चौकटीतले ‘ते’

ऋता बावडेकर
सोमवार, 9 मार्च 2020

सहजच...
 

आपल्या आसपासची माणसे, काही नाती यांबद्दल आपले अनेकदा पक्के ठोकताळे असतात. उदा. आई अशीच असते. आजी अशीच असते. वडील, आजोबा असेच असतात.. वगैरे वगैरे... थोडक्‍यात, प्रत्येकवेळी स्त्री-पुरुष म्हणून नव्हे, तर ती ती नाती कशी असतील हे आपण मनाशी ठरवलेले असते. म्हणजे, मित्रमंडळींत गप्पा रंगलेल्या असतात.. बोलण्याच्या ओघात कोणीतरी म्हणते, ‘माझी आजी ना अगदी शांत होती. तिचा चढलेला आवाज मी कधीही ऐकला नाही. शांतपणे तिचे काम करत असायची. सुटीत आजोळी गेल्यावर आम्हा मुलांचे इतके लाड करायची. आमचे आवडते पदार्थ करून खाऊ घालायची..’ वगैरे वगैरे. या वर्णनाशी अनेकांचे आपल्या आजीचे वर्णन जुळायचे. ते लगेच हो हो म्हणून माना डोलवायचे.. यात चूकही काही नाही. बहुतेक आज्या अशाच असतात.. पण त्या घोळक्‍यात एकतरी असा असेल, ज्याच्या आजीचे वर्णन या वर्णनाशी जुळत नसेल! 

‘व्यक्ती तितक्‍या प्रकृती’ असे आपण उगीच म्हणतो का? एकाचीही आजी 
खमकी नसेल; जिचा घरादारावर वचक असेल? जिच्या नजरेवर संपूर्ण घर चालत असेल? घरातील तीच कर्तीधर्ती.. तिचे मुलगेच काय, पतीही तिच्या शब्दाबाहेर नसेल? अशा आज्या असणारच; नव्हे आहेतच किंवा होत्या तरी! 

याचा अर्थ त्या प्रेमळ नव्हत्या - नाहीत, असा अजिबात नाही. पण प्रेम करण्याची, दाखवण्याची त्यांची पद्धत नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असते. याचा अर्थ, आजीचे नेहमीचे वर्णन चुकीचे आहे असा नाही.. तसा गैरसमज नसावा. पण सरसकट सगळ्या आज्या तशाच असतात असे नाही. त्यांना आपण ‘त्या’ चौकटीत बसवले आहे. 

आईची प्रतिमाही अशीच आहे. त्या प्रतिमेप्रमाणेच आया असतातही, पण परत प्रत्येकीची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी. पण म्हणून त्या अधिक चांगल्या किंवा वाईट अजिबात ठरत नाहीत. एकदा ‘पेप्सिको’च्या इंद्रा नूयी म्हणाल्या होत्या, ‘आईपणाचे आपण खूप ओझे घेतो. त्यात स्वतःच्या भावनांपेक्षा ‘लोक काय म्हणतील?’ हा भाव अधिक असतो. तसेच अपराधीपणा खूप असतो. तसे असण्याचे खरे तर काही कारण नाही. कारण आईलाही तिचे स्वतःचे आयुष्य असते. ते तिने स्वतःच्या मर्जीने जगले तर काय हरकत आहे? आणि त्यामुळे ती आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करते, असे अजिबात नाही. आपणच फार बाऊ करतो...’ मी जे म्हणतेय, ते हेच - प्रतिमेत अडकणे. विनाकारणच! 

हे बायकांच्या बाबतीत झाले.. पुरुषांचे तर त्याहून वेगळेच असते. ‘खंबीरपणा’, ‘कणखरपणा’ ही लेबले आपण त्यांना इतकी घट्ट चिकटवलेली असतात, की त्यात अनेक ‘आजोबा’, ‘बाबा’ आणि इतर नात्यांचा जीव घुसमटतो. ती लेबले झुगारून टाकण्याची ताकद खूप कमी जणांत असते. आई, आजी तेवढी मायाळू आणि आजोबा, बाबा करारी, शिस्तप्रिय, कठोर.. असे का? असे स्वभाव कोणाचेही असू शकतात. यात स्त्री-पुरुष असा भेद का करायचा? त्यामुळे नात्यात काय फरक पडतो? कोणाचेही स्वभाव कसेही असले, तरी मुलांवर-आप्तांवर प्रेम करणे हा स्थायिभाव एकच असतो ना! मग एखाद्याची आजी कडक असेल आणि आजोबा प्रेमळ (म्हणजे जसे आहे, तसे ते व्यक्त होत असतील) तर त्याने कानकोंडे का व्हावे? त्या वयात कदाचित कळणार नाही, पण मोठेपणी तरी आपल्या या नातेवाईकांची स्वभाववैशिष्ट्ये कळायला काहीच हरकत नाही. ज्यांच्याकडे या भूमिका वेगवेगळ्या आहेत, असे खूप लोक कसेनुसे होताना मी बघितलेत. 

अर्थात हे फक्त केवळ याच चार नात्यांसाठी नाही. आपल्यातले प्रत्येक नाते, प्रत्येक संबंध असे चौकटीतच येतात असे जाणवते. म्हणजे आपणच ते ठरवतो आणि त्यात काही बदल झाला, तर अस्वस्थ होतो. यात दोष कोणाचा? मग चौकटीत ते असतात, की आपण? 
थोडक्यात, या भूमिका आपणच ठरवतो. या प्रतिमा आपणच तयार करतो. काळाच्या ओघात त्या इतक्‍या पक्‍क्‍या आणि बंदिस्त करत जातो, की त्यात बदल करण्याची वेळ आली की आपण भांबावतो. आपण करतो आहोत ते बरोबर आहे का, असे प्रश्‍न स्वतःला विचारतो. एक लक्षात घेत नाही, की आईबाबा, आजीआजोबा वगैरे या भूमिका उद्या आपल्याकडे येणार आहेत. अशावेळी या चौकटींत, या प्रतिमांत अडकायला आपल्याला आवडेल का?   

संबंधित बातम्या