माझे अवकाश मला दे... 

ऋता बावडेकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

सहजच...
 

काही वर्षांपूर्वी, म्हणजे २००४ मध्ये रेखाने पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्ताने प्रसिद्ध झालेली तिची एक मुलाखत अजूनही स्मरणात आहे. विशेषतः, तिचे एक उत्तर! मुलाखतकर्त्याने तिला एक प्रश्‍न विचारला, ‘अमिताभ बच्चन यांनी तुम्हाला दिलेली आतापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती?’ तिने तात्काळ उत्तर दिले, ‘डिस्टन्स.. अंतर... आणि त्याबद्दल मी त्यांची मनापासून ऋणी आहे. कारण तसे झाले नसते, तर नायिकाप्रधान, अर्थपूर्ण चित्रपट निवडण्याची संधीच मला मिळाली नसती. सर्वोच्च व्यक्तीच्या सावलीत जगताना अर्थहीन भूमिका करण्यावाचून मला गत्यंतरच राहिले नसते.. गमतीचा भाग बघा, आजची मुले - तरुण याच ‘डिस्टन्स’साठी भांडताना दिसत आहेत. त्यांना त्यांची ‘स्पेस’ हवी आहे.. मी भाग्यवान, मला ती आयती मिळाली.. न मागता, अगदी भरभरून...’ 

या उत्तरात आपले मनच तिने एका अर्थाने मोकळे केले आहे. तेव्हापासून.. खरे तर त्या आधीपासूनच हा ‘स्पेस’ किंवा ‘अवकाश’ शब्द मला त्रास देत होता. त्याबद्दल कुतूहल वाढत होते. काय असते ही स्पेस - हा अवकाश? त्याची आपल्याला इतकी आवश्‍यकता का असते? आणि त्याचे महत्त्व आताच का? त्याशिवाय जगताच येत नाही का? तसे असेल, तर मग आधीचे लोक काय करत असतील? 

प्रश्‍न, प्रश्‍न आणि फक्त प्रश्‍नच... शब्दांचे अर्थ कळत होते, पण जगण्यातला त्यांचा संदर्भ लक्षात येत नव्हता. रेखाच्या उत्तरात तो काही प्रमाणात आहे. पण इतरांच्या आयुष्यात अवकाशाचा संबंध काय? महत्त्व काय? खरे तर इतका विचार करण्याचीही गरज नव्हती - नाही. आपण किंवा अगदी थोडेफार कळायला लागलेले मूल जेव्हा म्हणते, मला माझे काम करू दे, लुडबूड करू नकोस. ही लुडबूड करणे म्हणजे स्पेस नाकारणे आणि न करणे म्हणजे स्पेस देणे, इतका सोपा अर्थ या शब्दाचा - संकल्पनेचा आहे. पण तो प्रत्यक्षात आणणे अनेकांसाठी तितकेच अवघड आहे. किंबहुना त्यांच्यावर आकाश कोसळल्यासारखेच ते आहे. याचे कारण, आपला भोवताल, आपल्या आजूबाजूचे वातावरण... विचार करू, उत्तर सापडेल, तसा गुंता अधिकच वाढत होता. त्यामुळेच हा शब्द त्रास देत असावा. 

परदेशातले माहिती नाही, पण आपल्याकडे हा ‘अवकाश’ पूर्वीपासूनच नाकारण्यात आला आहे; ‘नाकारण्यात’ म्हणण्यापेक्षा हे काय प्रकरण आहे, हेच आपल्याला खूप उशिरा कळले आहे. याचा अर्थ पूर्वी असे काही नव्हते असे नाही, तर त्याची जाणीव नव्हती असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे याबद्दल कोणी काही बोललेच तर ‘आम्ही काय असेच ‘मोठे’ झालो का?’ असे म्हणून त्याची बोळवण केली जायची. जिथे मुलग्यांची ही अवस्था, तिथे मुलींची काय गत असणार? जग जेव्हा जवळ येऊ लागले, तिथल्या चालीरीती - तिथले व्यवहार समजू लागले, तेव्हा या ‘अवकाशा’ने उचल खाल्ली.. नंतर नंतर तर या ‘स्पेस’ची मागणीच होऊ लागली. कारण ज्या खास आपल्या आहेत, अशा गोष्टी आपल्याला नाकारण्यात येत आहेत, याची जाणीव झाली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे तिथून सुरुवात होते.. काय करावे, काय घालावे, कुठे जावे-कुठे जाऊ नये इथपासून हे प्रकरण सुरू होते, ते - कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणते शिक्षण घ्यावे, कोणाबरोबर लग्न करावे, कुठली नोकरी करावी, इथे राहावे की परदेशात जावे... असे कुठेही जाऊन ते पोचते. तरुण जात्याच बंडखोर असतात, या वृत्तीचे पुढे काय होते हा भाग वेगळा, पण तरुणपणी ते तसे असतात. त्यामुळे वर उल्लेखिलेल्या मुद्द्यांवरून किंवा त्या व्यतिरिक्त मुद्यांवरून मतभेद, वाद ठरलेले असतात आणि ‘अवकाशा’ची ठिणगी पडते. केवळ मुलगे किंवा पुरुषच नाही, आता तर आपली ‘स्पेस’ जपण्यासाठी महिला - तरुणीही एकट्या राहू लागल्या आहेत. त्यांना ती मिळते का, हा वेगळा मुद्दा. पण किमान त्या तसा प्रयत्न करताना दिसत आहेत. ही स्पेस केवळ घरचेच नाही, समाजही अनेकदा नाकारताना दिसतो. मग संघर्ष अटळ ठरतो. आपला अवकाश मिळवण्याची ती किंमत असते. 

सगळे प्रयत्न करून आपले उद्दिष्ट साध्य केले, की प्रश्‍न उरतो आपली स्पेस आपण व्यवस्थित वापरतो आहोत ना; तसेच आपल्या सहवासातील लोकांनाही त्यांची स्पेस वापरू देत आहोत ना! फार मोठी जबाबदारी असते ही. म्हणूनच अवकाश मिळवणे हे काय प्रकरण आहे, ते नीट समजून घ्यायला हवे आणि तसे वागायला हवे. 

थोडक्‍यात, ‘एकत्र’ ‘एकत्र’च्या आग्रहामुळे मने घुसमटू लागली. स्वतःचे अस्तित्वच नसल्याचा अनुभव त्यामुळे अनेकांना येऊ लागला. अनेकदा करायचे फार काही मोठे नसते, पण मनाप्रमाणे करता येत नाही, वागता येत नाही ही भावना छळत राहते. एकत्र राहण्याला, काही करण्याला कोणाचा फारसा विरोध नसतो. पण त्या नावाखाली कोणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालत आहे, आपल्या विचारांवर कब्जा करू पाहात आहे, या गोष्टी सहन होत नाहीत. मग मतभेद सुरू होतात. वाद सुरू होतात.. आणि ‘स्पेस’ची मागणी होऊ लागते. 

केवळ मुलांचेच (म्हणजे मुलींचेही) हे प्रश्‍न नसतात, तर सासू-सून किंवा मोठ्यांचे वादही अनेकदा यातूनच उद्‌भवत असतात. एक आपले हक्क सोडायला तयार नसते, तर दुसरीला आपल्या मनाप्रमाणे आपला संसार उभा करायचा असतो. चुकत कोणाचेच नाही, असे म्हणण्यात अर्थ नाही. एका कोणाचे किंवा दोन्ही बाजूंचे थोडे थोडे नक्कीच चुकत असते. पण इगो - अहं आडवा येतो. जमवून घेणे हा पर्याय असतो, पण याचा अर्थ दोन्ही बाजूंनी जमवून घ्यायला हवे असते. नाहीतर ‘स्पेस’चा हा गुंता प्रचंड वाढत जातो आणि एक दिवस त्याचा स्फोट होतो. 

वयाप्रमाणे प्रत्येकाने आपापली इनिंग खेळलेली असते. ती खेळी कदाचित मनासारखी झालेली नसेलही, पण याचा अर्थ पुढच्या खेळाडूला आपल्या मनाप्रमाणे खेळायला लावणे नव्हे. तसे केले तर ती साखळी कधी संपणारच नाही. त्यापेक्षा मोठ्या मनाने बाजूला व्हावे. आपली पुढची खेळी आपल्या मनाप्रमाणे खेळावी. 

या अवकाशावर असा विचार करताना लक्षात आले, वाटते तितकी ही संकल्पना अवघड, गुंतागुंतीची नाही. फक्त तिच्याकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे. आपल्या मुलामुलींना स्वातंत्र्य दिले, तर ते चुकीचेच वागतील ही भीती मनातून काढून टाकावी. खरे तर ही मुलांबद्दल नव्हे, तर स्वतःबद्दलच स्वतःला वाटत असलेली असुरक्षितता असते... आणि केवळ मुलांनाच नव्हे, तर आईवडिलांनाही या अवकाशाची गरज असते. 

माणूस कितीही समाजप्रिय असला, माणसांची त्याला सोबत लागत असली, ओढ वाटत असली, तरी कधी तरी एकटे राहावे, स्वतःशी संवाद साधावा, असे त्याला वाटतेच. पण गंमत म्हणजे, स्वसंवादाला अनेक जण घाबरतात. याचे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकेल.. खरे तर यापेक्षा चांगला संवाद दुसरा कोणताही नाही असे माझे मत आहे. 

तर हा अवकाश, ही स्पेस किती हवी, किती वापरायची हा प्रत्येकाचा प्रश्‍न आहे. पण अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला कधी ना कधी ती आवश्‍यक आहे एवढे नक्की. 

हा विषय मनात घोळू लागला तेव्हापासून प्रकाश होळकर यांची एक कविता मनात रुंजी घालत होती... ‘माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ मला...’ असे म्हणत म्हणत शेवटी कवी म्हणतो, ‘माझं आभाळ तुला घे, तुझं आभाळ ‘तुला’... हाच तो ‘अवकाश’ नव्हे ना?

संबंधित बातम्या