निःशब्द संवाद 

ऋता बावडेकर
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सहजच...
 

अनेकदा बेशिस्तीमुळेच ट्रॅफिक जाम होत असतो. वाहनांची वाढलेली संख्या, फेरीवाले, रस्त्यांची कामे, खड्डे वगैरे गोष्टी पूरक असतात. त्या दिवशीही असाच ट्रॅफिक जाम झाला होता. मुंगीच्या पावलानेही वाहने पुढे सरकत नव्हती. खरे तर मुंग्या झपाझप चालतात, पण असे म्हणण्याची पद्धत आहे.. तर सगळे जागच्याजागी स्थिर होते. मी उगाचंच इकडे तिकडे बघत होते आणि एका दृश्‍यावर माझी नजर स्थिर झाली... 

समोरच्या बसस्टॉपवर काही शाळकरी विद्यार्थी होते. त्या मुलामुलींच्या गप्पा सुरू होत्या. त्यांच्या गप्पा अगदी रंगल्या होत्या. कोणी स्मितहास्य करत होते, कोणी खळाळून हसत होते, कोणी परस्परांना टाळ्या देत होते, कोणी हावभाव करून काय काय बोलत होते... भान हरपून त्यांच्या ‘गप्पा’ सुरू होत्या. मीदेखील सगळी परिस्थिती विसरून मन लावून त्या ‘गप्पा ऐकत’ होते. पण काहीच आवाज येत नव्हता... ट्रॅफिकचा, गाड्यांचा, त्यांच्या हॉर्नचा आवाज म्हणावा, तर तो केव्हाच ऐकू येईनासा झाला होता. मग या गप्पा का ऐकू येत नव्हत्या? कारण ही मुले बोलतच नव्हती. हावभाव, हातवारे यावरच त्यांचा संवाद सुरू होता.. रंगला होता. त्यांना शब्दांची, आवाजाची गरजच नव्हती. ते आपल्यांतच तल्लीन झाले होते.. आणि त्या क्षणी त्यांच्या त्या तल्लीनतेत मीही सहभागी झाले होते; माझ्यासारखे आणखी किती झाले असतील ठाऊक नाही. गप्पांचा विषय काय होता, ते कशावर बोलत होते मला काहीही माहिती नव्हते - त्याची गरजच नव्हती; इतका सुरेख संवाद सुरू होता. त्यांचे ‘बोलणे’, टाळ्या देणे, ‘खळखळून’ हसणे, दाद देणेच मोहवून टाकत होते... जवळच्याच कर्णबधिर शाळेतील हे विद्यार्थी होते, हे थोड्याच वेळात लक्षात आले. नंतर किती वेळ त्यांच्या या ‘गप्पा’ सुरू होत्या माहिती नाही, कारण ट्रॅफिक सुरू झाल्यामुळे मी पुढे सरकले. पण हा ‘निःशब्द संवाद’ आजही माझ्या स्मरणात ताजा आहे. आजही त्या रस्त्याने जाता-येताना माझे त्या बसस्टॉपकडे लक्ष जाते, थोडेच पुढे असलेल्या त्या शाळेकडे लक्ष जाते. कधी ही मुले दिसतात, पण त्यावेळी वाहनांचा, आपला वेग इतका असतो की त्यांच्याकडे तितकेसे लक्ष देता येत नाही. या गप्पा ‘ऐकण्या’साठी वेळच हवा. त्याशिवाय त्याचा आनंद कसा घेणार? 

याचा अर्थ ही मुले रिकामटेकडी असतात वगैरे असा अजिबात नाही. पण आपल्यापेक्षा त्यांचा संवाद फार वेगळा असतो. कदाचित आपलेच विषय ते ‘बोलत’ असतील, पण त्यांचे ते ‘बोलणे’ ऐकत-बघत राहावेसे वाटते.. त्यासाठी वेळ तर हवाच ना! अलीकडच्या काळात क्वचितच ‘तंद्री लागते’; त्या दिवशी या मुलांमुळे माझी अशी तंद्री लागली होती. भानावर आले, तेव्हा एकदम फ्रेश - ताजेतवाने वाटत होते. मनोमन त्या मुलांचे आभार मानले. आता असे वाटते, आपण का नाही अशा गप्पा मारू शकत? त्यात रंगू शकत? आपले भान का नाही हरपत? असे भान हरपवणारे अनुभव वारंवार नाही, तरी अनेकदा अनुभवणारे भाग्यवान आपल्यात असतीलही; पण बहुसंख्यांना असे अनुभव क्वचितच येतात. जगण्याचा रेटाच इतका असतो, की अशा गोष्टींसाठी आपल्याकडे वेळच नसावा? आपण तो काढूही शकत नसावेत? खरे तर असे काही नसते, ठरवले तर आपण सगळे काही करू शकतो, पण इच्छाशक्ती हवी. कोणी म्हणेल, ती मुले तरी कुठे रोज अशा ‘गप्पा मारत’ असतील! कदाचित नसतीलच, पण म्हणून आपण गप्पा मारू नये असे कोणी सांगितले? अमुक कोणी काही करते म्हणून आपणही करावे असा इथे मुद्दाच नाही, तर चार घटका आपल्या हव्यात. आपण त्या मुद्दाम काढाव्यात. आपल्या लोकांबरोबर आपण त्या व्यतीत कराव्यात किंवा स्वतःबरोबरच त्या घालवाव्यात.. त्यामुळे जगण्याला उत्साह येतो, उमेद मिळते. 

त्या मुलांच्या ‘गप्पा’ आठवताना मनात आले, त्यांना आवाजाची आवश्‍यकताच नव्हती; असली तरी ते शक्‍य नव्हते. पण आयुष्यात ‘आवाज’ खरेच इतका महत्त्वाचा असतो का? याच विषयावर काही वर्षांपूर्वी मनोज कुमारने ‘शोर’ नावाचा चित्रपट काढला होता. त्यातील बाकी फापटपसारा सोडून द्या, पण विषय फार महत्त्वाचा आणि चांगला होता. तर आवाज महत्त्वाचाच असतो. ज्यांना तो लाभत नाही, त्यांना त्याचे मोल माहिती. पण म्हणून ज्यांना ही शक्ती प्राप्त आहे, त्यांनी त्याचा दुरुपयोग करावा का? आपल्याला हवा - अर्थात हेही सापेक्षच आहे, कारण मला पुरेल तेवढा आवाज इतर कोणाला पुरणार नाही. त्याची गरज त्यापेक्षा अधिक किंवा कमी असू शकेल. पण तेही त्याने स्वतःपुरतेच ठेवले तर अधिक चांगले ना! सणासमारंभांना स्पीकरच्या भिंती लावून आपल्या आवाजाची गरज भागवताना इतरांना त्रास देण्याचे काहीच कारण नाही आणि गरजही नाही. 

पण हे सर्रास चालते. कोणी सांगायला गेलेच, तर ‘भावनां’चा प्रश्‍न निर्माण होतो. त्यातून वाद वाढू शकतात. त्याचे पर्यवसान कशातही होऊ शकते. या सगळ्या पार्श्‍वभूमीवरच त्या मुलांचा ‘निःशब्द संवाद’ फार मोलाचा वाटतो. फार कशाला आपलाही कधीतरी, कोणाबरोबर तरी असा ‘संवाद’ होऊच शकतो - होतही असतो. ‘या हृदयीचे त्या हृदयी’ ते हेच की... प्रत्येकवेळी हे प्रकरण प्रियकर-प्रेयसी किंवा तत्समच असावे असे नाही. हा संवाद कोणाबरोबरही होऊ शकतो, अगदी स्वतःबरोबरही होऊ शकतो आणि तो ठरवून होत नाही.. तो होतो, इतके खरे!

संबंधित बातम्या