमतीदार आठवणी असतील, आनंदाचे प्रसंग असतील ते सांगा. रोज जगात काहीतरी घडतंय. त्याबद्दल बोला.” मी थोडा थांबलो. तेही सगळे स्तब्ध होते. काहीसे दिङ्मूढ.

“पण मी काय म्हणतो”, मी पुढे बोलू लागलो.

“काऽऽय?”आता ‘हा आणखी काय अक्कल पाजळतोय’ अशा संशयाने बाकावरून कोरसमध्ये प्रश्‍न उठला.

“मला सांगा. काही अगदी बोलायलाच हवं का? पंधरा वीस मिनिटे तुम्ही इथे येऊन बसता. फार तर अर्धा तास. नुसतं बसून राहा ना. आजूबाजूला बघावं. पलीकडे गणपतीचे मंदिर आहे. चौकात चहाची टपरी आहे. समोरच्या फुटपाथवर दोन बाक आहेत. मंदिरात, चहाच्या टपरीवर येणारी जाणारी माणसं पहा. बाकावर बसलेली माणसं बघा. रस्त्यावर फिरणारी मंडळी पहा. तुमच्या मागच्या औदुंबराच्या झाडावर पाखरांना जाग आलेली आहे. त्यांची किलबिल ऐका. नाहीतर पूर्वेला तो पहा बालसूर्य उगवला आहे. त्याच्या कोवळ्या उन्हात नुसते स्वस्थ बसून रहा. थोडावेळ डोळे मिटून. स्वतःला विसराल बघा. स्वतःचे शरीर विसराल. दुखणे विसराल. निदान काही क्षण तरी.”

मी असलं काही बोलेन इतकं लांबलचक भाषण ठोकेन याची त्या आजोबांपैकी कोणालाच कल्पना नव्हती. खरेतर मलाही ती नव्हती. दोन्ही बाक आपली बोळकी वासून माझ्याकडे टकमका बघत राहिले. अवाक्. सुन्न. मी जे काही बोललो 

त्यामुळे ते जसे चकित झाले होते. 

तसाच मीही. ते जसे थोडे अवघडले 

होते तसाच मीही. ते जसे थोडे खजिल झाले होते, तसाच मीही थोडा संकोचलो होतो. पण मी बोलून गेलो होतो. 

त्यांच्यावर उघड उघड आगंतुक मारा केला होता. माझ्याही नकळत. 

अचानक आणि बेधडक.

त्या आजोबा 

मंडळाचे व्याधीग्रस्त व्यग्र विश्व विस्कटून टाकले होते. तरी पण त्यांनी माझे बोलणे ऐकून घेतले होते. अचंब्याने तरी निमूटपणे. माझ्याकडून बाण सुटला होता. तो कसा, कुठे, किती आणि केव्हा लागतो एवढाच प्रश्‍न होता. पण त्याच्या उत्तराची वाट मी पाहिली नाही. आमच्यामध्ये एक अबोल अशांत तणाव निर्माण झाला होता. त्याचा भंग मी केला नाही. मी पुढे काहीच बोललो नाही. तेही सगळे निःशब्द होते.

माझी वेळ झाली होती. खरेतर थोडा उशीरच झाला होता. निघण्यापूर्वी मी एवढेच म्हणालो,

“पहा, जमतंय का ?”

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारखाच सूर्यदर्शन घेण्यासाठी मी त्यांच्या बाकांपुढून जाऊ लागलो. सगळे आजोबा उपस्थित होते. मी हसून हात वर केला. पुढे जाणार तोच नानांचा आवाज आला.

“यंग ओल्ड मॅन. तुमचा ठराव मंजूर! ”

“मंजूर?” मी थबकलो.

“एकमताने.”

सगळ्या आजोबा मंडळाने काठ्या उंचावत एक मुखी गजर केला. तसे रस्त्यावरच्या फिरायला जाणाऱ्या दोन चार जणांनी चमकून पाहिले. मागच्या औदुंबरावरचे काही पक्षी भुर्रकन 

आकाशात उडाले.

संबंधित बातम्या