धिस इज नॉट ‘फेअर’ 

ऋता बावडेकर
सोमवार, 13 जुलै 2020

सहजच...

मनमिळाऊ, सुस्वभावी, समंजस, नाकी-डोळी नीटस, गोरी.. विवाहासाठी मुलीचे हे वर्णन जवळजवळ ठरलेले असते. बाकी शब्द, वर्णन कदाचित बदलेल; पण त्यातला ‘गोरी’ हा शब्द क्वचितच बदललेला कोणी वाचला असेल. हा शब्द नसेल, तर ही जाहिरात अनेकांना अर्धवटच वाटेल. इतके गोऱ्या रंगाचे आपल्याकडे प्रस्थ आहे. मुलाचा रंग कोणताही असो, पण त्याला बायको गोरी‘च’ हवी असते. 

गोऱ्या रंगाचे हे काय आकर्षण आपल्याला आहे, ते का आहे, हे काही कळत नाही.. एरवी ‘पांढरी पाल’ वगैरे म्हणून एखाद्या गोऱ्या मुलीला हिणवणारे आपण, लग्नाच्या वेळी मात्र गोऱ्या मुलीसाठी अक्षरशः अडून बसतो. अर्थात, त्या हिणवण्यातही एक प्रकारची असूया, मत्सर असू शकतो. 

पण एकुणात काय, गोऱ्या रंगाला आपल्याकडे प्रचंड भाव आहे. लग्नाच्या ‘बाजारात’ तर आहेच आहे. एकदा एका स्नेह्यांना मी म्हटले, ‘तुमच्या मुलीचे लग्न पटकन ठरेल, देखणी आहे..’ ते म्हणाले, ‘पण रंग नाही ना.. प्रॉब्लेम येईल बघ.’ आणि खरोखरच तसे झाले. तुलनेत थोडी सुमार असलेल्या त्यांच्या पुतणीचे लग्न मात्र झटक्यात ठरले.. कारण, रंग गोरा! ही बातमी देताना ‘पटले ना?’ अशा अर्थाने ते हसत होते. पुतणीचे लग्न ठरले, याबद्दल दुःख वाटण्याचे काहीच कारण नाही. पण ज्या कारणामुळे या मुलीचे लग्न होत नव्हते, ते वेदनादायक होतेच. बरे तशी गोरी नसली, तरी ती बऱ्यापैकी उजळ होती. तरीही नाही म्हणजे नाहीच... यात तिचे देखणेपण सोडा, तिचा स्वभाव, तिचे वागणे, तिची हुशारी, तिचा सुगरणपणा.. कशाकशाचा विचार झाला नाही. गोरी नाही एवढे कारण नाही म्हणायला पुरेसे होते. सुदैवाने तिचे पालक, घरची मंडळी समजूतदार होती. या कारणामुळे तिला कोणी टोचून बोलले नाही किंवा त्यासाठी कोणी तिला दोषी ठरवले नाही. एवढेच कशाला उजळ होण्याची क्रिमे लावण्याचीही सक्ती कोणी तिच्यावर केली नाही. तिला कुठल्याही प्रकारचा अपराधीपणा वाटणार नाही, अशा पद्धतीने ते आपले काम करत राहिले. काही दिवसांनी त्या मुलीचेही लग्न ठरले. सुदैवाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या... 

सांगायचा मुद्दा हा, की गोरी होण्याचा अट्टहास ना त्या मुलीने धरला ना तिच्या घरच्यांनी! प्रत्येकाने हेच केले किंवा मुलाने - त्याच्या घरच्या मंडळींनी मुलीच्या गोरे असण्याचा आग्रह धरला नाही, तर बाजारातही गोरे होण्याची क्रिमे येणार नाहीत. ती आलीच नाहीत, तर त्यांची नावे बदलण्याची वेळही येणार नाही... आपल्या या गोरेपणाच्या हव्यासामुळे बाजारात, गोरे होण्याची भरपूर क्रिमे आली आहेत. त्यातील एका क्रीमने आपल्या नावातील ‘फेअर’ हा शब्द वगळण्याचा निर्णय घेतला आहे. हे क्रीम प्रचंड लोकप्रिय आहे. पण त्यातील त्यांच्या गोरेपणाच्या दाव्यामुळे वेळोवेळी त्यावर टीका झाली आहे. तसे बघितले, तर यात कंपनीचा किंवा त्या क्रीमचा काहीच दोष नाही. बाजाराची मागणी, ही कंपनी पूर्ण करते आहे. कारण ती व्यवसायासाठी बाजारात उतरली आहे. तिने हे क्रीम नाही काढले, तर दुसरी कोणती तरी कंपनी ते काढेल आणि फायदा उकळेल. त्यामुळे यात कोणत्याच कंपनीचा तसे बघायला गेले तर दोष नाही.. ते फक्त मागणीप्रमाणे पुरवठा करत आहेत. कोणी म्हणेल, ते अवाजवी - चुकीचे दावे करतात.. असतीलही... आणि तसे असेल तर हे सगळे दावे तपासून घेण्याची जबाबदारी, ग्राहक म्हणून आपली आहे. 

खरे तर ही क्रीमे आपण वापरायलाच नकोत. मूळात जो रंग आहे, तो बदलण्याचा अट्टहास का करायचा? त्याने काय साध्य होते? मुख्य म्हणजे, त्वचेचा रंग असा बदलता येतो का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. सगळे डॉक्टर्स हेच सांगतात. हे जर मान्य केले (आणि सगळ्यांना हे माहिती असते), तर कंपन्या अवाजवी दावे करतात, असे म्हणण्याला तरी काय अर्थ राहतो. कारण हे क्रीम जन्माला येण्याचे कारणच मूळात अशास्त्रीय आणि चुकीचे आहे. मग तरी आपण क्रीमला का दोष द्यायचा? खरे तर दोष स्वतःला द्यायला हवा. त्यात ती वापरणारी व्यक्ती, तिला ते क्रीम वापरायला भाग पाडणारे सगळे येतील. 

वर म्हटल्याप्रमाणे, केवळ कंपनी, क्रीमला दोष देऊन उपयोग नाही; तर मुख्य दोष आपल्या मानसिकतेचा आहे. आपल्याला गोरी बायको, सून हवी असते. हा आपला हट्ट पराकोटीचा असतो. पण समोरची मुलगी गोरी नसते. चांगले स्थळ (?) हातचे जाऊ द्यायला मंडळी तयार नसतात, मग काय वापर गोरे होण्याची मलमे... हा प्रकार असा सुरू होतो. 

लग्न, विवाह हा आपल्याकडे फार मोठा विषय आहे. पण त्या पलीकडेही काही गोष्टी असतात. केवळ लग्नातच नाही, एरवीही आपल्याला गोऱ्या माणसांचे फार कौतुक असते. प्रश्‍न आपल्या मानसिकतेचाच आहे. क्रीमचे नाव बदलून काहीही फरक पडणार नाही. एकतर क्रीमचे मूळ नाव प्रत्येकाला माहिती आहे. हे क्रीम कशासाठी प्रसिद्ध आहे, हेही सगळ्यांना माहिती आहे. मग तेवढा शब्द वगळून काय फायदा होणार आहे? आपल्याकडे ज्यांना फार महत्त्व असते, अशा बऱ्याच नटमंडळींनी कंपनीच्या या निर्णयाचे प्रचंड कौतुक केले आहे, पण मूळ उद्देशाचे काय? तो कुठे साध्य होतो आहे? पण त्यांना तरी फार कुठे काय पडले आहे? त्या निमित्ताने प्रसिद्धी मिळते. ते पुढारलेल्या वगैरे विचारांचे ठरतात... 

खरे तर मुलांनीच (मुली-मुलगे दोघेही) आता निर्णय घ्यायला हवा. खूप काही चांगल्या गोष्टी ही मुले करत असतात. परंपरेचे हे जोखडही त्यांनीच फेकून द्यायला हवे. नाही मी गोरी किंवा नाही मी गोरा.. मग? असा प्रश्‍न जेव्हा ते विचारतील तेव्हाच काही फरक पडू  

शकेल.. आणि या कामात कुठल्याही तथाकथित सेलिब्रिटीला घेऊ नये. प्रसिद्धी मिळवणे हा त्यांचा त्यात छुपा हेतू नसेलच असे नाही. ही लढाई (?) आपली आहे, ती आपणच लढायची, असे समजून प्रयत्न करायला हवेत. समविचारी भेटत जातात, कारवा वाढत जातो... समाजाला दखल घ्यावीच लागते. प्रयत्न मात्र प्रामाणिक हवेत...

संबंधित बातम्या