कुमकुम गेली... 

ऋता बावडेकर 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

स्मरण

परवा बातमी होती.. जुन्या जमान्यातील अभिनेत्री कुमकुम यांचे निधन. 

किती जणांना कुमकुम आठवते? खूप थोडे - म्हणजे, अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच लोक असतील कदाचित. त्यापेक्षा जास्त असतील, तर ते तिचे भाग्यच! 

नृत्य म्हटले, की कुकूपासून हेलन, बिंदू, अरुणा इराणी, पद्मा खन्ना, जयश्री टी वगैरेंपर्यंत किंवा शास्त्रीय नृत्यात वैजयंतीमाला, पद्मिनी, रागिणी, हेमामालिनी.. अशी कितीतरी नावे आठवतात. पण यात क्वचितच कुमकुमचे नाव घेतले जाते. वास्तविक, खऱ्या अर्थाने ‘नृत्यबिजली’ म्हणावे, असे तिचे चापल्य होते. ‘उजाला’ या चित्रपटातील ‘ओ मोरा नादान बालमा’ आणि ‘तेरा जलवा जिसने देखा’ ही तिची दोन गाणी बघितली तरी याची खात्री पटेल. क्षणात इथे, तर क्षणात तिथे असा तिचा वावर आहे... अर्थात अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. 

कुमकुमचे वडील नबाब होते. ती मूळची बिहारची. झेबुन्निसा हे तिचे खरे नाव. तिने साधारण ११५ चित्रपटांत भूमिका केल्या. गुरुदत्त यांनी हा चेहरा शोधला. ‘कभी आर कभी पार..’ या गाण्याद्वारे तिचे चित्रसृष्टीत पदार्पण झाले. त्यानंतर ‘ऐ दिल है मुश्‍कील..’ गाण्यात ती दिसली. मेमसाहेब, चार दिल चार राहेमध्ये ती शम्मी कपूरबरोबर दिसली. नर्तकी म्हणून तिला मोठी संधी ‘कोहिनूर’मध्ये मिळाली. ‘मधुबन में राधिका..’ या गाण्यात तिचे नृत्यकौशल्य दिसले. साक्षात दिलीपकुमार यांच्याबरोबर या गाण्यात चमकण्याची संधी तिला मिळाली. प्रसिद्ध नर्तक पं. शंभू महाराज यांच्याकडे कुमकुमने नृत्याचे शिक्षण घेतले होते. 

तिचे किशोरकुमारबरोबरचे ‘गंगा की लहरें’, ‘मि. फंटूश’, ‘मि. एक्स इन बॉम्बे’ वगैरे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. यातील त्यांची ‘मचलती हुई..’, ‘मेरे मेहबूब कयामत होगी..’ ही गाणी खूप गाजली. त्यावेळचे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या चित्रपटांत ती खूपदा झळकली. ‘आँखे’ या आपल्या चित्रपटांत त्यांनी तिला धर्मेंद्रच्या बहिणीची भूमिका दिली. तेव्हापासून म्हणा किंवा काहीही.. कुमकुमच्या वाट्याला दुय्यम किंवा केवळ एखाद्या नृत्यापुरत्या भूमिका येऊ लागल्या. मुख्य नायिका होण्याचे सगळे गुण - पोटेंशियल - क्षमता असूनही आणखी एक चांगली अभिनेत्री दुय्यम भूमिकांत अडकली. 

कोरीव भुवया, टपोरे डोळे, एक डोळा किंचित बारीक करत, ओठांची विशिष्ट हालचाल करणारी, कधी आपले बोट दातात धरणारी, एक भुवई उडवत मादक कटाक्ष टाकणारी कुमकुम आजही अनेकांच्या स्मरणात असेल.. खरेतर ‘घायाळ करणारी’ हे वर्णन अधिक योग्य ठरले असते, पण हा शब्द अलीकडे खूप वेळा वापरून गुळगुळीत झाला आहे. जी येते, ती हल्ली घायाळ करत असते.. त्यामुळे घायाळ नकोच... 

ही तिची ओळख असली, तरी कुमकुमने काही खूप मोठ्या चित्रपटांतही भूमिका केल्या आहेत. भले त्या दुय्यम असतील.. मदर इंडिया, सन ऑफ इंडिया, नया दौर, राजा और रंक, ललकार, गीत.. अशी कितीतरी नावे सांगता येतील. पण नायिका होण्यासाठी आली आणि अधिक करून दुय्यम भूमिका तिच्या वाट्याला आल्या. प्रत्येक भूमिका मात्र तिने मन लावून केली. 

अनेकदा असे होते, की मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्रीपेक्षा दुय्यम भूमिकेतील कलाकारच भाव खाऊन जातात. अनेकींच्या बाबतीत असे घडले आहे.. कुमकुमचे नाव या यादीत खूप वरती असेल. असे सगळे बघितले की वाटते, की असे का होत असेल? अलीकडे एक शब्द वापरतात ‘पीआर’शिप (त्याचा जो काही अर्थ अभिप्रेत असेल तो..).. त्यात तर हे कलावंत मागे पडले नसतील? कारण बहुतेक प्रेक्षकांना पडणारा हा प्रश्‍न आहे, त्यामुळे प्रेक्षकांना आवडला/आवडली नाही, असे नक्कीच नसणार.. कारणे काहीही असतील, पण या कलावंतांना योग्य न्याय मिळाला नाही, एवढे मात्र खरे. ते यशस्वी नव्हते का? तर तसेही नाही, पण चित्रसृष्टीत कोणी मुद्दाम दुय्यम भूमिका करायला येत नाही. प्रत्येकजण मुख्य भूमिकाच करेल असे जरी नसले, तरी जे मुख्य भूमिकेत झळकतात, तो प्रत्येक कलावंत त्या भूमिकांयोग्य असतो का, हा प्रश्‍न उरतोच! 

चित्रपटांतील भूमिकांव्यतिरिक्त दुर्दैवाने कुमकुमची फारशी माहिती उपलब्ध नाही. तिने कधी गॉसिप केले नाही किंवा कोणत्याही गॉसिपचा ती कधी भाग झाली नाही. तिच्या नावाच्याही चर्चा होत्या, पण त्या तिने वाढ दिल्या नाही किंवा त्याला बाजारू स्वरूप येऊ दिले नाही. लग्न करून ती चित्रपटांतून गायब झाली. कुठल्याही चित्रपटांत किंवा टीव्हीवरील एकाही कार्यक्रमांत ती पुन्हा झळकली नाही. खरे तर ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांच्या कुटुंबीयांबरोबर तिचे चांगले संबंध; पण जावेद जाफरी, नावेद जाफरी या जगदीप यांच्या मुलांच्या ‘बूगी वूगी’ या नृत्यविषयक कार्यक्रमातही ती कधी आली नाही. साहजिकच बदलत्या काळाप्रमाणे हळूहळू विस्मरणात गेली.. आणि आता तर कायमची काळाच्या पडद्याआडच गेली... नावेद जाफरी यांनी ट्विट केले, म्हणून तिच्या निधनाचे वृत्त कळले तरी!.. आणि अशी कोणी तारका जुन्या जमान्यात होती, हेही अनेकांना कळले...

संबंधित बातम्या