.... केवळ माझा सह्यकडा

मिलिंद देशपांडे
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सह्यगिरी

महाराष्ट्राला लाभलेली दक्षिण – उत्तर रांग हे आपणासारख्या भटक्यांचे नंदनवनच जणू. सह्याद्रीच्या या डोंगररांगा, दऱ्याखोऱ्या फक्त डोंगरभटक्यांनाच साद घालत नाहीत, तर असंख्य निसर्गप्रेमी, पशुपक्षीप्रेमी आणि साहसप्रेमी यांचे हे मुख्य आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही पुण्यभूमी आपल्या अंगाखांद्यावर असंख्य किल्ले, गिरिशिखरे डौलाने मिरवीत आपल्याला साद घालीत असते. गुजरातच्या सीमेपासून तिलारी नदीपर्यंत शेकडो किलोमीटर पसरलेला हा सह्याद्री आपल्या सौंदर्याने खुलून दिसतो. 

सह्याद्रीच्या रांगांमध्ये काय नाही? महाराष्ट्राचे ‘एव्हरेस्ट’ असलेले कळसूबाई शिखर, किल्ल्यांमध्ये सर्वोच्च असलेला साल्हेरसारखा किल्ला, फिरून फिरून चक्कर येणारी घनचक्करची रांग, असंख्य धबधबे, प्राचीन मंदिरे, इतिहासाची साक्ष देणारे बेलाग किल्ले, लाटांचे अखंड प्रहार सहन करीत ताठ मानेने उभे असलेले जलदुर्ग, मनाला भुरळ घालणारी अनेक सदाहरित जंगले आणि त्यामध्ये नांदणारे पक्षी-प्राणी वैभव व एकूणच तेथील जैवविविधता, देशावरून कोकणात उतरणाऱ्या पारंपारिक घाटवाटा हे सगळे वैभव याची देही याची डोळा अनुभवायचे असेल तर भटकंतीला पर्याय नाही. 

गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ मी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अनगड वाटांनी आणि नगाधिराज हिमालयातील हिमशिखरांच्या सान्निध्यात पायाला भोवरा लावून फिरत आहे. या माझ्या पायी भटकंतीत हजारो शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकवर्ग आणि काहीवेळा मनाने तरुण असलेले ज्येष्ठ नागरिकसुद्धा सहभागी झाले. मला आलेल्या अनुभवांची आणि माहितीची शिदोरी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो. ‘कात्रज ते सिंहगड’ हा पहिला लांबलचक ट्रेक मी १९७५ साली ज्येष्ठ गिर्यारोहक उषःप्रभा पागे यांच्या बोटाला धरून केला, त्यानंतर आजतागायत माझ्या पायांना विराम दिलाच नाही. या संपूर्ण प्रवासात दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर ऊर्फ आप्पा, बाबासाहेब पुरंदरे, प्रा. प्र. के. घाणेकर, हरीश कापडीया आणि आता आपल्यात नसणारे निनादराव बेडेकर व प्रमोद मांडे यांसारख्या मातब्बर मंडळींचा नुसताच सहवास लाभला नाही, तर त्यांच्याबरोबर अनेक दुर्गवाऱ्या करण्याचे भाग्य लाभले, हे माझे नशीब. 

सह्याद्री कसा भटकावा?  
आपण समजतो किंवा ऐकतो तितका सह्याद्री निश्चितच सोपा नाही. पण भान ठेवून आणि डोळसपणे भटकंती करायचा मानस असेल तर ही सह्याद्रीची रांग आणि  

भटक्यांना साद घालणारे त्यावरील दुर्गवैभव आपल्याला कायमच खुणावत राहील हे खरे. मुळात ट्रेकींगच्या बाजूने विचार केला तर सह्याद्रीतील किल्ल्यांचे तीन प्रकार सांगता येतील. सोपे, मध्यम आणि अवघड. सोप्या किल्ल्यांवर जाण्यासाठी कोणतीही शारीरिक कसरत करावी लागत नाही. उदाहरणार्थ सिंहगड, पुरंदर, लोहगड हे किल्ले पायवाटेने थोडीफार दमछाक होऊन सहज गाठता करता येतात. मध्यम प्रकारात मोडणाऱ्या किल्ल्यांवर मात्र वाटांची माहिती असलेला आणि त्यांची खात्री असलेला नेता आवश्यक आहे. अन्यथा तेथील स्थानिक वाटाड्या नेणे योग्य. नाहीतर वाट चुकून सगळेच गणित किंवा वेळापत्रक कोलमडते आणि सहकाऱ्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. उदा. वनदुर्ग वासोटा आणि नागेश्वर, प्रचितगड, मकरंदगड, जीवधन, साल्हेर-सालोटा वगैरे इंग्रजांनी सन १८१८ नंतर अनेक किल्ले आणि त्यावर जाणारे मार्ग उध्वस्त केले. त्यामुळे बऱ्याच किल्ल्यांच्या माथ्यांवर आता प्रस्तरारोहणाचे (रॉक क्लाइंबिंग) कसब आणि तंत्र वापरल्याशिवाय पोहोचूच शकत नाही आणि येथेच खरी कसोटी लागते. जर तुमचा नेता गिर्यारोहण क्षेत्रातील तज्ज्ञ नसेल तर हे साहस नक्कीच तुमच्या अंगचटीला येऊ शकते. असे अनेक अपघात या सह्याद्रीने नाइलाजास्तव पाहिले आहेत. 

इगतपुरीजवळील किंवा भंडारदरा जलाशयाच्या काठावर, तसेच कळसुबाईच्या रांगेत दिमाखाने उभे असलेले अलंग, मदन आणि कुलंग हे किल्ले निश्चितच अवघड या श्रेणीत मोडतात. या किल्ल्यांकडे दुरून पाहिले तरी छातीत धडकी भरते. आणि यांच्या माथ्यावर पोहोचणे हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. कारण अशा किल्ल्यांवर स्थानिक वाटाड्या तसेच कुशल गिर्यारोहक नेता सोबत असेल तरच आपण सुरक्षितपणे अशा कठीण किल्ल्यांची भ्रमंती करू शकतो. पण ‘मी आहे ना?’, ‘एकदम सोपे आहे,’ या भावनेतून गेलो तर आपण हमखास अपघाताला निमंत्रण देतो. हा फाजील आत्मविश्वास खरेतर सह्याद्रीतल्या भ्रमंतीत कोठेच नसावा. 

असे अनेक अवघड किल्ले, सुळके, प्रस्तरभिंती आणि अनगड वाटा पुण्यातील सेफ क्लाईंबिंग इनिशिएटीव्ह (एससीआय) या संस्थेच्या कसलेल्या गिर्यारोहकांनी प्रस्तरारोहणामध्ये वापरण्यात येणारे खिळे (केमिकल बोल्ट) मारून अत्यंत सुरक्षित केले आहेत. असे असले तरीही उत्तम जाण असलेल्या गिर्यारोहकांशिवाय हे धाडस करूच नये. आजकाल गुगल, फेसबुकच्या युगात कुठलेही ट्रेकिंगचे मार्ग किंवा भटकंतीयोग्य सर्व पर्यटनस्थळे एका क्लिकवर तुम्ही शोधू शकता. पण माहीतगार बरोबर असल्यास तेथील ऐतिहासिक घटना, किल्ल्याच्या किंवा शिखराच्या आजूबाजूला ३६० अंशात दिसणारे इतर किल्ले आणि डोंगररांगा, तेथील जैवविविधता याची ओळख होऊन आपल्याला ज्ञानप्राप्तीदेखील होते. नाहीतर समर्थ रामदासांनी सांगितल्याप्रमाणे ‘बहुत हिंडता सुख होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही’ अशीच अवस्था होते. आपण फक्त किल्ल्यावर जाऊन आलो, पण तो पाहिला नाही हे मनाला सतत सतावत राहते. हे किल्ले म्हणजे आपली स्फूर्तीस्थाने आहेत त्यामुळेच गडकिल्ले तिथे आपल्याजवळचे काहीही ठेऊ नका आणि आठवणींशिवाय तिथून काहीही आणू नका हेच खरे.

ट्रेकिंग का गरजेचे ? 
खरेतर मी ज्या काळापासून भटकंती करत आहे, तेव्हापासून ते आजमितीस या क्षेत्रात सातत्याने बदल होत गेला आहे. सध्या यात विलासी प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत हे मला जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगावेसे वाटते. साधारणतः सन २००० पर्यंतच्या काळात किल्ल्यांच्या पायथ्याशी पोहोचणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम होते. कारण अंतर्भागातील कच्चे रस्ते, पुरेसा विकसित न झालेला ग्रामीण व आदिवासी भाग, अपुरी वाहनव्यवस्था, ट्रेकिंग किंवा गिर्यारोहणाच्या छंदाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी यामुळे गडकिल्ल्यांवर भटकणारे विक्षिप्तच ठरविले जात असत. पण हळूहळू या छंदाचा प्रसार झाला. अनेक मान्यवरांनी याबाबत पुस्तकांच्या आणि लेखांच्या माध्यमातून केलेले विस्तृत लिखाण आणि प्रसिद्धी पुढील पिढीला एक वेगळे वळण लावत गेले. आज त्याचा झालेला प्रसार किती मोठा आहे हे आपण सर्वजण पाहतोच आहोत. 

माझ्या दृष्टीने आणि गेल्या चाळीस वर्षांच्या अनुभवाने मी हे दाव्यानिशी म्हणेन, की ट्रेकिंग व माउंटेनियरिंग हा केवळ छंद नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे’ ते एक उत्कृष्ट साधन आहे. संघभावनेतून पुढे जाणारी ही एक उत्तम शाळा आहे. सध्याच्या फिटनेसच्या वेडाची पूर्तता करण्यासाठी हे माध्यम अत्यंत उपयुक्त आहे. हे सर्व उपक्रम तुमच्या भावी जीवनात तुमचे मार्गदर्शक ठरतात यात शंका नाही. हा छंद जोपासल्याने संघभावना आणि सहनशीलता वाढीस लागते, अनावश्यक गरजांना आपोआप आवर घातला जातो. इतिहास-भूगोलाचे ज्ञान वाढीस लागून; पक्षी-प्राणी निरीक्षण, फोटोग्राफी व गिर्यारोहणाचे तंत्र हळूहळू अवगत होते. तसेच एकूणच निसर्गाचे घटक व त्यांचे अपापसातील नाते यांची जाण वाढीस लागते. आपल्यात मुळातच असलेल्या साहसी वृत्तीला योग्य ती चालना मिळते. ही सर्व क्षेत्रे पादाक्रांत करत असताना मला नक्की कोणते क्षेत्र निवडायचे, हे ठरवून अनेक जणांनी यातून रोजगार निर्माण केला ही आनंदाची गोष्ट आहे. आजमितीस संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक संस्था व खासगी कंपन्या विविध पदभ्रमण मोहिमांचे सातत्याने आयोजन करतात पण सहभागी होणाऱ्यांनी मात्र त्यांच्यासमवेत जाताना आयोजकांचा या क्षेत्रातील अनुभव किती वर्षांचा आहे, त्यांच्याकडील साधनसामग्री योग्य आहे का नाही हे निश्चित पडताळून पहावे, म्हणजे आपणास नंतर पश्चात्तापाची पाळी येणार नाही. यात कोणाचेही मोजमाप करायचा हेतू नसून, आजवर आलेल्या अनेक अनुभवातून हे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

आपल्याला नक्की काय पहायचे 
आहे आणि ते आपल्याला झेपणारे आहे का, हा विचार करूनच मार्गक्रमण करावे. ट्रेकिंगमध्ये कुठल्याही पंचतारांकित सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे कमीतकमी सामान घेऊन जास्तीतजास्त उत्तम भटकंती हा ट्रेकिंगचा मूलमंत्र जपून केलेली भटकंती कायम स्मरणात राहते, अन्यथा ‘जे जे मिळेल ते ते घ्यावे, अडचणीस कारण व्हावे आपुले आपण’ ही अवस्था होते. गडावरील देवळात, गावातील शाळेत, वेळप्रसंगी उघड्यावर; आकाशाशी संवाद साधत, बेफाम वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता परिसराशी हितगूज केले तर हा सखासह्याद्री तुम्हाला नक्कीच भावेल.

मित्रांनो काळजी घ्या 
गडांवर गेल्यावर उचित भान ठेवणे आणि या पवित्र वास्तूंचा मान ठेवणे हे आपले परमकर्तव्य आहे, ही जाण प्रत्येकाच्या मनात असणे आवश्यक आहे. गडांच्या तटबंदीवर, अन्य वास्तूंवर स्वतःचा नामोल्लेख करून ते विद्रूप करणे, तटांचे दगड लोटून देणे, पाण्याची खोली माहीत नसताना बिनदिक्कतपणे पोहणे, मद्यपान करणे आणि कहर म्हणजे अवघड जागी जाऊन ‘सेल्फीचा नादच खुळा’ म्हणत अपघाताला निमंत्रण देणे, कचरा करून पर्यावरणाचा ऱ्हास करणे हे टाळल्यास ही दुर्गसंपदा आणि तेथील वास्तू तुमच्याशी बोलल्याशिवाय राहणार नाहीत. 

अशा या सह्याद्रीच्या रांगांच्या वाऱ्या करताना, बिनभिंतीच्या या उघड्या शाळेत लाखो गुरूंनी मला उदंड शिकविलंय आणि दिलंयही. जिवाची बाजी लावून सह्याद्रीतील अनेक सुळके आणि कडे मी सर करू शकलो; सह्याद्रीतल्या अनगड वाटा पायाखालून घालू शकलो, अनेक अपरिचित दुर्गांवर भ्रमंती करू शकलो.

ट्रेकिंग व माउंटेनियरिंग हा केवळ छंद नसून ‘व्यक्तिमत्त्व विकासाचे’ ते एक उत्कृष्ट साधन आहे. संघभावनेतून पुढे जाणारी ही एक उत्तम शाळा आहे. सध्या फिटनेसच्या लागलेल्या वेडाची पूर्तता करण्यासाठी हे माध्यम अत्यंत उपयुक्त आहे. 

संबंधित बातम्या