आई कुठे काय करते? 

ऋता बावडेकर
सोमवार, 2 मार्च 2020

सहजच...
 

एका मालिकेतला ‘आई कुठे काय करते?’ हा संवाद काही दिवसांपूर्वी प्रचंड गाजला. इतका की अनेकांनी तो व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर जपून ठेवला, अनेकांना पाठवला; थोडक्‍यात हा संवाद व्हायरल झाला. त्यानंतर दुसऱ्या एका वाहिनीवर याच शीर्षकाची मालिकाच सुरू झाली. मालिकांमध्ये नेमके काय दाखवतात कल्पना नाही, पण या संवादात खूप तथ्य आहे, एवढे नक्की. 

योगायोग असा, की याच विषयावर बारा वर्षाच्या एका मुलाने काढलेले चित्रही सध्या प्रचंड गाजते आहे. या चित्राचा विषयही हाच आहे, फक्त तो प्रश्‍नार्थक किंवा उपहासात्मक नसून ‘आई काय काय करते!’ हे दाखवणारा सकारात्मक आहे. केरळचा अनुजनाथ सिंधू विनयलाल हा मुलगा बारा वर्षांचा असताना त्याने एक चित्र काढले. त्यात त्याची आई व आजूबाजूच्या महिला दिवसभर काय काय काम करत असतात, हे त्याने मोठ्या प्रभावीपणे रेखाटले आहे. चित्र तर सुंदर आहेच, पण त्याचबरोबर या मुलाची समज आणि महिलांची कामे करण्याची क्षमता आपल्याला अवाक करते. बारा वर्षांच्या या मुलाला हे सगळे जाणवावे, हे फार महत्त्वाचे आहे. या चित्राला दिल्लीच्या ‘शंकर्स ॲकॅडमी ऑफ आर्ट अँड बुक पब्लिशिंग’ या संस्थेचे बक्षीस मिळाले आहे. त्याला बक्षीस मिळाल्याचे त्याच्या आईला माहिती होते, पण प्रशस्तिपत्र आणि पदक मिळण्याआधीच त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. मात्र आपल्या आणि त्या बरोबरीने इतर ‘आयां’चा आपल्या लेकाने चित्रातून उचित सन्मान केल्याचे समाधान त्याच्या आईला नक्कीच मिळाले असेल. 

आपल्याकडे स्त्रियांना, त्यातही नोकरी वगैरे न करता घर सांभाळणाऱ्या स्त्रियांना हमखास कमी लेखले जाते. ‘ती काय करते? दिवसभर घरीच तर असते...’ हे बहुतेकांचे लाडके वाक्‍य असते. केवळ इतरच नाही, खुद्द संबंधित स्त्रीही स्वतःला कमी लेखत असते. ‘तुम्ही काय करता?’ असे विचारल्यावर ती ‘काही नाही.. मी घरीच असते’ किंवा ‘मी गृहिणी आहे’ असे मोठ्या संकोचाने उत्तर देते. वास्तविक सगळ्यात मोठी जबाबदारी ती सांभाळत असते. ‘घर सांभाळणे’ हे कोणाला कमी किंवा लहान काम वाटत असेल तर असो; पण आपल्या किमान चार-पाच नोकऱ्यांमधली जबाबदारी त्या एका कामात असते. या चित्रात त्या १२-१४ वर्षांच्या मुलाने नेमके हेच दाखवून दिले आहे. 

नोकरी करणाऱ्यांना कामाच्या किमान वेळा असतात. दिवसातले ठराविक तास कामाचे असतात. त्यासाठी त्यांना पगार, बोनस, इतर भत्ते वगैरे मिळत असते. त्यांना ठराविक सुट्या, रजा असतात. आपल्या हक्कांसाठी ते भांडू शकतात, चर्चा करू शकतात. ते थकू शकतात. घरी आल्यावर ऑफिसची बॅग फेकून देऊन आराम करू शकतात.. या तुलनेत काहीही न करणाऱ्या (?), घर सांभाळणाऱ्या, गृहिणी म्हणून स्वतःकडे (उगाचच) कमीपणा घेणाऱ्या घरातील स्त्रीला यापैकी काय मिळते? आरामाची तर तिने अपेक्षाच करू नये, कारण सगळे घर कामावर गेल्यानंतर ती काय करत असते? थोडक्यात, आराम तर करत असते! असेच गृहीत धरलेले असते ना! 

... आणि केवळ नोकरी वगैरे न करणारीच का? नोकरी करणाऱ्या महिलांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नसते. घरात राहून घर सांभाळणाऱ्या स्त्रीइतकेच कष्ट ही नोकरी करणारी महिला नोकरी सांभाळत करत असते. पण दोघींच्याही कष्टांना किंमत नसते. कारण ते तर त्यांचे कामच असते.. त्यासाठी त्या कसला मोबदला मागतात? पगार झाला की त्यांच्याकडेच तर तो दिला जातो ना? आता घरातच असतात, तर घरातले काही हवे नको पाहताना वेगवेगळी बिले भरली, बॅंकेतील किंवा इतर काही कामे केली, भाजी वगैरे आणली तर काय इतके मोठे? घरासाठीच आहे ना तेही! असले युक्तिवाद केले जातात. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कदाचित काही शब्द वेगळे असतील, पण भावना तीच! 

अर्थात, हे केवळ पुरुषच करतात असे नाही. घरातील काही महिलाही त्यांना असेच टोचून बोलत असतात. 

ही परिस्थिती कधी बदलेल? बदलेल का? असे प्रश्‍न मनात येत असतानाच अनुजनाथचे हे चित्र समोर आले. महिलांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हायला हवे, यात शंकाच नाही. पण त्याचबरोबर अनुजनाथसारखी नवी पिढी त्यांना समजून घ्यायला लागली, त्यांच्या कष्टाची दखल घ्यायला लागली, त्याबद्दल कृतज्ञ राहायला लागली, तर आणखी काय हवे? 

खरं सांगते, बायकांना कौतुकाची अपेक्षा नसते (अर्थात केलेच कौतुक, तर हरकतही नसते); पण किमान त्या जे करतात, त्याबद्दलची जाणीव तरी हवी, एवढीच त्यांची अपेक्षा असते.. माझ्या या मताशी अनेक जणी आणि जणही सहमत असतील, खात्री आहे!

संबंधित बातम्या