असा गुरू होणे नाही! 

ऋता बावडेकर
सोमवार, 18 मे 2020

सहजच...
 

फेब्रुवारी-मार्चमध्ये कधीतरी कोरोनाचा भारतात प्रवेश झाला. बघता बघता या साथीने सर्वत्र पसरायला सुरुवात केली. रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढायला लागला. या साथीचा सामना करण्यासाठी इतर उपायांप्रमाणे मार्चअखेरीस पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. तब्बल २०-२२ दिवसांचा.. बाप रे! इतके दिवस कुठे जायचे नाही, यायचे नाही? केवळ आपणच नाही, सगळ्यांनीच घरात थांबायचे! कसे शक्य आहे? 

पण झाले शक्य! तसा अवधी कमी होता, जवळजवळ नव्हताच; पण सगळ्यांनी मॅनेज केले. जीवनावश्‍यक वस्तूंचा शक्य तेवढा साठा केला. सरकारनेही ही दुकाने मर्यादित वेळांसाठी सुरू ठेवलेलीच होती. सोसायट्या, कॉलनीज यांनी आपल्या आवारातच भाज्या, जीवनावश्‍यक वस्तू मिळतील यासाठी प्रयत्न केले. औषधांची दुकानेही सुरू होती. अट एकच बाहेर जायचे नाही, आवश्‍यकच असेल तर फक्त सरकारने ठरवून दिलेल्या वेळेतच जायचे. 

चौकाचौकांत पोलिसांच्या जणू छावण्याच वसल्या. गरजूंना मदत, अनावश्‍यक फिरणाऱ्यांना मनाई करणे हे त्यांचे काम सरू झाले. 

मात्र, हे लिहितो-वाचतो आहोत तेवढे सोपे नव्हते-नाही. कारण कोरोनाचे गांभीर्य बहुसंख्य नागरिकांनी समजून घेतले असले, त्याप्रमाणे स्वतःचे वर्तन ठेवले. मात्र समाजातील असे अनेक घटक होते-आहेत, ज्यापैकी, तर काही जाणीवपूर्वक काही अजाणतेपणी (?) यंत्रणेला त्रास देत होते. 

अलीकडे आपण सगळे खूपच ‘हेल्थ कॉन्शस’ झालो आहोत. त्यामुळे व्यायाम सगळ्यांच्याच दृष्टीने महत्त्वाचा विषय झाला आहे. ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्यांची संख्या तर प्रचंड आहे. पण कोरोनामुळे त्यावर मर्यादा आली. अनेक लोक शहाण्यासारखे घरांतच व्यायाम करू लागले. पण काहींना घरांच्या चार भिंती अडथळा ठरू लागल्या. मोकळे आभाळ त्यांना खुणावू लागले.. आणि त्यांनी आपला मॉर्निंग वॉक सुरू केला.. जणू कोरोनाचे विषाणू पहाटे झोपलेले असतात. या लोकांना अडवायचे कसे असा पोलिसांपुढे प्रश्‍न उभा राहिला. मग त्यांनी शक्कल लढवली. ते अशा ‘व्यायामपटूं’ना थांबवून त्यांच्याकडून योगासने, सूर्यनमस्कार वगैरे करून घेऊ लागले.  

अशी काही उदाहरणे सोडली, तर बहुसंख्य लोक मात्र प्रामाणिकपणे आपापल्या घरांत ‘बंदिस्त’ झाले होते. घरातली ‘मदत’ बंद झाल्यामुळे अनेकांनी पहिल्यांदा झाडू हातात घेतला, स्वयंपाकघरात प्रवेश केला, कपडे धुतले... वगैरे वगैरे. त्याचे रीतसर फोटो वगैरेही काढले. आपापल्या फेसबुक वॉलवर ते डकवले. कौतुक करून घेतले. अनेकांनी प्रेरणा दिली, अनेकांनी प्रेरणा घेतली आणि रोजचे व्यवहार सुरू झाले. अनेकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत ‘वॉच पार्टी’ केल्या, आपल्या चाहत्यांबरोबर संवाद साधला.. पण फेसबुकवर सगळेच सेलिब्रिटी; मग अनेकांनी आपापल्या ग्रुपपुरते कथा-काव्यवाचन केले, गप्पांची मैफिल जमवली.. कोरोनावरचे जोक्स सुरूच होते. राजकारण तर चवीला हवेच! 

असे दोन लॉकडाऊन गेले.. तिसऱ्याला मात्र थोडा धीर सुटला. त्यातच दारूची दुकाने सुरू झाली. तिथे सगळे नियम पाळून रांगा लागल्या. पण केवळ त्यामुळे नाही पण वातावरणात थोडी शिथिलता आली. त्यातच सरकारी पातळीवरील निर्णयांत एकवाक्यता दिसत नव्हती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे, रस्त्यावर गर्दी वाढली. आतापर्यंत पाळलेला संयम सुटत आला, एवढे नक्की.. 

एक दिवसाचा कर्फ्यू किंवा पहिला आणि काही प्रमाणात दुसरा लॉकडाऊन, या काळात लोकांना पक्ष्यांचे मंजुळ स्वर घरात ऐकू येऊ लागले. हवा शुद्ध झाल्याचे - प्रदूषण कमी झाल्याचे जाणवले. कधी नव्हे ते रस्त्यावरचा शुकशुकाट बरा वाटू लागला, त्यावरील फुलां-पानांची पखरण छान वाटू लागली.. ते बघून आपण भारतात आहोत, की परदेशात असेही वाटू लागले; पण हे सगळे काही वेळच! माणूस परत स्वतःत परतला. हा बंदिवास (?) आवश्‍यक असला, तरी त्याला तो जाचू लागला. काही अपवाद वगळता, स्वतःपलीकडे बघायलाच तो तयार होईना.. 

इतरांचे कशाला? मी तरी स्वतःमधून किती बाहेर पडले होते? लॉकडाऊन, कोरोना, घरातली - घरातून ऑफिसची कामे, घरातला व्यायाम... या पलीकडे मी कितीशी गेले होते? धुतलेले कपडे वाळत घालणे, वाळलेले कपडे आत आणणे; या पलीकडे आमच्या छोट्या गच्चीचा वापर नव्हता. त्या दिवशी कसला तरी आवाज आला आणि बघितले, तर नेहमी गजबजलेले मुलांचे छोटे मैदान रिकामे होते.. पण तिथली झाडे लाल, केशरी, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या अशा विविध रंगांतील फुलांनी डवरली होती. इतक्या दिवसांत मला हे दृश्‍य कधीच दिसले नव्हते, म्हणजे मी बघितले नव्हते. 

जो नियम आपल्याला तोच या निसर्गाला; पण त्याने कधी त्याचे अवडंबर माजवलेले दिसले नाही. परिस्थिती प्रतिकूल असो वा अनुकूल; निसर्ग आपल्या वागण्यात कसली कुचराई करत नाही. लॉकडाऊनच्या काळात आपण किती काय काय केले, त्या प्रत्येकाची आपण समाज माध्यमांवर कमी-अधिक प्रमाणात जाहिरात केली. पण निसर्ग कोणाला न सांगता, न सवरता आपले काम चोख करत गेला. तुमच्या कौतुकाचीही त्याला गरज नाही आणि तुमच्याकडून झालेल्या दुर्लक्षालाही त्याच्या लेखी काही किंमत नाही. कुठल्याही परिस्थितीचा स्वतःवर परिणाम करून न घेता,आपले काम करत राहणे, ही त्याची शिकवणच खूप मोलाची आहे. (आपल्या सोयीप्रमाणे) निसर्गाचे गोडवे गाताना ती घेण्यास मात्र आपण विसरतो. 

संबंधित बातम्या