व्हॉट्‌सॲप बाबा 

ऋता बावडेकर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

सहजच...
 

‘मैत्रीचे झाड’.. हे असे झाड आहे, जे कधी वाकत नाही, तुटत नाही, कोमेजत नाही, जीवनात वादळे आली तरी सावरायला मदत करते.. तीच खरी मैत्री... 

ही अशी सुभाषिते, वचने, सुविचार.. वगैरे ‘व्हॉट्‌सॲप बाबा’ पाठवत असतात. म्हणजे पाठवणारे आपणच कोणी असतो, माध्यम व्हॉट्‌सॲपचे! 

व्हॉट्‌सॲपचे प्रस्थ गेल्या काही वर्षांतले; पण ते इतके वाढले आहे, की त्यापूर्वी आपण काय करत होतो, आयुष्य कसे जगत होतो, अशा सुविचार वगैरेंशिवाय आयुष्यातील समस्यांमधून कसे मार्ग काढत होतो.. असे प्रश्‍न पडू लागले आहेत. वर उल्लेख केलेली पोस्ट कोणी पाठवली नसती, तर आपल्याला मैत्रीचा अर्थ तरी कळला असता का, या विचाराने अंतर्मुख वगैरे व्हायला झाले. 

हे व्हॉट्‌सॲप बाबा विनोदी वगैरे पोस्ट्‌सपण पाठवतात; पण ‘टवाळा आवडे विनोद’ अशा भावनेने! त्यांचा भर असतो गंभीर वगैरे तत्त्वज्ञान सांगण्याचा; तुमच्यावर संस्कार करण्याचा, थोडक्यात तुम्हाला ‘अक्कल’ शिकवण्याचा. 

एखादा पुलंच्या ‘सखाराम गटणे’ टाइप्सचा अपवाद असला तर असेल; पण अशा पोस्ट्‌स तरुण मुलेमुली क्वचितच करत असतील, असे वाटते. मात्र, त्यांनी अशा पोस्ट्‌स पाठवल्या तर एकवेळ समजण्यासारखे आहे. त्यांचे वय, त्यांचा अनुभव, त्यांचे ज्ञान बघता ते पटण्यासारखेही आहे. पण ज्यांनी आयुष्यातील बऱ्यापैकी उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत असे लोक त्यांच्यासारख्याच ‘अनुभवसमृद्ध’ समवयीनांना जेव्हा असे बोधामृत पाजत असतात, तेव्हा गमतीपलीकडे काही वाटत नाही. आयुष्यात कसे वागावे, नाती कशी जपावीत वगैरे गोष्टी पन्नाशी-साठीची माणसे अशा पोस्टींमार्फत त्यांच्याच किंवा त्यांच्या आगे-मागेच्या वयाच्या लोकांना सांगू लागतात तेव्हा सगळे प्रकरण कीव करण्यापलीकडे गेलेले असते. 

गंमत पुढेच आहे.. एकदा मला असाच एक मेसेज आला, वैतागून ‘अरे हे काय पाठवलंयस?’ असा उलट मेसेज केला. तेव्हा, ‘सॉरी हं.. चुकून आलेला दिसतोय, मी वाचला नाही..’ असे उत्तर आले. म्हणजे, आपण काय फॉरवर्ड करतो आहोत, हेही अनेकांना माहिती नसते. आला मेसेज की कर फॉरवर्ड... एखाद्या ग्रुपवर असाल, तर एकच मेसेज अनेकजण पाठोपाठ फॉरवर्ड करतानाही दिसतील. सांगितले - म्हणजे तसे लिहिले तरी तुमचा मेसेज वाचण्याचे सौजन्यही कोणी दाखवत नाही. बहुतेक पुढचा मेसेज फॉरवर्ड करण्याच्या घाईत ते असतात.. 

अर्थात, हे ‘बाबा’ असलेच ज्ञान देत नाहीत. खूप माहिती देतात.. अनेकदा त्या माहितीची शहानिशा करावी, म्हटले तर ती करता येत नाही. कारण तसे काही अस्तित्वातच नसते. एक उदाहरण, खूप दिवसांपूर्वी लिंबाचे आरोग्यपूर्ण फायदे, अशा आशयाची पोस्ट सगळीकडे फिरत होती. पोस्टचे वैशिष्ट्य म्हणजे, ही माहिती डॉ. प्रकाश आमटे यांनी दिलेली आहे, असे त्यात म्हटले होते. केवळ व्हॉट्‌सॲप नव्हे, तर फेसबुक वगैरे सर्व समाजमाध्यमांवर ही पोस्ट ठळकपणे दिसत होती. लिंबाचे फायदे आणि तेही डॉ. आमटे सांगतायत म्हटल्यावर अनेकांनी त्यावर विश्‍वास ठेवला आणि त्याचवेळी ‘ही माहिती मी दिलेली नाही’ असे डॉ. आमटे यांनी जाहीर केले. आता? अशा पोस्ट्‌सवर शंका घेणे यानंतर सुरू झाले. पण काही ‘भाबडी’ मंडळी अजूनही भक्तिभावाने अशा पोस्ट्‌स पाठवत राहिल्या आहेत. मधूनच चुकारपणे हीच पोस्ट पुन्हा येतेच. 

हे असे फॉरवर्डस नेमके कोण करते? एवढे अगाध ज्ञान त्यांना कुठून मिळते? अशा पोस्ट्‌स तयार करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात, की आपल्या मोकळ्या वेळेचा ते सदुपयोग (?) करत असतात?... खरेच संशोधनाचा विषय आहे. सणांच्या काळात तर अशा पोस्ट्‌सना बहरच येतो. शोधून शोधून प्रत्येक सणाची माहिती काढलेली असते. ती वाचून आपल्या अज्ञानाबद्दल वाईटच वाटते. राजकारण, समाजकारण, मनोरंजन, शिक्षण, आरोग्य.. असे कुठलेही क्षेत्र, विषय अशा फॉरवर्डसना वर्ज्य नाही. ‘विषय द्या पोस्ट तयार’ असा जणू कारखानाच असतो... आणि इतक्या अधिकारवाणीने त्या लिहिलेल्या असतात, की माहितगारही काही क्षण बुचकळ्यात पडावा! 

खरे तर तंत्रज्ञानाने जगाची कवाडे आपल्यासाठी खुली केली आहेत. त्याचा योग्य उपयोग करायचा, तर अशा बिनबुडाच्या पोस्ट्‌स आपण तयार करत आहोत. अनेकजण तर ‘व्हॉट्‌सॲपवर आले आहे,’ असा दाखलाही देतात. जग कुठे चालले आहे, आपण कुठे चाललो आहोत... पन्नाशी-साठीची माणसे अशा पोस्ट्‌स फॉरवर्ड करण्यात आघाडीवर दिसतात, तेव्हा काहीतरी चुकते आहे, याची जाणीव होते. ‘मधुर वाणी घरकी धनदौलत है, और शांती घर की महालक्ष्मी है’ हे असले तथाकथित सुविचार फॉरवर्ड करणे आपल्या वयाला शोभते का? मुख्य म्हणजे, हे सुविचार वगैरे आपण प्रत्यक्षात आणतो का? आणत असू तर अजूनही वाद, भांडणे का होतात? याचे कारण अशा वचनांचा आणि प्रत्यक्ष कृतीचा काहीही संबंध नसतो. हे टाइमपासच असते. पण असा निरर्थक टाइमपास काय कामाचा? 

‘व्हॉट्‌सॲप बाबा’ हे आपल्याला कधीही सांगणार नाही. कारण त्याला ‘फीड’ केल्याशिवाय तो आपल्याला काही सांगूच शकत नाही आणि ‘फीड’ तर आपणच करणार ना!.. म्हणून आपणच ‘मोठे’ व्हायला हवे... मी पण अक्कल शिकवली का?

संबंधित बातम्या