स्वच्छता - माझी, तुमची! 

ऋता बावडेकर 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

सहजच

यक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता अशा दोन गोष्टी असतात. खरे तर स्वच्छतेबाबतच्या या दोन गोष्टींचा उल्लेख स्वतंत्रपणे व्हायला नको. पण आपल्याकडे तसा होतो. कारण आपण त्या तशाच मानतो. आपल्या डोक्यात याबाबत तसेच दोन स्वतंत्र कप्पे झालेले असतात.. घरात किंवा स्वतःपुरते कसे वागायचे आणि सार्वजनिक जीवनात वावरताना कसे वागायचे हे आपण कुठेतरी ठरवून टाकलेले असते.. आणि हे इतके पक्के असते की हे कप्पे सहसा उघडत नाहीत. आपण ते उघडूच देत नाही. (इथे आपण हा शब्द सरसकट वापरलेला नाही. कारण अपवाद असतातच..) मग इतरांना भले त्याचा कितीही त्रास होवो..  

प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी हिने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांचा वापर किती बेपर्वाईने केला जातो हे तिने त्यात लिहिले आहे. या पोस्टमध्ये ती म्हणते, ‘हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट्स (कमोड्स) असतात. त्यात काही कॉमन टॉयलेट्स म्हणजे स्त्री-पुरुषांकरता एकच टॉयलेट असतं. अशावेळी ते टॉयलेट कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहान वयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवे - अत्यंत गरजेचा विषय आहे असं समजून! 

पुरुष मूत्रविसर्जन करताना कमोडच्या रिंगवर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अशा घाणेरड्या कमोडवर त्या कशा बसत असतील? बसत नसतील तर मग कशा मॅनेज करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळीच्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? 

होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! कमोड कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्याही हायजीन, हेल्थ - आरोग्याशी असतो! सगळ्यांनी या विषयी Openly बोलावं! 

कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर flush ही करत नाहीत... अरे काय? एक button दाबायचं असतं फक्त... तेवढंही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं. असो...

तर commode, western toilet, युरोपियन toilet कसं वापरावं याची आपल्याला google करून माहिती मिळवता येईल पण आपल्यातला साधं flush button ही push करता येत नसल्याचा आळस बघता इथं मी मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 

पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना commode ची रिंग (frame) वर करून आपला कार्यभाग उरकून flush करून झाल्यावर पुन्हा ती frame toilet seat वर पाडायची असते. 

Commode seat स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडं लक्ष द्यावं! व्यवस्थित flush झालंय की नाही ते पाहावं जेणे करून दुर्गंधी येऊन जीव गुदमरून जाऊ नये याची खात्री करून मगच बाहेर पडावं. 

काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू पण पुन्हा ती खाली पाडणार नाही असा भलताच पुरुषी अहंकार गाजवतात त्यांना कोपरापासून दंडवत! 

या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्यानं पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो... पण त्यामुळं होणारे अनेक त्रास, infections याकडं अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय. 

हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावरही अवलंबून असतं याचा विचार करावा! 

प्रत्येकाला ‘मनासारखं’ ‘मनसोक्त’ हलकं व्हावंसं वाटत असतं, याचा आदर व्हावा एवढीच इच्छा! 

या पोस्टमधली भाषा काही लोकांना कदाचित खटकेल. पण त्यातली भावना लक्षात घेतली तर तिची पोटतिडीक लक्षात येईल. बायका दिवसभरात याही दिव्यातून जात असतात हे अनेकांच्या लक्षात येईल. 

मात्र हेमांगी कवीने लिहिले आहे, ती केवळ एक समस्या आहे. त्याच्याशीच संबंधित अशा अनेक समस्या आहेत आणि केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही अशा बेजबाबदार वागताना दिसतात. 

सार्वजनिक स्वच्छतागृह हा प्रकारच बहुतेक आपल्या दृष्टीने वापरा आणि फेकून द्या असा आहे. आपल्यानंतरही येथे कोणी येणार आहे. त्याला किंवा तिलाही ही जागा स्वच्छ असलेली आवडेल हे आपल्या गावीच असत नाही की काय, अशी परिस्थिती आहे. दुसरे कोणी कशाला, काही वेळाने कदाचित आपल्यालालाच इथे यावे लागेल, हेही आपण विसरून जातो आणि मग लोक कसे स्वच्छता पाळत नाहीत वगैरे दूषणे देत राहतो. इतरांकडे बोट दाखवताना वळलेल्या मुठीची इतर बोटे आपल्यावरच रोखलेली आहेत, हे मात्र सोयीस्करपणे विसरून जातो. 

बायकांची एक सवय असते. आत जाऊन आले, की पाय धुवायचे. एरवी ठीक असते, पण बाहेरही असे करताना त्या कसलाही विचार करत नाहीत. एक तर, तो कोरडा भाग ओला होता. आपल्या पायाची, चपलांची घाण त्यामुळे तिथे पसरते. इतर माणसांच्या ये-जा मुळे त्या घाणीत आणखी भर पडते.. आपण पाय धुतले, एक आन्हिक पार पाडले म्हणून या बायका खुश; पण तिथे आपण केलेल्या घाणीमुळे काय राडा झाला याचे  
भानच नाही. 

पावसाचे दिवस होते, आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो. वाटेत चहाला थांबलो. सार्वजनिक स्वच्छतागृहात रांग होती. तोपर्यंत सगळे ठीक होते. एक बाई आत गेल्या आणि फ्लश केल्यानंतर त्यांनी तिथल्या बादलीतले पाणी पायावर ओतून घेतले. दार उघडल्यावर सगळे पाणी बाहेर.. आत ओले, बाहेर ओले... सगळीकडे चिक चिक. एवढे करून काही झालेच नसल्यासारख्या त्या निघाल्या. माझ्या पुढच्या मुलीने त्यांना हटकले. तिचे रुपडे बघून हिला मराठी येत नसावे,असे बाईंना वाटले. त्या तिला समजावे म्हणून म्हणाल्या, ‘हमारेमे ऐसेच करते है। पावपे पानी डालते है।’ कपाळावर हात मारून घेण्याखेरीज काही पर्यायच नव्हता. 

असे अनेक प्रकार सांगता येतील.. 

हे सगळे ऐकले, बघितले, वाचले की वाटते हे लोक घरातही असेच वागत असतील? घरांतही इतकेच बेफिकीर असतील? 

असे म्हणतात, ज्या घराचे स्वच्छतागृह स्वच्छ, ते घर स्वच्छ! आपण कधी हॉटेलमध्ये राहायला गेलो तरी बघा, पहिल्यांदा पण तिथल्या खोलीतील बाथरूम, टॉयलेट्स बघतो; मग बाकीची पूर्ण खोली! ते जर स्वच्छ नसेल, तर स्वच्छ करायला लावतो. पण स्वच्छ असेल तर आपला मुक्काम अधिक चांगला होतो. पण आपल्यातले किती लोक ती स्वच्छता टिकवण्याचा प्रयत्न करतात? बरेचदा सगळीकडे अस्ताव्यस्तच असते. आवरायला कोणी आहे, म्हणून आपण काहीच जागच्या जागी ठेवायचे नाही? 

मला हे वैयक्तिक आणि सावर्जनिक प्रकरणच कळत नाही. घरात प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवण्याचा कटाक्ष असणारे आपण बाहेर गेल्यावर इतके अस्ताव्यस्त कसे होतो? ते आपले नसते म्हणून? दुसऱ्याने वापरलेले मी का स्वच्छ करायचे म्हणून? पण ‘दुसऱ्या’प्रमाणेच आपण ते कधीतरी वापरलेले असतेच ना! प्रत्येकजणच असे म्हणू लागला, तर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ कशी राहणार? बागेत गेले - भेळ खाऊन कागद तिथेच टाकला, चणे-फुटाणे खाल्ले कागद चुरगाळून भिरकावला, गजरा घेतला दोरा तोडून टाकला... आइस्क्रीमची रॅपर्स, सरबतांचे कागदी ग्लासेस, फुगे, फुले... काय काय आपण बागेत टाकून येतो. 

याच किंवा यापैकी काही गोष्टी समजा घरी घेऊन आलो, तर त्या आपण अशा टाकणार आहोत का? खचितच नाही. कोणी तसे केलेच तर कोणाचा तरी चढा स्वर पाठोपाठ येईलच. मग घरात वागतो तसे बाहेर का वागत नाही? 

कुत्री, मांजरे पाळण्याची प्रचंड आवड अनेकांना असते. काही अगदी निगुतीने हे पाळीव प्राणी पाळत असतात, पण काही मात्र समाजावर उपकार म्हणून आपले पाळीव प्रेम दाखवत असतात. मांजरी तर जवळजवळ सोडूनच दिलेल्या असतात. मग त्या इतरांच्या दुधाच्या पिशव्या फोडू देत, घरात घुसून खाण्याच्या भांड्यात तोंड घालू देत नाही तर दुसरा कुठलाही उच्छाद मांडू देत... तक्रार घेऊन गेले, की त्यावेळी मांजरी त्यांच्या नसतात. 

कुत्र्यांच्या बाबतीत थोडी वेगळी परिस्थिती असते. ते त्याच्या बरोबर घरात कसे वागत असतात माहिती नाही, पण रोज सकाळी न चुकता टेकडीवर वगैरे फिरायला नेतात. गळ्यातली दोरी काढून टाकतात आणि मग हा टॉमी - जिमी जो कोणी असा काही उधळतो की फिरायला येणारे आपसूक पळू लागतात. काही बोलायला गेले, की तो/ती काही करत नाही, हे ऐकून घ्यावे लागते. हे डॉगी लोक कुठेही थांबतात, आपला कार्यभाग उरकतात, पुढे चालू-पळू लागतात. तक्रार करावी, तर मालक/मालकीण गायब! टेकडीच काय, हे डॉगी लोक बंगल्यांसमोरही हक्काने आपला कार्यभाग साधत असलेले तुम्हाला दिसतील. 
मग परत प्रश्‍न पडतो, घरांतही असेच वागतात? वागू देतात? 

माणसे म्हणा किंवा प्राणी म्हणा; घरात जर कोणी असे वागत नसेल तर बाहेरच असे बेफिकीर, अस्वच्छ का वागतात? ‘आपले’ घर स्वच्छ ठेवण्याची इतकी ऊर्मी असते तर ‘परिसर’ आपण का नाही स्वच्छ ठेवत? तिथे घाण करायला आपल्याला कसे काहीच वाटत नाही? तो ‘आपला’ नसतो का? मग कोणाचा असतो? 

परदेशात जाऊन आले, की तिथली स्वच्छता, तिथला नीटनेटकेपणा, तिथली शिस्त.. याबद्दल आपल्यातले बहुसंख्य लोक भरभरून बोलत असतात. तिथले दाखले देत असतात. मग आपल्या देशात, आपल्या भागात तसे वागायला कोणी अडवलेले असते? 

एक गंमत आहे - घर माझे, गच्ची माझी, अंगण माझे.. मग त्या अंगणापलीकडचा परिसर कोणाचा? तो मात्र माझा नाही. असे कसे? 

वास्तविक तो परिसरही माझाच, त्यापलीकडचा भागही माझाच.. कारण त्यासाठी माझेच रक्त वापरले जात आहे. मी कष्ट करते/तो, त्यातील पैसा मी प्रामाणिकपणे टॅक्स म्हणून भरते/तो. मग हा सगळाच परिसर माझा आहे. तो मीच स्वच्छ ठेवला पाहिजे. माझा खारीचा वाटा उचललाच पाहिजे. काही गोष्टी येत नसतील तर शिकून घ्यायला पाहिजेत. ‘कोणीतरी’ येईल - करेल, ही वृत्ती सोडायला पाहिजे. ते ‘कोणीतरी’ मीच का नाही? असा प्रश्‍न जेव्हा पडेल आणि पुढे होऊन आपण काम करू तेव्हा कोणीही तक्रार करणार नाही.. 

नुकताच १५ ऑगस्ट होऊन गेला.. एवढे आशावादी राहायला हरकत नसावी, नाही का?

संबंधित बातम्या